यशवंतराय महाकाव्य - सर्ग सोळावा

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


चंद्रोदय - चंद्रप्रकाश - वणवर्णन - यशवंतराय रात्रभर जागत जातो - पहाटेस मार्ग चालू लागतो - त्याची व भिल्लांची गांठ - लढाई - भिल्ल यशवंतरायास कैद करितात.

श्लोक
ऐशा प्रसंगिं यशवंत वनीं भयान ।
विश्रांतितें क्षण शिलेवरि घे बसून ॥
घोड्यावरी बसुन वीसहि कोस आला ।
या कारणें श्रम तया सुभटास झाला ॥१॥
गेला झर्‍याजवळ सुंदर गार पाणी ।
पीतां मनांत अमृताचिच गोडि आणी ॥
संध्येस वंदुन फराळ करून कांहीं ।
तो आसनावर बसून सभोंति पाही ॥२॥
जाईल रात्र कशि हाच विचार पोटी ।
आहे पुढें पडलि ती तरवार मोठी ॥
व्याघ्रादि हिंस्र पशुंची मनिं भीति वाहे ।
जाग्यावरी बसुन सावध जागताहे ॥३॥
या वेळिं कुंकुमच चर्चुनि भाळ - देशीं ।
राहे पतीस निरखूं युवतीच जैशी ॥
तैशी दिशा सजलि उत्सुक काय पूर्व ।
ती तांबडी धरुन कांति दिसे अपूर्व ॥४॥
निर्वीर भूमि - तल पाहुन अंधकार ।
चाले मदांध गज - हर्ष - भरें पुढार ॥
पूर्वेस त्यास मृगराज मृगांक भेटे ।
हें अंधकार - गज - रक्तच लाल वाटे ॥५॥
लक्षावधी उगवती गगनांत तारे ।
हे भालदार शशि - भूपतिचेच सारे ॥
बुक्का गुलाल उधळीतच मानपानें ।
ते आणितात निजनाथ महोत्सवानें ॥६॥
अन्य स्थळीं दिवस घालवुनी विलासें ।
येतो पुन्हा परत लाजत चंद्र भासे ॥
डोकावुनी हळुच रात्रि - वधूस पाहे ।
मर्जी असेल कशि काळजि हीच वाहे ! ॥७॥
सारून दूर पडदे जलद - स्वरूप ।
आला प्रगल्भ नटराज पुढें अमूप ॥
जों लावितात टक एकच लोकमात्र ।
तों रंग मंडपिं नभीं शशि रम्य - गात्र ॥८॥
चंद्र - प्रभा गिरि - शिरावर फांकतात ।
ज्यांच्या लपे तम भयार्त गुहोदरांत ॥
राजाच तो मन उदार करून ठेवी ।
डोक्यावरी कर - जणो अभयास दावी ॥९॥
नानालतौषधिंस जीवन घालणारे ।
एकाच काळिं जन - नेत्र सुखावणारे ॥
पृथ्वी सुधा - धवल सर्व करून धाले ।
हे शीत शीत - किरणें कर धाडियेले ॥१०॥
आकाश - भूमि - गिरि - कंदरिं पूर्ण साचे ।
ओघावरी पडति ओघच चंद्रिकांचे ॥
क्षीराब्धिच्या उठति या लहरीच काय ! ।
कीं सर्व चंदन - रसांत बुडून जाय ॥११॥
या चांदण्यांत अमृतांत जणो बुडाल्या ।
हर्षांत डोलति ही नाचति मत्त झाल्या ॥
वेली कशा स्वतनुनी तरू वेढितात ।
प्रेमें प्रिया धरून तन्मय काय होत ॥१२॥
नाना लता मिळुन एकच गुंत होतां ।
सर्वांस एक समयास फुलेंहि येतां ॥
त्या काननीं घमघमाट सुंदर चाले ।
हर्षांत गोंधळुन चंचल चित्त डोले ॥१३॥
पानें जया असति गारच काळिं भोर ।
वृक्षावरी चढति वेलि अशा अपार ॥
त्या वीस पंचविस हात तिथून खाली ।
झोंकावती म्हणुन सांवलि गर्द झाली ॥१४॥
या वेलि हालति इथे जंव ये झुळूक ।
खालीं फुलें पडति भूमिवरी अनेक ॥
रे मारूता ! शिवुं नको म्हणतात वेली ।
हीं आसवेंच कुसुमें पडतात खालीं ॥१५॥
हे ताल साग सरळे गगनांत जाती ।
ईर्षाभरें वरचढीच करूं पहाती ॥
जों जों वरी चढति बारिक वृक्ष होती ।
उच्चत्व इच्छिति तयांत अशीच रीति ॥१६॥
छायेंत कांहिं भरतात बिघे जमीन ।
हे लक्ष - पक्षि - भरणांत सुदक्ष जाण ॥
राजे वनांतिल अशा समयास शांत ।
स्तब्धाकृती सुवट - वृक्ष वना पहात ॥१७॥
पानें करी शिथिल हालवि कांहिं वात ।
चाले सदा सळसळां ध्वनि पिंपळांत ॥
हा दुष्ट वायु उमळूं बघतो स्ववंश ।
हें ओरडोनि कळकी कळवीति खास ॥१८॥
या चांदण्यांत यशवंत पहात राहे ।
शोभाभरें खुलत सर्व अरण्य आहे ॥
तों गर्जना जवळ आयकण्यांत येती ।
कोठें तरी जवळ वाघ फिरे वनांतीं ॥१९॥
घोडाहि खिंकळतसे यशवंत याचा ।
सांगे पुढील भय धूर्त नसून वाचा ॥
तों एक धांदल उडालि पशूंत सर्व ।
व्याघ्राचिया पुढति दाविल कोण गर्व ? ॥२०॥
उड्डाण घेति हरणे मग ताड ताड ।
धांवून भीत वृक होति तरूंस आड ॥
आवेश रानडुकरांस परंतु आला ।
ते गर्जती उडविती वरती धुळीला ॥२१॥
रोंरावले वन - करी थडकांस देती ।
कोल्हे कुई करूनि दूर पळून जाती ॥
भ्याला पळे तरस लंघडशाहि घाली ।
गर्दी अशी उठुन एकच रानिं झाली ॥२२॥
हा रात्रिचा समय, रान अफाट दाट ।
स्वच्छंद हिंस्रपशु या स्थळिं हिंडतात ॥
घेऊन खङ्ग करण्यास तयार घाव ।
तो सावधान बसला यशवंतराव ॥२३॥
चाले पुढें घडिघडी जंव रात्र वेगें ।
त्या जागचें बदलुं रूप विचित्र लागे ॥
जों जों उदास दिसलें वन तन्मनांत ।
जोरें घुसूनच विचार उदास येत ॥२४॥
जी वस्तु भोंवति भयें निरखून घ्यावी ।
शंका क्षणामधिं तिच्या विषयीं भरावी ॥
त्या चांदण्यांत बघतां तितुके पदार्थ ।
भीती मनांत निरुपद्रव ही करीत ॥२५॥
जाळींत चंद्र - किरणीं करुनी प्रवेश ।
जे पाडिले कवडसे महिच्या तळास ॥
ते वाटले नयन कीं उघडून वाघ ।
रोंखीत मारिल उडीच धरून राग ॥२६॥
कोठें झुडूप बहु दाट फुटून पान ।
जें चांदण्यांत दिसतें अति कृष्णवर्ण ॥
विक्राळ तोंड पसरून सटा उभारी ।
उड्डाण मारिल गमे मृगराज भारी ॥२७॥
तेथें तयास दिसला अति शुभ्र - वेष ।
कोणी पुढें सरळ धीट उभा पुरुष ॥
तो कोण कोठिल म्हणून करून पृच्छा ।
जाणावयास यशवंत धरील इच्छा ॥२८॥
कांहीं न उत्तर करी स्थिर तो पुरूष ।
तें पाहतां दह्रि मनीं यशवंत रोष ॥
हातें धरून मग पिस्तुल नीट झाडी ।
आवाज एकच उठे विपिनीं धडाडी ॥२९॥
‘ चीं चीं ’ करीत घरट्यांतुन पक्षि आले ।
बाहेर, तो परि पुरूष न लेश हाले ॥
झाल अपुढेंच यशवंत जपून पाही ।
तो वृक्ष - मूल दिसलें दुसरें न कांहीं ॥३०॥
हांसे म्हणे “ किति तरी चुकलों भ्रमानें ।
नेलें पहा कितिक दूर कसें क्रमानें ” ॥
तो रात्र घालवि अशीच असून जागा ।
सोडी न निग्रह कदापि धरून जागा ॥३१॥
जेव्हां समीप अरुणोदय रम्य आला ।
चंद्र - प्रकाश सुख - दायक मंद झाला ॥
वारा झुळूझुळु सुटे करि गार गात्रें ।
हाले पुन्हा विपिन सर्वहि जीव - मात्रें ॥३२॥
झाली पहाट पुरती इथुनी निघावें ।
लंघून घांट मग जोधपुरास जावें ॥
ऐसा विचार जंव तो यशवंत आणी ।
तों ऐकतो हृदयभेदक दीन वाणी ॥३३॥
“ कोट्याहुनी भिउन शत्रुस मी निघालों ।
देशातरा तरित वांचवुं जीव आलों ॥
दुर्दैव सोडी न अजूनहि पाठ माझी ।
या जीव कोणि तरि येउन वांचवा जी ! ॥३४॥
या दांडग्यांप्रत निवारून लांडग्यांस ।
वाटे न नेइन सुरक्षित मी जिवास ॥
हाडें मरून मम याच वनीं पडावीं ।
कोणास दैव - गति ही तरि होय ठावी ? ” ॥३५॥
हे शब्द ऐकुन उभा यशवंत ठेला ।
घेता कराल करवाल करांत झाला ॥
गर्जे “ अरे भिउ नको ! धर धैर्य पोटीं ।
राखीन आज तुज दावुन शक्ति मोठी ॥३६॥
चाले पुढें चपल धीट विजेप्रमाणें ।
जेथें असा परिसला रव दीन कानें ॥
तों चालली सरळ ती दरडींत वाट ।
डांगें जिथे उठति दाट नभीं अचाट ॥३७॥
चंद्र - प्रकाश नवह्ता जरि त्या स्थळांत ।
होता उजेड दिसण्यापुरता पदार्थ ॥
संतापले बघति फाडुं नरास एक ।
ते लांडगे सिअति जे जमले अनेक ॥३८॥
एका क्षणांत थडके निधि साहसाचा ।
चालून सावध पुढें बलशालि साचा ॥
पाहे सशस्त्र वरती उचलून हात ।
आरोळि ठोकित सवेग शिरून आंत ॥३९॥
तों गोष्ट दृष्टिस पडे भलतीच कांहीं ।
सुस्तब्ध जीस बघतां यशवंत राही ॥
ते लांडगे - पुरूष तो - सगळे मिळून ।
या भोंवते जमति शस्त्र करीं धरून ॥४०॥
आली कळून मग गोष्ट खरी तयाला ।
गेलों फसून पुरता परि घात झाला ॥
घोडाहि दूर मजपासुन या प्रसंगे ।
हे शत्रु फार नच कोणि सहाय संगे ॥४१॥
नाहीं जिवंत तरि सांपडणार हातीं ।
कीं हातपाय जंव हे फिरते रहाती ॥
माझ्या शरीरिं जंव एक हि नाडि वाहे ।
संरक्षणीं झटुन यत्न करून पाहें ॥४२॥
तों भिल्ल सर्व इकडे वृक - रूप - धारी ।
होते तयार झगडा करणार भारी ॥
संग्राम - धीर चतुरा यशवंतराया ।
वेढून जों बगह्ति कैद बळें कराया ॥४३॥
तों कोपर्‍यांत दगडावर एक वृद्ध ।
होता पुरूष बसला यमराज शुद्ध ॥
भिल्लां उगीच बसण्यास हुकूम देत ।
ते चित्र - तुल्य अचल - स्थिति राहतात ॥४४॥
बोले वळून मग तो यशवंतरावा ।
“ आहेस कोण कुठला मजलागिं ठावा ॥
झाला बळी बळि असून तुझ्या बळाचा ।
त्याचा पिता समज मी मनिं बादलाचा ॥४५॥
अन्याय नीति नच भिल्ल कधीं पहाती ।
तूं आज येसि पुरता अमुच्याच हातीं ॥
जो आसरा मजसिं वृद्ध पित्यास बाळ ।
त्याला वधून मज पाहवितेस हाल ॥४६॥
यासाठिं वास्तविक जीव तुझा हरावा ।
घेऊन सूड निज हेतु पुरा करावा ॥
आम्ही परंतु करितों असला विचार ।
मारूनियां तुज न लाभ अम्हांस फार ॥४७॥
कोणी धरील यशवंत जिवंत हातें ।
देईल होळकर थोर इनाम त्यांतें ॥
तें पारितोषिक अलभ्य तुला धरून ।
घेईन - हेतु असला बसलों करून ॥४८॥
रागें हरीन तव जीव परंतु काय ।
आहे जिवंत करूं बादल हा उपाय ॥
रक्तें तुझ्या नच निवेल मर्माधिवन्ही ।
होईल जें मुहित घेइन तें करोनी ॥४९॥
कोट्यांतुनी सुटसि जोधपुरास याया ।
येणार या वन - पथें यशवंतराया ॥
ही बातमी मजसिं लागलि हेर गुप्त ।
मीं ठेविले सतत वाट तुझी पहात ॥५०॥
ब्रम्हाहि रक्षण करूं न शकेल तूतें ।
तूं सोडिशील न जिवंत कधीं वनातें ॥
जे दैव देइल तयास शिरीं धरावें ।
स्वाधीन शस्त्र हि शरीर तुवां करावें ” ॥५१॥
भिल्लांस काय कमला - सुत बोलताहे ।
“ हातांत आज तुमच्या पडलोंच आहें ॥
पाहीन यत्न करूनी पुरत्या हटानें ।
भिल्लांस लोळविन पांच दहा करानें ॥५२॥
आहे हत्यार कळतो उपयोग त्याचा ।
मी आसरा धरिन निर्भय कां भयाचा ! ॥
मातें जिवंत धरण्यास न काम सोपें ।
दावीन आज रण - कर्म तुम्हांस कोपें ॥५३॥
वाटे खुशाल मज कैद कराल होतें ।
ही प्राण - घातक मती सुचली तुह्मांतें ॥
या दुष्ट हो ! करिन खंडविखंड गात्रें ।
येईल जो पुढति हाणिन त्यास शस्त्रें ” ॥५४॥
तों धांवले प्रबळ भिल्ल तया धराया ।
हाणीति चोहिंकडुनी यशवंतराया ॥
तो मंडलाकृति फिरून विजेसमान ।
दे धाक चंचळ पदें करि मारहाण ॥५५॥
ज्याच्याकडे सरळ रोंखित दृष्टि नीट ।
तो कांपतो चळचळा करि मार्ग नीट ॥
तों मागुनी करिति येउन एक वार ।
चर्मावरी धरून तो परतूं तयार ॥५६॥
अंगामधें कवच पूर्विंच त्यास होतें ।
त्या आपटून करि शस्त्र महाध्वनीते ॥
लाह्याच काय ठिणग्या पडतात खालीं ।
कोलाहलें भरतसे वन एककाळीं ॥५७॥
एकाकडे फिरवि दृष्टि दुजास वार ।
गेला मरून तिसरा खल भूमि - भार ॥
जाळींतुनीच बगह्तो जंव शूर जाया ।
हल्ला करून धरिती यशवंतराया ॥५८॥
तो वीर्यशालि हिसकाहिसकींत धाडी ।
चौघांस दूरवर भूमि - तळास पाडी ॥
लातेंत सांपडुन ही पडती कितीक ।
ही शक्ति पाहुन अरी धरितात धाक ॥५९॥
जें तेज केवळ मराठि महाप्रचंड ।
कोट्यामधें झळकलें करि शत्रु - दंड ॥
ओसाड या अरवली - विपिनीं सकाळीं ।
भिल्लांस गांठुन भयंकर त्यांस जाळी ॥६०॥
एकेक घाव करि जो बल - शौर्य - शाली ।
तों एक एक भट हाणुन पाडि खालीं ॥
भिल्लांतले प्रमुख नायक कांपतात ।
कोणी पुढें न सरकूं धजला तशांत ॥६१॥
ते एकदांच उठले सगळेहि भिल्ल ।
चालून जाति धरिती यशवंत मल्ल ॥
झिंजाडि देउन तयां ढकलून दूर ।
बाहेर जाउं बघतां करि मार्ग शूर ॥६२॥
खालीं पडे अडखळून चुकून पाय ।
वेगें उठूं न शकला यशवंतराय ॥
तों भिल्ल येउन वरी पडती धरीती ।
बांधून कैद समयास तया करीती ॥६३॥
विधि लिहित कपाळीं तें चुके कोण काळीं ? ।
धरून मजसिं बांधा हो तुम्हांला खुशाली ॥
खरतर निज तेजें जिंकिती जे जगाला ।
पर-वशपण सोडी काय त्या ही नरांला ? ॥६४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP