स्कंध ८ वा - अध्याय ६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३०
स्तवितां यापरी प्रगटला हरी । कोटि सूर्यापरी कांति ज्याची ॥१॥
मरकतासम शामवर्ण कांति । किंचिदारक्त तीं नेत्रांबुजें ॥२॥
मनोहर मुख रेखींव भंवया । किरीट वर्णावा केंवी तरी ॥३॥
कुंडलांची प्रभा कपोलीं शोभली । अपूर्वता आली मुखचंद्रा ॥४॥
कनककटकें कौस्तुभ वनमाला । भरजरी शोभला पीतांबर ॥५॥
श्रीवत्सलांछन शंख चक्र गदा । पद्म, पैंजणांचा चरणीं नाद ॥६॥
वासुदेव म्हणे पाहूनि देवांनीं । घातलें चरणीं लोटांगण ॥७॥

३१
अत्यादरें ब्रह्मा प्रार्थी देवदेवा । नमस्कार घ्यावा आमुचा हा ॥१॥
उत्पत्यादिशून्या उपाधिरहिता । केवळ सुखाचा सागर तूं ॥२॥
अनंतसामर्थ्या देवा, अणुरुपा । प्रणाम आमुचा घेईं प्रभो ॥३॥
आदि मध्य अंतीं घटासी मृत्तिका । कारण ब्रह्मांडा तैसाचि तूं ॥४॥
मंथितांचि अग्नि दोहितां जैं दुग्ध । नांगरितां प्राप्त्य होई धान्य ॥५॥
खननें उदक, प्रयत्नें जीविका । तेंवी बोध तुझा विवेकानें ॥६॥
वासुदेव म्हणे अत्यादरें ब्रह्मा । सप्रेम स्तवना करीतसे ॥७॥

३२
दर्शनें दयाळा बहु जाहला आनंद ।
ध्यानीं मनीं दर्शनाचा होता एक छंद ॥१॥
दावानलव्याप्त गजा जेंवी गंगोदक ।
लाभतां कृपाळा, तेंवी आम्हांलागीं सौख्य ॥२॥
सर्वांतर्यामी तूं भाव जाणसी आमुचे ।
अग्निस्फुलिंग ते तेंवी अंश आम्हीं तुझे ॥३॥
वासुदेव म्हणे मार्ग देवा, कल्याणाचा ।
दावीं आम्हालागीं ब्रह्मा म्हणे विश्वकांता ॥४॥

३३
ऐकूनियां देव जाणूनि आशय । कथितों उपाय म्हणे एक ॥१॥
नि:शंकमनें तो जरी आचराल । निश्चयें पावाल इष्ट हेतु ॥२॥
अनुकुल काल दैत्य - दानवांसी । सख्यत्व तयांसी करणें योग्य ॥३॥
मूषकांसी व्याळ करी जेंवी सख्य । व्हावया विमुक्त संकटेंसी ॥४॥
तयांसवें क्षीरसागरीं औषधि । टाकूनि वासुकी रज्जु करा ॥५॥
मंदराचलासी रवि योजूनियां । मंथनें स्वकार्या साध्य करा ॥६॥
वासुदेव म्हणे ईश्वरोक्ति ऐका । उपाय सुधेचा कथिला देवां ॥७॥

३४
जें जें कथितील दैत्य । तें तें मान्य करा नित्य ॥१॥
इच्छेविरुद्ध तयांच्या । अवाक्षर बोलूं नका ॥२॥
कालकूट विष येतां । भय वाटूं न द्या चित्ता ॥३॥
अन्य वस्तूंसी पाहूनि । विकार न येवो मनीं ॥४॥
ऐशा वर्तनें कल्याण । अंतीं पावाल द्या ध्यान ॥५॥
ऐसें बोलूनियां देव । गुप्त म्हणे वासुदेव ॥६॥

३५
नि:शस्त्र होऊनि देवांसवें इंद्र । भेटला बळीस सख्यास्तव ॥१॥
युद्धार्थ सज्जले दैत्यमंत्री परी । राजानीति वरी दैत्यराज ॥२॥
अमृतलाभाचा उपाय ऐकून । देई अनुमोदन अत्यानंदें ॥३॥
पौलोम, शंबर, कालकेयादिक । अमृतलाभार्थ सिद्ध होती ॥४॥
उत्पाटिती बळें मंदरादिर परी । कोसळतां खालीं मरती बहु ॥५॥
वासुदेव म्हणे पाहूनि तें हरि । येऊनियां करी साह्य तयां ॥६॥

३६
कृपाकटाक्षेंचि मृतसंजीवन । करी नारायण तयावेळीं ॥१॥
पुढती लीलेनें गिरीसवें हरि । बैसे गरुडावरी अत्यानंदें ॥२॥
एका हस्तीं गिरि घेऊनि निघाला । सिंधुतीरीं आला गरुडासवें ॥३॥
मंदर त्या स्थानीं ठेवूनि गरुडा । म्हणे जा वैकुंठा त्वरित आतां ॥४॥
भय वासुकीतें नसो हेंचि मनीं । देव दैत्य स्थानीं येती तोंचि ॥५॥
वासुदेव म्हणे देवकार्यसिद्धि । व्हावी हेंचि इच्छी घननीळ ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP