स्कंध ८ वा - अध्याय २१ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१३७
सत्यलोकस्पर्शें तेथींचा प्रकाश । फिका होई स्पष्ट चरणतेजें ॥१॥
वेद-शास्त्रें मुनि वंदिती पदासी । ब्रह्मलोकाप्राप्ति स्मरणें ज्याच्या ॥२॥
नाभिकमलीं ज्या उत्पत्ति तो ब्रह्मा । पाहूनि चरणां पूजा करी ॥३॥
स्तवन तयानें मांडिलें अपार । स्पर्शे त्या पवित्र कमंडलु ॥४॥
गंगोदक तेंचि आलें भूमीवरी । त्रैलोक्या उद्धरी तीच गंगा ॥५॥
पुढती ईश्वर घेई पूर्वरुप । तदा ब्रह्ययादिक पूजिती त्या ॥६॥
लोकोत्तर कथा गाऊनि स्तविलें । जयघोष केले अत्यानंदें ॥७॥
जांबवंत करी दुंदुभीचा नाद । दशदिश व्याप्त तया नादें ॥८॥
वासुदेव म्हणे सज्जनांसी मोद । दुर्जनासी क्रोध त्याचि मिष ॥९॥

१३८
ऐसे देव आनंदांत । असतां यज्ञमंडपांत ॥१॥
दैत्य क्रोधाकुल होती । बटूवरी धांव घेती ॥२॥
नंद, सुनंद तैं जय । विजय, प्रबलही बल ॥३॥
कुमुद तो कुमुदाक्ष । विश्वसेन, पक्षिराज ॥४॥
श्रुतदेव तैं जयंत । सात्वत तो पुष्पदंत ॥५॥
ऐसे महाविष्णुगण । निवारिती तयां जाण ॥६॥
वासुदेव म्हणे बलि । तदां दैत्यां बोध करी ॥७॥

१३९
विप्रचित्तें, नेमे, राहो, लढूं नका । प्रतिकूल आतां काल तुम्हां ॥१॥
कालप्रतिरोध करुनि न लाभ । तेणेंचि उत्कर्ष केला होता ॥२॥
भगवान तोचि सांप्रत फिरला । आंवरी तयाला ऐसा कोण ॥३॥
बल, बुद्धि, मंत्र, व्यर्थ हे उपाय । ताडिती जे देव दडले होते ॥४॥
कालाचीच आतां करावी प्रतीक्षा । व्यर्थ हा युद्धाचा मार्ग एथें ॥५॥
वासुदेव म्हणे दैव प्रतिकूल । होतांचि सकल उलटॆ रंग ॥६॥

१४०
ऐकूनि बळीची वाणी दैत्यसेनापति ।
सोडूनियां युद्ध गेले रसातळाप्रति ॥१॥
जाणूनि प्रभूची इच्छा वरुणपाशानें ।
बांधिलें बळीसी क्षणामाजी गरुडानें ॥२॥
जिंकिलें सर्वही आतां देहही जिंकावा ।
हेतु ईश्वराचा भक्तअहंकार जावा ॥३॥
वचनपूर्तीचें धैर्य दावावें जनांसी ।
यास्तवचि कांही काल नरक त्या इच्छी ॥४॥
वासुदेव म्हणे बळि राहूनियां शांत ।
बद्ध जाहला पाहूनि पावला लौकिक ॥५॥

१४१
भगवान बटु बोलला बळीसी । वचनाची पूर्ति करिसी केंवी ॥१॥
शापही गुरुचा व्हावयासी सत्य । नरकलोकांत राहीं आतां ॥२॥
त्रैलोक्याधिपति ऐसा अभिमान । धरुनि वचन घडलें नाहीं ॥३॥
वासुदेव म्हणे अहंकार व्यर्थ । दाविलें प्रत्यक्ष प्रभुनें हेंचि ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP