स्कंध ११ वा - अध्याय १४ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥१७७॥
ब्रह्मवादी कृष्णा, साधनें मोक्षाचीं । विविध कथिली साधकांतें ॥१॥
विकल्पें कथावी सर्वचि ती श्रेष्ठ । अथवा वरिष्ठ एक त्यांत ॥२॥
प्रधान, गौण की भेद तयांमाजी । कथावें मजसी कृष्णनाथा ॥३॥
सर्वही आसक्ति तुटेल सर्वथा । निरपेक्ष ऐसा भक्तिमार्ग ॥४॥
सर्वश्रेष्ठ, ऐसें कथिलें त्वां, जेणें । मन तुजविणें न उरे भिन्न ॥५॥
वासुदेव म्हणे उध्दवाचा प्रश्न । भक्तीचि की अन्य मार्ग श्रेष्ठ ॥६॥
३-६

॥१७८॥
मदात्मक धर्म कथिती जे वेद । प्रलयी ते नष्ट कृष्ण म्हणे ॥१॥
तदा सृष्टयारंभी आशय मी साचा । कथिलें तयांचा विरंचीतें ॥२॥
कथिला तो धर्म तेणें मनूप्रति । सर्व मानवांसी पूर्वज तो ॥३॥
भृग्वादि सप्तर्षी जाणिती पुढती । देव-दानवांदि पुढती सर्व ॥४॥
गुणवैषम्यें ते सर्वही स्वभावें । भिन्नचि परी हें ध्यानी असो ॥५॥
वासुदेव म्हणे प्रकृतिवैचित्र्यें । बोधही तयांचे भिन्न भिन्न ॥६॥
७-११

॥१७९॥
विचित्र स्वभावें मतीही विचित्र । वाणीही विचित्र स्वभावेंचि ॥१॥
प्रकृतिवैचित्र्यें पाखंडही माजे । संप्रदायभेदें, भेद होती ॥२॥
मायामोहित ते यथाकर्मरुचि । श्रेयहि भिन्नचि म्हणती निज ॥३॥
कोणी धर्मश्रेय, म्हणती कोणी यश । काम, दम, सत्य, शमही कोणी ॥४॥
स्वार्थ, यज्ञ कोणी भोजन वा तप । कोणी दान व्रत नियम यम ॥५॥
मानिती परी ते सर्वही विनष्ट । होऊनियां दु:ख देती अंती ॥६॥
तमोनिष्ठ क्षुद्रसौख्यद स्पर्धादि । दोष तयांमाजी जाण बापा ॥७॥
वासुदेव म्हणे सायुज्यता देई । यास्तवचि पाही भक्ति श्रेष्ठ ॥८॥

॥१८०॥
उध्दवा हे सभ्या, सर्वथा निरपेक्ष । मजमाजी चित्त अर्पिती जे ॥१॥
ऐशा मत्स्वरुपांलागी जो आनंद । विषयलंपटास काय त्याचें ॥२॥
अकिंचन, दान्त, शांत, समचित्त । मत्प्रेमें संतुष्ट सर्वकाल ॥३॥
वासुदेव म्हणे ऐशा अकिंचना । स्वर्गही ठेंगणा वैभवानें ॥४॥
१४-१५

॥१८१॥
ब्रह्मलोक, स्वर्ग, सार्वभौमत्वहि । पाताळिचें तेंही सकल राज्य ॥१॥
अष्टमहासिध्दि तुच्छचि तयासी । किंबहुना मोक्षहि तुच्छ तया ॥२॥
मजविणें कांही तयासी न रुचे । अनन्य भक्तातें ब्रह्मांडीं या ॥३॥
उध्दवा, भक्त तूं आवडसी भज । तैसा या विश्वांत प्रिय न कोणी ॥४॥
ब्रह्मा तेंवी शिव, संकर्षण, लक्ष्मी । अथवा मजही मी, प्रिय न तैसा ॥५॥
वासुदेव म्हणे पुत्र, मित्र, भ्राता । भक्ताहूनि कांता तेही, तुच्छ ॥६॥
१६-१७

॥१८२॥
निरपेक्ष, शांत, निवैर, समदर्शी । पावन मुनीची चरणधुलि ॥१॥
यास्तव तयाच्या जातों मागोमाग । तेणें सर्व अंग पुनित माझें ॥२॥
निष्किंचन परी मी जया अंतरी । नित्य वास करी शांति जेथें ॥३॥
मनाचे उदार जे भूतवत्सल । बुध्दि ज्यां निर्मल निष्कामत्वें ॥४॥
केवळ सुख ते भोगिती जे त्यांची । कल्पना न लोकी इतरां कोणा ॥५॥
वासुदेव म्हणे निरतिशयानंद । भोगी जो गोविंदचरणी लीन ॥६॥
१८-२१

॥१८३॥
इंद्रियाधीन जो भक्त माझा त्यासी । बाधा इंद्रियांची प्रथम होई ॥१॥
परी भक्ति जैसी पावेल दृढता । प्राय: विषयबाधा न जडे तया ॥२॥
प्रज्वलित अग्नि काष्ठें दग्ध करी । तैसी भक्ति हरी सकल पापें ॥३॥
श्रेष्ठ भक्तीनें जैं होई मम  प्राप्ति । योगादिकां शक्ति नसे तेंवी ॥४॥
सांख्य, योग, धर्म, स्वाध्याय कीं तप । तैसी त्यागादिक गौण सर्व ॥५॥
सज्जनप्रिय मी भक्तीनेंचि वश । चांडाळही भक्त, मुक्त होती ॥६॥
वासुदेव म्हणे उच्चनीच जाति । कदाही न येती मोक्षा आड ॥७॥
२२-२३

॥१८४॥
सत्य दयान्वित धर्म । विद्या-तपयुक्त जाण ॥१॥
भक्तिवांचूनि तीं व्यर्थ । उध्दरिती न जीवास ॥२॥
विना रोमांच ठाकतां । कंठ सद्‍गद न होतां ॥३॥
आनंदाश्रु गळल्याविण । नव्हे चित्तशुध्दि जाण ॥४॥
वासुदेव म्हणे केंवी । भक्तीविण शुध्दि व्हावी ॥५॥
२४-२६

॥१८५॥
सद्गदित वाणी प्रेमाश्रु लोचनीं । आर्द्र चित्तें जनीं हांसे, रडे ॥१॥
निर्लज्ज गायनें, नाचे, उडया मारी । भक्त तो उध्दरी त्रिभुवना ॥२॥
आटवितां हेम होऊनि निर्मळ । स्वरुप केवळ पावे जेंवी ॥३॥
तेंवी चित्तमळ घालवूनि भक्ति । स्वस्वरुप स्थिति देई जीवा ॥४॥
पुण्यकथागान-श्रवणें क्रमेसी । शुध्द जीव लक्षी सूक्ष्मवस्तु ॥५॥
शास्त्रोक्त अंजनें निधानदर्शक । वासुदेव, ज्ञान तैसें म्हणे ॥६॥
२७-३०

॥१८६॥
चिंतितां विषय आसक्ति विषयीं । चिंतितां गोसावी तल्लीनता ॥१॥
यास्तव तो स्वप्नमनोरथासम । मिथ्या विषयभ्रम त्यजूनि दुर ॥२॥
सश्रध्द भक्तीनें सोडीं विषयध्यान । मजमाजी मन स्थिर करीं ॥३॥
कामुकांचा तेंवी स्त्रियांचाही संग । त्यागूनि, एकान्त स्वीकारुनि ॥४॥
निर्भय सुस्थळीं चिंतावें मजसी । दक्षत्वें मनासी आंवरावें ॥५॥
कामुक वा योषित्संगासम अन्य । क्लेशद बंधन नाहीं दुजें ॥६॥
वासुदेव म्हणे सुस्पष्ट हितोक्ति । साधकासी ऐसी नाही दुजी ॥७॥
३१-३३

॥१८७॥
म्हणे उध्दव कृष्णासी । आतां ध्यानरीति कथीं ॥१॥
कैसें, कैशारुपें ध्यान । मुमुक्षूतें योग्य जाण ॥२॥
कृष्ण म्हणे सुखासनीं । सहज, सरळ बैसूनि ॥३॥
हस्त अंकीं ते ठेऊन । दृष्टि नासाग्रीं लावून ॥४॥
आंवरुनि इंद्रियगणां । सावकाश प्राणायामा ॥५॥
पूरक, कुंभक, रेचक । तेंवी करावे विपरीत ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसा । व्हावा प्राणायाम साचा ॥७॥
३४-३५

॥१८८॥
घंटानादासम नाद ह्रदयांत । ओंकारस्वरुप नित्य होई ॥१॥
बिसतंतूसम सूक्ष्म अविच्छिन्न । ऊर्ध्व तो नेऊन प्राणाधारें ॥२॥
व्यक्तरुप तया देऊनि मानसीं । बिंदुरुपें त्यासी करणें स्थिर ॥३॥
त्रिकाल यापरी दश वेळ साचा । अभ्यास करितां निश्चयानें ॥४॥
मासापूर्वीची तो जितश्वास होई । प्राणजय पाहीं म्हणती तया ॥५॥
वासुदेव म्हणे अभ्यासें या नित्य । सुलभपणें योग सिध्द होई ॥६॥
३६-४१

॥१८९॥
अधोमुख ऊर्ध्वनाल । ह्रदयीं वसे जे कमल ॥१॥
चिंतावें तें अधोनाल । अष्टदलही तें प्रफुल्ल ॥२॥
सकर्णिक पीठ ऐसें । ध्यान करावें नेटकें ॥३॥
तया कर्णिकेंत सूर्य । सोम, अग्नि, क्रमें स्थिर ॥४॥
ध्यान, मंगल मद्‍रुप । स्मरुनि, करावें अग्नींत ॥५॥
मूर्ति सोज्वळ ती सम । शांत प्रसन्न वदन ॥६॥
दीर्घ चारु चतुर्भुज । ग्रीवा, कपोल सुंदर ॥७॥
उभय मकर कुंडलांची । हेवा वाटे ऐसी कांति ॥८॥
कनकवर्ण पीतांबर । शोभे मेघचि सजल ॥९॥
वत्स चिन्ह वक्षस्थळीं । अंकी रमाही शोभली ॥१०॥
शंखचक्रादि आयुधें वनमाला भूषवी ते ॥११॥
चरणीं नूपुरनिनाद । कंठीं लकाके कौस्तुभ ॥१२॥
झळके किरीट मस्तकीं । कोटि सूर्य ज्या लाजती ॥१३॥
कडी, कटिसूत्र, पोची । रमणीय सर्वागचि ॥१४॥
मुखीं हास्याचा विलास । सुप्रसन्नता दृष्टींत्त ॥१५॥
वासुदेव म्हणे ऐसें । रुप कथियेलें ध्यानाचें ॥१६॥
४२

॥१९०॥
कोमल सुकुमार बालरुपी ऐशा । संयम चित्ताचा करणें यत्नें ॥१॥
प्रति अवयवी संस्थापावें मन । निवारुनि पूर्ण विषयांलागी ॥२॥
पुढती तें बुध्दिसारथीसाह्यानें । उध्दवा, निश्चयें बुध्दिवंतें ॥३॥
सर्वथा करावें स्थिर माझ्याठाई । वासुदेव होई लीन तेथें ॥४॥
४३-४६

॥१९१॥
सुहास्यवदनीं चित्त ते पुढती । स्थापूनियां दृष्टि अवलोकावई ॥१॥
स्थिर ऐसें चित्त आंवरुनि यत्नें । रमवावें ध्यानें शून्याकाशीं ॥२॥
तेथूनि पुढती निर्गुण परमात्मा । चिंतूनि विषयां लक्षूं नये ॥३॥
सर्वही चिंतन होतां तें विलीन । केव्ळ स्फुरण, समाधि ते ॥४॥
ऐशा तीव्र ध्यानें योगाभ्यासकाची । ज्योती, ज्योतिमाजी लीन होई ॥५॥
ध्याता, ध्येय, ध्यान, कर्ता, क्रिया, कर्म । ऐसे सकल भ्रम शांत होती ॥६॥
वासुदेव म्हणे ध्यानाचा हा मार्ग । शाश्वत अभंगपदीं नेई ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP