स्कंध ११ वा - अध्याय ८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥९८॥
इंद्रियसौख्य तें दु:खचि सर्वत्र । लाभे अकस्मात प्रारब्धानें ॥१॥
यास्तव ज्ञात्यानें तदर्थ प्रयत्न । न करावा जाण धरुनि इच्छा ॥२॥
यदृच्छाप्राप्त जें अस्वादु वा अल्प । सेवूनियाम स्वस्थ अजगर ॥३॥
लाभें-अलाभेंही स्वस्थचि तो राही । निरलस सेवी औदासिन्य ॥४॥
सामर्थ्य असोनि स्वस्थचि तो राहे । वीतनिद्र पाहें ध्यानमग्न ॥५॥
देहेंद्रिय मन असूनि सबळ । निष्क्रिय अचल अजगर जैं ॥६॥
वासुदेव म्हणे स्वस्थ, शांत, सम । अलिप्तचि जाण सदा योगी ॥७॥

॥९९॥
दुर्विगाह्य, नित्यप्रसन्न सागर । दुस्तर, गंभीर, सर्वकाल ॥१॥
अनंत, अपार, अगोचार, शांत । अक्षोभ्यचि नित्य परिपूर्ण ॥२॥
तैसा मुनिराज सदा निर्विकार । असावा साचार सिंधूसम ॥३॥
वासुदेव म्हणे ग्रीष्म-वर्षा सम । मानूनि सज्जन स्थिर राहे ॥४॥

॥१००॥
दीपसौंदर्यातें भूलोनि पतंग । वेडावतां अंग जळूनि जाई ॥१॥
तेंवी श्रृंगारिक हावभाव स्त्रीचे । पाहोनि जयातें मोह पडे ॥२॥
वंचना तयाची होतसे निश्चयें । वासना बळावे उपभोगाची ॥३॥
वासुदेव म्हणे मायामोहकारी । जाणूनियां नारी, दक्ष ज्ञाता ॥४॥

॥१०१॥
अल्प-अल्प अंशें, ती मधुमक्षिका । पुष्पा न पीडितां सेवी मध ॥१॥
तेंवी यावद्देह असे तावत्काल । भिक्षान्नें निर्वाह करिन सौख्यें ॥२॥
सान-थोर शास्त्र, शोधूनियां सार । सेवूनि असार दुर्लक्षीन ॥३॥
एकाचि कमळीं बैसतां भ्रमर । बंधन त्या घोर प्राप्त होई ॥४॥
वासुदेव म्हणे मर्म हें जाणूनि । गुणासक्त मुनि न होईचि ॥५॥

॥१०२॥
अन्य दिन राहो, सायंकाळातेंही । नसावी संग्रही कांहीं भिक्षा ॥१॥
हस्त हेंचि पात्र, उदर कोठार । संग्रह हा थोर भिक्षुकाचा ॥२॥
मधुमक्षिका ती संग्रहासमेत । पावतसे नाश घ्यावें ध्यानीं ॥३॥
वासुदेव म्हणे आशा ते भिक्षूसी । संग्रहें विनाशीं लोटीतसे ॥४॥

॥१०३॥
काष्ठकरिणीच्या संगें वनीं गज । पावए घोर बंध क्षणामाजी ॥१॥
यास्तव ज्ञात्यानें काष्टपुतळीही । स्पर्शू नये पाहीं चरणानेंही ॥२॥
मृत्युरुप साक्षात्‍ जाणावी अंगना । दृष्टांत त्या जाणा गजाचाचि ॥३॥
वासुदेव म्हणे सान्निध्येंही कष्ट । ममत्वें अरिष्ट स्पष्ट न, कीं ॥४॥

॥१०४॥
बहुत कष्टानें संपादूनि धन । दिलें, न भोगून संपविलें ॥१॥
तरी अन्य कोणी लुटूनियां नेई । मधुहा तो पाहीं मधु जैसा ॥२॥
विनियोग योग्य यास्तव करावा । अथवा नसावा संग्रहचि ॥३॥
सुदु:खोपार्जित शिजवितां अन्न । याचका अर्पण करी गृही ॥४॥
श्रमावीण ऐसा लाभेल सुग्रास । मधुहा हा बोध करी दुजा ॥५॥
वासुदेव म्हणे संग्रह नसावा । प्राप्ताचाचि घ्यावा दैवें लाभ ॥६॥

॥१०५॥
ग्राम्य- शृंगारिक गीतें न ऐकावीं । पाशबध्द होई मृग तेणें ॥१॥
नृत्य-गीत ग्रामयोषितांची क्रीडा । तेणें ऋष्यशृंगा अध:पात ॥२॥
वनवासी यती तोही भ्रष्ट होई । बोध ऐसा पाहीं सुचवी मृग ॥३॥
वासुदेव म्हणे साधकासी नित्य । त्याज्य गाम्यगीताश्रवण जाणा ॥४॥

॥१०६॥
आमिषाकारणें जालबध्द मीन । रसलुब्ध जन तैसा बध्द ॥१॥
अनावर जिव्हा मोहवी तयासी । बुध्दि लोलुपाची नष्ट होई ॥२॥
निराहारें अन्य इंद्रियें दुर्बल । रसना प्रबल परी तेणें ॥३॥
सर्वही इंद्रियें रसनेवांचूनि । जिंकितांही जनीं अजितेंद्रिय ॥४॥
जिव्हाविजयी त्या सर्वत्र विजय । गाई वासुदेव मीनबोध ॥५॥

॥१०७॥
विदेहनगरीं पिंगला नामक । वेश्या होती एक बोध तिचा ॥१॥
नृपोत्तमा, ऐक एकदां ते नारी । उभी द्वारावरी नटूनियां ॥२॥
दिसेल जो मार्गी कामुक तो  मानी । संकेतजीविनी बहुतां पाही ॥३॥
द्रव्यलोभें ऐसी तिष्ठली बहुत । येरझारा नित्य द्वारी घाली ॥४॥
अर्धरात्र ऐसी लोटूनियां गेली । उद्वेग पावली चित्ती बहु ॥५॥
गीत जें तियेनें गाइलें तें ऐकें । वैराग्य आशेचें खड्‍ग असे ॥६॥
अनात्मज्ञ जेंवी सोडी न ममता । तेंवी देहात्मता अविवेक्यासी ॥७॥
वासुदेव म्हणे पिंगलेची वाणी । ऐकावी देऊनि पुढती चित्त ॥८॥

॥१०८॥
पहा पहा माझ्या मोहाचा विस्तार । मन अनावर कैसें झालें ॥१॥
कामपूर्ति क्षुद्रजनेंसी इच्छितें । मूढत्व हें माझे केंवी वर्णू ॥२॥
नित्य जो समीप वित्त-रतिप्रद । अर्पी जो स्वानंद कांत माझा ॥३॥
ढकलूनि त्यासी भय -शोककारी । मूढांची चाकरी केली बहु ॥४॥
आत्मारामासी या शिणविलें व्यर्थ । अर्थलोभी, अर्थ काय देती ॥५॥
कामुक ते काम पुरविती केंवी । दु:खी, दु:ख केंवी हरितील ते ॥६॥
परी ऐशा मूढां विकिला हा देह । क्षुद्र सुखास्तव हंत हंत ॥७॥
वासुदेव म्हणे अंतर्मूख चित्त । होतांचि, प्रकाश तयाक्षणीं ॥८॥

॥१०९॥
कणा तेंचि आढें, बरगडया वांसे । हस्तपाद ज्याचे स्तंभ होती ॥१॥
ऐसा अस्थिमय सांपळा शोभला । बांधूनि टाकिला त्वचा रोमें ॥२॥
नवद्वारांतूनि वाहे मळ नित्य । आहो विष्ठा-मूत्र भरलें जेथें ॥३॥
ऐशा पुरुषासी इच्छी मजवीण । मिथिलेंत कोण दुजी नारी ॥४॥
अच्युत, अभंग, आत्मारामत्याग । करुनियां, आस धरिली अन्य ॥५॥
वासुदेव म्हणे विषयांची घृणा । साधकासी जाणा सिध्दिप्रद ॥६॥

॥११०॥
आतां तरी पुढें जिवलग मित्र । अति प्रियकर नाथ माझा ॥१॥
सर्वनियंत्या त्या आत्मारामाप्रति । प्रेमें सर्वस्वासी अर्पूनियां ॥२॥
आत्मसौख्यानंदासवेंचि मी रमा । होऊनि आरामा मेळवीन ॥३॥
वासुदेव म्हणे पाहूनि वैराग्य । पिंगला आनंदरुप झाली ॥४॥

॥१११॥
आद्यन्तवंत ते काम वा कामद । देव व मानव पराधीन ॥१॥
भजक वा भार्याकल्य़ाण तयांनीं । आजवरी कोणी केलें नाहीं ॥२॥
श्रीविष्णुप्रसादें माझें अहोभाग्य । जाहलें वैराग्य, विवेकानें ॥३॥
गृहादिक त्याग घडे वैराग्यानें । मोक्षलाभ जेणें सुलभ होई ॥४॥
वासुदेव म्हणे वैराग्यकारक । क्लेश तो प्रसाद भगवंताचा ॥५॥

॥११२॥
वैराग्यरुप हा उपकार मोठा । ग्राम्य दुराशेचा करीन त्याग ॥१॥
अनन्यशरण रिघूनि तयासी । संतुष्टचित्तेंसी क्रमिन काल ॥२॥
काया-वाचा- मनें सेवीन प्रभूतें । मत्सम अज्ञातें तारी तोचि ॥३॥
काळसर्पे विश्व ग्रासिलें हें सर्व । भ्रमशून्य भाव ऐसा यदा ॥४॥
विषयवैराग्य लाभे जयावेळीं । आत्मा तयावेळी आत्मगोप्ता ॥५॥
वासुदेव म्हणे पिंगलेचें भाग्य । कृपेनें वैराग्य लाभे तिज ॥६॥

॥११३॥
अवधूत म्हणे ग्राम्य तृष्णा ऐसी । आशा-दुराशाही छेदूनियां ॥१॥
आत्म्यामाजी बुध्दि करुनियां स्थिर । वेश्या शय्येवर पहुडली ॥२॥
तात्पर्य नृपाळा, आशा दु:खमूळ । नैराश्य केवळ परम सुख ॥३॥
पिंगलेनें ग्राम्य आशा ते तोडितां । लाभ वैराग्याचा होई तिज ॥४॥
वासुदेव म्हणे सुखनिद्रा तया । वैराग्य तें जया लाभतसे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP