स्कंध ११ वा - अध्याय ३० वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥३४८॥
परीक्षिति म्हणे उध्द वनांत । जाता भगवंत काय करी ॥१॥
विप्रशापें नष्ट होतील यादव । ऐकूनि माधव कैशारीति ॥२॥
त्रैलोक्यसुंदर सोडी निजदेह । वेडावंती नेत्र पाहूनि ज्या ॥३॥
ऐकूनि जें साधू होती पदी लीन । होई प्रेममग्न कविवावी ॥४॥
पाहूनि ज्या पार्थरक्षी सरुपता । केवी त्या मोक्षदा देहत्याग ॥५॥
वासुदेव म्हणे निवेदिती शुक । पाहूनि उत्पात वदला हरि ॥६॥

॥३४९॥
यादवहो, जाणा केतु हे यमाचे । क्षणहीन एथें वसणें योग्य ॥१॥
स्त्रिया, बाल-वृध्दा धाडा शंखोध्दारीं । सरस्वतीतीरीं सकल जाऊं ॥२॥
पश्चिमाभिमुखी जेथें सरस्वती । क्षेत्री त्या प्रभासी जाणें योग्य ॥३॥
स्नान-उपोषणें होऊनियां शुध्द । पूजूं देवतांस स्वस्थचित्तें ॥४॥
स्वस्त्ययनें विप्रांकरवीं करुनि । गो-भू-हिरण्यांनी तोषवूं त्यां ॥५॥
सर्वारिष्टशांति होईल त्या योगें । गो-विप्रपूजा ते श्रेयस्कर ॥६॥
वासुदेव म्हणे ऐकूनि ते वाणी । सिध्द त्याचि कर्मी यादववीर ॥७॥

॥३५०॥
ऐलतीरीं येऊनियां, रथारुढ । होऊनि, प्रभास गांठिताती ॥१॥
दानधर्म बहु केला तयाक्षेत्री । सकल मंगलविधि साधियेला ॥२॥
दुर्दैवें तयांसी सुचली दुष्टबुध्दि । मैरेय प्राशिती रुचिर तीव्र ॥३॥
बुध्दि भ्रष्ट जेणें होतसे तत्काळ । मद्य तें दुर्मिळ सेविताती ॥४॥
वासुदेव म्हणे होऊनि बेभान । करिती भांडण प्राणांतिक ॥५॥

॥३५१॥
कृष्णमायामूढ होऊनि यादव । शस्त्रास्त्रसंयुक्त होती तदा ॥१॥
रथ-गज-अश्व उष्ट्रादि वाहनीं । उन्मादें बैसूनि करिती युध्द ॥२॥
प्रद्युम्न तैं सांब, अक्रूर-भोजासी । अनिरुध्द-सात्यकि, द्वंद्वें ऐसी ॥३॥
अन्यही बहुत करिती द्वंद्वयुध्द । सकल स्नेहबंध तुटूनि गेलें ॥४॥
पिता-पुत्र मामे-भाचे, आजा -नातू । चुलते-पुतण्ये, बंधु, करिती युध्द ॥५॥
धनुष्यबाणादि संपूनियां जातां । येईल तें हाता घेती तृण ॥६॥
वासुदेव म्हणे लव्हाळेचि शस्त्रें । होती दैवकोपें वज्रासम ॥७॥

॥३५२॥
लोहदंडासम होती ते लव्हाळे । वरितां धांवले कृष्णावरी ॥१॥
मतिभ्रंशें कृष्ण -बळिरामवध । करावया सिध्द होती सर्व ॥२॥
पाहूनि तें कृष्ण-बळिराम कोपले । बहुत पाडिले रणी वीर ॥३॥
ऐसे शापभ्रष्ट मायाविमोहित । स्पर्धा क्रोधें, युध्द करुनि मेले ॥४॥
वैणवाग्निसम स्वकुलविध्वंस । करुनि उन्मत्त नष्ट होती ॥५॥
वासुदेव म्हणे भार हा पृथ्वीचा । हरितां अच्युता तोष वाटे ॥६॥

॥३५३॥
एकांतीं बळिराम सागराचे तीरी । योगबळे सोडी निजदेह ॥१॥
ऐकूनि गोविंद अश्वत्थाच्या तळी । लाऊनि समाधी स्वस्थ बैसे ॥२॥
रुप तें हरीचें वर्णवे न साचें । सकल तमातें नष्ट करी ॥३॥
श्रीवत्सलांछ्न मनोहर कांती । झळकतो अती पीतांबर ॥४॥
कमलवदन कुरळे कुंतल । रमणीय नेत्र आकर्षक ॥५॥
मकर कुंडलें दिव्य कटिसूत्र । तें यज्ञोपवीत कडीं-तोडे ॥६॥
तुलसीचा हार नुपुरे कौस्तुभ । वासुदेव रुप ध्यातोए मनी ॥७॥

॥३५४॥
आरक्त तो वामचरण सव्यांकीं । टेंकूनि अश्वत्थीं ध्यानमग्न ॥१॥
दिव्य पादतल मृगमुख भासे । जरा नामें व्याधें एक बाण ॥२॥
तीव्र, मुशलावशेषाचा सोडूनि । सन्निध येऊनि अवलोकितां ॥३॥
चतुर्भुज रुप पाहूनि सांवळें । विनम्र तो लोळे चरणावरी ॥४॥
न जाणतां म्हणे घडलें हें कर्म । जगद्वंद्या ज्ञान , दर्शनें या ॥५॥
क्षमा करी देवां, घोर अपराध । क्षणार्धेचि वध करीं माझा ॥६॥
तेणें ऐसी पापें न होतील कदा । वंदी त्या गोविंदा वासुदेव ॥७॥

॥३५५॥
देवादिकांतेंही न कळे तव माया । पामरा केंवी या आकळेल ॥१॥
पश्चात्ताप ऐसा पाहूनि व्याधाचा । कृष्ण म्हणे व्याधा भिऊं नको ॥२॥
इष्ट तेंचि तुवां केलेंसी या वेळीं । विमान या स्थळीं तुजसी येवो ॥३॥
जाऊनियां स्वर्गी सौख्य भोगी तेथ । विमान प्रत्यक्ष येई तदा ॥४॥
प्रदक्षिणा तीन करुनि व्याधानें । वंदूनि चरणातें अत्यादरें ॥५॥
बैसूनि विमानीं स्वर्गाप्रति गेला । तटस्थ राहिला वासुदेव ॥६॥

॥३५६॥
अन्यत्र दारुक शोधितां कृष्णासी । सुवास त्याप्रति वनमालेचा ॥१॥
येतां त्या सुगंधें, येई तयास्थानी । देवासी पाहूनि पुढती धांवे ॥२॥
रुदन करीत लोळणचि घेई । देवा, करुं कायी म्हणे आतां ॥३॥
अज्ञानें मजसी सुचेना कांहींचि । गेली ज्ञानदृष्टी सकल माझी ॥४॥
चंद्रास्ते रजनीमाजी घोत तम । गोंधळलें मन तैसे माझें ॥५॥
वासुदेव म्हणे यापरी दारुक । वदे तोंचि तेथ नवल होई ॥६॥

॥३५७॥
गरुडांकित रथ अश्व, तैं शस्त्रास्त्रें । सकल गुप्त झाले नभामाजी ॥१॥
आश्चर्यचकित दारुकासी देव । म्हणे द्वारकेस जाऊनियां ॥२॥
कथीं बांधवांसी यादव संपले । बळिरामें त्यजिलें स्वदेहासी ॥३॥
मीहि त्वरितचि जातसें निजधामीं । राहूं नका कोणी द्वारकेंत ॥४॥
द्वारका बुडेल सांगरी हे आतां । जावें इंद्रप्रस्था तातादिकीं ॥५॥
मार्गामाजी पार्थ येऊनि रक्षील । प्रेमें सांभाळील पुढती सर्वा ॥६॥
दारुका, मदुक्त बोध अनुष्ठितां । तळमळ चित्ता न उरे तुझ्या ॥७॥
ऐकूनि दारुक घाली प्रदक्षिणा । वंदूनि चरणां वारंवार ॥८॥
धरुनि मस्तकीं श्रीकृष्णचरण । पाळिलें वचन पुढती दु:खें ॥९॥
वासुदेव म्हणे वदवे न कांही । कृष्ण कृष्ण येई वदनीं शब्द ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP