स्कंध ८ वा - अध्याय ३ रा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१५
(गजेंद्रानें जपलेंले स्तोत्र)
परीक्षितीलागीं बोलताती शुक । चिंतूनि हरीस स्वस्थ गज ॥१॥
पूर्वजन्मार्जित श्रेष्ठ स्तोत्रजप । होऊनि एकाग्र करी प्रेमें ॥२॥
जयामाजी जेणें नटला जो विश्व । तया नमस्कार आदिबीजा ॥३॥
रचलें खचलें पाही जो हें कदा । तया स्वयंप्रभा नमन माझें ॥४॥
प्रविलीन होतां सर्व जो प्रकाशे । नमस्कार त्यातें असो माझा ॥५॥
नटेशा त्या देव ऋषि न जाणती । त्राता तो आम्हांसी होवो सदा ॥६॥
दर्शनार्थ ज्याच्या कष्टती महात्मे । दर्शन तो मातें देवो प्रभु ॥७॥
निर्गुण असूनि स्वीकारी जो गुण । अचिंत्य निर्गुण निर्विकार ॥८॥
अनंतशक्ति तो परब्रह्मरुप । नमन तयास असो माझें ॥९॥
वाणी मनाहूनि असूनियां पर । चेतवी जो सर्व इंद्रियांसी ॥१०॥
कैवल्यनाथा त्या निर्वाणप्रदासी । सर्वदा प्रणती असो माझी ॥११॥
शांत, मूढ, घोररुपें जो प्रगटे । परी एकात्म्यातें नमस्कार ॥१२॥
क्षेत्रज्ञ जो सर्वाध्यक्ष सर्वसाक्षी । जो मूळप्रकृति नमन तया ॥१३॥
अखिलकारणा देवा, निष्कारणा । अद्भुतकारणा नमन तुज ॥१४॥
वेद शास्त्र नद्या जेथ सिंधूसम । पावती विराम नमन तया ॥१५॥
शरणागता मजसम पशूचेही । पाश जो निवारी अज्ञानाचे ॥१६॥
दयाळा त्या समदृष्टि ईश्वरासी । भक्तपालकासी नमन असो ॥१७॥
निरिच्छ ज्ञात्यांसी वैभव जो अर्पी । मुक्तता तो माझी करो वेगें ॥१८॥
गातां जयाप्रति मोक्षही भक्तांसी । आवडे न, त्यासी नमस्कार ॥१९॥
नेति नेति ऐशा निषेधें जो अंतीं । अवशिष्ट, त्यासी नमस्कार ॥२०॥
गजदेहाची न आसक्ति मजसी । इच्छा दर्शनाची एक त्याच्या ॥२१॥
अहंममातीत भक्तिचि जयातें । पावती तयातें नमन माझें ॥२२॥
वासुदेव म्हणे ऐसें बहुविध । स्तवन गजेंद्र करी आर्त ॥२३॥
(गजेंद्रोक्त स्तोत्र संपूर्ण)

१६
राया, स्तवनें या ब्रह्मयादिक कोणी । प्रगट होऊनि पातले न ॥१॥
देवाधिदेव तैं भगवंत हरी । बैसे गरुडावरी भक्तास्तव ॥२॥
शंखचक्रधारी देवादिकांसवें । आर्तत्राणा धांवे गदापाणी ॥३॥
पाहूनि हरीतें पदांबुजीं त्याच्या । गजेंद्र अंबुजा अर्पी एका ॥४॥
नारायणा, जगद्‍गुरो, भगवंता । नमस्कार माझा वदला घेईं ॥५॥
सद्‍गदित कंठें बोलतां कष्टानें । बाहेरी काढिलें प्रभुनें तया ॥६॥
विदारुनि नक्रमुख गजेंद्रासी । मुक्त हृषीकेशी स्वकरें करी ॥७॥
वासुदेव म्हणे भक्तकल्पद्रुम । रक्षो नारायण भाविकांसी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 19, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP