यशवंतराय महाकाव्य - सर्ग पहिला

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


इष्टदेवतानमन - उपोद्घात - कोटा-शहराचा इतिहास - दिलिरखानाचा जुलूम - भूषणसिंग - त्याची पत्नी - तिचा छळ व नाश - भूषणसिंगाचें धैर्याचें वर्तन - भूषणसिंग आपला मुलगा अभयसिंग व कन्या लीलावती यांस यशवंतरायाच्या स्वाधीन करितो - भूषणसिंगाचा मृत्यु - पठाणांने नीच कर्म - त्यांची व कोटा - शहरांतील लोकांची लढाई - दिलिरखान नागरिक लोकांची समजोत काढितो - भूषणसिंगाच्या वाड्याची दुर्दशा.

श्लोक
मी वंदितों तव पदांस भवानि माते ।
दे सच्चरित्र - कथनास्तव बुद्धि मातें ॥
हें मूल मंदमति यास करीं धरावें ।
मार्गास लावुन सुधन्य तुवां करावें ॥१॥
देवी ! भजून तुजला तरले मराठे ।
दुर्वार्य तो स्व - रिपु - सैन्य - समुद्र वाटे ॥
त्यांच्या कथा कथिन हा मम हेतु पूर्ण ।
आलों तुला शरण मी मज पाव तूर्ण ॥२॥
महेश - बंधु जन जे असतील मानी ।
साधूं स्वदेश-हित जे झटती इमानी ॥
औदार्य धैर्य गुण हे प्रिय ज्यांस होती ।
घेवोत ते रसिक मत्कवितेस हातीं ॥३॥
व्हावें स्वतंत्र. उदया निज राष्ट्र यावें ।
सन्मान्य उच्च-पद ही स्व-जनीं वरावें ॥
आचंद्र-सूर्य निज कीर्ति रहावि मागें ।
ज्यांच्या प्रशस्त मनिं हेतु असाच वागे ॥४॥
जे संकटीं स्थिर, असे व्रत ज्यांस साचें ।
यत्नें निवारण करूं भय दुर्बलांचें ॥
त्यांच्या कथा सुरस वर्णिन पद्य-रूप ।
देवोत हर्ष रसिकांप्रत त्या अमूप ॥५॥
वाहे जयाजवळ निर्मळ चंबळेचें ।
पाणी तय अपिऊन बाग हजार वांचे ॥
व्यापार लोकसमुदाय जिथील मोठा ।
प्रख्यात तें नगर मालव - देशिं कोटा ॥६॥
पन्नास कोसभर त्या नगरासभोंती ।
आहेत गांव दृढ दुर्ग पुरें हि मोठीं ॥
प्राचीन काळिं रजपूत नृपाळ होते ।
येथील राज्य करिते बहु शूर होते ॥७॥
सिंधूदका तरून वानर जेंवि आले ।
लंकेस आक्रमुन नाशुन तुष्ट झाले ॥
सिंधूदका तरून भारतवर्षिं धीट ।
येऊन मोंगल करीति तशीच लूट ॥८॥
लाटा जशा उठति थोर महोदधीच्या ।
स्वांर्‍या तशा बहु भयंकर मोंगलांच्या ॥
येऊन आदळति या हतभाग्य देशीं ।
कोणी निवारण करूं शकले न त्यांसी ॥९॥
राज्यें अनेक विलयाप्रत मोंगलांनीं ।
नेलीं अरींस जरि देउन थोर हानी ॥
कोटापुरेश्वर तयांसह फार वर्षे ।
झुंजोनि रक्षि निज देश बल - प्रकर्षे ॥१०॥
विस्तीर्ण राष्ट्र तरि केवळ मोंगलांचें ।
सैन्य प्रचंड जय जोडुन हात नाचे ॥
त्याच्यापुढें चिमुकला रजपूत - देश ।
तो राहिला अजित कीर्ति तया विशेष ॥११॥
दिलीश्वर प्रबळ घेउन सैन्य आला ।
एके प्रसंगिं सहसा करि थोर घाला ॥
मेला तयासह लढून नृपाळ मानी ।
केलें स्वहस्तगत हें पुर मोंगलांनीं ॥१२॥
या प्रांतिं लोक अतिशूर महाभिमानी ।
अद्यापि दृष्टि पडतील हठी इमानी ॥
हे द्वेषितात परकीय जनां स्वभावें ।
स्वातंत्र - रक्षण जिवाहुन यांस ठावें ॥१३॥
सत्ता स्वकीय नगरामधिं चालवाया ।
दुष्टांस दंडन यथासमयीं कराया ॥
दिल्लीपति स्वजन दिल्लिरखान नेमी ।
होता अयोग्य जरि थोर पदास कामी ॥१४॥
तो दुष्ट न्याय बघुनी न कधींच वागे ।
दावूं जनांस निज उग्र चरित्र लागे ॥
झाला तिथे कहर कोण तयास सांगे ! ।
मानी मनीं जळति सत्कुलवंत रागें ॥१५॥
द्रव्य प्रजेजवळचें लुटण्यास यानें ।
केले जुलूम भलते अधमाधमानें ॥
मेले अनेक अपराध नसून लेश ।
गेले किती पळुन सोडुन गांव देश ॥१६॥
वेश्या तमासगिर नीच धनास पावे ।
जाती सुशील मिळुनी धुळिला स्वभावें ॥
त्यांच्या सभोंति हलका जन नित्य वाढे ।
गेलें बुडोन पुर दुर्व्यसनांत गाढें ॥१७॥
वेश्या - विलास - मदिरा - प्रिय नाच रंग ।
वाड्यांत चालति तयांतच खान दंग ॥
योजून युक्ति विविधा जमवी अनार्य ।
जें वित्त तें खरचुनी करि हेंच कार्य ॥१८॥
दावोनि मोह कुलवंत सती जनातें ।
ओढी बळें प्रतिदिनीं किति दुष्पथातें ! ॥
नेल्या स्त्रिया मुलि सुना किति चारुगात्री ! ।
त्यानें स्वयें शिरून पौरगृहांत रात्रीं ॥१९॥
आप्तेष्ट बंधु - गृह - वित्त - शिशु - स्त्रियांचा ।
विश्वास न क्षणभरी हि वसे जिवाचा ॥
ऐशा स्थितींत सुख लेश कसा असावा ! ।
कोट्यामधें सुज्जन केंवि सुखें वसावा ! ॥२०॥
हा खान जाय विलया कवण्या उपायें ? ।
कैशी पुन्हा निजमना सुख शांतता ये ? ॥
जाऊं कसे तरून या व्यसनोदधीतें ? ।
हें चिंतिती नगर - वासि - जनांत मोठे ॥२१॥
ज्या नांव भूषण असा जन एक कोणी ।
होता सुखें वसत त्या नगरांत मानी ॥
तो पूर्विंच्या नृप - कुलांतच जन्म पावे ।
सन्मान देति रजपूत तया स्वभावें ॥२२॥
त्याची प्रिया गुणवती अतिरम्य मूर्ती ।
लक्ष्मीच काय गृहिं शोभलि त्याचिया ती ॥
न्याया तिला धरून दाउदखान नामेम ।
आला पठाण सरदार मदांध कामें ॥२३॥
होती महालिं बसली सुदती सुखानें ।
दोन्ही मुलें जवळ खेळति कौतुकानें ॥
तों दुष्ट दाउद पठाण भटांसमेत ।
घोड्यावरी बसुन गर्दि करीत येत ॥२४॥
द्वारीं बळें घुसुन गर्जति “ दीन दीन ! " ।
“ हाणा धरा ! ” म्हणति हालतसे जमीन ॥
नाहीं पती निकट - संकट हें बघून ।
साध्वी पडे महिस मूर्च्छित फार दीन ॥२५॥
झालें विवर्ण मुख लोळति केश कीर्ण ।
आक्रोश मांडिति मुलें भंवतीं बसून ॥
ती या स्थितींत असतां उचलून नेली ।
दुष्टें, तया न करूणा लव ही उदेली ॥२६॥
साधावया निज मनोरथ कामुकांनी ।
केली न कोणति अशी करणी खलांनीं ! ॥
गेले परंतु उलथून बळी उदंड ।
चाले अनाहत सती - जन - कोप - दंड ॥२७॥
ती बापुडी बघुन या हरिणी वृकासी ।
कांपे करी विनवण्या हि महाप्रयासीं ॥
ऐकून त्या नच खळा करूणा शिवे त्या ।
शापी सती करित नंतर आत्म-हत्या ॥२८॥
“ अक्षय्य निर्मळ विवाह-भव प्रशस्त ।
जो प्रेम-बंध वसतो मम मत्पतींत ॥
त्यातें तुटातुट करूं छळुनी पहासी ।
तस्मात्सबांधव सवंश लयास जासी ! ” ॥२९॥
जेव्हां तिच्या पतिस वृत्त कळून आलें ।
तो शोक फार करि दुःसह दुःख झालें ॥
“ स्त्री-रत्न तूं सकल-सद्गुणरम्यखाणी ।
नाहीं च लाभलिस कीं मजला शिराणी ! ॥३०॥
संतोषवीत सुख देत जना स्वकीय ।
सन्मार्ग - वर्तन तुझें भुवनीं अनिंद्य ॥
नाहीं असें बघवलें नयनीं खळांतें ! ।
ही दुर्दशा अशि घडे ह्मणुनीच तूतें ॥३१॥
आतां मला न सुख-लेश जगीं मिळेल ।
ध्यायास सूड मम देह सदा जळेल ॥
साध्वी ! तुझें चरित निर्मळ मालवून ।
शोकांधकारिं मज दाउद लोटि जाण ! ॥३२॥
तत्कंठ - नाळ जरि मी न चिरीन आजी ।
माता मला प्रसवली तरि व्यर्थ माझी ! ॥
माझा हि जन्म रजपूत - कुळांत व्यर्थ ! ।
होईन सिद्ध मरण्यास सखे ! त्वदर्थ ! ” ॥३३॥
प्राचीन - भूप - कूल - तंतु जरी लहान ।
साहेल काय खल - दत्त निजापमान ? ॥
कोपें जळे स्थिर नसे मन एक ठायां ।
तो शूर भूषण उठे मग सूड घ्याया ॥३४॥
घेऊन मित्र मग गांठित दाउदास ।
रात्री गृहांतरि शिरून जयी उदास ॥
झाली चकामक भयंकर त्यांत मेला ।
दाऊद, भूषण जयी स्वगृहास गेला ॥३५॥
वृत्तांत हा कथित दाउद - सेवकांनीं ।
कीं सर्पासाच उठला परिसून कानीं ॥
आरक्त नेत्र करि चावुन ओंठ दांत ।
कोपें जळे कुमति दिल्लिर तो अलोट ॥३६॥
बोलावुनी जवळ पांच शर्ते पठाण ।
आज्ञा तयांस करि निष्ठुर फार खान ॥
“ जा. भूषणा त्वरित येथ धरून आणा ।
हाणा. धरा. लुटुन घ्या. न भयास माना. ” ॥३७॥
हें वृत्त ऐकुन न भूषण लेश भ्याला ।
बोलावुनी जवळ नागरिकां ह्मणाला ॥
“ बैसा तुम्हीं घरिं खुशाल असा समस्त ।
न प्राण - हानि कवणाहि घडो मदर्थ ” ॥३८॥
लीलावती अभयसिंग जयांस नांवें ।
तीं बालकें बहुन भूषण दुःख पावे ॥
मातापिता कवण होइल यांस आतां ? ।
सांभाळ कोण जपुनी करि या अनाथां ? ॥३९॥
तन्मित्र जो नगरिं त्या यशवंतराव ।
होता धनाढ्य गुणवंत महाप्रभाव ॥
त्या हांक मारून वदे “ सखया ! मुलांतें ।
सांभाळ यां कर दया धर यांस हातें ॥४०॥
हें जों घडे तंव पठाण समीप येती ।
ज्यांतें स्मरून च मनीं रिपु घेति भीति ॥
भ्याला न त्यांस रजपूत न मृत्युलाही ।
द्वारीं हत्यार पडताळुन धीट राही ॥४१॥
विश्वासु सेवक सशस्त्र उभे सभोंती ।
स्व - स्वामि - रक्षणिं लढून च जीव देती ॥
लागून वार मग भूषण ही निमाला ।
गेला असा सुजन शेवट घोर झाला ! ॥४२॥
हर्षेंकरून मग गर्जति ‘ दीन दीन ! ’ ।
वाड्यांत त्या शिरति मत्त जयें पठाण ॥
फोडून तोडुन लुटून गृहास आग ।
ते लविती धरिति थोर मनांत राग ॥४३॥
होता जिवंत जंव भूषण त्या बघून ।
होते भयें यवन घालित खालिं भान ॥
आतां अचेतन बघून शरीर तेंच ।
हे ओढिती फरफरा किति कर्म नीच ! ॥४४॥
अत्यंत शोक - कर भूषण नागराची ।
ही दुर्दशा बघुन सद्गुण - सागराची ॥
आबालवृद्ध जन होति समस्त कष्टी ।
उग्रस्वरें रडति वर्षति अश्रुवृष्टी ॥४५॥
संतापती कितिक मानधनोग्रवीर्य ।
आवेश एकदम त्यांत भरे अवार्य ॥
जें सांपडे धरून तेंच हत्यार हातीं ।
शें दोनशें प्रथम त्यांतुन धांव घेती ॥४६॥
द्वेषाग्नि जो धुमसत प्रतिनागराच्या ।
होता मनीम स्मरून दुष्कृति मोंगलांच्या ॥
ती पेटला सहज आज तदा अनर्थ ।
कोट्यांत होय करणार अनेक घात ॥४७॥
तैं कांपले थरथरा भय - भीत भीरू ।
विघ्नांतुनी म्हणति ईश्वर आजि तारू ॥
आले गृहांतुन परी रणशूर वारूं ।
शत्रूंस, बोलति “ मरूं परि आज मारूं ! ” ॥४८॥
व्यापारि लाविति भयें सहसा दुकानें ।
होणार काम पुढची स्थिति कोण जाणे ! ॥
श्रीमंत ठेविति सुसेवक शस्त्र - पाणी ।
द्वारीं, उभे सदन रक्षिति ते इमानी ॥४९॥
स्त्री बोलली पतिस “ मार पठाण सारे ! ।
साहित्य सांग करण्यास मला सख्यारे ! ॥
बंदूक देइन भरून तुझी कट्यार ।
आणीन. सांग. तुज काय रुचे हत्यार ? ” ॥५०॥
हा रोध पाहुन हठा पडेल पठाण ।
एकेक पाउल हि देति न ते जमीन ॥
जावो न यांतिल जिवंत घरास एक ।
या निश्चयें लढति ते रजपूत लोक ॥५१॥
न्हाले रक्त - जलें भलें करूनियां झाले श्रमी भांडण ।
धाले तोडुन हातपाय हृदयीं भ्याले न एक क्षण ॥
अंगारीं तृणसे पठाण पडले भंगास ते पावुन ।
दंगा ऐकुन दंग खान उठला संभ्रांत रंगांतुन ॥५२॥
दंडाया मी पुर - जन हरी हेतु आतां धरीन ।
ऐशा काळीं तरि निजकरें नाश माझा करीन ॥
ऐसें आणी मनिं, विनवुनी धाडि तो पौर मागें ।
रागें लोका परत अपुल्या खान जायास सांगे ॥५३॥
स्मशानिं मग नेउनी सदय - भूषण - प्रेत ते ।
मनांत अतिगौरवा धरुन जाहले जाळिते ॥
“ असा पुरूष आपणांमधुन आज गेला दुर ! ” ।
असें म्हणत तद्गुणां स्मरति लोक शोकातुर ॥५४॥
होते पाहुणचार घेत जिथला सन्मार्ग - गामी जन ।
दुःखी दीन अनाथ भूषण - करें पावून गेले धन ॥
लक्ष्मी, सद्गुण, सद्विचार, सुख, सत्कांता जिथे नांदली ।
होता भूषण भूषवीत भवना भूषाच भू - मंडलीं ॥५५॥
अन्यायें अपराधहीन जन ही मृत्यू जिथे पावले ।
त्यांचें रक्त पवित्र दुष्ट यवनीं कीं ज्या स्थळीं शिंपिलें ॥
वाडा तो पडला परंतु तिथल्या खाणाखुणा राहती ।
पांयांतें जन नागरीक अजुनी दुःखें करें दाविती ॥५६॥
जे या जगीं सतत पापभया धरीती ।
सन्मार्ग आचरिति दुःख परां न देती ॥
या लोकिं त्यांस सुख शांति सदा मिळेल ।
हें कोण भूषण - गती बघुनी म्हणेल ? ॥५७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP