मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|यशवंतराय महाकाव्य| सर्ग तेरावा यशवंतराय महाकाव्य अनुक्रमणिका सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पाचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग एकोणिसावा सर्ग विसावा सर्ग एकविसावा सर्ग बाविसावा सर्ग तेविसावा सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग तेरावा श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले. Tags : marathiyashawantraiकाव्यमराठीमहाकाव्ययशवंतराय सर्ग तेरावा Translation - भाषांतर अनंताचार्य सदाशिवरावभाऊची भेट घेतात - सदाशिवराव अनंताचार्यास आश्वासन देतो - पेशव्याचें दरबार - अनंताचर्याचें दरबारांत भाषण - त्या भाषणाचा पेशव्याच्या मनावर परिणाम - वादविवाद - पेशव्याचा निश्चय.श्लोक तो विप्र जाऊन सदाशिवाला । भेटे न जों येउन वेळ झाला ॥वृत्तांत कोटा - शहरीं उदेला । तो सर्व ही त्याप्रत सांगिजेला ॥१॥उन्मत्त खानें कवण्या तर्हेनें । लोकां छळीलें कथिलें तयानें ॥जो सिद्ध कोटापुर सोडवाया । वाखाणिलें त्या यशवंतराया ॥२॥“ दिल्ली - पतीनें धन देउं केलें । तेणें मराठे वश त्यास जाले ॥आले कराया यशवंत - नाश । घालून वेढा बसले पुरास ॥३॥प्रत्येक होते दिवसास झुंज । दोहींकडे पावत नाश फौज ॥आलों म्हणोनी विनती कराया । कीं वांचवावें यशवंतराया ॥४॥आहों स्वधर्मी म्हणुनी तयार । मैत्रीस होऊं न धरूं हत्यार ॥या रक्त - पाताप्रत थांबवावें । आतां न कोणासहि दुःख व्हावें ” ॥५॥ऐकून हें वृत्त समस्त डोले । भाऊ तयाला मग काय बोले ॥“ आचार्य यावें दरबारिं आज । पाहीन आधीं तुमचेंच काज ॥६॥सांगून मी पाहिन पेशव्याला । ऐकेल माझ्या बहुधा वचाला ॥पाडीन त्याची समजूत कांहीं । मी पक्ष घेतों तुमचाच पाहीं ॥७॥वाड्यांत होतो दरबार जेव्हां । हा जाणवा अर्ज नृपास तेव्हां ॥जें जें तुम्हांतें वदणें वदावें । सर्वांस तें विश्रुत तेथ व्हावें ” ॥८॥त्या रात्रिं झाला दरबार आले । झुंजार ते मानकरी मिळाले ॥गेला भरोनी शनवार - वाडा । ऐसा जमे लोक - समूह गाढा ॥९॥जाया निघाला मग तो अनंत । मार्गी चमत्कार बघे अनंत ॥जी जी बघे वस्तु नवीन वाटे । पाहून आश्चर्य मनांत दाटे ॥१०॥नानाप्रकारें करूनी सुवेष । ऐश्वर्य दावूं बघते अशेष ॥फेंकीत दृष्टी भंवती अमंद । तेथें किती जाति खुशालचंद ॥११॥शृंगारिलें अश्व सुभूषणांनीं । कित्येक त्यांच्या वरती बसूनी ॥रस्त्यांत डौलें फिरतात दृष्टी । लोकांचिया ओढुन ते धरीती ॥१२॥वारांगना सुंदर पद्म - नेत्री । जातात मार्गांतुन रम्य - गात्री ॥त्या मारिती चंचल वक्र डोळे । ते बाण फाडूनच ऊर गेले ! ॥१३॥श्रीमंत संभावित सभ्य लोक । जातात देवालयिं ते अनेक ॥धंदे किती आटपुनी निघाले । याया गृहा, एकच गर्दि चाले ॥१४॥पोटें परान्नें फुगवून तट्ट । खुशाल येथें बसतात भट्ट ॥हे मठ्ठ बुद्धींत शरीरिं लठ्ठ । दानालयीं दाविती घट्ट हट्ट ! ॥१५॥रस्त्यांत गर्दी मिळतो न वाव । जाती निराळ्या विविध - स्वभाव ॥वेषांत वृत्तींत तसे निराळे । एका स्थळीं लोक कसे मिळाले ॥१६॥तो विप्र जाऊन नृपालयांत । पोंचे तसा नीट महासभेंट ॥तेथें व्यवस्थापक येउनीया । योग्यासनीं सांगति या बसाया ॥१७॥पाहे सभेला सरदार लोक । युद्धप्रयायी बसले अनेक ॥ठोकून वीरासन धीर मुद्रा । धिक्कारिती दाउन जे समुद्रा ॥१८॥जों शत्रुचा थोर पडून घाला । राज्यास धोका अनिवार आला ॥ज्यांनीं बळें तो परि दूर केला । होते असे वीर तया सभेला ॥१९॥वंशांतले वीस पुरूष ज्यांचे । स्वराज - कार्या झटणार साचे ॥गेले मरोनी लढतां रणांत । सभेंत होते बहु राज - भक्त ॥२०॥व्यापार शेती कुल - वृत्ति यांतें । धिक्कारूनी शस्त्र धरून हातें ॥जे वैभवाला चढले अपार । होते असे शूर सभेस फार ॥२१॥कोणी महात्मे असतां लहान । जे तर्किले सुज्ञ - जनीं न सान ॥ज्यांचा प्रतापार्क उजेड पाडी । पृथ्वीवरी, भीति अरींस धाडी ॥२२॥किल्लेकरी सावध पूर्ण सिद्ध । किल्ला मिळेना करूनी सुयुद्ध ॥वेगें शिड्या लावुन दुर्ग घेते । धैर्यांबुधी योध सभेस होते ॥२३॥कांहीं नवे काढुन नीति - पंथ । सौख्य प्रजांचे बहु वाढवीत ॥न्यायें प्रजा तोषित ज्यांहिं केली । होते सभेला जन बुद्धि - शाली ॥२४॥पर्जन्य - काळीं रिपु अन्य - तीरा । दांतांत धैर्ये धरूनी हत्यारा ॥हाणीति शत्रूंस तरून पूर । होते तिथे यापरि वीर शूर ॥२५॥गाजी मराठ्यांमधिं शूर बाजी । जो भासला कीं दुसरा शिवाजी ॥त्याचे सखे साहस संकटांत । कित्येक होते सरदार तेथ ॥२६॥गादीवव्री शोभत तेथ नाना । दात्यांमधें कर्ण जया म्हणाना ॥भावांवरी टाकुन राज्य - भार । जो भोगिता भूप - विलास थोर ॥२७॥दोघेहि बंधू असुनी समर्थ । जे वाढवूं राज्य सदा पहात ॥डोक्यावरी भार धरील तो कां ? । आणी स्व - सौख्यास कशास धोका ? ॥२८॥या पेशव्यानें परि पूर्ण काळीं । साधून कामें बहु कीर्ति केली ॥राज्याचिया दुर्गम नीति - शास्त्रीं । प्राविण्य दावी असुनी सुशस्त्री ॥२९॥जाग्यावरी बैसुन तो पुण्यांत । संकल्प जे गुप्त करी मनांत ॥येती फळें त्या जणु आपआप । तेव्हां कळे तन्मतिचा प्रताप ॥३०॥युद्धाविणें जो निजकार्य साधी । उपाय योजी बहु सौम्य आधीं ॥कोणी तयाला कपटी म्हणोत । न दोष त्या देतिल कोंकणस्थ ॥३१॥बापाप्रमाणें अतिरम्य - मूर्ति । होती तयाची बहु शांतवृत्ति ॥काळे तया किंचित थोर डोळे । जैं धूर्तता - दर्शक तेज खेळे ॥३२॥सुदैव तें दावित थोर भाळ । बाहू तयाचे दिसती विशाळ ॥उभार आलार न पुष्ट भासे । नाना असा त्या दरबारिं बैसे ॥३३॥विश्वास आणी रघुनाथराव । भाऊ हि तेथें सरल - स्वभाव ॥शोभेस देती दरबारिं साचे । बैसून जे हातच पेशव्याचे ॥३४॥जे मैत्रिला इच्छिति पेशव्यांशीं । नृपाळ जे राहति दूरदेशीं ॥त्यांचे सभेला मुखत्यार हो ते । प्रसन्न मर्जी करण्यात होते ॥३५॥झुंजार इब्राहिमखान गारदी । जो शत्रु हे पक्षि तयांस पारधी ॥मेहंदळेही बळवंतराव तो । बैसून सन्मान विशेष पावतो ॥३६॥उतार ज्याचें वय भव्य कांती । जो जाणणारा दरबार - रीती ॥तेथें व्यवस्थापक शुभ्र - केश । गादीपुढें राहि उभा सुवेष ॥३७॥बोलावया त्या समयीं द्विजातें । हळूच तो दावित खूण हातें ॥अनंत राहून उभा सभोंती । पाहे सभा सर्वहि एकदा ती ॥३८॥ ( येथे ३९ नंबर नाही. ) यातें न्यहाळून किती पहाती । परस्परीं गोष्टि हळू करीती ॥कटाक्षही टाकिति एकमेकीं । संकेत केले दुसरे अनेकीं ॥४०॥तो स्पष्ट साधें मधुर स्वरानें । लागे करूं भाषण आर्जवानें ॥कीं व्यक्त ज्या ज्या विषया करीतो । त्या त्या मधें तन्मय - चित्त होतो ॥४१॥“ बल्लाळ भूपा ! नय - मार्ग - चारिन । हे हिंदु - लोक - प्रतिपाल - कारिन् ॥श्रीमंत तूं सत्यच भाग्य - शाली । येवो जयश्री तुज सर्व काळीं ॥४२॥कोटापुराहून पुण्या निघालों । विज्ञापना मी करण्यात आलों ॥दयाळु चित्तें परिसून घ्यावी । बुद्धी तुला न्याय करूं घडावी ॥४३॥स्वतंत्र कोटा असुनी प्रदेश । म्लेच्छाचिया जाय कसा करास ॥हें सर्व तूं जाणसि लोक - नाथा ! । सांगेन कां तो इतिहास आतां ? ॥४४॥हिंदु प्रजा दुर्बल म्लेछ - हस्तीं । येऊन जे तेथ अनर्थ होती ॥राज्यांत दिल्ली - पतिच्या घडून । ते सर्व आले कथितों म्हणून ॥४५॥दिल्ली - पती दिल्लिर आप्त नेमी । मानी सुभेदार सुभ्यास कामी ॥कोट्यास येऊन अनर्थ केले । त्यानें जनां फारचि गांजियेलें ! ॥४६॥अन्याय - मार्गे कर बैसवीले । व्हावे तसे सज्जन नागवीले ॥लोभी मनुष्या अधिकार हातीं । सामर्थ्य मोठें नच लाज चित्तीं ॥४७॥वाटे न कांहीं तर रक्त - पात । चुके कराया नच जीव - घात ॥द्रव्यार्थ मार्गीं भलत्या पडून । घे साधुनी इच्छित कार्य खान ॥४८॥लोकांस वाटे परि हा न मोठा । अन्याय झाला जरि फार तोटा ॥दिल्लीर वित्तार्थच ताप देतो । नाहीं तिथे काय करील कीं तो ! ॥४९॥वित्ताहुनी वस्तु जगांत कांहीं । आहेत ज्याम मौल्यच होत नाहीं ॥त्या वस्तु घेऊं जंव खान पाहे । होऊन तों एक अनर्य राहे ! ॥५०॥धर्मामधें होउं जुलूम लागे । उन्मत्तसा दिल्लिरखान वागे ॥स्व - धर्म - कर्में प्रतिबद्ध झालीं । नीती जनाची बिघडून गेली ॥५१॥कामांध तो दिल्लिर दुष्ट थोर । कुलस्त्रिया नेइ करून जोर ! ॥येईल कोणावर धाड खोटी । रात्रंदिनीं काळजि हीच पोटी ! ॥५२॥बेबंद झालें सगळेंच राज्य । अन्याय - वन्हीमधिं होय आज्य ॥वेळीं उभा त्या यशवंत राहे । रक्षावया हिंदु जनास पाहे ॥५३॥आहे मराठ्यांत तयास जन्म । अर्थांत त्याचे जन - मान्य कर्म ॥अन्याय देखूं शकला न वीर । गोळा करी लोक धरून धीर ॥५४॥देऊन कीं तो स्वसुखास लात । कामीं अशा दुर्घट घालि हात ॥होऊनियां सक्त परोपकारीं । राहे उभा सज्जन मृत्यु - दारीं ॥५५॥त्यानें तयारी लढण्यास केली । वार्ता अशी जों नगरीं उदेली ॥तों भ्याड तो खान पळून गेला । धनी पुराला यशवंत झाला ॥५६॥झाल्याविणें एकहि जीव - नाश । स्वातंत्र्य पावे सगळाच देश ॥तो विघ्न आला अनिवार्य एक । भ्याले जया चिंतुनि सर्व लोक ॥५७॥दिल्लीपती मालक त्या पुराचा । संतापला घातक दुर्लबांचा ॥मल्हारराया मग लोभ दावी । सैन्यें मराठी निजकार्यि लावी ॥५८॥तो राजपूतांसह भांडताहे । रक्षीत कोटा यशवंत राहे ॥चोहींकडे होउन रक्त - पात । दुःखामधें देश असे समस्त ॥५९॥यासाठिं मातें यशवंत पाठवी । कीर्ती तुझी थोर मनांत आठवी ॥वारूनियां होळकरास सत्वर । तूं शांति देशाप्रत दे सुखाकर ॥६०॥वृत्तांत माझा इतुकाच आहे । तो सांगुनी स्वस्थ बसून राहें ॥तूं एक शब्दा सदया ! वदावें । लक्षावधी जीव सुखी असावे ॥६१॥हातांत येतां अधिकार शक्ती । दीनां छळावें नच राज्य - रीती ॥हा होतसे हिंदुवरी जुलूम । हें कीं मराठ्यांप्रत योग्य काम ? ॥६२॥स्व - देश - मुक्तीकरितां झटावें । स्वधर्म - संवर्धन ही करावें ॥स्व - राज्य - योगें स्वजनांस सौख्य । असे मनीं हें धरिं तत्व मुख्य ॥६३॥ज्याचें असे संमत याच काजा । स्थापी महाराज्य शिवाजि राजा ॥देशोन्नतीचाच जयास काम । तो शोभला वीर - शिरोललाम ॥६४॥तो स्तुत्य हेतू धरूनी मनांत । हें कार्य हातीं यशवंत घेत ॥कां आडवे आज तयास येतां ? । कां ही चिर - स्थायि अकीर्ति घेतां ॥६५॥वैराण झाला सगळा मुलूख । खाया नसे अन्न जनां कितीक ॥लागेल जें घेउन तेंच हातीं । देशांतरा येथिल लोक जाती ॥६६॥व्हावा अम्हां हर्ष तुम्हां पहातां । स्वजातिचे यास्तव भेट होतां ॥हें आज आलें अमुच्या कपाळा । घेणें करीं कीं तरवार भाला ॥६७॥जे नित्य कोटा - शहरासभोंती । युद्ध - प्रसंग स्वजनांत होती ॥जाती लयाया किती वीर - रत्नें । जीं वाटती दुर्मिळही प्रयत्नें ॥६८॥दुष्काळ मोठा पडला असेल । कोट्यांत कोणीहि सुखी नसेल ॥शें दोनशें नित्य मनुष्य - घात । होतील दुःकें रडतील आप्त ॥६९॥झुंझार मोठे तुमचे मराठे । घेतील काळें नगरास वाटे ॥अपार हानीस वरून कांहीं । नाहीं तयां तादृश लाभ पाहीं ॥७०॥मल्हाररावास हुकूम द्यावा । मोर्चा तयाचा तिथुनी उठावा ॥झालें असो काय उपाय त्याला । ऐकें विनंती अजुनी दयाळा ! ॥७१॥कल्याण जे इच्छिति पेशव्यांचें । होवो अकल्याण न त्या नरांचें ॥नाचो जगीं तें भगवें निशाण । म्लेच्छावरी हिंदुवरी कधीं न ॥७२॥आहेत उन्मत्त अरी जगांत । त्यांच्यावरी सैन्य सुटो अनंत ।कोट्यांतले दुर्बळ लोक त्यांतें । मारूनियां काय नफा तुम्हातें ? ॥७३॥गंगानदी पैलतटीं अपार । जावोत वेगें उतरून वीर ॥निर्मूळ होवो परधर्मि वैरी । शोभाल तेणें भुवनाधिकारी ॥७४॥आम्ही प्रसंगीं रजपूत येऊं । हर्षे यथाशक्ति सुसाह्य देऊं ॥व्हावे मराठे रजपूत राया । एकत्र अन्योन्य - हिता झटाया ॥७५॥श्रीमंत राजे मुखत्यार येथें । जे धाडिती देउन संपदेतें ॥नाहीं तसा मी परि विप्र भोळा । होवोन अन्याय म्हणे दयाळ ! ॥७६॥ बोलावयाला निज पक्ष युक्त । नाहीं मला युक्ति वदूं सदुक्त ॥मी नम्रसा सेवक या पदांचा । पाढा असें वाचित आपदांचा ॥७७॥नेत्रांमधें आणुन अश्रु - वारी । लक्षावधी दुर्बळ लोक दारीं ॥माझे मुखें बोलति हें समक्ष । दे त्यांकडे एक कृपा - कटाक्ष ! ” ॥७८॥बोलून हे शब्द अनंत ऐसे । सन्मान्य आचार्य उगीच बैसे ॥आकर्षिलीं लोक - मनें तयानें । ते बैसती निश्चल विस्मयानें ॥७९॥तों पेशवा बोलत रम्य वाणी । पोटीं महात्मा करूणेस आणी ॥“ वृत्तांत जो त्वांकथिला अनंता । झाला अम्हां विश्रुत तो समस्तां ॥८०॥गोष्टींत या होळकरास दोष । द्यावा असें वाटतसे मनास ॥मल्हार वेढा उठवून जाई । काढीन ऐशी तजवीज कांहीं ” ॥८१॥तों शौर्यशाली रघुनाथ दादा । वेळेस त्या बोलत काय शब्दां ॥“ मल्हाररावाप्रत दोष देतां । नाना ! असे दुःख म्हणून चित्ता ॥८२॥मल्हार तो सुज्ञ जनांस ठावा । प्रताप त्याचा कवणें वदावा ? ॥त्याच्या मनाला न विषाद व्हावा ।विचार कांहीं असला करावा ॥८३॥त्या सार्वभौमाप्रत दिल्लिनाथा । अयुक्त कांहींच न साह्य देतां ॥पुराण तो भूपति - वंश गाजे । सन्मान देतात म्हणून राजे ॥८४॥जे शाहुराजावर बादशाहें । अनंत केले उपकार पाहें ॥तें पाहिजे आठविलें मनांत । झालों मराठे जरि शक्तिमंत ॥८५॥इच्छा जरी उत्तर - देश घ्यावा । तो आपुला बादशहा करावा ॥सन्मान त्याचा यवनांत वारो । हें ठेवणें नित्य मनांत लागे ” ॥८६॥संतापला ऐकुन या वचाला । सदाशिव श्रेष्ठ तदा म्हणाला ॥“ दादा ! कसेंही म्हणती म्हणोत । न वाटते तें मजला सुयुक्त ॥८७॥जो दिल्लिच्या बादशहास तोष । द्याया स्वयें दे स्वजनास रोष ॥जो शक्ति लावी भलत्याच कामीं । वाखाणितो होळकरास कां मी ? ॥८८॥मेघांप्रमाणें मिळुनी समस्त । एकेक एकत्र अविंध होत ॥मल्हार वायू करिता निराळे । त्यांतें तरी योग्य धरून भाले ॥८९॥प्रख्यात - कीर्ती सरदार धीट । पेटे हठा हें गमतें न नीट ॥कां हिंदुचें रक्त पडेल खालीं ? । इच्छा अशी कीं यवनास झाली ॥९०॥कोट्यांतुनी दिल्लिर घालवाया । स्व - राज्य - संस्थापनही कराया ॥जो बेत घाली यशवंतराज । सुज्ञांत तें होईल मान्य काज ॥९१॥त्या नागरांचा करुनी विनाश । देणें पुन्हा तें पुर मोंगलांस ॥ही गोष्ट तो केवळ निंद्य आहे । दुष्कीर्ति देईल अम्हांस पाहें ॥९२॥हिंदूंत आणी यवनांत मोठें । होणार केव्हां तरि युद्ध वाटे ॥रक्षू म्हणोनी रजपूत सर्व । कीं शत्रुचा हे हरितील गर्व ॥९३॥यासाठिं येथून हुकूम जावा । मल्हार ताळ्यावर नीट यावा ॥कोट्यांतले लोक सुखी असावे । त्यांनीं नृपा ! त्वद्गुण - गीत - गावें ” ॥९४॥यापरि वादविवाद घडे दरबारिं महा ।भांडति ते रघुनाथ सदाशिवराव पहा ॥काय इथे करणें नच पेशवियास सुचे ।भाउ वदे समयास तया वच तेंच रूचे ॥९५॥ N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP