स्कंध ८ वा - अध्याय १५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


९४
परीक्षिती म्हणे मुने वैकुंठींचा । नाथ कां भिक्षेचा वरी मार्ग ॥१॥
मागितलीं तींही तीनचि पाउलें । देतांही बळींतें बद्ध केलें ॥२॥
विचित्र प्रभूचें वाटतें हें कर्म । निवेदा संपूर्ण वृत्त मज ॥३॥
वासुदेव म्हणे दयावंत शुक । निवेदिती वृत्त सकल ऐका ॥४॥

९५
इंद्रें वधितां बळीसी । शुक्र जिवंत करिती ॥१॥
सेवी तयांसी तैं बळि । मुनि तोषले अंतरीं ॥२॥
ऋग्वेदाच्या ब्राह्मणांत । निवेदिला जो अभिषेक - ॥३॥
करुनियां, महायज्ञ । करवी विश्वजित्‍ नाम ॥४॥
अग्नि होऊनि संतुष्ट । अर्पी कनकमय रथ ॥५॥
कनकचाप दोन भाते । प्राप्त होती अक्षय्य जे ॥६॥
दिव्य कवचही लाभे । माला अर्पिली प्रल्हादें ॥७॥
वासुदेव म्हणे शंख । अर्पिती त्या स्वयें शुक्र ॥८॥

९६
स्वस्तिवाचनही करिती ब्राह्मण । साधनें संपूर्ण अर्पूनियां ॥१॥
प्रदक्षिणा बळि घालूनि विप्रांसी । वंदी प्रल्हादासी अत्यादरें ॥२॥
स्वर्गावरी चाल करी मग दैत्य । शुक्रदत्त शंख फुंकी वेगें ॥३॥
इंद्रपुरीमाजी नंदनादि वनें । कोठें पुष्पें, फळें कोठें बहु ॥४॥
लता-पादपीं तीं पक्ष्यांचीं युगुलें । गुंजनीं रंगले भृंगवृंद ॥५॥
वासुदेव म्हणे पुष्पफलाकीर्ण । अपूर्व तें वन शोभादाई ॥६॥

९७
सरोवरें रम्य बहु तयास्थानीं । हंस सारसांनीं शोभविलीं ॥१॥
क्रीडेस्तव देवदेवांगना तेथें । संचरती मोदें प्रतिदिनीं ॥२॥
आकाशगंगेचा वेढा त्या पुरीसी । सगोपूर किती कनकतट ॥३॥
विश्वकर्माकृत पुर तें सुस्थित । सुवर्णअर्गल महाद्वारां ॥४॥
बहु राजपथ भूमि स्फटिकाची । विमानें शोभती कोट्यवधि ॥५॥
रत्नखचित ते चतुष्पथ तेथ । अहो पार्श्वपथ हीरकांचे ॥६॥
वासुदेव म्हणे सभागृह तेंवी । अंगणेंही पाहीं जागजागीं ॥७॥

९८
लावण्यसंपन्न युवतीसंभार । भेटतो सर्वत्र स्वर्गामाजी ॥१॥
वेण्यांतूनि त्यांच्या गलित जीं पुष्पें । वायु त्या सुगंधें सुगंधित ॥२॥
अगरु-चंदनधूम्राच्छन्न मार्गी । नित्य अप्सरांची दाटी बहु ॥३॥
मौक्तिकांची छत्रें सुवर्णपताका । विमानाग्र शोभा बहु स्थळीं ॥४॥
कपोत मयूर भ्रमरांचे नाद । अप्सरा सर्वत्र करिती गान ॥५॥
वासुदेव म्हणे मृदंग दुंदुभि । गंधर्वही गाती अत्यानंदें ॥६॥

९९
अधार्मिक पाप्याप्रति । कदा प्रवेश न स्वर्गी ॥१॥
बळि ऐशा स्वर्गावरी । सैन्यासवें चाल करी ॥२॥
देवसभेमाजी इंद्र । प्रश्न करी तैं गुरुस ॥३॥
पूर्ववैरी हा आमुचा । बळिवंत होई कैसा ॥४॥
गुरु बोलले तयासी । विप्रकृपा हे बळीसी ॥५॥
प्रतिकूल तुम्हां काल । जावें सोडूनियांख स्थळ ॥६॥
वासुदेव म्हणे काळ । करी अतर्क्यचि खेळ ॥७॥

१००
बृहस्पति म्हणे सामर्थ्य बळीचें । पावेल वृद्धीतें पुढती बहु ॥१॥
होऊनियां अंतीं मत्त, विप्रांप्रति । अवमानील तोचि नाश त्याचा ॥२॥
देवहो, स्वस्थानीं तदा यावें तुम्हीं । बोध तोअ ऐकूनि सकळ देव ॥३॥
वंदूनि गुरुतें पालटूनि वेष । त्यागूनियां स्वर्ग निघूनि जाती ॥४॥
निष्कंटक स्थान पाहूनि तें बळि । स्वर्गी वास करी अत्यानंदें ॥५॥
शत अश्वमेघ करवूनि शुक्र । कृतार्थ बळीस करी यत्नें ॥६॥
वासुदेव म्हणे कालगति येतां । होई अनुकूलता दुष्टांतेंही ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP