स्कंध ११ वा - अध्याय १७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥२०९॥
म्हणे उध्दव कृष्णासी । भक्तिलक्षण धर्मासी ॥१॥
आचरितां सकलां हित । वर्णाश्रमही न जेथ ॥२॥
तथापि तो कवण्या पंथें । आचरितां भक्ति जडे ॥३॥
कृप करुनि तें स्पष्ट । सुलभपणें सांगे मज ॥४॥
पुरा ब्रह्मदेवाप्रति । हंसरुपे जें कथिलेंसी ॥५॥
काळ पालटतां त्याचा । काय उपयोग आतां ॥६॥
मूर्तिमंत विद्या जेथें । तुजवीण कोणी तेथें ॥७॥
ज्ञान, दया सत्वयुक्त । वक्ता लाभला न त्यांस ॥८॥
मग मर्त्यलोकी वक्ता । तुझ्याविणे कोण साचा ॥९॥
संस्थापक, संरक्षक । धर्मोध्दारक तूं एक ॥१०॥
त्यागितां तूं महीतल । धर्म कोण रे कथील ॥११॥
यास्तव तूं ज्याचा त्यासी । सर्वज्ञा तो धर्म कथीं ।\१२॥
कथिती उत्तर शुकदेव । ऐका म्हणे वासुदेव ॥१३॥
९-१३

॥२१०॥
कृष्ण म्हणे प्रश्न कल्याणकारक । वेदाभिमान्यांस अन्यासीही ॥१॥
कृतयुगामाजी एक हंसवर्ण । कृतकृत्य जाण सकल प्रजा ॥२॥
प्रणवरुपचि ते वेद, चतुष्पाद । धर्म मी वृषभ होतों तदा ॥३॥
निष्पाप ते तपोनिष्ठ सर्वलोक । हंसरुपा मज नियमें ध्याती ॥४॥
त्रेतायुगारंभी प्रादुर्भुत वेद । तेणें मी त्रिविधरुप झालो ॥५॥
मज विराटाच्या मुख बाव्हादिकी । चातुवर्ण्य लोकीं प्रगट झालें ॥६॥
स्वस्वभावें त्यांचे धर्मही विभिन्न । वासुदेव ध्यान द्यावें म्हणे ॥७॥
१४-१८

॥२११॥
कटिपश्वात्भागीं गार्हस्थ्य जन्मलें । ब्रह्मचर्य आलें ह्र्दयांतूनि ॥१॥
वक्ष:स्थळी वानप्रस्थ तो आश्रम । मस्तकापासून संन्यास तो ॥२॥
त्या त्या वर्णाश्रमस्थानासम ती ती । लाभली प्रकृति त्या त्या जीवां ॥३॥
शम, दम, तप, शौच तैं संतोष । क्षमा तें आर्जव भक्ति, दया ॥४॥
सत्य ऐशा गुणें प्रकृति विप्राची । तेज, बल, धृति, शौर्यौदार्य ॥५॥
उद्यम, स्थैर्य, तें ब्रह्मण्य, ऐश्वर्य । यागुणें क्षत्रिय शोभतसे ॥६॥
आस्तिक्य तैं दानशूरत्व, अदंभ । ब्रह्मसेवा, तोष न कदा द्रव्यें ॥७॥
वैश्याचे हे धर्म, म्हणे वासुदेव । ध्यानी असो सर्व हितालागीं ॥८॥
१९-२०

॥२१२॥
त्रैवर्णिक, देव तेंवी धेनुसेवा । निष्कपट भावा धरुनिया ॥१॥
लाभ घडे तेणें संतोष मनांत । शुद्रप्रकृतीस ध्यानी घेई ॥२॥
अशौच, अनृत, चौर्य, नास्तिकता । निष्कारण तंटा नरकद्वारें ॥३॥
वासुदेव म्हणे अंतेवासीयांचा । त्या अतिशूद्रांचा स्वभाव हा ॥४॥
२१-२३

॥२१३॥
सत्य, अहिंसा, अस्तेय । काम, क्रोध, तो अलोभ ॥१॥
भूतप्रिय-हित इच्छा । धर्म सार्ववर्णिकांचा ॥२॥
जातकर्मादिक होतां । मौंजीबंधन तत्त्वतां ॥३॥
तेणें द्विजत्वाची सिध्दि । गुरुकुलांत वसती ॥४॥
वेदाध्ययन संयमें । अजिन-दंडादि लक्षणें ॥५॥
दंत, कौपिनीं अलक्ष । नित्य दर्भ, पवित्रक ॥६॥
वासुदेव म्हणे ब्रह्म । सूत्र, मेखला हें चिन्ह ॥७॥
२४-२६

॥२१४॥
स्नान, भोजन तैं होम । जप, मलविसर्जन ॥१॥
मौनें कर्मे हीं करावी । केश, नखें न काढावी ॥२॥
वीर्यनाश न करावा । घडतां प्राणायाम व्हावा ॥३॥
स्नान गायत्रीचा जप । तेणें ब्रह्मचर्यलाभ ॥४॥
अग्नि, गुरु, गो-ब्राह्मण । सकल वृध्दांचें सेवन ॥५॥
देवपूजा शुचिभावें । संध्या वंदन करावें ॥६॥
वासुदेव म्हणे ज्प । करणें गायत्रीचा मुख्य ॥७॥
२७-२८

॥२१५॥
गुरु तोचि ईश मानूनि सर्वदा । अवमान त्याचा न घडो कदा ॥१॥
मर्त्य न गणावा गुरु देवमय । असूया तैं द्वेष न घडो त्याचा ॥२॥
सायंप्रातर्भिक्षा अर्पावी गुरुसी । निर्वाह ते देती, तेणे घडो ॥३॥
आज्ञापिती तेंचि सेवावें अन्यही । असावें निग्रही सर्वकाल ॥४॥
वासुदेव म्हणे ब्रह्मचर्यधर्म । आधार जाणून आचरावें ॥५॥
२९-३२

॥२१६॥
विनम्रभावानें आचार्याची सेवा । कर जोडूनियां करणें नित्य ॥१॥
यान-शय्यासनस्थानीं ते असतां । समीप तयांच्या असणें सदा ॥२॥
गुरुकुलामाजी अखंड यापरी । भोगहीन व्हावी विद्या पूर्ण ॥३॥
क्वचित्‍ कोणा जरी ब्रह्मपद इच्छा । तेणें नैष्ठिकता वरणें योग्य ॥४॥
देहही तयानें अर्पावा गुरुसी । तेंवी भेददृष्टी त्यागावी ते ॥५॥
अग्नि, गुरु, भूतमात्र आपणही । ब्रह्मभावना ही करणें योग्य ॥६॥
वासुदेव म्हणे सर्वत्र ईश्वर । भक्ति हेंचि थोर साधन त्या ॥७॥

॥२१७॥
स्त्रियांचें भाषण दर्शनही त्याज्य । थटटाही ते वर्ज्य नैष्ठिकासी ॥१॥
प्राणिमैथुनही पाहूं नये कदा । ब्रह्मचार्‍यासी हा प्रथम धर्म ॥२॥
विनय, शौच तें आचमन, स्नान । संध्या, जप जाण तीर्थयात्रा ॥३॥
व्रतें हीं पाळावीं अस्पृश्य, अभक्ष्य । तेंवी असंभाष्य वर्ज तया ॥४॥
सर्व आश्रयांचा नियम ऐकावा । सर्वत्र असावा ईशभाव ॥५॥
मन, वाणी देह स्वाधीन असावीं । वासुदेव गाई कृष्णबोध ॥६॥
३६-३९

॥२१८॥
निष्ठापूर्वक जो पाळील हीं व्रतें । अग्नीसम त्याचें तेज वाढे ॥१॥
भक्तियुक्त ऐसें आचरी जो तप । विप्राचें त्या चित्त शुध्द होई ॥२॥
आश्रयान्तरासी इच्छितां, गुरुआज्ञा । घेऊनि दक्षिणा अर्पावी त्यां ॥३॥
समावर्तनानें यथेच्छ आश्रम । स्वीकारुनि धर्म वरणें कांता ॥६॥
वासुदेव म्हणे अनुमोल अन्य । राखूनियां क्रम वरणें जरी ॥७॥
४०-४३

॥२१९॥
यज्ञ, अध्ययन, दान त्रैवर्णिकां । केवळचि विप्रां अन्य तीन ॥१॥
प्रतिग्रह, अध्यापन तैं याजन । या कर्मा न अन्य अधिकारी ॥२॥
प्रतिग्रहें तप, तेज, यशहानी । मानिती त्या दोन्ही पुढिल वृत्ति ॥३॥
अध्यापनादीही दोषद ज्यां वाटे । शिलवृत्ति त्यातें श्रेयस्कार ॥४॥
क्षुद्रकार्यार्थ हा नसे विप्रदेह । इहलोकीं तीव्र तप व्हावें ॥५॥
देहपात होतां अनंत सौख्यार्थ । दारिद्यादि क्लेश स्वीकारावे ॥६॥
शिलोच्छवृत्तीनें राहूनि संतुष्ट । निष्ठायुक्त श्रेष्ठ धर्म पाळी ॥७॥
मदर्पित चित्त अनासक्त गृही । अधिकारी पाहीं शांतीचा तो ॥८॥
वासुदेव म्हणे संसारसिंधूत । शांतिरत्नलाभ अलिप्तासी ॥९॥
४४-४५

॥२२०॥
दु:खाकुल विप्र भक्तांसी संकटीं । सोडविती, त्यांसी नावाडी मी ॥१॥
सागरांत नौकेसम त्यां आधार । होऊनि उध्दार करितों त्यांचा ॥२॥
प्रजेची संकटें निवारावीं नृपें । पिता बालकांतें रक्षी जेंवी ॥३॥
आपणा रक्षूनि रक्षी जो अन्यांतें । धीर संज्ञा त्यातें शोभतसे ॥४॥
श्रेष्ठ मज जेंवी रक्षूनि आपणा । संरक्षी गजांना तैसा नृप ॥५॥
वासुदेव म्हणी नृपाळाचें कर्म । ईश्वरासमान सर्वाधार ॥६॥
४६-४९

॥२२१॥
ऐसा प्रजाहितदक्ष जो नृपाळ । विमान तेजाळ तया येई ॥१॥
इंद्रासह सौख्य भोगी तो स्वर्गात । भूलोकींचे दु:ख निवारुनि ॥२॥
आपत्तींत विप्रां क्षात्र-वैश्यवृत्ति । सेवावृत्ति त्यांसी त्याज्य सदा ॥३॥
नृपातेंही सदा सेवावृत्ति त्याज्य । मृगया, व्यापार, अध्यायन ॥४॥
संकटांत वैश्य वरो शुद्रवृत्ति । शुद्र बुरुडांची वृत्ति वरो ॥५॥
वासुदेव म्हणे संपतां आपत्ति । आपुलाली वृत्ति स्वीकारावी ॥६॥
५०-५४

॥२२२॥
स्वाध्याय तैं स्वाहा, स्वधा, बलिदान । अन्नसंतर्पण नित्य घडो ॥१॥
देव, ऋषी तेंवी सकलही भूतें । जाणूनि मद्रूपें यज्ञ व्हावे ॥२॥
न्याय्यप्राप्त धनें व्हावे पंचयज्ञ । प्रेमानें पाळून आश्रितांसी ॥३॥
आसक्ति नसावी कुटुंबीं कदाही । कदा प्रमादही न घडो तेथें ॥४॥
इह-परसौख्य नश्वर गणावें । पांथस्थ जाणावे कौटुंबिक ॥५॥
स्वप्नासम त्यांचा संग अशाश्वत । जाणूनि ममत्व नसो तेथें ॥६॥
वासुदेव म्हणे अहंममशून्य । अतिथीच धन्य प्रपंची जो ॥७॥
५५-५८

॥२२३॥
गृहस्थधर्मे या तोषवूनि मज । व्हावें वानप्रस्थ अथवा यति ॥१॥
आसक्त जो पुत्र- वित्तेषणायुक्त । होई पाशबध्द मूढमति ॥२॥
माता-पिता वृध्द कांता लेंकुरवाळी । आधार बाळांसी अन्य कोण ॥३॥
मजवीण त्यांचे कैसें व्हावें आतां । ऐसी जया चिंता मूढात्मा तो ॥४॥
अतृप्त, गृहादि चिंतितां मरण । येई तया जाण नरक प्राप्ति ॥५॥
वासुदेव सप्तदशोध्याय कथी । विनवी आसक्ति न जडो कोठें ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP