स्कंध ११ वा - अध्याय १ ला

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥१॥
भक्ति-ज्ञान -योगस्वरुप श्रीहरी । चिंतूनि अंतरीं व्यासांसवें ॥१॥
एकादशस्कंध क्षीरसिंधूमाजी । पाहूं गोविंदासी भक्तिबळें ॥२॥
महामुनि शुक बोलले रायासी । वधूनि दैत्यांसी यदुश्रेष्ठ ॥३॥
बळिरामासवें यादवांसमेत । बैसतां सभेंत एकेवेळीं ॥४॥
सत्वरि विनाशकारी कलहातें । निर्मूनि भूमीचें हरिलें दु:ख ॥५॥
बहु अपमानें, क्रुध्द पांडवांसी । करुनि, पुढती हरिला भार ॥६॥
वासुदेव म्हणे भूभारहरण । करी नारायण सहेतुक ॥७॥

॥२॥
स्वबाहुरक्षित यादवसैन्यास । संहारुनि अज चिंती मनीं ॥१॥
हरिलचि नाही भार अद्यापि मी । अजिंक्य पाहूनि यादवांसी ॥२॥
वीर्य बलोत्कर्षे अन्यासी अजिंक्य । यादवांचा योग्य नाश असे ॥३॥
यादवविनाशाविण कार्यपूर्ति । नसे ऐसें चित्तीं चिंती प्रभु ॥४॥
परस्पर संघर्षेचि वेणुवन । दग्ध होई श्रम न घेताचि ॥५॥
तैसेचि यादव संहारुनि, सौख्यें । जाईन आनंदे निजधामा ॥६॥
चिंतूनियां ऐसें विप्रशापव्याजें । स्वकुल नाशातें करी हरि ॥७॥
वासुदेव म्हणे इच्छील जें हरी । तेंचि या संसारीं हितप्रद ॥८॥

॥३॥
विश्वलावण्यासी लावण्य जयानें । ऐशा सौंदर्यानें जनदृष्टि ॥१॥
हरुनियां, बोधें चोरुनियां चित्त । चरित्रें भक्तांस आकर्षूनि ॥२॥
जगत्पावनी ते संपादूनि कीर्ति । भगवंत जाती निजधामासी ॥३॥
ऐकूनियां राव म्हणे मुनिश्रेष्ठा । यादवांसी कैसा शाप सांगा ॥४॥
ब्रह्मण्य, वदान्य, वृध्द्सेवारत । कैसे कृष्णभक्त शापियेले ॥५॥
कदा, केंवी, कोणी, शापिले यादव । कैसा भेदभाव एकरुपा ॥६॥
वासुदेव म्हणे प्रशन नृपाळाचा । ऐकूनियां वृत्ता कथिती मुनी ॥७॥

॥४॥
निवेदिती मुनी सौंदर्याचें धाम । मांगल्यनिधान आप्तकाम ॥१॥
अनासक्तचित्त कुलधर्मी रत । लोकसंग्रहार्थ कर्मे करी ॥२॥
उध्दारक ज्याची कीर्ति मानवातें । अवशिष्ट कार्यातें करुं म्हणे ॥३॥
वासुदेव म्हणे कुलाचा संहार । हेंचि आतां कार्य करण्या सिध्द ॥४॥

॥५॥
गातां कलिमलहारक, मंगल । पुण्यचि केवळ ऐसी कर्मे ॥१॥
कृष्णाज्ञेनें मुनि द्वारावतीमाजी । आचरिती त्यांसी कृष्ण म्हणे ॥२॥
पिंडारक क्षेत्रीं वसावें सुखानें । जाती अनुज्ञेनें मुनि तेथ ॥३॥
विश्वामित्र, भृगु, असित, दुर्वास । अंगिरा, कश्यप, वामदेव ॥४॥
आत्रि, वसिष्ठादि नारद तैं कण्व । वंदी वासुदेव सकलां तयां ॥५॥

॥६॥
एकदां क्रीडेंत यादवांचे पुत्र । सांबासी स्त्रीवेष देऊनियां ॥१॥
वंदूनि ऋषीते, आसन्नप्रसवा । हरिणाक्षी, व्हावा इच्छी पुत्र ॥२॥
परी लज्जायुक्त विचारीना कोणा । यास्तव आपणा सत्यनिष्ठां ॥३॥
पुशितसों, नम्रभावे, हिजप्रति । कोण्या अपत्याची प्राप्ति सांगा ॥४॥
क्रुध्द त्या थटटेनें होऊनियां मुनि । काळरुप वाणी वदले घोर ॥५॥
मूढहो, हिजसी कुलसंहारक । ’ होईल सुदृढ मुसळ एक ’ ॥६॥
वासुदेव म्हणे दुर्दैववंचित । मानवाचें कृत्य निंद्य घडे ॥७॥

॥७॥
ऐकूनि भयानें सोडितां उदर । लोहाचें मुसळ दिसलें तयां ॥१॥
खिन्नचित्त तदा होऊनि चिंतिती । कथावें आप्तांसी काय आतां ॥२॥
दुर्दैव मानूनि उग्रसेनाप्रति । दु:खें निवेदिती सकल वृत्त ॥३॥
प्रत्यक्ष मुसळ पाहूनियां जन । जाहले उद्विग्न भयाकुल ॥४॥
राजाज्ञेनें पिष्ट तयाचें करिती । सिंधूंत त्यागिती, अवशोषही ॥५॥
गिळिलें तें एका मत्स्यानें, लव्हाळे । पिष्टानें वाढले सिंधू तीरीं ॥६॥
वासुदेव म्हणे गूढ हरिइच्छा । पार न तियेचा कवणा लागे ॥७॥

॥८॥
उदरी जयाच्या लोह अवशेष । मत्स्य ये जाळयांत धीवराच्या ॥१॥
चिरितां तो मत्स्य, लोह गवसतां । तीक्ष्ण बाण त्याच व्याधें केला ॥२॥
सर्वज्ञ श्रीकृष्णा निवेदिल्याविण । करी उग्रसेन व्यवस्था हे ॥३॥
सर्व समर्थही जाणूनि तें हरी । उपाय न करी कांहींएक ॥४॥
कालरुपें शाप सत्य होऊं देई । इच्छाचि ते पाहीं तैसी त्याची ॥५॥
वासुदेव म्हणे नाना नाटक्यासी । शरण देवासी तया जाऊं ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP