मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
बाहीचे ह्या तुटेबटण सदर्...

उमाकांत मालवीय - बाहीचे ह्या तुटेबटण सदर्...

अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


बाहीचे ह्या तुटेबटण
सदर्‍याची उसवली शिवण

तुझी आठवण पदोपदी येण्याचे हे प्रसंग सारे

पुटे धुळीची मेजावरती
शिळ्या फुलांची ही फुलदाणी
इथे तिथे विखरुन पडलेली
कितिक पुस्तके केविलवाणी

शिणलेले - थकलेले हे तन
संवादास्तव आसुसले मन

तुझी आठवण पदोपदी येण्याचे हे प्रसंग सारे

रुमाल मळका किती दिसांचा
कुठे ठेवली किल्ली न कळे
कुंकुमरेखेविनाच ऐना
जागेवरती वस्तू न मिळे

माजघराची धुरकट घुसमट
मिठू मिठू हा बोले पोपट

तुझी आठवण पदोपदी येण्याचे हे प्रसंग सारे
कुणा कथावी तडफड, तगमग
दाढी करताना गाल चिरे
लावलास ना गुलाब तू जो
फूल त्यावरी पहिले बहरे

प्रतीक्षेतले पत्राच्या क्षण
मधुगुंगीचा दंश विलक्षण

तुझी आठवण पदोपदी येण्याचे हे प्रसंग सारे

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP