स्कंध ८ वा - अध्याय १८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


११५
देवकार्यास्तव ज्याचा अवतार । स्तवी ब्रह्मदेव तयाप्रति ॥१॥
ऐकूनि तें अज अव्यय प्रगटे । रुप वर्णूं त्याचें न कळे केंवी ॥२॥
शंख चक्र गदा पद्म चतुर्भुज । नेत्र तेज:पुंज कमलाकृति ॥३॥
पीतांबरधारी शामल, शरीर । कुंडलें तेजाळ मकराकार ॥४॥
मुखारविंद त्या कांतीनें झळके । लांछन विराजे वक्ष:स्थळीं ॥५॥
कडीं तोडे बाजूबंद तैं पैंजण । मेखलादि जाण अलंकार ॥६॥
वनमालागंधें भ्रमर डोलती । कौस्तुभप्रभा ती आश्रमांत ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसी ईशमूर्ति । अहर्निश चिंती तोचि धन्य ॥८॥

११६
प्रगटतां ऐसी मूर्ति । येई प्रसन्नता लोकीं ॥१॥
जलाशय कांतिमान । प्रजा आनंदली पूर्ण ॥२॥
ऋतु सर्व गुणयुक्त । धेनु ब्राह्मण हर्षित ॥३॥
भाद्रपद शुक्ल पक्षीं । पुण्य दिवस द्वादशी ॥४॥
माध्यान्हीसी होता सूर्य । तदा अभिजित्‍ नक्षत्र ॥५॥
अवतरे नारायण । तेणें विजया ऐसें नाम ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसा । अवतार वामनाचा ॥७॥

११७
विश्व पावलें मांगल्य । वाद्यें वाजती मंगल ॥१॥
नृत्य होई अप्सरांचें । गायनही गंधर्वांचें ॥२॥
ध्यानमग्न होती मुनि । जयजयकार करिती जनीं ॥३॥
देव यक्ष किन्नरादि । मुनि आश्रमाभोंवती ॥४॥
गुढ्या तोरणें सर्वत्र । पुष्पवर्षाव बहुत ॥५॥
रुप पालटूनि हरी । होई बटुरुपधारी ॥६॥
पाहूनियां तो वामन । मुनि करिती जातकर्म ॥७॥
वासुदेव म्हणे हर्ष । पाहूनियां वामनास ॥८॥

११८
अल्पकाळें व्रतबंधही योजिला । उपदेश केला भास्करानें ॥१॥
यज्ञोपवीत त्या अर्पी बृहस्पति । कश्यप बांधिती कटिसूत्र ॥२॥
औषधिपति त्या अर्पीतसे दंड । कौपीन प्रत्यक्ष माता अर्पी ॥३॥
छत्र स्वर्गदेव, कमंडलु ब्रह्मा । सप्तर्षि ते दर्भां अर्पिताती ॥४॥
अक्षमाला देई देवी सरस्वती । कुबेर त्या अर्पी भिक्षापात्र ॥५॥
वाढीतसे भिक्षा भवानी तयातें । ऐसा बाळ शोभे ब्रह्मर्षीत ॥६॥
वासुदेव म्हणे करी अग्निकार्य । वामन तो देव ब्रह्मांडाचा ॥७॥

११९
पुढती एकदां वृत्त वामनासी । कळे यज्ञामाजी रमला बळी ॥१॥
नर्मदातटाकीं भृगुकच्छदेशीं । ऋत्विज करिती अश्वमेध ॥२॥
ऐकूनि तें वृत्त देव बटुरुपी । पातला तीरासी नर्मदेच्या ॥३॥
निस्तेज त्याहूनि भासती ऋत्विज । अनेकांचें तर्क, कोण ऐसे ॥४॥
अग्नि सूर्य कोणी लेखिती तयासी । ब्रह्मकुमारचि म्हणती कोणी ॥५॥
वासुदेव म्हणे ऐसे बहु तर्क । चालले जों तोंच येई बटु ॥६॥

१२०
आला मंडपीं वामन । विश्वसाक्षी भगवान ॥१॥
दंड कमंडलुधारी । छत्र शोभे अन्य करीं ॥२॥
मुंजतृणाची मेखला । कृष्णाजिन पांघुरला ॥३॥
चकित पाहूनि त्या जन । सकल देती उत्थापन ॥४॥
वासुदेव म्हणे बळि । तया आसनीं बैसवी ॥५॥

१२१
अर्ध्यपाद्यादिक अर्पी बळिराजा । प्रेमादरें पूजा करी त्याची ॥१॥
प्रत्यक्ष शिवही घेती ज्याचें तीर्थ । तेंचि पादतीर्थ बळि घेई ॥२॥
वंदूनियां अंतीं म्हणे मी कृतार्थ । सकलही सार्थ यज्ञ माझे ॥३॥
मागण्यासी कांहीं बटो, पातलांती । आज्ञा होई तेंचि अर्पीन मी ॥४॥
ऋषींचें हें भासे मूर्तिमंत तप । धेनु गृहादिक मागा कांहीं ॥५॥
वासुदेव म्हणे दात्याचाही दाता । भगवंत, त्याचा दाता बळि ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP