स्कंध ११ वा - अध्याय २६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥३०८॥ ।१-४।
उध्दवासी बोले कृष्ण मोक्षदाता । देह, हा लाभतां भक्तिभावें ॥१॥
भजे जो मजसी तया परमानंद्द । लाभे मतस्वरुपप्राप्तियोगें ॥२॥
गुणोपाधि त्याचा होतसे विनष्ट । असोनि गुणांत निर्लेप तो ॥३॥
शिश्नोदरतृप्त नास्तिकाच्या संगें । अंधा अंधसंगें नरक तेंवी ॥४॥
उर्वशीविरहमूढ ऐलराव । कथी वासुदेव गाथा त्याची ॥५॥

॥३०९॥ ।५-१०।
त्यजोनि आपणा जाई तैं उर्वशी । न त्यागी मजसी म्हणे राव ॥१॥
व्याकुळ होवोनि धांवे दिगंबर । अतृत्प अंतर कामाकुल ॥२॥
बहु संवत्सरांचेही न त्या भान । वेडावला प्राण त्यजूं पाहे ॥३॥
शुध्दीवरी येतां म्हणे मी उन्मत्त । जाहलों, ती प्राप्त होतां व्यर्थ ॥४॥
बहु वय गेलें कित्येक दिवस । उदय वा अस्त कळला नाही ॥५॥
सार्वभौम राजा असूनि विक्रमी । खेळणेंचि जनीं स्त्रीहातीचें ॥६॥
कस्पटासमान लेखिलें मजसी । रडलो, नग्नचि मागें गेलों ॥७॥
वासुदेव म्हणे मोह अनिवार । चिंतूनियां ऐल चकित झाला ॥८॥

॥३१०॥ ।११-१६।
सोशिल्या तियेच्या लत्ता खरासम । सत्ता, पराक्रम व्यर्थ गेले ॥१॥
विद्या, तप, त्याग, श्रुत तेंवी मौन । व्यर्थचि ते जाण स्त्रीजिताचें ॥२॥
ग्राम्य पशूंसम राव मी स्त्रीजित । अहंमन्य मूढ धिक्कारार्ह ॥३॥
आहुतीनीं अग्नि, तैसा सहज काम । दीर्घकालेंही न पुरला माझा ॥४॥
वेश्याहता मज अधोक्षजाविण । सोडविता कोण अन्य आतां ॥५॥
उर्वशीनें मज बोधिलें बहुत । परी मोह नष्ट झाला नाहीं ॥६॥
वासुदेव म्हणे शृंखला लोहाच्या । तुटती, कामाच्या परी न सैल ॥७॥

॥३११॥ ।१७-२४।
भ्रम रज्जूसम मज उर्वशीचा । दोष न तियेचा लवही वाटे ॥१॥
दुर्गंधाची खाण, कोठें मलिन देह । निर्मल तो सत्त्वगुण कोठें ॥२॥
परी अध्यासें हा भ्रमतो मानव । ऐसा हा प्रभाव अविद्येचा ॥३॥
माता-पिता, पत्नी, आप्त, मित्र, अग्नि । गृध्र, श्वान, मानी स्वदेह हा ॥४॥
मानिति सर्वही माझा, तैसा मीहि । मानितो माझ्याचि अज्ञान हें ।\५॥
मनोहर हास्य सरल नासिका । सुंदरस्वरुपा भुलतो जीव ॥६॥
मज्जा मांसादीत मानिला आनंद । वाटतें मी कीट नरकीचा कीं ॥७॥
यास्तव स्त्री, स्त्रैण त्यागावे सर्वथा । हेतु मनक्षोमा विषयसंग ॥८॥
अदृष्ट अश्रुती न होई आसक्ति । विविक्ता विराक्ति शांतिप्रद ॥९॥
वासुदेव म्हणे संग स्त्री-स्त्रैणांचा । बाधें मोठमोठया ज्ञात्यांसीही ॥१०॥

॥३१२॥ ।२५-३१।
कृष्ण म्हणे ऐसी गाऊनियां गाथा । ऐल उर्वशीचा त्याग करी ॥१॥
आत्मा तो परमात्मा जाणुनि नि:संग । होई, शोक-मोह त्यागूनियां ।\२॥
यास्तव दु:संग त्यजूनि सत्संग । धरितांचि भंग आसक्तीचा ॥३॥
सब्दोध संतांचा समूळ आसक्ति । नष्ट करी, चित्तीं रुजलीसे जी ॥४॥
समदर्शी शांत भक्त निरपेक्ष । अहंममत्यक्त निर्द्वद्व ते ॥५॥
सत्संगे श्रवण घडे मत्कथांचे । श्रवणें पातकांचे उच्चाटन ॥६॥
श्रवण गायन आदरानुमती । जया परमभक्ति उपजे त्यांसी ॥७॥
सगुण निर्गुण स्वरुपाचे ठायीं । जडतां भक्ति येई कृतार्थता ॥८॥
अग्निसंगें शीतभय, तम जाई । संतसंगें तेंवी मायाभंग ॥९॥
वासुदेव म्हणे सत्संग सकळ । हरुनियां मळ विमल करी ॥१०॥

॥३१३॥ ।३२-३५।
जलमग्ना, नौका तारक ज्यापरी । ज्ञाते संत तेंवी भवमग्ना ॥१॥
भुकेल्यांसी अन्न, दीनां नारायण । मृतां धर्म त्राण, भ्रांतां संत ॥२॥
जन्म -मरणभयग्रस्त जीवांप्रति । निर्भयता देती एक संत ॥३॥
अंध:करमात्र नष्ट सूर्यतेजें । सामर्थ्य संतांचे अलौकिक ॥४॥
विविध साधनें नाशिती अज्ञान । सकल आप्तजन, आत्माही ते ॥५॥
विषयगिरागें वीतसेना पुत्र । उर्वशीचे पाश छेदूनियां ॥६॥
आत्माराम आत्मक्रीड आत्मरति । होऊनियां, क्षिती हिंडे सौख्यें ॥७॥
वासुदेव म्हणे अचल वैराग्य । तेंचि महाभाग्य सुकृतें लाभे ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP