स्कंध ११ वा - अध्याय २४ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥२९३॥ ।१-७।
बोले भगवान पूर्वविनिर्णीत । कथितों मी सांख्यशास्त्र आतां ॥१॥
जाणितां तें सर्व विकल्प-विनाश । साधाया सामर्थ्य प्राप्त होई ॥२॥
युगारंभीं ज्ञान, ज्ञेय एक होतें । अद्वैतविवेकें नव्हते भेद ॥३॥
मायाबळे द्विधा वाड्‍.मनोगोचर । प्रकृति-पुरुष ऐशा भेदें ॥४॥
प्रकति-पुरुष उभयात्मिका ते । कार्य कारण ते, उभयविध ॥५॥
जीवानुमतीनें प्रेरणेनें माझ्या । गुणोद्भव साचा प्रकृतींत ॥६॥
वैषम्यें त्या सूत्र, महत्संयोगानें । मोहकारी जाणें अहंकार ॥७॥
वैकारिक तेंवि तैजस, तामस । ऐसा तो त्रिविध जडाजड ॥८॥
वासुदेव म्हणे तन्मात्रा इंद्रियें । मनालागी पाहें कारण तो ॥९॥

॥२९४॥ ।८-११।
तामस तन्मात्रांपासूनि तीं भूतें । ज्ञान कर्मेद्रियें राजसाची ॥१॥
सत्वाशापासूनि देवाता सकळ । इंद्रियांसी बळ तयांचेंचि ॥२॥
महत्तत्त्वादि मी प्रेरितां एकत्र । क्रियाशक्ति त्यांत मदिच्छेनें ॥३॥
वास्तव्यार्थ माझ्या निर्मिती ती अंड । जलस्था तयांत प्रगटलों मी ॥४॥
नाभींतून माझ्या विरंचि जन्मला । राजस बैसला तपासी तो ॥५॥
अनुग्रहें माझ्या लोकपालंसवें । निर्मिलीं तयानें त्रिभुवनें ॥६॥
वासुदेव म्हणे भू:भुव:स्व: । प्रकार ते पहा भुवनांचे त्या ॥७॥

॥२९५॥ ।१२-१५।
स्वर्गलोकीं देव, भूतें भूवलोकीं । वसती मानवादि भूलोकी या ॥१॥
त्रिभुवनापरि सिध्दांची वसती । पाताळीं ते स्थिति असुर-नागां ॥२॥
सत्त्व, रज, तमें, त्रिभुवनप्राप्ति । योगी, तपी, न्यासी महदादींत ॥३॥
गुणमल ते न महर्लोकादीसी । अनन्य भक्तांसी वैकुंठ तो ॥४॥
कालस्वरुपी जो मीचि सर्वकर्ता । कर्मगतिदाता जीवांप्रति ॥५॥
सत्वादि प्रवाही गटंगळया खाती । जीव, तेंचि कथी वासुदेव ॥६॥

॥२९६॥ ।१६-१९।
प्रकृति-पुरुषअंशें सान-थोर । सकल पदार्थ प्रकटती हे ॥१॥
आदि, मध्य, अंत जयांत तें सत्य । विकारें व्यवहार घडती सर्व ॥२॥
सुवर्ण मृत्तिकाविकारें व्यवहार । आदि अंती सर्व सुवर्णाचि ॥३॥
मृत्तिकोपादान पिंडतो निमित्त । कारण घटास महदादि तैं ॥४॥
व्यावहारिकत्व तया सत्यालागीं । प्रकृति तयासी उपदान ॥५॥
परमपुरुषचि आधार तयाचा । पकाशक त्याचा काल असे ॥६॥
प्रकृति-पुरुष, कालत्रय हें मी । ब्रह्मरुप, मानी वासुदेव ॥७॥

॥२९७॥ ।२०-२४।
ईक्षण ईशाचे तावत्काल सृष्टि । जीवभोगार्थ ही अव्याहत ॥१॥
परंपरेनेंचि चाले, आदि-अंत । स्थितिही त्या मीच प्रलयीं नाश ॥२॥
शरीर अन्नांत, अन्नधान्य बीजीं । बीज पृथ्वीमाजी तेंही गंधीं ॥३॥
ऐसी उपादानकारणीं विलीन । स्वरुप त्यागून होती भूतें ॥४॥
गंध जळीं, जळ, रसांत, यापरी । कारणांत सारी सृष्टि लीन ॥५॥
वासुदेव म्हणे त्या त्या गुणीं ते ते । विकार लयातेम पावताति ॥६॥

॥२९८॥ ।२५-२९।
इंद्रियदेवता लीन मनामाजी । शब्द तन्मात्रा ती अहंमाजी ॥१॥
अहंकार महत्तत्त्वामाजी लीन । गुणांत तें, गुण अव्यक्तांत ॥२॥
अव्यक्त अखंड कालामाजी लीन । ईश्वरीं विलीन होई काल ॥३॥
ईश्वरही अज आत्म्यांत विलीन । स्वस्वरुपमग्न निर्गुण तो ॥४॥
चिंतनें या भ्रांति न होई कदापि । होतां नष्ट जेंवी सूर्ये तम ॥५॥
संशयोच्छेदक सांख्यशास्त्र ऐसें । विलोमानुलोमें कथिलें तुज ॥६॥
भूत, भविष्य मी जाणतों उध्दवा । मोद वासुदेवा बोधगानें ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP