स्कंध ८ वा - अध्याय ९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


५८
निवेदिती शुक राया, स्वार्थालागीं स्नेह ।
त्यागूनि अमृतासाठीं मांडिती कलह ॥१॥
गालिप्रदानही त्वेषें एकमेकांलागीं ।
करिती तो विराजली मोहिनी त्या जागीं ॥२॥
मोहक तियेचें रुप पाहूनि भुलले ।
चारुगात्री सुंदरी, तूं कोण ग बोलले ॥३॥
अनघ्रात पुष्पासम विशुद्ध तूं वाटे ।
पाठविलें ईश्वरेंचि आम्हांस्तव एथें ॥४॥
वासुदेव म्हणे सुधा विभागूनि देईं ।
आम्हांप्रति ऐसें दैत्य विनविती पाहीं ॥५॥

५९
मोहिनीस्वरुपी हरि स्मितहास्यें । बोलला दैत्यांतें धूर्तपणें ॥१॥
कश्यपपुत्र हो विश्वास हा ऐसा । योग्य नसे साचा स्त्रियांवरी ॥२॥
त्यांतही जारिणी, नित्य नूतनाची । वासना धरिती निज मनीं ॥३॥
मधुर भाषणें आकर्षिती मन । ठाव कोणाही न लागूं देती ॥४॥
यास्तव न आम्हीं विश्वासासी पात्र । आणितों अरिष्ट वृकासम ॥५॥
वासुदेव म्हणे ऐशा गूढ शब्दें । विश्वास दैत्यांतें वाटे बहु ॥६॥

६०
अत्यानंदें करुनि हास्य । दैत्य मानिती विश्वास ॥१॥
मोहिनीच्या करामाजी । कुंभ अमृताचा देती ॥२॥
स्वीकारितां तो कलश । बोले मोहिनी दैत्यांस ॥३॥
इष्टानिष्ट घडतां कांहीं । दोष न यावाचि पाहीं ॥४॥
मान्य जरी हें तुम्हांतें । स्वीकारीन या कार्यातें ॥५॥
ऐकूनियां मोहिनीसी । हर्षे संमती ते देती ॥६॥
वासुदेव म्हणे काम । सुज्ञातेही पाडी भ्रम ॥७॥

६१
सुस्नात होऊनि अग्निकार्य केलें । अन्न अर्पियेलें गो-विप्रांसी ॥१॥
उपोषित स्वयें राहूनियां दैत्य । ब्राह्मणाशीर्वाद घेती हर्षे ॥२॥
वस्त्र अलंकार लेऊनि नूतन । मंडपी येऊन विराजले ॥३॥
उजळिले दीप धूपही त्या स्थानीं । दर्भ पसरूनि पूर्वाग्र ते ॥४॥
बैसले आनंदें तयां दर्भावरी । देवही त्या स्थळीं प्राप्त झाले ॥५॥
वासुदेव म्हणे सस्मित सुसज्ज । येई मंडपांत मोहिनी तैं ॥६॥

६२
भिन्न भिन्न पंक्ति करुनि दोघांच्या । हर्षे देव-दैत्यां तोष देई ॥१॥
मोहिनी जें बोले, वाटे तें अमृत । जाहले मोहित दैत्य ऐसे ॥२॥
वचनबद्धही होतेचि ते, मनीं । चिंतूनि मोहिनी ठरवी कांहीं ॥३॥
म्हणे सर्पा दुग्ध, तेंवी यां अमृत । पाजितां जगांत हाहा:कार ॥४॥
चिंतूनियां म्हणे देव हे हांवरे । अमृत त्यां बरे प्रथम देणें ॥५॥
वासुदेव म्हणे प्रेमपाशबद्ध । होऊनियां मूढ दु:ख भोगी ॥६॥

६३
राहु तया वेळीं पालटूनि वेष । बैसला देवांत जाऊनियां ॥१॥
सूर्य-चंद्रांमाजी बैसूनि अमृत । प्राशितां तयांस पाहती ते ॥२॥
मोहिनीसी खूण करितां ते चक्र । सोडूनियां शिर उडवी त्याचें ॥३॥
शिर तें अमर होऊनि राहिलें । ग्रहांत योजिलें ईश्वरें त्या ॥४॥
सूर्यचंद्रांसी तें अद्यापीही ग्रासी । येई प्रत्ययासी सकलांच्याही ॥५॥
वासुदेव म्हणे यापरी अमृत । वांटिलें देवांस मोहिनीनें ॥६॥

६४
वांटितां वांटितां रिक्त होई कुंभ । जाहला प्रगट हरी तदा ॥१॥
स्थळ काल हेतु साहित्य प्रयत्न । इच्छा सर्व सम देव दैत्या ॥२॥
परी परीक्षिता, आश्रय प्रभूचा । नव्हताचि दैत्यां दुष्टकर्मे ॥३॥
देवमात्रही ते आश्रित प्रभूचे । पावले तेणें ते हेतुसिद्धि ॥४॥
यास्तव प्रभूचा आश्रय करितां । काय संकटांचा पाड तेथें ॥५॥
वृक्षमूळीं जलसिंचन ज्यापरी । कर्मे तीं त्यापरी ईश्वरार्थ ॥६॥
आचरितां सिद्धि सर्व कामनांची । वासुदेव कथी, इतर श्रम ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP