स्कंध ११ वा - अध्याय १५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥१९२॥
जितेंद्रिय शांत जितश्वास योगी । चित्त मजमाजी स्थापी तया ॥१॥
प्राप्त होती सिध्दि, बोले भगवान । उध्दववचन पुढती ऐका ॥२॥
उध्दव अच्युता म्हणे धारणेनें । कोणत्या, किंन्नामें किं स्वरुपा ॥३॥
कतिविध सिध्दि तेंही देवा, कथीं । सिध्दिप्रद तूंचि योगीजनां ॥४॥
देव म्हणे योगवेत्ते अष्टादश । कथिती सिध्दि अष्ट मुख्य मम ॥५॥
अवशिष्ट दश सत्वगुणाधीन । ’ अणिमा ’ ’ महिमा ’ जाण ’ लाधिमा ’ त्रय देहसंबंधी या,
’ अदृष्टदर्शन ’ ’प्राकाश्य ’ तें जाण ’ ईशिता ’ ही ॥७॥
अनासक्ति तोचि ’ वशिता ’ जाणावी । ’ कामपूर्ति ’ व्हावी अंतिम ते ॥८॥
वासुदेव म्हणे अष्टासिध्दि ऐशा । ईश्वराधीन या सर्वश्रेष्ठ ॥९॥
६-९

॥१९३॥
’ अनर्मिमत्व ’ तैं ’ दूरश्रवण-दृष्टि ’ । तेंवी ’ शीघ्रगति ’ ’ कामरुप ’ ॥१॥
’ परकायाप्रवेश ’ ’स्वच्छंदमरण ’ । ’ अप्सराप्रापण ’ ’हेतुसिध्दि ’ ॥२॥
’ विरंकुश आज्ञा ’ गौणासिध्दि दश । क्षद्रही त्या पंच निवेदीन ॥३॥
’ त्रिकालज्ञान ’ तै ’ द्वंद्वसहिष्णुत्व ’ । ’ परचित्तबोध ’, ’ स्तंभन ’ तें ॥४॥
’अजिंक्यता ’ ऐशा क्षुद्रासिध्दि जाणा । कथितो धारणा वासुदेव ॥५॥
१०-१७

॥१९४॥
तन्मात्रा मी, त्यांचे चिंतितां आणिमा । महत्वोपासना महिमादाई ॥१॥
भूरपरमाणुरुपा मजप्रति । चिंती जो तयासी ’ लघिमा ’ लाभे ॥२॥
अहंकारतत्व ध्यातां नियंतृत्व । ’ प्राप्ति ’ ते अपूर्व सिध्दि लाभे ॥३॥
क्रियाशक्तियुक्त अव्यक्त सूत्रात्मा । चिंतितां उत्तमा ’ प्राकाश्य ’ ते ॥४॥
कालरुपी विष्णुध्यानें ते ’ प्रभुता ’ । जडाजड सत्ता प्राप्त जेणें ॥५॥
तुरीयस्वरुपध्यानें ते ’ वशिता ’ । निर्गुणा चिंतितां ’ कामपूर्ति ’ ॥६॥
वासुदेव म्हणी ऐशा महासिध्दि । लाभती जयासी ईश्वर तो ॥७॥
१८-२३

॥१९५॥
श्वेतद्वीपपति शुध्दधर्मा जो मी । चिंती त्या षडूर्मी बाधतीना ॥१॥
आकाशस्थ प्राण समष्टिस्वरुप । दूर ’ श्रवणलाभ ’ चिंती तया ॥२॥
सूर्यामाजी दृष्टी, दृष्टिमाजी सूर्य । चिंती त्या अपूर्व ’ दूरदृष्टि ’ ॥३॥
मन:प्राण चिंती मत्संयुक्तरुपें । ’ शीघ्रगति ’ त्यातें सिध्दि लाभे ॥४॥
ध्याऊनि मजसी इच्छील जे तेंचि । ’ रुप ’ ’ रुपसिध्दि ’ नाव तया ॥५॥
दृढभावनेनें ’ परकायाप्रवेश ’ । पुष्पामाजी भृंग प्रवेशे जैं ॥६॥
वासुदेव म्हणे शुध्द संकल्पेंचि । सकलही सिध्दि दृढाभ्यासें ॥७॥
२४-२७

॥१९६॥
गुद पार्ष्णीनें पीडितां । प्राणापानांसी एकता ॥१॥
पुढती इष्टचक्रांतूनि । जावें देहासी त्यजूनि ॥२॥
’ इच्छामरण ते सिध्दि ’ । यत्नें संपादिती योगी ॥३॥
शुध्द सत्वरुपा मज । ध्यातां करावा संकल्प ॥४॥
प्राप्त होती देवांगना । ’सिध्द संकल्प ’ तो जाणा ॥५॥
सर्व नियंतृत्व माझें । प्राप्त होई याचि मार्गे ॥६॥
वासुदेव म्हणे क्षुद्र । सिध्दींचाही ऐका मार्ग ॥७॥
२८-३४

॥१९७॥
त्रिकालज्ञ ईशस्वरुपाचें ध्यान । करितां तें ज्ञान योगितांसी ॥१॥
जन्म-मरणादि बोध तया सर्व । तेंवी परांतर बोध तेणें ॥२॥
अग्न्यदि स्तंभन चिंतितां मुद्रूप । चिंतितां अवतार अजिंक्यत्व ॥३॥
योगधारणेनें ऐशा सर्व सिध्दि । सादर सेविती योगियातें ॥४॥
शमधारणेनें प्राणायामरत । भक्ताच्या अंकित ऋध्दि-सिध्दि ॥५॥
मत्पदप्राप्तीचीं विघनेंचि या सिध्दि । मुमुक्षूनें फंदी न पडावें या ॥६॥
जन्मौषधि, तप, मंत्रानें ज्या सिध्दि । योगें त्या, योगाची पदवी न त्यां ॥७॥
वासुदेव म्हणे कामना त्यजिती । तयां निष्कामांसी ईशप्राप्ति ॥८॥
३५-३६

॥१९८॥
पालक, पोषक, प्रवर्तक मीचि । सकल सिध्दिसी स्वामीही मी ॥१॥
सांख्ययोगधर्म ब्रह्मज्ञान स्वामी । उध्दवा, जाण मी पति, प्रभु ॥२॥
अंतर्बाह्य मी हें व्यापियेलें विश्व । आवरण मज नसे कांही ॥३॥
पंचभूतें जेंवी विश्वी अंतर्बाह्य । व्यापिती तैं साच नियंता मी ॥४॥
वासुदेव म्हणे लीला श्रीहरीची। ऋध्दि-सिध्दि -मुक्ति कृपा त्याची ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP