स्कंध ११ वा - अध्याय १३ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य॥१६५॥
त्रिगुण ते बुध्दिगुण, न आत्म्याचे । सत्वेंचि तयांचें शमन घडे ॥१॥
सत्ववृध्दि होतां भक्तिरुप धर्म । वाढे, सत्वगुण, सात्विकान्नें ॥२॥
सद्धर्मे जाणावा रज-तमनाश । तन्नाशें विनाश अधर्माचा ॥३॥
शास्त्र, तीर्थ, प्रजा, देश, काल, कर्म । जन्म, मंत्र, ध्यान, संस्कारही ॥४॥
वासुदेव म्हणे पदार्थ हे दश । गुणवृध्दिकारक म्हणे कृष्ण ॥५॥
५-८

॥१६६॥
शास्त्रज्ञ मानिति तेंचि सत्वयुक्त । निंदिती ते ज्यास तामस तें ॥१॥
उपेक्षिती जया राजस तें कर्म । सात्विकचि जाण आदरावें ॥२॥
तेणे धर्मवृध्दि होतांचि निर्धारें । अज्ञानांधकारें दूर होती ॥३॥
संघर्षे जाळूनिइ अग्नि, वेणुवन । स्वयेंचि उपशम पावे जैसा ॥४॥
गुण वैषम्यज देह तैशापरी । विचारें निवारी अज्ञानासी ॥५॥
कृष्णा, विपत्ति हे विषय जाणून । खर, श्वान, जन, कैसे होती ॥६॥
वासुदेव म्हणे प्रश्न उध्दवाचा । उत्तर परिसा भगवंताचें ॥७॥
९-११

॥१६७॥
प्रमत्ताप्रति ते मिथ्या अहंवृत्ति । घोर रज चित्तीं उपजे तेणें ॥१॥
पुष्ट तयायोगें मनींचा संकल्प । ध्यानें त्याचि नित्य कामवृध्दि ॥२॥
अनिवार कामें इंद्रियाधीनता । तेणें बेभानता जाणुनिही ॥३॥
रजोगुणवेगें खर-श्वानांसम । वैषयिक कर्म करी जीव ॥४॥
वासुदेव म्हणे कामाचा किंकर । होऊनिया नर खररुप ॥५॥
१२-१४

॥१६८॥
रज-तमें बुध्दिभ्रष्टता पावतां । विवेकेंचि ज्ञाता यत्न करी ॥१॥
वारंवार दोषचिंतन करुनि । चित्त आंवरुनि त्यजी काम ॥२॥
सावधानतेनें न होतां निराश । समर्पावें चित्त मजसी यत्नें ॥३॥
हळु हळु स्थिर करावें त्याठाई । निश्चितसमयी यत्न व्हावा ॥४॥
जितासन, जितश्वास होऊनियां । अभ्यास करावा ऐशारीति ॥५॥
तदा स्थिर मन प्रवेशे मद्रूपी । योग हा शिष्यांसी कथिला पूर्वी ॥६॥
सनकादिकांनी आणिला तो जनी । वासुदेव मनीं चिंती तोचि ॥७॥
१५-१७

॥१६९॥ ( हंसगीता )
म्हणे उध्दव केशवा । सनकादिकां तूं केशवां ॥१॥
कोण्यारुपें कथिला योग । मजसी कथावें तें सर्व ॥२॥
देव म्हणे सनकादिक । पुत्र विरंचीचे देख ॥३॥
योगज्ञानही तयांनी । पुशिलें स्वपित्यालागोनी ॥४॥
ताता, चित्त गुणांमाजी । प्रवेशे, ते चित्तामाजी ॥५॥
प्रवेशती, मुमुक्षुनें । कैसे त्यागावे ते यत्नें ॥६॥
वासुदेव म्हणे ऐक्य । चित्त गुणांचें तो बंध ॥७॥
१८-२१

॥१७०॥
देव म्हणे स्वयंभू तो भूरनाथ । चिंतितीही बोध न होई त्या ॥१॥
मग माझे ध्यान करितां सन्निध । जाहलों प्रगट हंसरुपें ॥२॥
पाहूनि मजसी सर्व ते वंदिती । कोण तूं करिती प्रश्न ऐसा ॥३॥
वासुदेव म्हणे उत्तर प्रश्नाचें । देऊनि चित्तातें परिसा आतां ॥४॥
२२-२६

॥१७१॥
भेदातीता मज प्रश्न ऐसा केंवी । विप्रहो, या ठाई संभवेल ॥१॥
उत्तरदात्यासी आधार तो काय । आत्मा एकमेव निरुपाधि ॥२॥
पाश्वभौतिक हें सर्वही समान । यास्तव हा प्रश्न निरर्थक ॥३॥
इंद्रियें मन वा वाचेनें जें ग्राह्य । जाणावें ते सर्व मीचि एक ॥४॥
बाळांनो, हे चित्त गुण एकमेकीं । प्रवेशती तोचि जीवदेह ॥५॥
निरंतर ध्याने, गुणांमाजीचित्त । वासनास्वरुप गुण चित्ती ॥६॥
मद्रुप जीव त्यां उभयांसी त्यागी । वंद्य तोचि योगी वासुदेवा ॥७॥
२७-३०

॥१७२॥
जाग्रत्स्वप्ननिद्द्रागुणें बुध्दिवृत्ति । विलक्षण साक्षी जीव तयां ॥१॥
संसृतिपाश हा गुणावस्था देई । अलिप्त त्यां पाही तुरीय तो ॥२॥
होऊनियां, छेद करावा पाशांचा । गुणचित्तयोगा तैंचि नाश ॥३॥
आनंदस्वरुपा अहंकारबंध । होई दु:खरुप जाणूनि हें ॥४॥
विषयविरागें ज्ञाता तुर्यास्थित । संसारचिंतेस त्यागी सुखें ॥५॥
नानात्व जोंवरी गळे न युक्तीनें । जागृतीचि म्हणे स्वप्नासी तों ॥६॥
वासुदेव म्हणे स्वप्न ते जागृति । भासे अज्ञानेंचि अनेकत्वें ॥७॥
३१-३३

॥१७३॥
आत्मभिन्न सर्व मिथ्याचि यास्तव । तज्जन्य ते सर्व भेद, कर्मे ॥१॥
फळे, कामनाही मिथ्याचि ती सर्व । यथा स्वप्नमय आभास ते ॥२॥
जागृतींत मन, बुध्दि, इंद्रियांनीं । अनुभव जनीं नश्वराचा ॥३॥
स्वप्नीं तेंचि भोगी, आंवरी निद्रेत । द्रष्टा इंद्रियेश परी एक ॥४॥
सर्वस्मरण त्या ऐशा मायाकृत । अवस्था, सुस्पष्ट जाणूनियां ॥५॥
अनुमान, शास्त्र-ज्ञानरुप खड्‍गें । संशयमूळ जें अहंभाव ॥६॥
छेदूनि भजावें ह्र्दयस्था मज । वासुदेवा बोध तारक हा ॥७॥
३४-३६

॥१७४॥
केवळ भ्रमाचा बाजार हें विश्व । सर्व मनोमय पसारा हा ॥१॥
अलातचक्रचि विनाशी हें दृश्य । भासे विविधाकार एक तत्व ॥२॥
अज्ञानस्वप्न हें गुणमय त्रिधा । जाणुनियां मुधा, मुरडा दृष्टि ॥३॥
वासनानिवृत्त निष्काम होऊनि । निजसुखधामी स्थिर व्हावें ॥४॥
ऐशा स्थितीतही भासतां हा भास । अशाश्वत बोध भ्रमहारी ॥५॥
यावच्छरीर हें दृश्यभान राही । परी बाधा नाहीं ज्ञात्यासी ते ॥६॥
देहभान नसे जीवन्मुक्ताप्रति । जेंवी मदांधासी वस्त्रभान ॥७॥
वासुदेव म्हणे मुक्ताची हे स्थिति । भानाभान त्यासी यदृच्छेनें ॥८॥
३७-४०

॥१७५॥
प्रारब्धभोगार्थ शरीर सप्राण । स्वप्न हें जाणून न भूले ज्ञाता ॥१॥
समग्र प्रपंच जाणूनि माइक । कदाही न लिप्त, सिध्द तेथें ॥२॥
हंस म्हणे आलों विष्णु मी प्रत्यक्ष । कथाया रहस्य तुह्मांप्रति ॥३॥
विप्रहो, मी सांख्य, योग, सत्य, ऋत । कीर्ति, दम तेज, तैसीच श्री ॥४॥
अधिष्ठान यांचे, निर्गुण निरपेक्ष । परी गुण मज सेविताती ॥५॥
अलिप्तता, साम्य आदि अगुणहि । सहद‍प्रीया पाही भजती मज ॥६॥
वासुदेव म्हणे आत्माश्रित जे जे । गुण शाश्वत ते अगुण जाणा ॥७॥
४१-४२

॥१७६॥
ऐशा बोधे मुनि जाहले नि:शंक । भक्तिभावें मज पूजिती ते ॥१॥
स्तवनही स्तोत्रें गाऊनियां केलें । प्रेमें स्वीकारिलें पूजनासी ॥२॥
घेऊनि सप्रेम निरोप तयांचा । ब्रह्मा अवलोकितां पुढती त्याच्या ॥३॥
निजधामी ठेलो, कथी हंसदेव । म्हणे वासुदेव व्यापक तो ॥४॥
(हंसगीता समाप्त )


N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP