स्कंध ११ वा - अध्याय २८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥३२४॥
प्रकृति-पुरुष कार्यरुपें एक । जाणुनि हें विश्व, शांत, घोर ॥१॥
स्वभावज कर्मप्रशंसा वा निंदा । करूं नये कदा ध्यानीं असो ॥२॥
उध्दवासी कृष्ण म्हणती निंदा-स्तुति । असत्याभिमानेंचि होत असे ॥३॥
यास्तव पतन साधकाचें तेणें । नानात्वदर्शनें द्वैतभाव ॥४॥
सुषुप्ति वा मृत्यु, लीन होतां मन । अथवा स्वप्नभ्रम भेदभावें ॥५॥
नाहीं तेंचि पाही आहे तें न पाही । तत्त्वभ्रष्ट होई जीव ऐसा ॥६॥
उच्चारित किंवा मन:कल्पित जें । अनित्य सर्व तें द्वैतमय ॥७॥
वासुदेव म्हणे निंदा-स्तुति काय । शुभाशुभ होय नाशिवंता ॥८॥

॥३२५॥
असत्यही प्रतिध्वनि छायादिक । सुख-दु:खात्मक करिती कार्ये ॥१॥
तेंवी देहादिक असूनियां मिथ्या । आमृत्यु सुख-दु:खां निर्मिताती ॥२॥
उत्पत्त्यादि सर्व होई स्वयें आत्मा । निरुपण त्रिधा भासमात्र ॥३॥
गुणमय विश्व आत्मा तो निर्गुण । निंदा-स्तुतिसम सूर्या जेंवी ॥४॥
यास्तव प्रमाणें जाणूनियां मिथ्या । अनासक्त ज्ञाता राही स्वयें ॥५॥
वासुदेव म्हणे प्रकाशे सर्वत्र । सूर्य, तेंवी भेद ज्ञात्यासी न ॥६॥

॥३२६॥
उध्दव साशंक होऊनियां पुशी । सुख-दु:खें कैसी कवणालागी ॥१॥
काष्ठासम देह जड, मग सुख । तैसेचि हें दु:ख कवणा केंवी ॥२॥
निर्गुण अव्यय, आत्मा स्वयंज्जोति । देह जड त्यासी जाणीव न ॥३॥
यास्तव संसार कैसा, कोणालागीं । कथी भगवदुक्ति वासुदेव ॥४॥

॥३२७॥
कृष्ण म्हणे देह-इंद्रियां तादात्म्य । पावूनियां अज्ञ संसारी हा ॥१॥
नित्य ध्यानें, स्वप्नभ्रम जैशापरी । तैसें जग पाही नसतांचि हें ॥२॥
स्वप्नस्थासी बहु अनर्थ ते स्वप्नीं । जागृतींत ज्ञानी निर्मोहचि ॥३॥
हर्ष- शोकादिकां अहंकारमूळ । आत्मा तो केवळ निर्विकार ॥४॥
देहेंद्रिय, प्राण, मन तो मी ऐसें । मानितां आत्म्यातें जीवभाव ॥५॥
उपाधिभेदें तो सूत्रात्मादि होई । कालवशें पाही भ्रमण पावें ॥६॥
वासुदेव म्हणे गुणकर्ममूर्ति । होऊनि आभासीं भ्रमतो जीव ॥७॥

॥३२८॥
ऐसें अहंकारोद्भव सर्व कर्म । निर्मूल जाणून रमतो ज्ञाता ॥१॥
ज्ञानशस्त्रें मूळ छेदूनि तयाचें । संचरतो सुखें अवनीवरी ॥२॥
वेद-शास्त्रतपें पावूनि विवेक । पमाणें समस्त अभ्यासूनि ॥३॥
होऊनि संदेहरहित, आदि-अंतीं । मध्यकालीं तेंचि पाही ब्रह्म ॥४॥
सुवर्णचि एक सकल अलंक्दार । तैसाचि व्यवहार ब्रह्मरुप ॥५॥
वासुदेव म्हणे होतां ऐसें ज्ञान । सकळही भ्रम दूर होई ॥६॥

॥३२९॥
वेदांतीं अन्वय-व्यतिरेकपध्दति । पाहतां आत्माचि एक सत्य ॥१॥
अवस्थागुण वा अध्यात्मादि भेद । प्रकाशित तेंच करी एक ॥२॥
उत्पत्तिपूर्वी जें नसे अंतींही न । वर्तमानीं भ्रम सहजचि तें ॥३॥
नामरुप मात्र कारणीं ते भास । कारण स्वरुप सिध्दान्त हा ॥४॥
रजोगुणोत्पन्न भासहा सकळ । ब्रह्म एकमात्र विविध भासे ॥५॥
यापरी निश्चय करुनि शास्त्रानें । अनासक्त व्हावें देह-गेहीं ॥६॥
वासुदेव म्हणे प्रत्यक्ष तर्कादि । योजूनियां हेंचि सिध्द होई ॥७॥

॥३३०॥
शरीर पार्थिव, इंद्रियें इंद्रादि । भौतिक शब्दादि विषय जाणें ॥१॥
अन्नमयचि ते अंत:करणादि । विषय, प्रकृति सकळ जड ॥२॥
यास्तव तीं आत्मा नव्हेतचि कोणी । विवेकें हें ज्ञानी जाणतसे ॥३॥
मग इंद्रियाचा संयम वा क्षोभ । काय करी मेघ सूर्याप्रति ॥४॥
वासुदेव म्हणे मेघ येतां जातां । न्यूनाधिक सूर्या काय होय ॥५॥

॥३३१॥
शीत, उष्ण, ऋतु, बाधती न नभा । तैसे त्या स्वयंभा गुणादिक ॥१॥
तथापि मालिन्य भक्तीनें न नष्ट । मनाचें, हे कष्ट तावत्काल ॥२॥
निर्मूल न रोग तोंवरी औषध । सोडूं नये, संग तेंवी त्याज्य ॥३॥
अपक्ककषायें मलिन मानस । अपक्व योग्यास भ्रष्ट करी ॥४॥
परी अंतरायें होती योगभ्रष्ट । करिती ते अभ्यास पुढिल जन्मीं ॥५॥
फलप्रद कर्मी आसक्ति न तयां । मोद वासुदेव योगाभ्यासें ॥६॥

॥३३२॥
अज्ञ प्राक्संस्कारें कर्मे यावज्जीव । करुनि विकार पावे बहु ॥१॥
परी तृष्णाहीन ज्ञाता आत्मानंदें । असुनिही कोठें नसल्यापरी ॥२॥
देह जातां, येतां, उठता, बैसतां । खातां, निद्रा घेतां, त्यजितां मळ ॥३॥
स्वभावप्राप्त बा घडतां अन्य कर्मे । अलिप्तचि जाणें नित्य ज्ञाता ॥४॥
वासुदेव म्हणे यास्तव ज्ञात्यासी कवण्याही कर्माची नसे बाधा ॥५॥

॥३३३॥
मिथ्या इंद्रियांचे विषयही मिथ्या । पाहूनिही द्वैता न शिवे ज्ञाता ॥१॥
नानारुपें मिथ्या जेंवी ती स्वप्नस्थ । विषय असत्य समजें तेंवी ॥२॥
लाभतां जागृति, सहज स्वप्न मिथ्या । ज्ञान होतां खोटा तैसा भव ॥३॥
गुणकर्मे चित्रविचित्र अज्ञान । आत्म्यावरी भान अविवेकानें ॥४॥
आत्मबोधाभ्यासें विनष्ट ते होई । ग्राह्य न त्याज्यही आत्मा स्थिर ॥५॥
सूर्यप्रकाश जैम नाशूनि तमातें । पदार्थ दावी जे असती तेचि ॥६॥
वासुदेव म्हणे बुध्दिस्थ अज्ञान । नष्ट होतां ज्ञान सहज सिध्द ॥७॥

॥३३४॥
अज, अप्रमेय, निर्विकार एक । अनुभवरुप अद्वितीय ॥१॥
विराम वाणीचा प्रेरणा तियेसी । प्राणासवें तोचि करीतसे ॥२॥
स्वगतादि भेदही न आत्म्यामाजी । विकल्प ते भ्रांति, आत्माश्रित ॥३॥
नामरुपात्मक हें पांचभौतिक । मानिताती सत्य द्वैतभावें ॥४॥
अद्वैतवाक्यां जे म्हणती अर्थवाद । भ्रांत ते पंडित द्वैतवादी ॥५॥
वासुदेव म्हणे नामरुप सत्य । मानूनि अनर्थ करिती वेडे ॥६॥

॥३३५॥
अपक्की योग्यानें रोगपीडा होतां । मार्ग काय ऐका आचरावा ॥१॥
असनीं धारणासंयुक्त कुंभक । औषधि वा तप, मंत्रमार्ग ॥२॥
नामसंकीर्तन ध्यान, सिध्दसेवा । उपाय जाणावा विविध ऐसा ॥३॥
औषधेंही कोणी राखिती तारुण्य । परी किती दिन स्थैर्य त्यातें ॥४॥
यद्यपि अमरत्व लाभलें योगानें । तरी ज्ञानाविणें शीणचि तो ॥५॥
भक्तियुक्त ज्ञान आचरी तयातें । करील बापुडें काय विघ्न ॥६॥
कारण विषयविरागें तो ज्ञाता । उल्लंघूनि पीडा, पार जाई ॥७॥
वासुदेव म्हणे आत्मानंदमग्न । पाहूनियां विघ्न भ्रम न पावें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP