स्कंध ११ वा - अध्याय २ रा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥९॥
महामुनि शुक निवेदिती राया । रक्षक ज्या ठाया परमात्मा तो ॥१॥
द्वारकेंत तया वसती येऊनि । वारंवार मुनि ब्रह्मसुत ॥२॥
सर्वत्र पाहूनि मृत्युभय लोकीं । त्या देववंद्यासी न भजे कोण ॥३॥
एकदां पूजूनि वसुदेव नारदा । सुआसनस्थिता प्रश्न करी ॥४॥
जगत्कल्याणार्थ भ्रमतां सर्वत्र । माता-पिता, संत त्रैलोक्याचे ॥५॥
देवांचेंही कर्म सुख-दु:खाप्रद । संत मात्र शुध्द सौख्यदाते ॥६॥
वासुदेव म्हणे संतांची थोरवी । ऐकूनियां घ्यावी वसुदेवोक्त ॥७॥

॥१०॥
भजती जे जेंवी तयां छायेसम । देव कर्मासम फल देती ॥१॥
दिनवत्सलचि परी थोर संत । नित्य निरपेक्ष करिती दया ॥२॥
संतश्रेष्ठ मुने, वंदन तुजसी । पृच्छा एक माझी असे अद्य ॥३॥
सश्रध्द श्रवणें सर्वभयमुक्ति । लाभते मर्त्यासी निश्चयानें ॥४॥
भागवतधर्म तेंचि कथीं मज । मायाविमोहित झालों पूर्वी ॥५॥
तेणे मोक्षप्रद अनंताची पूजा । करुनियां प्रजा इच्छियेली ॥६॥
यास्तव संकटनिवारक मार्ग । दाखवीं तूं मज मुनिश्रेष्ठा ॥७॥
वासुदेव म्हणे बोलले तैं शुक । कृष्णकथामृत स्मरती मुनि ॥८॥

॥११॥
वसुदेवाप्रति बोलले नारद । प्रश्न मोक्षप्रद केलासी हा ॥१॥
श्रवण, पठण, ध्यान, अनुमोदन । आदरही जाण ज्या धर्माचा ॥२॥
देव-विश्वद्रोही तोंही तत्काळचि । लागे सन्मार्गासी धूतपाप ॥३॥
श्रवण कीर्तन पुण्यप्रद ज्याचें । स्मरण तयाचें तुझ्यायोगें ॥४॥
वसुदेवा, ऐकें विदेह- और्षभ । संवाद, जो श्रेष्ठ बोधकारी ॥५॥
स्वायंबु मनुचा पुत्र प्रियव्रत । सुत त्या आग्नीध्र, नाभी तया ॥६॥
नाभीचा वृषभ जाणें ईश्वरांश । तया शतपुत्र, भरतश्रेष्ठ ॥७॥
ख्यात त्याच्या नामे हर्ष हें विश्वांत । नारायण भक्त भरत राजा ॥८॥
वासुदेव म्हणे तीन जन्में मोक्ष । लाभे भरतास जया, तो हा ॥९॥

॥१२॥
अन्य नवसंख्य नवखंडाधिप । सत्कर्म निरत एक्याऐशीं ॥१॥
अवशिष्ट नऊ योगी महाज्ञाते । सर्व शास्त्रवेत्ते दिगंबर ॥२॥
कवी, हरी अंतरिक्ष तैं प्रबुध्द । पिप्पलायन श्रेष्ठ आविर्होत्र ॥३॥
द्रुमिल, चमस, तो करभाजन । नामें ऐसी जाण ज्ञात्यांचीं त्या ॥४॥
विश्व, विश्वनाथ रुप तें जाणूनि । भ्रमण अवनीवरी त्यांचें ॥५॥
त्रैलोक्यसंचार करितां एकदां । आले जनकाच्या ज्ञानसत्रीं ॥६॥
वासुदेव म्हणे संतांचे दर्शन । होतां महापुण्य लाभतसे ॥७॥

॥१३॥
महा योग्यांचें त्या सूर्यासम तेज । पाहूनि स्वागत करिती सर्व ॥१॥
उत्थापन देती अग्नीसवें त्यासी । सुस्थानीं बैसवी राव तयां ॥२॥
पुजूनियां नम्रभावें त्यां जनक । होऊनि हर्षित प्रश्न करी ॥३॥
पार्षदांचे तुह्मी वाटे श्रीहरीचे । भक्तहितार्थ जे भ्रमती नित्य ॥४॥
नृदेह दुर्लभ हा क्षणभंगुर । तेथ सुदुर्लभ संतभेटी ॥५॥
अर्धक्षणही ते, लाभतां कल्याण । आत्यंतिक क्षेम कथा मज ॥६॥
पात्र जरी आह्मीं, तरी ते समस्त । धर्म भागवत निवेदावे ॥७॥
भागवतधर्मे वागे जो प्रपन्न । तयासी प्रसन्न आत्मराज ॥८॥
वासुदेव म्हणे प्रश्न तो ऐकूनि । संतोषले मनीं मुनीश्रेष्ठ ॥९॥

॥१४॥
कवि बोलती रायासी । मृत्युभय न भक्तासी ॥१॥
भव असत्य जाणूनि । विषयवैराग्यें जो मनीं ॥२॥
सेवी ईशपादांबुजां । मुक्ति पायांतळीं त्याच्या ॥३॥
भक्तीविण अन्य मार्ग । नसे निर्भय होण्यास ॥४॥
अज्ञातेंही सुलभतेनें । आत्मलाभ होई ज्ञानें ॥५॥
ऐसें उपाय ईशोक्त । तेचि धर्म भागवत ॥६॥
वासुदेव म्हणे भक्ति । मात्रा एक भवरोगाची ॥७॥

॥१५॥
कदाही न किंतु चालतां हा पथ । झांकूनिही नेत्र पुढटी जातां ॥१॥
धांवतांही ठेंच, पतन वा नसे । निर्भयत्व ऐसें अन्यत्र न ॥२॥
काया-वाचा, मन, इंद्रियें वा बुध्दि । अहंकारही जीं कर्मे करी ॥३॥
प्रारब्धयोगें वा कर्म घडे जें जें । समर्पावें तें तें नारायण ॥४॥
वासुदेव म्हणे मर्म हें भक्तीचें । जाणतां, कर्माचें भय काय ॥५॥

॥१६॥
मायाबळें ईशपराड्‍.मुखालागीं । विपरीत बुध्दि विस्मृतीनें ॥१॥
तेणें द्वैतभान होऊनियां भय । पावूनियां, भवपंकी रुते ॥२॥
यास्तव सद्‍गुरु देवता मानूनि । एकभावें मनीं घ्यावा ईश ॥३॥
जीवन्मुक्तिलाभ घडे न जोंवरी । मार्ग हा तोंवरी सोडूं नये ॥४॥
स्वप्नसृष्टीसम अविद्यमानही । भासे विश्व पाही संकल्पानें ॥५॥
यास्तव आंवरी मन जो सर्वदा । पावे अभयता तोचि एक ॥६॥
रथांगपाणीचें जन्म-कर्मवृत्त । ऐकूनि सुभद्र या लोकीचें ॥७॥
वासुदेव म्हणे निर्लज्ज, नि:संग । होऊनिया दंग भजनीं व्हावें ॥८॥

॥१७॥
आवडीचें ऐशा व्रतें, गातां नाम । भरुनियां प्रेम बाहूं लागे ॥१॥
तेंणें उच्चस्वरें हास्य वा रुदन । तेंवी आक्रंदन गान करी ॥२॥
उन्मत्त होऊनि नाचेहि तो कदा । लोकबाह्य क्रीडा ऐशा करी ॥३॥
चराचएर विश्व देह श्रीहरीचा । मानूनियां भूतां वंदी भक्त ॥४॥
वासुदेव म्हणे सरित्समुद्रही । भूतमात्र होई भक्तां हरि ॥५॥

॥१८॥
ईशप्रेम, साक्षात्कार । तेंवी वैराग्य अन्यत्र ॥१॥
अनुभव हा त्रिविध । भोगी एकाकालीं भक्त ॥२॥
तुष्टी, पुष्टि, क्षुधानाश । भक्षितां जैं प्रतिग्रास ॥३॥
भक्ति, विरक्ति- प्रबोध । अखंड ज्या अच्युतछंद ॥४॥
वासुदेव म्हणे भक्ति । परिणामी तेंचि शांति ॥५॥

॥१९॥
राम म्हणे मुने, कैसा ईशभक्त । बोले, चाले, वृत्त सकल कथा ॥१॥
लक्षणें ज्या प्रीति संपादी हरीची । निवेदा मजसी तेंही सर्व ॥२॥
हरिमुनि तदा बोलती रायासी । ईश्वर जयासी सर्वाभूतीं ॥३॥
भगवंती पाही सकलही भूतें । श्रेष्ठ भक्त त्यातें म्हणती संत ॥४॥
प्रेम भगवंती भक्तांसवे मैत्री । कृपा अज्ञावरी सर्वकाल ॥५॥
द्वेष्टयांची उपेक्षा ऐसा ज्याचा बाणा । मध्यम तो जाणा भागवत ॥६॥
हरिमूर्तीमाजी पाहूनियां देव । पूजा करी भाव ठेवूनियां ॥७॥
परी भक्तांमाजी अथवा सर्वत्र । पाही न जो ईश प्राकृत तो ॥८॥
वासुदेव म्हणे उत्तमादि ऐशा । जाणूनि अवस्था यत्न घडो ॥९॥

॥२०॥
विषयग्रहण करितांही हर्ष । द्वेष, न जयास उपजे मनी ॥१॥
जाणुनियां विष्णुमायामय जग । श्रेष्ठ भागवत समजा तोचि ॥२॥
जन्म-मृत्यु देहा, प्राणा क्षुधा-तृषा । भीति मना, इच्छा बुध्दिधर्म ॥३॥
ईशस्मरणें हे बाधती न जया । सर्वश्रेष्ठ तया जाणें भक्त ॥४॥
वासुदेवप्रेमें कामकर्म बीजें । रुजती न जेथें पेरितांही ॥५॥
जन्म-कर्म वर्णादींचे अहंभाव । जया न तो प्रिय भगवंतासी ॥६॥
वासुदेव म्हणे श्रेष्ठ ऐसें गुण । तोचि भक्तोत्तम हरिसी प्रिय ॥७॥

॥२१॥
देह-गेहादिकीं आपपर भेद । मावळे, समत्व सर्वभूतीं ॥१॥
शांत, समाधानी सदा ज्याचें चित्त । उत्तम तो भक्त ध्यानी घ्यावें ॥२॥
त्रैलोक्यराज्यही लेखूनियां तुच्छ । समरण अखंड न चुके ज्यांचे ॥३॥
आजितात्मे देवादिकही यत्पाद । शोधिताती नित्य तींच पदें ॥४॥
क्षणही न चिंत्तांतूनि दूर होती । वैष्णवाग्र्य तोचि ध्यानी घेई ॥५॥
वासुदेव म्हणे अर्धक्षणही न । ईशविस्मरण भक्तांलागीं ॥६॥

॥२२॥
आल्हादकारक चंद्र प्रकाशतां जेंवी । ताप नष्ट होई रजनीमाजी ॥१॥
तेंवी दीप्त पादनखाग्रें, जयाचे । निवारित साचे सकल ताप ॥२॥
उद्भव तयांचा केंवी पुनरपि । शाश्वत पदासी अवलंबितां ॥३॥
नकळतां नाम येतां मुखामाजी । पातकांच्या राशी दग्ध्द करी ॥४॥
ऐशा श्रीहरीचीं चरणकमळें । शुध्द भावबळें ह्र्दयीं ज्याच्या ॥५॥
प्रेमपाशबध्द तोचि भक्तश्रेष्ट्ज । म्हणावा, म्हणतात ज्ञाते तेंचि ॥६॥
वासुदेव म्हणे भागवतोत्तम । स्वयें पुरुषोत्तम अंतर्बाह्य ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP