मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
- मेंदीचा सुकलेला रंग नि ...

संयोजिता बापट - - मेंदीचा सुकलेला रंग नि ...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


- मेंदीचा सुकलेला रंग
नि मधून मधून डोकावणारे पांढरे केस
देताहेत
उतरत्या वयाची सूचना
हल्ली हल्लीच चेहर्‍यावर पडलेल्या
वेड्यावाकड्या पायवाटेसारख्या सुरकुत्यांना

मात्र, त्या सुरकुत्यांकडं
जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ती चेहर्‍यावर फिरवते
पावडर - लालीचे दोन हात जास्तीचेच
डोळ्यांतले काजळयुक्त अनुभवी भाव
घेतात वलयाकार
नुकत्याच तारुण्यात आलेल्या किशोरीसारखे

डोळ्यांखालची काळी वर्तुळं
आवर्जून लक्षात आणून देतो आरसा
पण नाहींच जुमानत त्याला
मनातली नवयौवना
ती डो्कावतच राहते त्याच्यात स्वच्छंदपणे
पुनःपुन्हा

तेवढ्यात पडतेच तिची नजर
त्या टांगलेल्या पिशवीवर
जिच्यात ठेवलेले असतात
दुखर्‍या गुडघ्यांचे रिपोर्ट्स
तरीही सज्ज होऊन
सर्रकन् जाते ती अंगणात
दरवळणार्‍या उदबत्तीच्या सुगंधासारखी !

एवढी वर्ष संसार सुरळीत सांभाळल्याचं समाधान बाळगत
ती उभी राहते दारात
संध्याकाळी कामावरून घरी येणार्‍या
नवर्‍याच्या स्वागतासाठी
हसणार्‍या, डोलणार्‍या तरतरीत चाफेकळीसारखी !

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP