स्कंध ११ वा - अध्याय ३ रा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥२३॥
संतहो, ब्रह्यादि मायावंतांतेही । मोहीतसे पाही ईशमाया ॥१॥
जाणावी ते म्हणी नृपाळ, संतांनीं । सदय होऊनि निवेदावी ॥२॥
भवतपतप्त मर्त्य मी अतृप्त । हरिकथामृत ऐकूनियां ॥३॥
तापनिवारक दिव्यौषधिरुप । वांणीचा न वीट कदा येई ॥४॥
वासुदेव म्हणे अंतरिक्षमुनि । प्रश्न हा ऐकूनि कथिती बोध ॥५॥

॥२४॥
राया, भूतें, भूतकार्येही निर्मूनि । स्वयें प्रवेशूनि देहामाजी ॥१॥
मन-इंद्रियांनीं घेई गुणभोग । देह हा भौतिक मीचि मानी ॥२॥
सकलही ऐसें घडवी जे तेम्चि । शक्ति ईश्वराची माया नामें ॥३॥
हस्तापादादिकीम वासनासंयुक्त । होऊनि उद्युक्त कर्मामाजी ॥४॥
सकामत्वें तत्तत्कर्मफलें भोगी । ऐसा जीव जगीं भ्रमण पावे ॥५॥
प्रलयान्त ऐसें भोगी सुख-दु:ख । अंती अव्यक्तांत नेई काळ ॥६॥
वासुदेव म्हणी व्यक्ताव्यक्त खेळ । मायेचे सकळ म्हणती मुनि ॥७॥

॥२५॥
शतवर्षे अनावृष्टि, अंति सूर्य । होईल प्रखर त्रैलोक्यांत ॥१॥
शेषमुखांतूनि निघतील ज्वाळा । होईल तयाला साह्य वायु ॥२॥
शतवर्षे सांवर्तक मेघवृष्टि । विरेल त्यामाजी विराटही ॥३॥
अव्यक्तस्वरुप हिरण्यगर्भ जें । तेंचि विराटाचें सूक्ष्मरुप ॥४॥
वासुदेव म्हणे अग्नि निरंधन । कारणांत लीन तैसेचि हें ॥५॥

॥२६॥    
वायुह्र्तगंध भूमी जलरुप । होई तेजोरुप, जल तेंही ॥१॥
रुपहीन तेज, पुढती वायुरुप । नष्टकरी स्पर्श नभ त्याचा ॥२॥
नभाचाही शब्दगुण, ग्रासी काल। तामसाहंकार ग्रासी नभा ॥३॥
तामस राजसी, राजस सात्विकीं । सात्विकहीं अंती महतामाजी ॥४॥
शेवटीम महत्‍ तें प्रकृतीत लीन । माया हे कारण सर्गादीसी ॥५॥
वासुदेव म्हणे गुणमयी माया । महणती मुनि राया, अन्य काय ॥६॥

॥२७॥
राव म्हणे मुने, ईशमाया जनीं । दुस्तर जाणुनि अकृतात्म्यांसी ॥१॥
देहात्मवादीही तरती लीलेनें । उपाय दयेनें कथा ऐसा ॥२॥
’ प्रबुध्द ’ बोलती आरंभिती कर्म । दु:ख निरसून सुखलाभार्थ ॥३॥
अनुभव परि उलटचि येई । दांपत्यां या ठाई, अवलोकावें ॥४॥
नित्य दु:खदचि असूनि दुर्लभ । आत्ममृत्युरुप सकल वित्त ॥५॥
कष्टसंपादित पशु-गृहापत्य । काय सुखलाभ नश्वरानें ॥६॥
यज्ञविनिर्मित स्वर्गातही हेंचि । स्पर्धा, असूया तैं भयादिक ॥७॥
समानाची स्पर्धा, निंदा वरिष्ठांची । भीति विनाशाची नश्वरत्वें ॥८॥
यास्तव सद्‍गुरु चरण धरावे । परमे श्रेय व्हावें वाटे तेणें ॥९॥
शब्दज्ञान साक्षात्कारही जयासी । ब्रह्मबोधें शांतिसनचि जे ॥१०॥
वासुदेव म्हणे जिज्ञासू होऊनि । पंथ हा क्रमूनि श्रेय लाभो ॥११॥

॥२८॥
सद्‍गुरुचि आत्मा दैवत मानूनि । तयातें सेवूनि शुध्दभावें ॥१॥
आत्मा आत्मदहि हरि जेणें तुष्ट । धर्म भागवत पुसिजे तेचि ॥२॥
गृह-दारादिकीं व्हावें अनासक्त । जोडावा सत्संग अत्यादरें ॥३॥
दया, मैत्री, नम्रभाव यथोचित । सद्‍गुण प्रत्यक्ष संपादावे ॥४॥
शौच, तप, मौन, तितिक्षा, स्वाध्याय । अहिंसा, आर्जव, ब्रह्मचर्य ॥५॥
समभाव द्वंद्वीं सच्चित्सुखरुप । आत्माचि सर्वत्र अवलोकावा ॥६॥
नियामकरुपें ईश्वर पहावा । अभिमान नसावा गृहादिकीं ॥७॥
एकान्त सेवूनि वल्कलें वा चिंध्या । पांघराव्या यथालाभें तोष ॥८॥
पावूनियां, भागवतशास्त्री श्रध्दा । अन्यशास्त्र निंदा न घडो कदा ॥९॥
मन-वाणी-कर्म-संयम शिकावा । शम, दम, व्हावा सत्यासवें ॥१०॥
वासुदेव म्हणे साधनस्वरुप । सद्‍गुण हे नित्य अभ्यासावे ॥११॥

॥२९॥
ऐकावी अद्‍भुत कर्मे श्रीहरीची । गावीं घ्यावी तीचि सर्वकाळ ॥१॥
जन्म, कर्म, गुण गाऊनि तयाचे । क्रिया सर्व त्यातें समर्पाव्या ॥२॥
इष्टापूर्त जप, तप, सदाचार । प्रियही साचार आपणा जें ॥३॥
दारा, सुत, गृह, प्राणही अर्पावे । सकल शिकावें गुरुपाशीं ॥४॥
प्राणप्रिय कृष्ण, तोचि जया नाथ । जोडावें सौह्र्द ऐशा नरां ॥५॥
स्थावर -जंगमीं तेंवी मनुजमात्री । धार्मिकाचे ठाई प्रेम असो ॥६॥
त्यांतही सद्भक्त सेवावे सर्वदा । पुसावा हा पंथा सद्‍गुरुसी ॥७॥
आशा, असूया तैं स्पर्धावारणार्थ । संवाद भक्तांत व्हावा सदा ॥८॥
पावन तें यशगान, संभाषण । परस्पर प्रेमबृध्दी करी ॥९॥
वासुदेव म्हणे परस्पर बोधें । दु:खनिवृत्तीचे शिकणें मार्ग ॥१०॥

॥३०॥
पापविवारक करिती स्मरण । करविती प्रेमभावें तेंचि ॥१॥
साधनेनें ऐशा होती प्रेमरुप । देह पुलकित होई त्यांचा ॥२॥
अलौकिक ऐसे भक्त, ईशप्रेमें । सद्‍गद कंठानें रडती क्वचित्‍ ॥३॥
हांसती, हर्षती, सप्रेम बोलती । गाती, नाचताती अत्यानंदें ॥४॥
लीलानुकरणें येई तद्रुपता । हर्षे त्या स्तब्धता पावताती ॥५॥
शिकूनियां ऐसे भागवतधर्म । आचारें त्या प्रेम हरिचें जया ॥६॥
नारायणपर होऊनि तो नर । उल्लंघी दुस्तर सहज माया ॥७॥
वासुदेव म्हणे भागवतधर्म । आचरितां धन्य होई जीव ॥८॥

॥३१॥
राव म्हणे कथा ब्रह्म । नांव ज्याचें नारायण ॥१॥
श्रेष्ठ ब्रह्मज्ञ तुह्मींचि । निवेदावें तें मजसी ॥२॥
पिप्पलायन तदा राया । वदले मोद पावूनियां ॥३॥
विश्वोत्पत्त्यादि कारण । असूनि जया न कारण ॥४॥
साक्षी अवस्थात्रयाचा । समाधींतही जो साचा ॥५॥
देह, इंद्रिये, मनादि । जेणें व्यापार पावती ॥६॥
परमात्मा नारायण । राया, तेंचि परब्रह्म ॥७॥
वासुदेव म्हणे एक । नारायण श्रेष्ठ तत्व ॥८॥
 
॥३२॥
ज्वालांसीच ज्वाला प्रकाश न देती । अथवा न जाळिती अग्नीतेंही ॥१॥
चक्षु, मन, वाणी, बुध्दि तेंवी प्राण । असमर्थ जाण जाणण्या जें ॥२॥
नेति नेति शब्दें श्रुति मात्र कथी । सीमा निषेधाची तोचि आत्मा ॥३॥
एकचि जो बहु प्रकारें प्रकाशे । त्रिगुणात्मक भासे मायारुपें ॥४॥
तोचि क्रियारुपें सुत्रात्मा भासतो । ज्ञानशक्तीनें तो महत्तत्त्व ॥५॥
जीवाहंकारही तोचि राया, पाहीं । सूर्यादिक होई देवता तो ॥६॥
दर्शनादि क्रिया, रुपादि विषय । संवेदना होय सुखादिक ॥७॥
वासुदेव म्हणे आहे, नाहीं सूक्ष्म । स्थूलही, संपूर्ण तोचि एक ॥८॥

॥३३॥
जन्मला न कदा मरण ज ज्यासी । क्षय-वृध्दि त्यासी नसे कांही ॥१॥
बाल्य तारुण्यादि अवस्थांचा साक्षी । तैसा सर्वव्यापी शाश्वत तो ॥२॥
अजर अमर उपलब्धि मात्र । प्राण जेंवी एक विविध देहीं ॥३॥
चारी खाणीमाजी जीवाअनुसरण । करुनियां प्राण वसतो सदा ॥४॥
अहंवृत्तीसवें इंद्रियेंही लीन । उपाधिविहीन तदा आत्मा ॥५॥
निर्लेपा तयाचें स्मरण जीवासी । संपतां, सुषुप्ति होत असे ॥६॥
वासुदेव म्हणे सर्वावस्थासाक्षी । आत्मा निरुपाधि निर्विकार ॥७॥

॥३४॥
निर्मळ दृष्टीने प्रकाशग्रहण । तैसें शुध्द मन, आत्मा दावी ॥१॥  
पद्मनाभपादपद्मदर्शनेच्छा । अंतरी भक्तीचा उगम करी ॥२॥
मलविक्षेपांचा तेणे घडे नाश । मूळ तें जयांस गुण-कर्म ॥३॥
राव म्हणे मुने, कथा कर्मयोग । जेणें सुसंस्कृत होय नर ॥४॥
विशुध्दकर्मा तो पावूनि नैष्कर्म्य । पावेल परमपद जेणें ॥५॥
पुरा हेंचि तातासमक्ष पुशितां । वदले कांही न कां ब्रह्मपुत्र ॥६॥
वासुदेव म्हणे ’ आविर्होत्रमुनि ’ उत्तर देऊनि तोषविती ॥७॥

॥३५॥
विहित तें कर्म, निषिध्द अकर्म । विहित अकरण, विकर्म तें ॥१॥
कर्मनिर्णय हा वेदेंचि करावा । पात्रता मानवा नसे त्याची ॥२॥
ईश्वरोक्त वेद, तत्व ते जाणिती । ज्ञात्यांचीही मति, मोह पावे ॥३॥
बालबुध्दि तव जाणुनि, कुमार । न देतां उत्तर स्वस्थ झाले ॥४॥
परोक्षवादी ते वेद जाणे बापा । दाविती आमिषा कार्यास्तव ॥५॥
कर्म मुक्त्यर्थचि कर्मनिवेदन । वासुदेव ध्यान द्यावें म्हणे ॥६॥

॥३६॥
अज्ञ किंवा असंयमी । धर्म वेदोक्त त्यजूनि ॥१॥
करी निषिध्दाचरण । वारंवार तया जन्म ॥२॥
वेदाज्ञा जो ईश्वरार्थ । पाळी, परी अनासक्त ॥३॥
लाभे नैष्कर्म्य तयासी । रोचनार्थ फलश्रुति ॥४॥
स्वर्गादिक लाभतांही । तेथ आसक्ति न कांहीं ॥५॥
सिध्दि नैष्कर्म्य ते जाणा । वासुदेवाचा हा बाणा ॥६॥

॥३७॥
परब्रह्मरुपी जीव अहंबंध । छेद, इच्छी त्यास कथिती मार्ग ॥१॥
वैदीक - तांत्रिकमार्गे केशवासी । आराधी तयासी त्वरित यश ॥२॥
आचार्योक्तमार्गे राम-कृष्णरुपी । इष्टदेवतेची पूजा व्हावी ॥३॥
देहविशुध्यर्थ प्राणायामादिक । करुनियां, शुध्द अंतर्बाह्य ॥४॥
होऊनि, सन्मुख बैसावें मूर्तीच्या । स्वरक्षणें पूजा न्यास घडो ॥५॥
पूजाद्र्व्यें सर्व सन्निध घेऊनि । सविधि प्रोक्षूनि आत्म्यासवें ॥६॥
समाहितचित्तें ह्र्दयादि न्यासें । पूजावें प्रभूतें यथालाभें ॥७॥
वासुदेव म्हणे पूजितां मूर्तीसी । ह्रदयांत तेचि पूजा व्हावी ॥८॥

॥३८॥
ह्रदयादि, अंगें, आयुधें, चक्रादि । पार्षद, नंदादि मंत्रें त्या त्या ॥१॥
अर्ध्य, पाद्य, वस्त्र, अलंकार, गंध । पुष्प, धूपदीप, नैवेद्यही ॥२॥
पूजाद्रव्यें यथासांग पुरुषोत्तम । पूजावा, स्तवून वंदावें त्या ॥३॥
हरिरुप स्वयें पाहूनि आपणा । ध्यावें नारायणा ह्रदयामाजी ॥४॥
निर्माल्य मस्तकीं करुनि धारण । समाप्त पूजन व्हावें प्रेमें ॥५॥
ह्र्दयीं, पेटिकेमाजी वा श्रीहरि । ठेऊनि अंतरी तुष्ट व्हावें ॥६॥
अग्नि, सूर्य, जल, अतिथीमाजी वा । श्रीहरि पूजी, वा, ह्रदयींही जो ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसा यतिश्रेष्ठ । भवबंधमुक्त त्वरित होई ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP