यशवंतराय महाकाव्य - सर्ग चवथा

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


यशवंतरायाचे विचार - राजपुतान्यांतील राजांस यशवंतरायानें पाठविलेलें पत्र - भूषणसिंगाची मुलें लीलावती व अभयसिंग यांस जोधपुरास पाठविण्याविषयीं यशवंतराय निश्चय करितो - जाण्याची तयारी - यशवंतराय लीलावती व अभयसिंग यांस निरोप देतो.

श्लोक
देशाभिमानी यशवंत नंतर । गेला गृहाला निज धीभतांवर ॥
वृत्तांत जो दोहन - मंदिरांतरीं । झाला तयाच्या मनिं चिंतना करी ॥१॥
होईल आतां स्थिति केंवि आपुली । ही गोष्ट त्यानें न मनीं हि आणिली ॥
माता सुशीला वच पूर्वि जें वदे । तें या प्रसंगीं बहु धैर्य यास दे ॥२॥
कोट्यांतले श्रेष्ठ कुलीन धी - धन । जे मोंगलां घालवुं इच्छिती जन ॥
मुख्यत्व त्यांचें यशवंत घे शिरीं । हा भार दे फार न काळजी परी ॥३॥
यावी स्वदेशास पुन्हा स्वतंत्रता । हा हेतु चित्तांत धरी न अन्यथा ॥
ज्या वस्तु या साधक बाधक स्थित । चिंती तयांतें यशवंत सांप्रत ॥४॥
दिल्लिश्वराचें बल थोरही यश । राहे जयश्री चिर त्याजला वश ॥
सेनापती सेविति त्यांजला बरे । जाणून हें सर्व न लेश घाबरे ॥५॥
पारामधें धैर्य अपार साहस । राहे, तयां जिंकिल कोण मानुष ? ॥
साहाय्य राजे रजपूत देतिल । जातील धाकें निज देशिं मोंगल ॥६॥
मानी मनीं हें यशवंत मानितो । दैवानुकूल्या निज फार वानितो ॥
राजांकडे राजपुतानियामधें । दूतांसवें पाठवुनी सुलेख दे ॥७॥
“ राजे तुम्हीं क्षत्रिय - वंश - भूषण । धर्माभिमानी सुगुणी यशोधन ॥
जाणून युष्मद्बल - शौर्य - वैभव । विज्ञापितों वंदुनि धर्म - बांधव ॥८॥
जे हिंदु धर्मा बहु पीडिती खल । ते येउनी जिंकिति देश मोंगल ॥
जिंकावया त्यां रजपूत येथले । आम्हीं उठों एकमनें झुजूं बळें ॥९॥
येणार कोट्यावर थोर संकटें । हानी रणीं होइल फार वाटतें ॥
साहाय्य आम्हां तुमचें जरी मिळे । वैरी तरी हा सुख - जेय हें कळे ॥१०॥
जे जे स्वःधर्मा छळितात दुर्मद । ज्यांच्या कृती साधु - जनास दुःखद ॥
कां द्वेष हो त्यांविषयीं अनावर । आतां ठसेना तुमच्या मनावर ॥११॥
होते न आले नंव येथ मोंगल । राष्ट्रांत होता तुमचाच अंमल ॥
तेव्हां प्रजा भारत - वर्ष - संस्थित । होत्या पदांतें तुमच्याच वंदित ॥१२॥
श्रीराम - धर्मादिक पूर्वज प्रभू । देती तुम्हां पुण्य धनाढ्य आर्य - भू ॥
म्लेच्छाचिया घालवुनी करांत ती । कां बैसलां स्वस्थ असून सन्मती ॥१३॥
झुंजून घ्यावें यश मोंगलांसवें । व्हावी निराशा न तुम्हां पराभवें ॥
भंगे न भ्याला परि संग संगरा । तो गाजतो वीर मही - तळी खरा ॥१४॥
मानी यशस्वी भट भीम भूपती । म्लेच्छां करी जर्जर पद्मिनी - पती ॥
ज्याच्या प्रतापाग्निंत्य शत्रु भाजला । तो वीर लोकीं पृथुराज गाजला ॥१५॥
लक्षवधी धाडुन सैन्य दुर्धर । ज्यातें शकेना लववूं अकब्बर ॥
आयुष्य जो घालवि धर्म - रक्षणीं । धन्य प्रताप प्रिय होय तो जनीं ॥१६॥
ऐसे किती शूर उदार भूपती । नांवास शोभा तुमच्याच आणिती ॥
गेला तयांचा अभिमान कां लया ? । कां मोगलांच्या धरितां तुम्ही भया ॥१७॥
आतां पुरे आळस हा करा कमी । हातीं हत्यारें रणशूर घ्या तुम्ही ॥
पोषाख अंगीं चढवून केशरी । या चालुनी नीटच मोंगलांवरी ॥१८॥
होऊं उठा सर्व हि एक एकदा । अंतस्य वैरें विसरा तुम्ही सदा ॥
भांडूं बळें ठेवुन भार ईश्वरीं । विज्ञापना हीच तुम्हांस मी करीं ” ॥१९॥
दूतांचिया देउन लेख हा करीं । जायास आज्ञा यशवंत त्यां करी ॥
नानाप्रकारें मन वीर चिंतन । बैसे करीत प्रिय ज्यास सज्जन ॥२०॥
“ प्राणाहुनी हि प्रिय वीर भूषण । प्राणक्षया कारण जो करी रण ॥
त्याचीं मुलें दोन अनाथ सुंदर । आहेत देवा सुखि त्यांजला कर ॥२१॥
लीलावती भूषण - कन्यका गुणी । रूपें रतीतें लवही न जी उणी ॥
ती वाढुनी हर्ष विशेष दे मला । वाढे जशी चंद्र - कलाच निर्मला ॥२२॥
माता हिची श्लाघ्य - चरित्र - शोभित । नेती बलात्कार करूनियां शठ ॥
हातून त्यांच्या सुटली तरी कसी । लीलावती, विस्मय हाच मानसीं ॥२३॥
होता हिचा बाप जिवंत जोंवर । इच्छा अशी होय मना अनावर ॥
घालून त्या भीड करीन मागणी । पाणि - ग्रहें होइन मी हिचा धनी ॥२४॥
माझा सखा जाय लयास भूषण । गेले हि त्याच्या सह धन्य ते दिन ॥
इच्छा अपूर्ण मम जी असे अहा ! । ती पूर्ण व्हाया नच योग्य काळ हा ॥२५॥
आम्हीं उठों प्रबळ शत्रुसवें लढाया ।
व्हाया स्वतंत्र अथवा समरीं पडाया ॥
आतां पुढें समय घोर पुरावरी या ।
येतां दिसे पुर - जना बहु दुःख द्याया ॥२६॥
हें जाणते प्रमुख येथिल लोक सारे ।
आपापले त्वरित आटपती पसारे ॥
स्त्रीवरी आप्त शिशु वित्त समस्त यतिं ।
देतात धाडुन सुरक्षित सुस्यळांतें ॥२७॥
येथील पूर्व - नृप - वंशिंच जन्म ज्याचा ।
म्यां रक्षिला अभय हा सुत भूषणाचा ॥
ऐकून हें खवळलाच असेल खान ।
तो मारण्यास अभयास करील यत्न ॥२८॥
मन्मित्र - पुत्र मम गेहिं वसो खुशाल ।
राहीन यास्तव सुसावध सर्वकाळ ॥
वाटे तथापि अरि घेइल घोर सूड ।
दुष्टांचिया कृति भयंकर फार गूढ ॥२९॥
जातील मोंगल पळून इथून जेव्हां ।
होईल राज - पद येथिल रिक्त तेव्हां ॥
सिंहासनीं अभय मत्प्रिय - मित्र पुत्र ।
बैसो असेकुलज थोर पदास पात्र ॥३०॥
देऊन चाकर भले समवेत कांहीं ।
धाडीन यांस सरली जंव रात्र नाहीं ” ॥
ऐसा विचार करि पूर्व दिशेस पाहे ।
तेजो - निधी अरुण तों वरि येत आहे ॥३१॥
बोलावुनी त्वरित भूषण - बालकांतें ।
प्रेमें वदे मग तयां बसवून हातें ॥
“ होतो वियोग तुमचा प्रिय बालकांनो ।
जें दुःख होय मज तें मम चित्त जाणो ” ॥३२॥
तेव्हां वदे अभय आणुन अश्रु डोळां ।
“ कां आज दूर करितां तुमच्या मुलांला ? ॥
जावें तुम्हां त्यजुन कोण विदेश - पंथा ? ।
फाका तुम्हांविण न रक्षक अन्य आतां ” ॥३३॥
लीलावती न वदली वचनास कांहीं ।
खालीं सलज्ज मुख घालुन रम्य राही ॥
ती एकदाच यशवंत - मुखास पाहे ।
लाजे पुन्हा कितिक सुंदर दीसताहे ! ॥३४॥
होती लहानपणिं खेळत गात गीत ।
नित्य प्रसन्न यशवंत - मना करीत ॥
लागे परंतु जंव यौवन तीस याया ।
लाजे बघून जवळी यशवंतराया ॥३५॥
लज्जा जरी करि तिच्या रसनेस बद्ध ।
वक्तृत्व सर्व नयनेंच करी प्रसिद्ध ॥
कीं प्रेम लाज भय काळजि हे विकार ।
दृष्टींत त्या प्रकट होउन राहणार ॥३६॥
वारा प्रचंड करि नम्र लता - शिरातें ।
लज्जौघ तेंवि लववी हि तिच्या मुखातें ॥
लीलावतीस बघुनी असल्या स्थितींत ।
साश्चर्य - हर्ष यशवंत वदे सदुक्त ॥३७॥
‘‘ जीं ओपिलीं प्रिय - सखें पदरांत यत्नें ।
माझ्या मुलें जणु अमूल्य अशीच रत्नें ॥
मी त्या तुम्हां त्यजिन काय बळेंच दूर ? ।
कीं हा हितार्थ तुमच्या करितों विचार ॥३८॥
उत्पत्ति राजकुलिं जी तुमची असे हे ।
ती नाश सत्य तुमचा करणार आहे ॥
उत्कर्ष - कालिं अभिमान तुम्हांस ज्याचा ।
तो वंश सांप्रत विनाश करील साचा ॥३९॥
आम्ही स्व - राज्य झततों नगरीं उभारूं ।
उद्योग मोंगलहि त्या करितील वारूं ॥
ते पूर्व - भूप  - कुल - जात जनां समस्त ।
मारून टाकितिल यत्न करून दुष्ट ॥४०॥
कस्तूरिका - मृग जरी अपराध - हीन ।
जाऊन बैसति दरींत गरीब दीन ॥
कस्तूरिकार्थ अतियत्न करी शिकारी ।
निःशंक शोधुन नृशंत तयांस मारी ॥४१॥
लीलावती ! ह्मणुन जोधपुरास जावें ।
येथून, निर्भय तिथेंच तुम्हीं रहावें ॥
तेथील मित्र मम शूर सुधी नृपाल ।
संगोपनास तुमच्या झटुनी करील ॥४२॥
घेऊन जन्म रजपूत - कुळांत पाही ।
लीलावती ! सकल शोभसि सद्गुणांहीं ॥
आहेस तूं चव्तुर काणसि सर्व कांहीं ।
प्राप्त स्थितींत सुख मानुन शांत राहीं ॥४३॥
जातोस आज मज सोडुन दूर देशा ! ।
ठेवूं सुखी तुजसिं आर्जवितों रमेशा ॥
बा वाग नीट अभया परक्या जनांत ।
होता कसा तव पिता स्मर हें मनांत ॥४४॥
माता पिता सदय सेवक एक - निष्ठ ।
ऐश्वर्य दुर्लभ हि हर्म्य पुरीं वरिष्ठ ॥
एक्या दिनींच खळ मेळविती धुळीला ।
होसी अनाथ किति दुर्घट दैव - लीला ! ॥४५॥
स्व - प्राण - रक्षण करूं जरि भीत दीन ।
जातोस तूं जनन - भूमिस ही त्यजून ॥
झालें असे उलट सांप्रत दैव बाळा ! ।
देऊं नको म्हणुन दुःख तुझ्या मनाला ! ॥४६॥
तोफा आगमनोत्सवार्थ सुटती भेरी भरें वाजती ।
गाती मंगलगीत बंदिजनही वारांगना नाचती ॥
अंबारीवरि पौर वर्षति फुलें सोन्या रुप्याचीं सुखें ।
येणें यापरि जन्म - भूमिस तुझें होणार तें कौतुकें ॥४७॥
ज्ञानी शूर धनी गुणी जन तुला येतील वंदावया ॥
लाखों वीर तयार होतिल तुझी आज्ञा शिरीं घ्यावया ॥
तूं सिंहासनिं राजसिंह बसतां पाहीन मी जेधवां ।
आतां भूषण - वाक्य मीं पुरविलें वाटेल हें तेधवां ॥४८॥
दिन जोंवरि धन्य तो न आला । जंव मद्यन्त न पावती फळाला ॥
तंव जोधपुरीं तुवां रहावें । अभया ! मद्वच हें मनीं धरावें ” ॥४९॥
निरवुनि अभयाला आणि लीलावतीला ।
अनुचर - करिं, सांगे जावया शीघ्र त्यांला ॥
नमिति बहिणभाऊ नम्र त्याच्या पदांतें ।
पुशित नयन जाती बालकें तीं स्व - पंथें ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP