यशवंतराय महाकाव्य - सर्ग सातवा

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


दिल्लिरखान कोट्यांतून पळून गेल्याची बातमी गांवभर पसरते - मुसलमान लोकांची धांदल - ते शहरांतून बाहेर निघतात - त्यांवर नागरिक लोकांचा हल्ला - यशवंतराय मध्यें पडून मुसलमान लोकांस शहराबाहेर सुरक्षित पोंचते करितो - कोटा शहरांतील लोकांस मोंगल गेल्याबद्द्ल झालेला आनंद - मल्हारराव होळकर बादशाहाचा पक्ष घेऊन कोट्यावर स्वारी करीत आहे ही बातमी दूत आणितात - नागरिक लोकांचें घाबरणें - यशवंतरायाचें त्यांस धीर देणें होळकरास प्रतिबंध करण्याचे उपाय - यशवंत्राय पुण्यास पेशव्याच्या दरबारीं वकील पाठवितो.

श्लोक
प्रभात - काळी दुसर्‍याच दीवशीं । पुरांत वार्ता उठली पहा कशी ? ॥
स्व - सैन्य घेऊन भयार्त दिल्लिर । पळून गेला खळ सोडुनी पुर ॥१॥
बघूं बघे जो कमला - सुताप्रत । तया स्थळीं शासन योग्य पावत ॥
प्रभाव जो कीं यशवंत - मंदिरीं । बघे तयापाहुन खान भी धरी ॥२॥
असे तयाचें अति शौर्य - गौरव । करील मन्नाश खचीत यास्तव ॥
पळेन पाहीन पुरा न यावरी । भयें अशा दिल्लिर निश्चया करी ॥३॥
स्व - नायका दूर - गतास ऐकत । भयें पळों लागति दिल्लिराश्रित ॥
मुलें स्त्रिया घालुन गाडियांवर । त्वरेंत घेती पळतां बरोबर ॥४॥
अशा हि वेळीं दृढ गोल बांधुन । मध्यें करीती गमनास दुर्जन ॥
उभे करीं घेउन शस्त्र भोंवती । पठाण रक्षूं निजवित्त पाहती ॥५॥
रथाग शब्दा करिती घडाघडा । पदे हयांचीं नगरीं खडाखडा ॥
उडोन जातां वर धूळ ही दिसे । पथांत तारंबळ जाहली असे ॥६॥
न वांचवाया क्षम जीव निश्चयें । कुठून त्यांच्या स्थिरता मनास ये ? ॥
कितीक आप्तां कितिक स्त्रियांप्रती । सुदुर्धरा या समयास टाकिती ॥७॥
महाजनाच्या सुदती सुखी स्त्रिया । असे कधीं हाल न ठाउके जयां ॥
उरी धरोनी पळतो पथीं मुलें । जिवाहुनी काय असेल आगळें ? ॥८॥
पुरीं पुरस्थां पुरताचि चेव ये । जमावया लागति टाकुनी भयें ॥
करून हल्ला यवनांस मारिती । पठाण ही अद्भुत शौर्य दाविती ॥९॥
परंतु मुंग्यांसम झुंडि येउन । पुरांतुनी वर्षति बाण जों जन ॥
सभोंति ऐशा प्रळयास पाहुन । सुटे धिराचें यवनांत बंधन ॥१०॥
क्षणांत मोडून व्यवस्थित स्थिती । दिसेल तो मार्ग धरून धांवती ॥
उडे तिथे त्या प्रळया न वर्णवे । नवे नवे विघ्न तयांस जाणवे ॥११॥
पुरस्थ संताप - भरांत गुंगले । दिसेल तें माणुस मारूं लागले ॥
स्व - शत्रुच्या शोणित - रंगि रंगले । मदांध रानांतिल हत्ति भासले ॥१२॥
कुराण - निष्णात विशाल वाम्बल । सुशील काजी रडतात दुर्बळ ॥
उभे सभोंती जन हांसती किती । किती करें दाढि धरून ओढिती ॥१३॥
जुलूम नानाविध दिल्लिराश्रयें । जयां करीतां न कधीं दयाच ये ॥
लपून आतां बसती गृहामधीं । पुरस्थ त्यां शोधुन काधुनी वधी ॥१४॥
मनोहर श्रीयुत गात्र कांपतें । विलोचनीं लोचन - वारि चालतें ॥
धडाडला धाक उडे उरःस्थळ । दिसे जयांची मुख - कांति विव्हळ ॥१५॥
रिपु - स्त्रिया घेउन बालकें करीं । पथांत येती पडती पदांवरी ॥
रडूनियां प्रार्थिति जीव - रक्षणीं । वरी पहाती भय - लोल दृष्टिनीं ॥१६॥
हयावरी बैसुन थोर दौडत । स्व - सेवकां योग्य हुकूम सांगत ॥
अशा प्रसंगीं यशवंत पातला । दयार्द्र हें पाहुन सर्व जाहला ॥१७॥
“ न कोणि कोणासहि दुःख देउत । हत्यार कोशामधिं सर्व ठेवुत ॥
घरोघरीं पौर बसून राहुत । घडेल तें स्वस्थ बसून पाहुत ॥१८॥
पुरांत जे म्लेच्छ अजून राहती । न कष्ट होतील तयांस संप्रती ॥
परंतु जाण्यास इथून ज्यां मन । सुखेंचि जवोत न त्यांस बंधन ” ॥१९॥
वदून ऐशा वचनास सन्मत । पुढें त्वरेनें यशवंत चालत ॥
विशाल वाडा नृप पूर्व बांधिती । तयास गेला मग तो महामती ॥२०॥
पुराण - भूपालय सुंदराकृती । धरून संवत्सर चारशें स्थिती ॥
बघे लढाया बहु वेळ तुंबळ । अविंध तेयें वसले महाबळ ॥२१॥
श्रम - द्रुमाचें वरितात सत्फळ । न होति आतां रजपूत दुर्बळ ॥
निशाण लागे फडकावयानिळें । मरुत्सुताचें वरि चिन्ह चांगलें ॥२२॥
बघावया सुंदर केंवि तें दिसे । पुरांतलीं धांवति वृद्ध माणसें ।
सुखाश्रु येतात अलोट लोचनीं । स्व - राज्य - सौख्यें भरती पुन्हा मनीं ॥२३॥
करीति तेव्हां यशवंत - वर्णन । सुयोग्य आशीर्वचनास देउन ॥
“ शतायुषी होउन हा सुखा वरो । स्व देश - सेवा परिपूर्ण हा करो ” ॥२४॥
जनांस तो दावुन रीति चांगली । करी व्यवस्था नगरामधें बळी ॥
महाजनांची मग संमती बघे । ‘ पुराधिकारी ’ यशवंत नाम घे ॥२५॥
महारवें डिंडिम चंड वाजती । जयस्वरें सुस्वर भाट गर्जती ॥
धडाधडा वाजति तोफबंधुका । तुतारिया ही स्वर काढिती निका ॥२६॥
गुदया उभारीति जन स्वमंदिरीं । सुगीत नृत्यादि सुरू परोपरी ।
स्वतंत्रतेच्या पहिल्याच या दिनीं । सुखावले दिल्लिर - बंध - मोचनीं ॥२७॥
जिये थिथे उत्सव चालला असे । सुखांत कोटापुर मग्नसें दिसे ॥
पुराधिकारी यशवंत याप्रत । त्वरेंभयें येउन दूत सांगत ॥२८॥
“ दिगंतरा सत्वर पार भेदिती । मराठि सैन्ये जमवून भोंवतीं ॥
प्रसिद्ध मल्हार यश - सुधाकर । करीतसे चाल बळें पुरावर ॥२९॥
तयास दिल्लीपति लोभ दाखवी । तुम्हांवरी रोषित सिंह पाठवी ॥
अनन्य - सामान्य - पराक्रम स्वतां । पुरावरी येइल जाण तत्वतां ॥३०॥
दिनीं दिनीं चाळिस कोस चालतो । स्थळीं स्थळीं सैन्य - समूह वाढतो ॥
लुटीत जाळीत जनास दंडित । जमावितो खंड रनांत पंडित ” ॥३१॥
श्रवून वार्ता यशवंत घाबरे । म्हणे “ दया ईश करी तरी बरें ॥
पुन्हा इथे मोंगल येतिल क्षणें । दिसून आलीं मज सर्व लक्षणें ॥३२॥
लढून घेऊं जय मोंगलांसवें । पळावया लावुं तयांस निश्चयें ॥
परी मराठे जरि येति संगरीं । तयांसवें भांडण कोण तो करी ? ॥३३॥
निशाण मोठें भगवें भयंकर । जिये जिथे जाइल मृत्यु - किंकर ॥
तिथे तिथे वाहति रक्त - वाहिनी । परी मराठे जय जाति घेउनी ॥३४॥
धरुन भाले लढणार दुर्धर । बळी मराठे करणार दुष्कर ॥
जगामधें ख्यातिस थोर पावले । तयांस भीती रजपूत आपुले ॥३५॥
प्रचंड यांचे जय - दुंदुभि - ध्वनि । रिपु - स्त्रिया टाकिति गर्भं ऐकुनि ॥
नृपाळ जे बैसति आसनावर । भरे तयां कंप तिथेच थर्थर ॥३६॥
जया दिशे स्वार अपार धांवती । तया दिशेचे नृप भीति पावति ॥
दहा दहा कोस पुढेंच येउन । विनम्रशीर्षें करितात वंदन ॥३७॥
असा बळी वैरी मिळे अम्हांप्रत । न सिद्धता कांहिंच होय सांप्रत ॥
परंतु आहों रजपूत नांवचे । मरूं धनी होउं कसे अकीर्तिचे ॥३८॥
सहाय जे जे रजपूत भूपती । भिऊन आतां बसतील मागुती ॥
म्हणून आम्हीच पुरास रक्षण । करूं तयारी न बसू स्थिर क्षण ” ॥३९॥
प्रसिद्ध जे दोहन मान सागर । तयां कथी तो मग शौर्य - सागर ॥
“ करील मल्हार पुरासवें रण । कसें करावें तरि त्यास वारण ? ॥४०॥
स्वजाति हिंदू असुनीहि हा अरी । विरोध आश्चर्य न हें जरी करी ! ॥
स्वजातिचे श्येन विहंग मारितो । विषांध सर्पापरि मारि काय तो ” ॥४१॥
तया प्रसंगीं बहु बेत जाहले । न निश्चया कांहिंच वीर पावले ॥
करीति जों युक्ति नव्या नव्या मनीं । उभीभयें राहति मार्गि येउनी ॥४२॥
न साम हा संभवनीय यांसवें । न लोभिया इच्छित दान देववे ॥
न भेद चालेल मराठियांवर । उपाय तो शेवटलाहि दुष्कर ॥४३॥
सुनम्र होऊं विनवून यांप्रती । प्रकार हा क्षत्रिय निंद्य मानिती ॥
जरी दटावूं हंसतील दुर्मती । तयांपुढे शक्ति अह्मांस ती किती ॥४४॥
सहाय आम्हां नृप कोण होइल ? । न साह्य कोणी व्यसनांत देइल ! ॥
समग्र सूत्रें दरबारची करीं । धरून खेळे रिपु हा बहू परी ! ॥४५॥
जे या भार्त - वर्ष - काननिं महाभूपाल ताल - द्रुम ॥
शिंदे होळकरादि हे गजशिशू भंगावया त्या क्षम ॥४६॥
यांचा यूय - पती बलाढ्य नृपती बल्लाळ - शर्मांकित ॥
राहे दक्षिण - देशि पुण्य - नगरी शोभाकरीं सांप्रत ॥४७॥
शरण जरि रिघावें पेशव्याच्या पदातें ।
तरि मग पळवावें सर्व ही आपदातें ॥
अभिमत पुरुषांचे तो अभिप्राय जाणी ।
पुर - पति मग ऐशी युक्ति चित्तास आणी ॥४८॥
स्वपक्ष बोलेल पुण्यास जाउन । सुदक्ष ऐसा द्विज एक पाहुन ॥
निजोक्त सांगून तया सविस्तर । पुण्यास धाडी यशवंत सत्वर ॥४९॥
चतुर वचन - विद्वान् शास्त्र - विद्या - प्रवीण ।
विमल चरित ज्याचें ज्य आनंताभिधान ॥
द्विज हळु हळु कंठी दक्षिणेचा प्रवास ।
निजजन - हित होतें इष्ट ज्याच्या जिवास ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP