स्कंध ११ वा - अध्याय २२ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥२६४॥ ।१-३।
श्रीकृष्णासी प्रेमें बोलला उध्दव । कथीं मूळतत्त्व संख्या मज ॥१॥
अष्टाविंशति ते संख्या त्वां कथिली । ऋषींनी कथिली बहुविध ॥२॥
षडविशति कोणी, पंचविंशति ते । सप्त, नव, षट्‍, ऐसें वदती कोणी ॥३॥
चार, अकरा कीं सप्तदश, सोळा, । कथिती कोणी तेरा, मूलतत्वें ॥४॥
नित्य चिरंजीवा प्रभो, तें रहस्य । कथावें निश्चित सहेतुक ॥५॥
वासुदेव म्हणे दयामय देव । उध्दवासी सर्व कथिती ऐका ॥६॥

॥२६५॥ ।४-९।
कृष्ण म्हणे युक्तियुक्तचि शास्त्रज्ञ । बोलती तें जाण साधारचि ॥१॥
मायाश्रयें माझ्या दुर्घट न कांही । उपपत्ति दावी वक्ता बहु ॥२॥
तुझे खोटें, माझे खरें, भेद ऐसा । होतसे नाहींसा शांतिलाभें ॥३॥
पुढती ते वाद पावती शमन । संख्या इच्छेसम सिध्द होई ।\४॥
व्याप्य-व्यापकात्त्वें सान -थोरसंख्या । कार्यकारणाचा करितां भाव ॥५॥
वासुदेव म्हणी होई अंतर्भाव । अथवा विस्तारें संख्याभेद ॥६॥

॥२६६॥ १०-१२।
मायाच्छान्न जीवा स्वयें केंवी ज्ञान । यास्तवचि ज्ञानदाता गुरु ॥१॥
चतुविंशति ते गुण प्रकृतीचे । जीवेशांसह ते षडविशति ॥२॥
प्रकृतीचा गुण मानिती ते ज्ञान । त्रिगुणांचे साम्य प्रकृति ते ॥३॥
सृष्टिस्थिति लय, रज, सत्त्व, तम । प्रकृतीचे धर्म न आत्म्याचे ॥४॥
वासुदेव म्हणे सांख्यशास्त्र ऐसें । निवेदीपक्ष ते अन्य बहु ॥५॥

॥२६७॥ ।१३-१६।
सत्व तेंचि ज्ञान, रज तेंचि कर्म । तम तें अज्ञान, कथिलें एथ ॥१॥
गुणक्षोम तोचि काल निवेदिला । स्वभाव बोलिला महत्तत्व ॥२॥
पुरुष-प्रकृति, व्यक्त अहंकार । भूतें ही साचार तत्त्वें नऊ ॥३॥
ज्ञानकर्मेद्रियें मन एकादश । अंत्य उभयविध म्हणती कोणी ॥४॥
शब्दादिक पंच जाणावे विषय । गत्युक्ति उत्सर्ग शिल्प फलें ॥५॥
वासुदेव म्हणे भिन्न भिन्न मतें । परी सिध्दांन्त ते नसती भिन्न ॥६॥

॥२६८॥ ।१७-१८।
कार्य कारणही होऊनि प्रकृति । सृष्टयारंभीं तेचि तदनुरुप ॥१॥
गुणाधारें, परी पुरुष तो द्रष्टा । विक्षोम तत्त्वांचा ईशेच्छेनें ॥२॥
प्रकृती पुरुष होऊन एकत्र । निर्मिती व्रह्मांड प्रभुसंकल्पें ॥३॥
वासुदेव म्हणे मूळ द्रव्यें सप्त । अथवा तें षटक पुढती ऐका ॥४॥

॥२६९॥ ।१९-२५।
मूळ द्रव्यें सप्त आकाशदि पंच । जीव, आत्मा, देह प्राण त्यांचे ॥१॥
जीव -शिवैक्यानें अवशिष्ट सहा । निर्मूनियां विश्वा प्रवेशे तो ॥२॥
पृथ्वी, जल, तेज, तेंवी आत्मा ऐसी । मूळ ही चारचि म्हणती कोणी ॥३॥
भूतें, आत्मा म्न, इंद्रिये तन्मात्रा । ऐसी द्रव्यें सत्रा मानिताती ॥४॥
अष्टप्रकृति तैं आत्मा ऐसीं नव । ऐसे भेद सर्व युक्तियुक्त ॥७॥
ज्ञात्यालागीं कांहीं नसेचि अयोग्य । कथी वासुदेव देववाणी ॥८॥

॥२७०॥ ।२६-३०।
उध्दव विनवी प्रकृती-पुरुष । अन्योन्यां आश्रय म्हणूनि एक ॥१॥
संशय मनींचा फेडी दयावंता । कोण ज्ञानदाता तुझ्याविण ॥२॥
उध्दवासी तदा बोलले श्रीकृष्ण । तयांमाजी जाण भेद बहु ॥३॥
गुणक्षोभरुपी सृष्टी वैकारिक । गुणमयी देख माया माझी ॥४॥
गुणांनी दाविते नैकविध भेद । अध्यात्माधिदैव । अधिभौतिक ॥५॥
वासुदेव म्हणे भेद तो त्रिविध । मायेचे विकार ऐशापरी ॥६॥

॥२७१॥ ।३१-३३।
दृष्टि, रुप तेंवी सूर्यांश हे त्रयी । स्वतंत्र ते नाहीं सूर्यासम ॥१॥
त्रिपुटि यापरी ऐशा सकलही । अधिष्ठाता पाहीम आत्मा भिन्न ॥२॥
गुणक्षोभोद्भव अहंकार त्रिधा । मोह, बुध्दिभेदा तोचि मूळ ॥३॥
आत्मा ज्ञानरुप संशय तयाचा । भेदभावें साचाकार घेई ।\४॥
स्वस्वरुपभ्रष्टां तेंचि सत्य वाटे । परी मिथ्याचि ते ज्ञानियासी ॥५॥
वासुदेव म्हणे अहंकारनाश । जाण तोचि मोक्ष ज्ञानें लाभे ॥६॥

॥२७०॥ ।३४-३५।
म्हणे उध्दव हे देवा । ईशपराड्‍.मुख जीवां ॥१॥
कर्मासम देहप्राप्ति । घडे सांगावें ते कैसी ॥२॥
जन्म- मरणाचा प्रश्न । न सुटे आत्मबोधाविण ॥३॥
मायावंचितचि जनीं । बहुधा ज्ञानी नसे कोणी ॥४॥
वासुदेव म्हणे ज्ञान । कथिती ऐका भगवान ॥५॥

॥२७३॥ ।३६-४२।
कर्मासवें मन इंद्रिय़ांसमेत । फिरे बहु लोक, आत्मा मागें ॥१॥
दृष्ट किंवा श्रुत विशय चिंतूनि । विसरे वा ध्यानीं धरी कांहीं ॥२॥
विषयाभिमानें अन्य कारणेंही । पूर्ण स्मृति जाई तोचि मृत्यु ॥३॥
आत्मभावें करी देहाचा स्वीकार । जन्म तो साचार मनोराज्य ॥४॥
स्वप्नीं, मनोराज्यीं, पूर्वविस्मरण । जन्म तो नूतन अपूर्वचि ॥५॥
जन्म, स्थिति, मृत्यु, स्मृति-विस्मृतीनें । स्वप्नासम, मनें कल्पियेलीं ॥६॥
क्षणोक्षणीं जन्म -मृत्यु करी काल । येई न प्रत्यय वेगें त्याच्या ॥७॥
वासुदेव म्हणे वेगवंत काल । घडवी सक्ल न कळतांचि ॥८॥

॥२७४॥ ।४३-४६।
दीपज्योति, फल, प्रवाह नदीचा । प्रतिक्षणीं तैसा सृष्टिभेद ॥१॥
प्रतिक्षणीं भिन्न होतांही तयांसी । ’ तोचि हा ’ व्यर्थचि भाषा लोकी ॥२॥
अमर आत्मा तैं जन्मे न मरेहि । विझतां काष्ठ जैं न मरे वन्ही ॥३॥
निषेक, गर्भ तैं जन्म बाल्यादिक । अवस्था देहास, जीवासी न ॥४॥
वासुदेव म्हणे जन्म-मरण भ्रांति । जाणूनियां शांतिलाभ घ्यावा ॥५॥

॥२७५॥ ।४७-५१।
कल्पित कौमार्यादिक त्या अवस्था । क्वचित्त्यागी ज्ञाता असंगत्वें ॥१॥
पिता-पुत्र मृत्यु-जन्में अनुमान । होई, जन्म-मरण देहासीच ॥२॥
तरु-लता बीजें जन्म, फळें नाश । द्रष्टा, तो स्वतंत्र वृक्षाहूनि ॥३॥
अविवेकें भेदज्ञान न कळतां । प्रकृति मी ऐसा भ्रम होई ॥४॥
मग कर्मासम, सत्वें देव, ऋषि । असुर, मानवादि रजोगुणें ॥५॥
स्थावर वा तिर्यकू योनी ते तमानें । भ्रमती अज्ञानें जीव ऐसे ॥६॥
वासुदेव म्हणे गुणतारतम्यें । ऋषि, देव जाणे असुर, नर ॥७॥

॥२७६॥ ।५२-५६।
अनिच्छेनें नृत्य-गीतानुकरण । घडे, तैं वर्तन बुध्दिगुणें ॥१॥
नाव पुढें जातां वृक्षचि धांवती । भ्रमणें वा, भ्रांति पृथ्वी भ्रमे ॥२॥
तेंवी मनोरथ- स्वप्नासम मिथ्या । अनुभव विषयांचा व्यवहारीं ॥३॥
असत्य विषय, ध्यानें सत्य भासे । स्वप्नानुभव तें तेंवी जग ॥४॥
उध्दवा, यास्तव इंद्रियभ्रमानें । विषयांत प्रेमें रमूं नको ॥५॥
अज्ञानेंचि भेदभ्रम, हा निश्चय । करीं, वासुदेव चिंती मनीं ॥६॥

॥२७७॥ ।५७-५८।
दुष्टांनीं वा मूढ जनांनीं निंदिलें । तिरस्कृत केलें अपमानूनि ॥१॥
वंचिलें, गांजिलें, मत्सर करुनि । ताडिलें बांधूनि वृतिच्छेदें ॥२॥
थुंकूनि वा मूत्रोत्सर्गेही पीडूनि । दिधलें बहु जनीं दु:ख, भय ॥३॥
तरी मोक्षेच्छूनें आपुला उध्दार । करावा साचार साधनांनीं ॥४॥
वासुदेव म्हणे क्लेश हे असह्य । जाणोनि उध्दव प्रश्न करी ॥५॥

॥२७८॥ ।५९-६०।
म्हणे उध्दव मुकुंदा । कैसें सोसावें या दु:खा ॥१॥
असह्यचि ऐसे क्लेश । भक्तां सह्य, न अन्यास ॥२॥
ज्ञातेही ते प्रकृतिवश । भक्तज्ञातेचि समर्थ ॥३॥
वासुदेव म्हणे शुक । कथिती उत्तर सविस्तृत ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP