स्कंध ८ वा - अध्याय २२ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१४२
निवेदिती शुक राया, श्रेष्ठ बळि । ढळलाचि नाहीं छळितां बहु ॥१॥
गंभीरपणें तो बोलला वामना । केलीस वंचना मज न दोष ॥२॥
परी संतोषार्थ तुझ्या जें कथिसी । वागेन तैसाचि आनंदानें ॥३॥
तृतीय पाउल ठेंवीं या मस्तकीं । परी अपकीर्ति न करीं मम ॥४॥
श्रेष्ठकृत दंड तोचि हितप्रद । मायेनें जो आप्त टाळिताती ॥५॥
वरि वरि आम्हां भाससी तूम वैरी । हितकर्ता परी एक तूंचि ॥६॥
वासुदेव म्हणे गुरु सकलांचा । वैरी न कोणाचा बटु वामन ॥७॥

१४३
विविध मदांनीं झालों आम्हीं धुंद । यास्तव नेत्रांत अंजन हें ॥१॥
आजवरी बहु विरोधभक्तीनें । दैत्य आनंदानें तरुनि गेले ॥२॥
जाणूनि या बंधें मजसी न लाज । अथवा न दु:ख लवही वाटे ॥३॥
प्रल्हादपौत्रत्वें कृपेसी मी पात्र । पात्रतेचा लेश नसे अन्य ॥४॥
वैरभाव तव होता दैत्यांप्रति । प्रल्हाद तुझाचि भक्त परी ॥५॥
त्याच पुण्यें अद्य लाभले हे पाय । म्हणे वासुदेव धन्य बळि ॥६॥

१४४
इतुक्यांत येई प्रल्हाद त्या ठाईं । लज्जायुक्त होई बळि तदा ॥१॥
गहिंवरुनियां बोले तैं प्रल्हाद । अर्पूनि ऐश्वर्य हरिलें तूंचि ॥२॥
इष्टचि तें देवा, मोहनिवारक । ज्ञातेही सत्तांध होती मोहें ॥३॥
दयावंता, घेईं नमस्कार माझा । विंध्यावली तदा विनवी प्रेमें ॥४॥
म्हणे निर्माता या विश्वालागीं तूंचि । देईल तुजसी कोण अन्य ॥५॥
अहंभावें शिरीं ठेवीं म्हणे पाय । देह तरी काय परी त्याचा ॥६॥
देहाभिमानी हा ऐशापरी देवा । पतीवरी दया करणें परी ॥७॥
वासुदेव म्हणे ब्रह्माही विनवी । सर्वार्पणें व्हावी क्षमा यातें ॥८॥

१४५
अनुग्रहास्तव सर्वस्वहरण । करितों वामन वदला तदा ॥१॥
कारण ऐश्वर्योन्मत्तालागीं माझी । न होईचि स्मृति कदाकाळीं ॥२॥
कृमिकीटयोनि हिंडूनियां अंतीं । नरदेहप्राप्ति होत असे ॥३॥
ऐश्वर्यादिकांचा तेथें अभिमान । होतांचि पतन पावे नर ॥४॥
गर्वहीना लाभे अनुग्रह माझा । मोह ऐश्वर्याचा भक्तासी न ॥५॥
वासुदेव म्हणे बोलूनियां ऐसें । वैशिष्टय बळीचें कथी देव ॥६॥

१४६
ब्रह्मदेवा, याचें द्रव्य राज्य गेलें । त्यागूनियां गेले ज्ञातिबंधु ॥१॥
घालूनि उताणा बांधिलें शत्रूंनीं । गुरुही त्यागूनि शाप देई ॥२॥
इतुकेंही होतां सत्य न सांडिलें । मायेसी जिंकिलें येणें एकें ॥३॥
कपटभाषणें कथिला मी धर्म । परी त्यागिलें न सत्य येणें ॥४॥
यास्तव दुर्लभ देवांतेंही ऐसें । स्थान मी बळीतें योजियेलें ॥५॥
इंद्रपद यासी लाभेल पुढती । सांभाळीन मीचि तदा तया ॥६॥
तोंवरी न जेथें अधिव्याधि कोणा । राहील हा जाणा सुतलीं ऐशा ॥७॥
वासुदेव म्हणे यापरी ईश्वर । बोले करुणाकर बळीलागीं ॥८॥

१४७
इंद्रसेना, तव असावें कल्याण । देवादि जें स्थान इच्छिताती ॥१॥
सुतलामाजी त्या जाईं आप्तांसवें । निष्कंटक पावें सौख्य तेथें ॥२॥
सुदर्शन तुज रक्षील त्या ठाईं । द्वारपाळ पाहीं तेथें मीचि ॥३॥
आसुरी गुण जे संगतीनें तुज । होती ते नष्ट कृपालेशें ॥४॥
वासुदेव म्हणे कृपावंत हरी । सकळही हरी भक्तदोष ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP