स्कंध ११ वा - अध्याय ९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥११४॥
अवधूत म्हणे जें जें प्रिय त्याचा । संग्रह तो साचा दु:खामूळ ॥१॥
यास्तव संग्रहशून्य जो विद्वान । सुखाचें निधान स्वयें तोचि ॥२॥
सामिष कुररा वधित निरामिष । त्यागितां आमिष सुख तया ॥३॥
वासुदेव म्हणे मूळ कलहाचें । आमिषचि, ज्ञाते त्यजिती सौख्यें ॥४॥

॥११५॥
मानापमानांची क्षिती नसे मातें । चिंता न चित्तातें गृह-पुत्रांची ॥१॥
आत्मक्रीड -आत्मरति बाळासम । करितों भ्रमण भूलोकीं या ॥२॥
जड-मूढ, बाल किंवा गुणातीत । निश्चींत आनंद दोघांसीच ॥३॥
वासुदेव म्हणे अज्ञातें बालक । ज्ञानें जीवन्मुक्त सुखरुप ॥४॥

॥११६॥
कुमारिका एक, गृही एकाकिनी । पहावया कोणी आले तिज ॥१॥
सत्कारें भोजन द्यावया तयांसी । साळी कांडण्यासी सिध्द होई ॥२॥
शंखकंकणांचा होई तदा नाद । काढितें एकेक करांतूनि ॥३॥
दोन दोनही तीं ठेवितांही नाद । पाहोनि एकेक ठेवी अंती ॥४॥
बहुतांच्या संगें माजतो कलह । दोघे नेती काल वार्तालापें ॥५॥
यास्तव एकाकी रमावें हा बोध्द । शोधितां रहस्य कळलें मज ॥६॥
वासुदेव म्हणे कुमारीपासूनि । एकान्तचि ध्यानी घेई यति ॥७॥

॥११७॥
अंतद्रितपणें आसन तैं श्वास । जिंकूनि अभ्यास वैराग्येंसी ॥१॥
एकाग्र करुनि मन स्थिर व्हावें । निश्चल रहावें परमपदीं ॥२॥
वासनाधुळीचा कणही न राही । हळु हळु येई स्थिति ऐसी ॥३॥
सत्ववृध्दि होतां रज-तमनाश । विषय मनांत उरतीचिना ॥४॥
उन्मनी ते स्थिति येतां अंतर्बाह्य । विषय सकल गळूनि जाती ॥५॥
इषुकारासम आत्मरंगी धुंद । होतां न जीवास अन्य भान ॥६॥
जवळूनि जातां स्वारी नृपाळाची । त्या कार्यमग्नासी कळलें नाही ॥७॥
वासुदेव म्हणे इषुकार ऐसा । शिकवी अवधूता तन्मयत्व ॥८॥

॥११८॥
साधक एकाकी दक्ष गृहहीन । गुहा हेंचि जाण स्थान त्याचें ॥१॥
गूढाचार अल्पभाषी तैं संचारी । गृहार्थ न करी व्यर्थ यत्न ॥२॥
आयत्या बिळांत नागोबाचा वास । यत्न अनित्यार्थ कष्टप्रद ॥३॥
वासुदेव म्हणे मैत्री न कोणासी । भयही मानसीं नसे सर्पा ॥४॥

॥११९॥
एकमात्र देव असे नारायण । माया ते स्वाधीन शक्ति त्याची ॥१॥
मायाबळें विश्व रचिलें जें पूर्वी । कल्पांतीं आंवरी काल तेंचि ॥२॥
एक अद्वितिय आत्मा स्वआधार । तेंवी सर्वाधार तोचि एक ॥३॥
कलशक्तिरुप आपुल्या सामर्थ्ये । गुणांसी साम्यातें नेई प्रभु ॥४॥
जड-चैतन्याचा नियंता तो एक । प्राप्तव्य मुक्तांस तोचि एक ॥५॥
अथांच तो एक आनंदसागर । तेंवी निरुपाधिक मोद त्याचा ॥६॥
यास्तव ’ केवल ’ संज्ञा हे तयासी । वासुदेव इच्छी केवला त्या ॥७॥

॥१२०॥
अवधूत म्हणे राया, शत्रुंजया । क्षोभवूनि माया त्रिगुणात्मिका ॥१॥
निर्मिला, सूत्रात्मा विश्वाचें जें सूत्र । प्रेरक जीवास तोचि एक ॥२॥
प्रेरणेनें त्याच्या अहंभावें जीव । ममत्वें आजीव कर्म करी ॥३॥
अहंकारद्वारा अनेक मुखांनीं । विश्वासी निर्मूनि क्रीडा करी ॥४॥
काढूनियां धागा पसरी मुखानें । ऊर्णनाभि प्रेमें क्रीडतसे ॥५॥
क्षणामाजी सर्व गिळूनियां टाकी । तैसीच हे कृति परमेशाची ॥६॥
वासुदेव म्हणे ऊर्णनाभी ऐसा । अवधूताच्या चित्ता बोध करी ॥७॥

॥१२१॥
भिंगुरटी नेई कीटातें धरुन । भीतीनें तो ध्यान करी तिचें ॥१॥
त्याचि देही त्याचें पालटे स्वरुप । ध्यानें ध्येयरुप होई स्वयें ॥२॥
स्नेह-द्वेषभयें जयालागी ध्यावें । याचि देहीं व्हावें तयापरी ॥३॥
ध्यानाचें सामर्थ्य, कीट बोधी ऐसें । गुरु मजसी हे बहुत झालें ॥४॥
वासुदेव म्हणी देहादिक तेंही । कथिती जें कांहीं तेंही ऐका ॥५॥

॥१२२॥
वैराग्य-विवेककारक हा देह । श्रेष्ठ गुरु होय्य मजलागीं तो ॥१॥
वृध्दिंगत नित्य दु:ख हेंचि फल । जन्म-मरणशील ऐसा देह ॥२॥
वैराग्य त्या योगें, तत्त्वांचा विवेक । याचि देही साच करितां येई ॥३॥
ऐसेंही असूनि या पांचभौतिका मानितों परका यथार्थत्वें ॥४॥
वासुदेव म्हणे भूतेंही अनित्य । जाणुनि अलिप्त विचरे यति ॥५॥

॥१२३॥
भार्या, पुत्र, धन, पशु, गृह, दास । आप्त, इष्ट-मित्र परिवार हा ॥१॥
सुखार्थ रक्षूनि, वियोगचै अंती । निर्मूनि बीजासी निघूनि जाई ॥२॥
बीजें अन्यवृक्ष निर्मी जेंवी वृक्ष । देहही तैसाच अन्य देहा ॥३॥
रसना, त्वचा तैं उपस्थ अन्यत्र । ओढी श्रोत्र, नेत्र, अन्यत्रचि ॥४॥
सपत्नी त्या जेंवी गृहपतीलागीं । तैसी हे जीवाची करिती स्थिति ॥५॥
परमवैराग्य हेंचि अंती फल । देहाचे सकल उपकार हे ॥६॥
वासुदेव म्हणे देहचि विवेक । शिकवी ज्ञात्यास ऐशारीति ॥७॥

॥१२४॥
वृक्ष, सर्प, पशु, पक्षी, दंश, मत्स्य । अनेक देहांस निर्मूनियां ॥१॥
संतोष न होई यास्तव ईश्वरें । शरीर निर्मिलें मानवाचें ॥२॥
ब्रह्मावबोधाची शक्ति त्या पाहूनि । आनंदित मनीं होई ईश ॥३॥
बहुजन्माअंती देह हा दुष्प्राप्य । अनित्य, अर्थद परी असे ॥४॥
काळमुखीं नाही पडला जों तोंचि । मोक्षार्थ यत्नांची धरणें कांस ॥५॥
विषयसौख्य तें सर्वदेहीं असे । मोक्षचि नराचें परम सौख्य ॥६॥
वासुदेव म्हणे मानवशरीर । लाभतां अपूर्व गमवूं नये ॥७॥

॥१२५॥
दत्तअवधूत बोले यदुलागीं । ऐसा मी विरागी आत्मनिष्ठ ॥१॥
मुक्तसंग तेंवी निरहंकारेंसी । भ्रमण महीसी करितों सौख्यें ॥२॥
स्थिरत्व पूर्णता एकाचि गुरुनें । येई न या ज्ञानें विचरें मही ॥३॥
बहुधा ऋषींनीं गाईले हें ब्रह्म । शंकानिरसन होई तेणे ॥४॥
वासुदेव म्हणे गुरु मोक्षदाता । एकचि, या बोधा करिती पुढें ॥५॥

॥१२६॥
कृष्ण म्हणे वंदी यदु अवधूतासी । आशीर्वाद त्यासी मागितला ॥१॥
सप्रेम निरोप दिधला तयासी । संचारार्थ जाती दत्तगुरु ॥२॥
ऐकूनि तो बोध पूर्वजपूर्वजा । लाभे कृतार्थता समभावें ॥३॥
भेदबुध्दि नष्ट जाहली तयाची । समबुध्दि त्यासी लाभे ज्ञानें ॥४॥
वासुदेव म्हणे समत्व कठिण । साध्य तें अंतिम खेळ नव्हें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP