यशवंतराय महाकाव्य - सर्ग तेविसावा

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


कमलाबाई सावध होते - तिची व नवर्‍याची ओळख पटते - ‘ जगदवराव पवार ’ असें आपलें खोटें नांव सांगून कमलाबाईस फसविल्याबद्दल मल्हारराव तिची क्षमा मागतो - सर्वांस आनंद होतो - आनंदराव व यशवंतराव यांची व कमलाबाईची भेट - परस्पर आपापल्या हकीकती सांगतात - आनंदरावाचें बोधपर भाषण.

श्लोक
घडिभरि कमलेला यावयालागिं शुद्धी ।
करिति सदुपचारां पावली आत्मबुद्धी ॥
अवचित घडतां हा भेटीचा लाभ हर्ष ।
उसळुन मनिं आली मूर्च्छना ती तियेस ॥१॥
नयन उघडि झाली पूर्ण ती सावधान ।
फिरविच परि दृष्टी भोंवताली कदा न ॥
भय धरि - नयनांहीं पाहिलें त्या प्रियास ।
न बघति जरि आतां होति भारी निराश ॥२॥
बहु सुख तिस झालें त्यांत डोळे मिटीत ।
स्मरून पतिस गालीं थर्र रोमांच येत ॥
वदत हळु “ जरी हें स्वप्न देवा ! असेल ।
सुख - कर तरि आतां हेंच राहो खुशाल ! ” ॥३॥
मधुर मधुर मंद - स्यंद कीं दुग्ध - धारा ।
दयित तिजसिं वाणी बोलला अत्युदारा ॥
“ सुदिन च विधि दावी कीं अशी धन्य दारा ।
पुनरपि मज भेटे देइ सौख्या अपारा ॥४॥
बहुत दिवस झाले भेटलों आज भार्ये ! ।
सुखविसि मज शब्दें कां न तूं एक आर्ये ! ॥
बळव मजकडे ती प्रीतिनें मुग्ध दृष्टी ।
मनिं धरि तव भर्ता जी सुधेचीच वृष्टी ” ॥५॥
परिसुन सुख पावे शब्द ऐसे पतीचे ।
भ्रम - निरसन झालें त्या क्षणीं सर्व तीचें ॥
दचकुन उठताहे स्वस्थळीं स्तब्ध राहे ।
सभय निरखुनीयां भोंवती पाहताहे ॥६॥
कमल - सदृश नेत्रीं आणुनी अश्रु - वारी ।
विनवित सुत - शोक - व्याकुला दिव्य नारी ॥
“ सदय दयित माझा भेटसी आज काय ।
व्यसन मम न ठावें कीं तुला ? हाय हाय ! ॥७॥
तरुण सुगुण पार - त्राण हें ज्यास काम ।
करिल तनुज लोका तो उद्यां रामराम ॥
म्हणुनिच जगदेवा ! धांव नाथा ! अनाथा ।
झडकर यशवंता रक्षणें त्वांच आतां ॥८॥
अदय म्हणति लोकीं वीर मल्हारराव ।
बुडविल मम वाटे शोक - सिंधूंत नांव ॥
म्हणुनिच जगदेवा ! जा तुझा पुत्र आण ।
क्षण न दवडिं आतां ! धांव ! माझीच आण ! ” ॥९॥
हंसुन मग म्हणाला वीर मल्हार काय ।
“ न कर विसर दुःखा सुंदरी ‘ हाय हाय ’ ॥
तव सुत यशवंत स्वस्थ आहे खुशाल ।
न भय लव हि दावूं त्याजला शक्त काळ ॥१०॥
विसर तवहि साध्वी पूर्विं अन्याय केला ।
धरुन चरण आतां मागतों या भिकेला ॥
म्हणवित जगदेव ख्यात मल्हार मीच ।
त्यजुन तुजसिं गेलों निर्जनीं मीच नीच ॥११॥
मुलखिं फिरत होतों जाट राजाचिया मी ।
लपवुन निज नामा वागलों याच नामीं ॥
बघुन तुजसिं तेव्हां गुंतलों मोह - पाशीं ।
झटुन झणि विवाहें केलि मी आपुलीशी ॥१२॥
सुगुण अतुल रूप श्रेष्ठ जाती कुलीन ।
बघुन तुजसिं व्हावा मोह कोणास तो न ? ॥
विरह घडुन वर्षे जाहलीं पंचवीस ।
फिरुन परि सुखाच्या आज घेतों चवीस ॥१३॥
कपट निकट केलें जाचलें हें मनातें ।
प्रकट परि न व्हाया धैर्य ही होय मातें ॥
मम धनि मज सांगे शत्रुला शोक द्याया ।
त्यजुन तुजसिं गेलों त्या क्षणीं मी लढाया ॥१४॥
परवशपण मातें दास मी पेशव्यांचा ।
प्रभु - चरणिं समर्पी आपुली देह - वाचा ॥
प्रबळ रिपु कराया सिद्ध झाला लढाई ।
म्हणुन करून गेलों संगरा फार घाई ॥१५॥
स्मरुं तरि गत गोष्टी त्या स्थळींच्या किमर्थ ।
शुभ समयिं अशा ज्या खेद चित्तास देत ॥
पुनरपि तुज पाहूं देव ठेवी जिवंत ।
म्हणुन समजतो मी आपणा भाग्यवंत ! ” ॥१६॥
सुवचन वदतां हें कंठ आला भरून ।
पडत हळुच गालीं नेत्रिंचें वारि जाण ॥
स्तिमित सकळ गात्रें खुंटली तेथ वाणी ।
द्रवलि कमल - नेत्री ती हि लावण्यखाणी ॥१७॥
कर करून पुढारा धांवली रम्य मूर्ती ।
बळकट मिठि मारी स्वप्रिया स्फुंदतां ती ॥
धरून तिस तयाला चुंबितां तृप्ति नाहीं ।
द्रवति जन हि तेव्हां भोंवताले शिपाई ॥१८॥
मग सुत यशवंत प्रीतिनें हात जोडी ।
चरण - नमनिं माता त्यास आधींच ओढी ॥
उरिं धरुन वदे कीं “ बाळका ! लाडक्या ! हें ।
शुभ्र मुख तव धन्या मी पुन्हा आज पाहें ” ॥१९॥
थरथरवित होता पूर्वि ज्याचा प्रभाव ।
रिपुसच, निजधर्मोत्तेजनीं ज्यास हांव ॥
षडरिंस परि आतां मात्र जो दे न ठाव ।
निरखुन कमलेला पाहि आनंदराव ॥२०॥
तपत तप सहोनी जो सदा ऊन ताप ।
प्रभु - वर - भजनानें नित्य जाळी स्वपाप ॥
वदन - सदनिं राहे श्रीश - नाम - प्रलाप ।
निरखित कमला तो बाप दिव्य - प्रता ॥२१॥
स्थिति तरि तुमचीही जाहली काय ताता ! ।
श्रम सहुन अनंत श्रांत हिंडून तीर्था ॥
मजसिं न बघवे हें कांपते चित्त बाई ! ।
उठति विषम कैशा यातना या अगाई ! ॥२२॥
स्व - जनक - चरणांतें घालि लोटांगणाला ।
रडत रडत पोटीं हर्ष ही फार झाला ॥
“ प्रियकर मम ताता ! वंदित्ये कन्यका ही ।
विण न तव कृपेच्या मागत्ये अन्य कांहीं ” ॥२३॥
“ जनक तव सभाग्ये ! वृद्ध मी एकदांच ।
तुजसिं बघुन व्हावें इच्छितों तृप्त साच ॥
परि मज बघवेना अश्रु येतात भारी ।
फिरुन फिरून आतां कोण त्यांतें निवारी ? ” ॥२४॥
पुर - पति यशवंत ख्यात मल्हार तात ।
पति - रत कमला ती आणि आनंद शांत ॥
बसुन निज चरित्रें सांगती एकमेकां ।
श्रवणिं अनुभवीती ते पुन्हा हर्ष शोकां ॥२५॥
विविध मिळति जैसे रंग एक ठिकाणी ।
पसरिति निजकांती एकमेकांवरोनी ॥
परि न उणिव येते तत्प्रभेला तयानें ।
सकळ खुलति एका ठायिं तें कोण वाने ! ॥२६॥
विरह बहु दिनांचा होय दुर्दैव - योगें ।
स्वचरित्र जन जो तो जाहलें त्यांत सांगे ॥
अनुपम कृति होती सर्व ही त्या जनांची ।
व्यसनिं उदयिं वा जी श्लाघ्य सन्मान्य साची ॥२७॥
दवडिलिं कमलेनें संकटीं फार वर्षें ।
त्यजित पति दिसेना बाप होणार कैसें ॥
कठिण समयिं तीनें सोडिला नाहिं धीर ।
प्रभुवर परदेशीं ठेविला पूर्ण भार ॥२८॥
हृदयिं उठुन आशा लोपल्या जेंवि लाटा ।
विषम सतत बोंचि काळजी जेंवि कांटा ॥
परि नच ढळ पावे लेश ही शील तीचें ।
म्हणुन नवल वाटे त्या सतीच्या स्थितीचें ॥२९॥
कपट - वध कराया बादलें दिल्लिरानें ।
झटुन लगट केली त्यांस नाशास हा ने ॥
म्हणवुनि यशवंता वानिलें तत्प्रियानें ।
सुरस चरित त्याचें ऐकुनी स्तुत्य कानें ॥३०॥
स्व - जन - हित कराया युक्ति ज्या पौर - नाय ।
करि, बघुन च त्यांतें खिन्न मल्हार होत ॥
परि परिसुनि आतां त्याच नानाप्रकारें ।
स्तविति बहुत होती विस्मय, स्तब्ध सारे ॥३१॥
विरह विषम झाला काळजी काळ फार ।
सहन करि तयां तें दुःख झालें अपार ॥
कथन हित - करें तें पेशव्याच्या करीतां ।
विसरलि कमला स्व - त्याग - रोषास आतां ॥३२॥
सरळ सुरस साधी साधुची पोक्त वाणी ।
अमृत - मधुर आणी शांत सद्भाव - खाणी ॥
परिसलि डफळ्याची तन्मय स्वांत होय ।
विमल - चरित बोले योगि आनंदराय ॥३३॥
“ जल - निधिवर वारा क्षोभवी थोर लाट ।
फुटुन चहुंकडे ती बिंदु घेतात वाट ॥
व्यसनिं पडुन आम्हीं तीन ही एक काळीं ।
जरि दुरवर गेलों आजि हे भेट झाली ॥३४॥
जगिं उपजुन कोणा सौख्य नाहीं मिळालें ।
व्यसन - शत मनुष्यें पाहिजे भोगियेलें ॥
पडुन सुख - विलासी होति उन्मत्त जीव ।
व्यसनिं म्हणति ‘ देवा ! लौकरी धांव धांव ’ ॥३५॥
हंसुनि दुडदुडां जें धांअतें मूल भारी ।
रमावे निज मनाला वस्तुंनीं सौख्यकारी ॥
जंव भयकर कांहीं पाहतां भीति वाटे ।
रडुन रडुन बोले ‘ आइगे ! शीघ्र भेटें ’ ॥३६॥
किति जरि जगिं दुःखें येउनी वर्षतात ।
प्रभु जपत मनुष्या द्यावया हर्ष तात ॥
परि सहज न होतो ईश्वराचा प्रसाद ।
स्मरण मनिं तयाचें पाहिजे नित्य गाढ ॥३७॥
प्रभु - कर निजभक्तां रक्षण्याला समर्थ ।
अनय सहन त्यांतें लेश नाहींच होत ॥
सतत भय निवारी संकटीं वाट दावी ।
किति तरि करूणा त्या ईश्वराची वदावी ! ॥३८॥
सुकृत करून घ्यावें याच जन्मीं फळाला ।
विसरत हरि नाहीं तो कदा सज्जनाला ॥
अपकृति हि करावी या जगीं जी नरानें ।
विषम विषच तैसें भोगिजे दुःख त्यानें ॥३९॥
स्मरुन धरिति जे जे सत्पयालागिं देवा ।
अवचित च सुखाचा सांपडे त्यांस ठेवा ॥
निशिदिन दुसर्‍याचे चिंतिते घातपात ।
मरति जणु अकस्मात् सोसुनी वज्रपात ॥४०॥
तृषित फिरति जेव्हां लोक सन्मार्गवर्ती ।
सुख - जल - नद वाहे त्यास हर्षें पहाती ॥
परि खळ निज कर्मे थांबवीती न लेश ।
न कळत पडताहे तों गळीं काळ पाश ॥४१॥
ममकर हित - कारी त्या स्थळीं सावकारा ।
सुजन किसनदासा जाहला दान - शूरा ॥
परि मम कमलेच्या रक्षणीं पूर्ण दक्ष ।
कुठुन मजसिं ठावें होय हा कल्पवृक्ष ॥४२॥
अकरुण तरूणानें बादलें भिल्ल - नाथें ।
धरून तिजसिं नेलें दुर्बला स्त्री जनातें ॥
म्हणुनिच जणु तीच्या पुत्र - हस्तें मराया ।
खल बल - निधि आला धीट मल्हारराया ! ” ॥४३॥
अशा गोष्टी तेथें स्मरून करिती मागिल कथा ।
निशा गेली सारी हळुहळु कथा त्या न सरतां ॥
उजाडाया झालें अरूण उगवे कांति पसरे ।
सुटे वारा पक्षी किलबिल करीती सुखभरें ॥४४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP