यशवंतराय महाकाव्य - सर्ग पंधरावा

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


यशवंतराय जोधपूरच्या मार्गानें प्रवास करितो - कोटा शहराविषयीं त्याचे विचार - लहानपणाच्या गोंडपणाविषयीं त्याच्या मनांत आलेल्या कल्पना - आईची आठवण - सायंकाळीं दिसणार्‍या अकृत्रिम सृष्टीचें वर्णन.

श्लोक
दीडशें हि वरुषें मही - तळीं । नाचुनी तुडवि जे अरी बळी ॥
रामदास करि ज्यास अर्पण । तें निशाण झळके पुरांतुन ॥१॥
जाहला जंव मराठि अंमल । भीति पावति अनाथ दुर्बळ ॥
मानवत बलशालि नागर । क्षोभ त्यांस चढला अनावर ॥२॥
स्वार पायदळ फार शीणले । तीन मास बहु दुःख पावले ॥
सूड घेउं म्हणतात दक्षणी । दग्ध हें पुर करूं पुरें क्षणीं ॥३॥
शूर होळकर बेत ऐकतो । नागरांवर दयेस पावतो ॥
शांत कोप पहिलाहि होतसे । सैनिकां मग हुकूम देतसे ॥४॥
“ हो लुटालुट न या नगरांत । सर्व लोक हि सुखांत असोत ॥
वरि जे करिती बादशहासीं । आणणें धरून मात्र तयांसीं ॥५॥
नाश फार घडला असें रणें । त्यास दुष्ट जन तेच कारणें ॥
यास्तव प्रथम त्यांजला धरा । शोध फार मम मित्र हो करा ॥६॥
दिल्लि - नायक - पदांस रक्षिता । मी असून रिपु - कीर्ति भक्षिता ॥
त्याविरुद्ध उठल्या जनाप्रत । दंडणें मजसिं योग्य भासत ॥७॥
अग्रणी हि यशवंतराय तो । दिल्लिला धरून आज धाडितो ॥
हत्तिच्या चरणिं मृत्यु येइल । तेंच शासन सुयोग होइल ॥८॥
जो धरील यशवंतराय हा । पारितोषिक वरील तो महा ॥
शोधुनी सकल भूमि - मंडल । जा धरा त्वरि आणिजे खल ” ॥९॥
राव होळकर बोलतो असें । तों मनांत यशवंत येतसे ॥
मूर्ति राहिलि उभीच ती पुढें । प्रीति - लोट सुटला तियेकडे ॥१०॥
मग्न होय मग वीर चिंतनीं । काय चालति विचार त्या क्षणीं ॥
कां म्हणून मन राहिना स्थिर ? । होय कोण यशवंत हा नर ? ॥११॥
या विचित्र पुरूषास एकदा । पाहिलें न विसरेन त्या कदा ॥
कां प्रसन्न मन पाहुनीच या । होय ? काय गुण साधला तया ॥१२॥
त्या अपाय घडला जरि कांहीं । वाटतें न मम जीवित राही ॥
शांत - वृत्ति मग सैनिक बाहे । त्यांस होळकर बोलत आहे ॥१३॥
“ सांपडेल यशवंत तो जरी । सौम्य त्याजवळ वर्तणें तरी ॥
दूर जाइल म्हणून सावध । राहणें परि करूं नका वध ” ॥१४॥
मानसिंग आणि वीर सागर । जाति घालवित शौर्य - सागर ॥
घे निरोप यशवंत शेवट । त्यांस दे परत धाडुनी झट ॥१५॥
तो हयावर बसून एकटा । कंठि वाट यशवंत तत्वतां ॥
वेष शुभ्र बहु - मौल्य संयुत । याशिवाय नवह्ता अलंकृत ॥१६॥
आंतुनी चिलखतास तो धरी । मंदिलें वरिलि सुप्रभा शिरीं ॥
घे कट्यार तरवार बांधुन । ढाल पाठिवर शस्त्र - वारण ॥१७॥
भल्ल बाजुवर ठेवि निस्तुल । ठेवि संनिध तयार पिस्तुल ॥
हा मुशाफर असा सजोनि घे । जोधपूर शहराकडे निघे ॥१८॥
तो पुरा फिरून पाहि मागुती । अश्रु फार नयनांत चालती ॥
सौख्य बाळपणचें हि आठवे । दुःख तों न हृदयांत सांठवे ! ॥१९॥
सावली किसनदास - सत्कृपा । भोगिलें सुख अलभ्य जें नृपा ॥
हौस फार गमली प्रतिक्षणीं । तें लहानपण आठवे मनीं ॥२०॥
शेवटीं फिरून दृष्टि पाठवी । तो हयास यशवंत थांबवी ॥
तें प्रसिद्ध पुर एकदा बघे । सौख्य मानुन तयांत पूर्ण घे ॥२१॥
पाहतां स्थितिस त्या पुराचिया । कोणत्या न उपजे नरा दया ? ॥
नासधूस धुलधाण तेथिल । अश्रु पाहुन न कोण टाकिल ? ॥२२॥
जेथ नांदलि समस्त संपदा । ठाउकी नच कुणास आपदा ॥
ते उदास बहु दीनसे दिसे । भीति दे मसण भासलें जसें ॥२३॥
सुंदरें धनिक - लोक - मंदिरें । जाहलीं जळुन खाक हें खरें ॥
आग लागति कितींस नूतन । लोळ चालति नभांत पेटुन ॥२४॥
कांहिं उंच मजले सुखावह । तोफ - मार न सहून दुस्सह ॥
कोसळून पडतात भूमिला । शत्रुच्या नमिति काय पावलां ! ॥२५॥
तोफ होतिच सुरू पुरामधें । शब्द थोर करूनी भयास दे ॥
नाद तो त्वरित दूर डोंगरीं । जाउनी प्रतिरवा पुन्हा करी ॥२६॥
शेंकडों स्थळिं पडून मोडला । आरपार किति जागिं भंगला ॥
राखण्यास पुर होय साधन । पावला तट म्हणून शासन ! ॥२७॥
आपटून दिनरात्र गोलक । जाहल्या तटिं खुणा भयानक ॥
तो जनास निज दुःख दावितो । डागला महिष काय भासतो ॥२८॥
भोंवती उपवनें मनोहर । प्रीति ज्यांवर करीति नागर ॥
ध्वस्त होउन उदास दीसती । कोण पाहिल सुखांत ती स्थिती ? ॥२९॥
प्रेम सद्गद गळा भरून ये । एक पाउल गमे हलूं नये ॥
हात जोडुन अनन्य - मानसें । काय भाषण सुधी करीतसे ॥३०॥
“ हे पुरा ! प्रियकरा ! जिवाहुन । वाटतें तुजसिं दुःख पाहुन ॥
कांपवीत भुवनास नांदले । या स्थळीं नृपति शूर ते भले ॥३१॥
तेथली स्थिति अशी घडे अहा ! । दैव होय उलटें कसें पहा ! ॥
शत्रुनें तुजसिं फार घेरिलें । दुःख - बीज हृदयांत पेरिलें ॥३२॥
बादशाह करि बा ! तुझा छळ । रक्षणें तव सुतांसि दुर्बळ ॥
हें अवश्य मज कृत्य वाटलें । हांकिले मुसलमान येथले ॥३३॥
भांडलों मग मराठियांसवें । ख्यात जे भुवनिं वीर्य - गौरवें ॥
मीं धरून तरवारिला करीं । पाहिलें लटुन थांबवूं अरी ॥३४॥
शत्रुला नगरिं येउं मीं दिलें । तत्करांत तव पुत्र सोडिले ॥
थोर जाण अपराध हा मम । कोण तुल्य मजसीं नराधम ? ॥३५॥
नाश जे करिति येउनी पुरा । वैरि जे तुजसिं भेटती पुरा ॥
वाहवीति जन - रक्त - वाहिनी । मीच त्यांत पहिला म्हणें मनीं ॥३६॥
दुष्ट होळकर आंत येउन । वाटतें तुजसिं टाकिं जाळुन ॥
काय होय न दशा तुझी कळे ! । सोडुनी तुजसिं दूर मी पळें ॥३७॥
आपदभ्र तव टाळण्याप्रत । मी जरी न शकलों तुझा सुत ॥
तूं सुखांत परि नित्य राहणें । ईश्वराजवळ हेंच मागणें ॥३८॥
चाललों दुर तुला त्यजूनियां । दे निरोप कर एवढी दया ॥
शेवटील मज भेट वाटतें । दुःख यास्तव मनांत दाटतें ! ॥३९॥
रम्य राज - सदनें जलाशय । देवळें अमित हर्ग्य सुप्रिय ॥
आपण प्रथित राज - मार्ग जे । वंदितों नगर - देवते तुझे ” ॥४०॥
यापरी वदुन आपुला पथ । तो धरीत यशवंत सांप्रत ॥
चालतां मनिं विचार चालले । चित्त फारचि उदास जाहलें ॥४१॥
हेतु एक धरितां मनामधीं । दावितो उलट वर्तना विधी ॥
चांगले अणिक बेत वाइट । मोडितो विधि धरूनियां हट ॥४२॥
जों तरूणपण अंगिं संचरे । हौस तों नवनवी मनीं भरे ॥
अल्पशा अनुभवें जगाचिया । शेवटीं उलट भासतें तया ॥४३॥
आसनीं शयनिं भोजनीं मनीं । ज्यांचिया दिवस जाति चिंतनीं ॥
स्वप्नसे विहळ सर्व हेतु ते । होति दुःख मग फार वाटतें ॥४४॥
जी तरूणपणची मती नवी । ती अपक्क म्हणतात हें कवी ॥
सोसण्यास तिज घाव पाहिजे । त्याविणें न उपयुक्त जाणिजे ॥४५॥
आज तीन महिने लढाइचें । जें चढे स्फुरण फार वेळचें ॥
लागलेंच उतरूं हळूहळू । त्या विचार मग शांत ये कळूं ॥४६॥
काय मी लढुन मेळवीयलें ? । लोक मात्र अति दुःख पावले ॥
नाहिं लाभलिच कीं स्वतंत्रता । मात्र दिल्लि - पति कोपला अतां ॥४७॥
या अशाच दुसर्‍याहि कल्पना । दुःख - दायक विशेष ज्या म्हणा ॥
येउनी हृदय खिन्नता धरी । त्यास शांतवि सुवीर यापरी ॥४८॥
“ वीर - पुत्र म्हणवून सत्कुल । कोण मूर्ख परतंत्र राहिल ? ॥
कार्य साधुन न धन्य जाहलों । दोष हा न मम हें जगा कळो ! ॥४९॥
काय रात्रदिन जागलों नसें ? । काय पौर - हित पाहिलें नसे ? ॥
कीं जिवावर उदार होउनी । नाहिं काय लढलों पुरांतुनी ? ॥५०॥
यत्न निष्फळ समस्त जाहले । त्यास कारण न दोष आपुले ॥
निश्चयेंच भवितव्यता अशी । ती चुकेल कवण्या गुणें कशी ! ॥५१॥
सिद्ध शूर रजपूत भूपती । साह्य देउं उठते जरी किती ॥
कां असा प्रळय सोसितें पुर ? । भांडतों मिळुन दोनही जर ॥५२॥
कां न होळकर पावला दया ? । कां उदारमति नाठवे तया ? ॥
कां स्वधर्म - परिपालनास्तव । तो न लावित सुवीर्य - गौरव ? ॥५३॥
हें कळे मज खुशाल पोंचला । जो पुण्याप्रत वकील धाडिला ॥
कां न आलि मग पेशव्या दया ? । तो न कां सरळ आचरे नया ? ॥५४॥
हें परंतु घडतें कसें जरी । ईश - हेतु असला असे तरी ॥
दुःख - सागरिं बुडोच सर्वदा । जन्म - भू मम सुखी नसो कदा ॥५५॥
आसरा न मजला कुठे वसे । काय दीन हत - भाग्य मी असें ॥
बोध येउन करील चांगला । कोण योग्य पथ दावितो मला ? ॥५६॥
अंधकार पसरे जगावरी । त्यांत चांचपत वाट मी करीं ॥
ठेंच लागुन पडें घडोघडी । इच्छितों मदत दीन केवढी ! ॥५७॥
धांवतात लहरी चहूंकडे । भूमि दृष्टिस न ती कुठे पडे ॥
मी बुडेन भय वाटतें तरी । पोहतों धरून धीर अंतरीं ॥५८॥
तात - पाद जरि भेटते मला । धन्य धन्य असतों सुखी भला ॥
या कपाळिं लिहिलीं न अक्षरें । तीं असें मजसिं वाटतें खरें ” ॥५९॥
आइलाहि यशवंत आठवी । चित्त तच्चरणिं नम्र पाठवी ॥
जों मनांत भरली न ती स्मृती । लेंकरासम रडे महामती ॥६०॥
“ शेवटील हि न भेट जाहली । खंत यास्तव मनास लागली ॥
नाहिं लोळण तिच्या पदांपुढें । घेतली म्हणुन जीव आंखडे ॥६१॥
शील - पुण्य - सरिता गुणी महा । ईश्वरेंच जननी दिली अहा ! ॥
काय म्यां सुख दिलें तिच्या सुतें । आठवून्मन फार कापतें ॥६२॥
भोगिलें अमित संकटांप्रत । दुःख केंवि विसरेल सांप्रत ? ॥
बैसुनी जवळ गोड भाषण । कोण तीजसिं करील सांत्वन ? ” ॥६३॥
चालतां मनिं विचार या परी । जोधपूर - पथ वीर तो धरी ॥
टेंकड्या चढ उतार भूमिला । अश्व लंघित पळे जवें भला ॥६४॥
सूचना न करितां गुणी हय । चालला पळत नीट निर्भय ॥
किर्र झाडिंतुन कंडरांतुन । धांवला तरून तो नद्यांतुन ॥६५॥
नावमात्रच लगाम घेउन । शांत - चित्त यशवंट बैसुन ॥
भोंवती अरवली - गिरी - दरी । कर्मणूक बघतां वनें कई ॥६६॥
तों उदास दिसुं लागलें वन । अंधकार पसरे हळू घन ॥
सूर्य अस्त - गिरि - मार्ग साधतो । पक्षि - संघ घरट्यांस धांवतो ॥६७॥
गार फार सुटला समीरण । शब्द होय तरू - पल्लवांतुन ॥
गौर गोंडस कळे विकासते । लाजवीएति युवती - कपोल ते ॥६८॥
ताड साग बकुली शमी वट । उंच पिंपळ तमाल उद्धट ॥
आम्र चंपकहि शाल्मलि - द्रुम । भोंवते मिळुन रक्षिती तम ॥६९॥
इंद्रनील - सम - नीर सुंदर । धांवतात खडकांत निर्झर ॥
आपटूण दगडांत पाझरे । वारि, हे पसरले जणो हिरे ! ॥७०॥
ग्राम्य - वन - फल - पुष्प - शोभित । वृक्ष भूमिस लवून पावत ॥
पाहुणाच यशवंत ये घरा । देति त्यास मुजराच हा खरा ! ॥७१॥
श्वापदें फिरति भीति - दायक । सिंह व्याघ्र वृक त्यांत नायक ॥
वास घेत निज भक्ष शोधिती । त्यांस दुर्बळ बघून कांपत ॥७२॥
या परि पाहत पाहत चालतसे सुमती ।
कानन - भूमि सुखावह फार तया गमती ॥
मावळला भगवान्दिननायक तो मिहिर ।
पूर्ण तमें भरूनी जग भासतसे विहिर ॥७३॥
देउन कान दुरून जल - ध्वनि आयकतो ।
जाउन निर्मल पाहि झरा सुख - दायक तो ॥
खालति एक शिला - तल पाहुनियां उतरे ।
बांधित आणुन अश्व समीप तरूस करें ॥७४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP