मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
हा महासागर... सरितेची सा...

विश्वास गांगुर्डे - हा महासागर... सरितेची सा...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


हा महासागर...
सरितेची सारी संकटं
अंतरात सामावणारा
अत्यंत खोल खोल...
मनाचा थांग लागू न देणारा
पर्वतप्राय लाटांनी
प्रस्थापित सृष्टीही
होत्याची नव्हती करण्याची
क्षमता बाळगणारा
किनार्‍यावरच्या
वालुकेवर अन् खडकांवर
फेनधवल लहरी उधळणारा
निळ्याभोर
शांततेची चादर
क्षितिजापर्यंत पांघरणारा
कित्येक
अनमोल मोती अन् रत्नं
अंतरात बाळगणारा...

आणि तो हिमालय
उत्तुंग उंचीचा
अगदी आभाळाला भिडणारा
धिप्पाड अन् अतिभव्य
इतका की
नजरेच्या पॅनोरम्यात
न मावणारा
विश्वकल्याणासाठी
ध्यानस्थ ऋषीसारखा
शांत, धीरोदात्तपणे
तपस्या करणारा
कधी सूर्यकिरणांबरोबर
क्रीडा करताना
विविध रंगच्छटा उधळणारा
तर कधी सृष्टीच्या
विनाशासाठी घोंघावणार्‍या
प्रचंड वेगवान वार्‍यांना
थोपवणारा...

होय,
आमचे बाबाही असेच आहेत
महासागरासारखे... !
हिमालयासारखे... !

N/A

References : N/A
Last Updated : April 24, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP