यशवंतराय महाकाव्य - सर्ग चौदावा

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


कोटा - शहराभोंवतीं मराठ्यांचा गराडा - त्या शहरांत दुष्काळ पडतो - कोटा शहर मराठ्यांच्या स्वाधीन करण्याविषयीं नागरिक लोकांची यशवंतरायास विनंति - यशवंतराय ती मान्य करीत नाहीं - पुण्याच्या दरबारांत घडलेली हकीकत होळकरास कळते - शेवटची लढाई करण्याची मसलत व तयारी - मराठे कोटा शहराचा एक दरवाजा हस्तगत करून आंत प्रवेश करितात - लढाई - यशवंतराय युद्धास निघतो - माता व पुत्र - निकराची लढाई - यशवंतरायाचा पराक्रम - नागरिक लोकांचें आवेशानें व निराशेनें लढणें - मराठ्यांचा जय - यशवंतराय प्राण द्यावयस उद्युक्त होतो - मानसिंग वगैरे त्याचे मित्र त्यास समरांगणांतूनेकीकडे काढतात व त्याची समजूत घालितात - तो रजपूत राजांचें साहाय्य मिळवून मराठ्यांशीं पुन्हा लढण्याच्या हेतूनें जोधपुरास जातो - कोटा शहर मराठ्यांच्या स्वाधीन होतें.

आर्या
यशवंत शौर्यशाली सावध रक्षूं पुरा बळें पाहे ॥
कोटा शहरांतिल जन त्याच्या आज्ञेंत सर्वदा राहे ॥१॥
पडले शिथिल मराठे तोफांचा मार बंदही झाला ॥
उत्साह धीर तों तों यशवंताच्या मनामधें आला ॥२॥
आज उद्यां अरि जातिल भांडुन कंटाळतां स्वदेशाला ॥
मोर्चे उठतां मुक्तच आपण होऊं असें गमे त्याला ॥३॥
परि जागच्याच जागीं हे गोड विचार राहती सर्व ॥
मल्हार तो न जाता घालविता होय त्या जरी शर्व ॥४॥
अन्नाची सामग्री सरतां येतील पौर कौलाला ॥
शस्त्रें ठेवुन होतिल शरणागत हे त्यजून डौलाला ॥५॥
मल्हार हेंच चिंतुनि कोटा - शहरासभोंवती घाली ॥
वेढा तेणें आशा यशवंताची प्रनष्ट ती झाली ॥६॥
ज्या रजपूत नृपांनीं वचन दिलें साह्य द्यावया मागें ॥
एक न त्यांतुन येऊन द्यायाला हात संकटीं लागे ॥७॥
बाहेरून ते नृपती आंतुन नगरस्थ भांडते हो ते ॥
तरि दक्षणी कदाचित् युद्धा सोडून चालते होते ॥८॥
परि तें घडले नाहीं यशवंता न च सुचे तदा कांहीं ॥
दिग्भाग शून्य दाही विप्राची वाट सर्वदा पाही ॥९॥
जाउन अनंत येइल साधुनियां काम वाटलें नाहीं ॥
होउन निराश यास्तव प्रति दिवशीं फार काळजी वाही ॥१०॥
हाहाकार उडाला नगरीं दुष्काळ थोरसा पडला ॥
भयदा दुःखांबुधिच्या सर्वहि जन भोंवर्‍यांत सांपडला ॥११॥
रस्तोरस्तीं फिरती होउनियां दीन मारिती हांका ॥
कळवळती तें पाहुन सज्जन म्हणतात ‘ नेत्र हो ! झांका ! ’ ॥१२॥
एकैक मौल्यवान हि विकिती श्रीमंत वस्तु वांचाया ॥
कोठून त्या प्रसंगीं सुचतें त्यां गावयास नाचाया ! ॥१३॥
माता कितीक बैसति वरती चिंतेंत लावुनी डोळे ॥
केविलवाणें रडती शिशु त्यांतें चित्त पाहुनी पोळे ! ॥१४॥
काळाच्या तोडांतुन बाळाला सोडवूं धरी आशा ॥
मातृ - स्नेहें माता शांतीनें आपुल्या वरी नाशा ॥१५॥
व्यर्थ प्रयत्न झाले दिवसभरी मूठ धान्य मिळवाया ॥
साश्रु घरीं पति येतो दुःखें भार्येस हेंच कळवाया ! ॥१६॥
सरता धान्य नरांनीं पशुंवरती धाड घातलि पहा ! ती ॥
घोडीं डुकरें कुतरीं उंदिर ही मांजरें हि जन खाती ! ॥१७॥
दुष्काळाची उठली प्रेमळ भगिनी पुरीं महामारी ॥
करूनी खटपट झटपट धरुनि जना कितिक नित्य ती मारी ॥१८॥
काय करावें आतां ऐशा चिंतेंत यन्मनें जळती ॥
कोट्यांतील महाजन यशवंताच्या गृहीं तदा मिळती ॥१९॥
यशवंत त्यांस बोले “ सोडुं नका धैर्य लोकहो ! अजुनी ॥
पूर्वज - जनाचरित जी रीती विसरून काय होय जुनी ॥२०॥
वेशा उठवुन जाइल वाटे मल्हारराव होळकर ॥
निज कार्य - साधनांतीं आतां तुमचा करो न घोळ कर ॥२१॥
बघतात मराठ्यांच्या हातुन जे सोडवूं कुशल मान ॥
जमतात उत्तरेच्या प्रांतांत बलाढ्य ते मुसलमान ॥२२॥
रघुनाथराव येतो शूर पुण्याहून त्यांस दंडाया ॥
सैन्य प्रचंड संगें घेउनियां शत्र - गर्व खंडाया ॥२३॥
मल्हारराव कॊटा सोडुन त्याच्या पळेल साह्याला ॥
आपोआपचि जातो काय बळी प्राण देतसां ह्याला ? ॥२४॥
राहे जीवित देहीं तोंवरि लढतां रणीं खुशाल मरूं ॥
यावच्चंद्र - दिवाकर झटुनी समयास या सुकीर्ति वरूं ॥२५॥
जाऊन शरण आतां नाहीं कल्याण होळकर याला ॥
केला प्रतिबंध तया नेइल तो सर्व नगर विलयाला ! ॥२६॥
झाला असे तयाचा नाश अमित सूड कां न घेईल ? ॥
जाळुन नाशुन लुटुनहि त्याच्या न मनास शांति होईल ! ॥२७॥
यासाठीं या समयीं बैसुं नका धीर सोडुनी स्वस्थ ॥
द्या टक्कर झटुन हठें होळकराशीं पुरांतुनि समस्त ” ॥२८॥
हें यशवंत महात्मा बोलुन वच नागरां परत धाडी ॥
उत्तेजनपर भाषण करून निराशा मनांतुनी काढी ॥२९॥
बसला बसला वाटच मल्हार पहात नीट गोटांत ॥
स्वाधीन नगर होइल ऐशी आशा धरून पोटांत ॥३०॥
विप्र अनंत यशस्वी येइ पुण्याहून बातमी लागे ॥
सत्वर जवळी बाहे सरदार तयांस काय मग सांगे ॥३१॥
“ बसलों वेढा घालुन महिने मी तीन या पुरापाशीं ॥
सर्व प्रयत्न झाले निष्फळ आतां कराल गत कैशी ? ॥३२॥
स्वस्थ असे जरि बसलों होइल परिणाम काय हें कळतें ॥
सोडुन कोटा जावें लागेल म्हणून फार मन जळतें ! ॥३३॥
कांहीं उणें कराया राव सदाशिव घडि घडि पाहे ॥
कानांत पेशव्याच्या सांगाया वेळ साधिल न कां हे ! ॥३४॥
पस्तीस तीस वर्षें केल्या त्या ख्यात मीं बहु लढाया ॥
परि कोणी हि न टिकला भगव्या झेंड्यापुढें अरि लढाया ! ॥३५॥
येईल पेशव्यांची आज्ञा परतावयास त्या आधीं ॥
करिं एकदाच हरिहर हल्ला करूनी मनोगता साधीं ॥३६॥
इतुके प्रयत्न करूनी कां मी परतेन हात हालवित ॥
घेइन कोटा झगडुन नेइन रजपूत दूर घालवित ! ” ॥३७॥
ती युक्ती मानवली सर्वां सरदार शूर लोकांला ॥
शेवटचा यत्न करूसर्वांचा बेत एकदा झाला ॥३८॥
ठरला दिवस तयारी केली मोठी लढावया पूर्ण ॥
तरवारी भाल्यांनीं रिपु - सैन्याचें करूं म्हणति चूर्ण ॥३९॥
प्रातःकाळापासुन झाली सैन्यांत हालचाल सुरू ॥
तों ते नागर सावध सिद्धच निज - रिपु - निवारणास करूं ॥४०॥
होते वेढुन चवघे भवते सरदार शूर विख्यात ॥
ज्यांचें समरीं कौशल इतिहास - प्रिय जनां असे ज्ञात ॥४१॥
दिनरात्र युद्ध करणें आवडलें हेंच त्यांचिया चित्ता ॥
जो बाजिराया घाली वळवील न बुद्धिमंत कां कित्ता ? ॥४२॥
ती रात्र पौर्णिमेची होती नुकताच चंद्र वर आला ॥
पूर्वेकडुन भयंकर भडिमार तटावरी सुरू झाला ॥४३॥
पुरवासी ही ठेविति मार मराठ्यांवरी तदा उलटा ॥
दोन्ही पक्षांकडल्या भांडति तोफा जयार्थ कीं कुलटा ॥४४॥
तों जानराव चढला गुप्तपणें उंच ही तटावरती ॥
धीट तयाच्या मागुन वीर मराठे हजार वर चढती ॥४५॥
प्रतिबंध त्या तटावर नाहीं झालाच जानरावास ॥
वेशीवरती जातां पडले नाहींत त्यास आयांस ॥४६॥
‘ हरहर ’ करिति मराठे खरतर तरवारि चमकती फार ॥
हल्ला रजपूतांवर करिति न ते जाहले जंव तयार ॥४७॥
क्षणभर होय चकामक सांपडले शत्रु मारिले ठायां ॥
हाता पायां घायां घेउन रजपूत जाहले जायां ॥४८॥
घटकेंत तट मिळाला वेशीजवळील जानरावास ॥
रण - मंदिरांत रूचला जन्मभरि श्रेष्ठ ज्या नरा वास ॥४९॥
परि त्या वेशाखाली जमले होते अपार नागर ते ॥
जिंकुन घेऊं पाहे वेश जळी संकटीं कसा परते ? ॥५०॥
त्यानें खूण दिली ती ऐकुन बाहेर जाहले जागे ॥
तोफांसहित मराठे त्या वेशीजवळ धांवले रागें ॥५१॥
दरवाज्यावर झाली तोफ सुरू ती धुडूं धुडूं वाजे ॥
गोळे येति धडाधड आपटती तो ध्वनी नभीं गाजे ॥५२॥
होऊन छिन्न गेला दरवाजा उडुन दूरसा पडला ॥
आंत घुसायास बळें वेळ मराठयांत योग्य सांपडला ॥५३॥
तोफा ओढुन नेल्या मागें, मल्हार येउनी घुसला ॥
फुरफुरतां कर गर्जे हर्षें आवेश तन्मनीं वसला ॥५४॥
गडबड झाली ऐकुन उठला यशवंटराय खडबडुन ॥
मातेच्या चरणाला प्रथम मिठी नम्र घालि कडकडुन ॥५५॥
“ माते ! पुरीं मराठे येतात असें मला खचित कळतें ॥
जातो पुर रक्षाया दावाया त्यांस केवि मम बळ तें ॥५६॥
झालों विजयी जरि तरि येइन मी तुजसिं तोंड दावाया ॥
दाविन कीं तव उदरीं जन्म न म्यां घेतला असे वायां ॥५७॥
दे आशिर्वा तुझ्या पुत्राला तोच त्यास तारील ॥
पुण्य - प्रताप तव कीं वाटे मम सर्व शत्रु मारील ” ॥५८॥
कमला यशवंताला पाहुन समरोन्मुखास गहिंवरली ॥
“ मी धन्य धन्य माता बाळा प्रसवून यास महिवरली ॥५९॥
जा वत्सा यशवंता समरीं तुज लाडक्या विजय येवो ॥
प्रभु तव कल्याण करो सांभाळुन तुजसिं संकटीं नेवो ” ॥६०॥
दंगा होता तिकडे आला यशवंतराय धांवून ॥
अत्युग्र दिसे क्रोधें नगरीं रिपु - सैनिकांस पाहून ॥६१॥
आले स्फुरण मुसंडी मारिति डुकरासमान रजपूत ॥
त्यांवरि उठति मराठे रागें कीं उठविलें जणो भूत ॥६२॥
यशवंतानें केला थोर पराक्रम रणांत त्या काळीं ॥
नेटें परि मल्हारी पाउल एकेक तो पुढें घाली ॥६३॥
तों प्रळय - मेघ - गर्जन - सम पडला गडगडाट कानाला ॥
थरथर हाले भूमी वाटे जाईल काय पाताळा ॥६४॥
दक्षिण दिशेस मानी मानाजी स्वस्थ बैसला नाहीं ॥
तट घ्यायास हळू हळु खटपट होता करीत तो कांहीं ॥६५॥
त्यानें महाश्रमानें सुरूंग केले तयार पांच तदा ॥
ते एकदम उडाले झाली त्यांचीच गर्जना भयदा ॥६६॥
जों जों तट कोसळतो तों तों तो धडधडाट रव घडतो ॥
दुःखा येति उमाळे कीं जाणो तट पुनः पुन्हा रडतो ॥६७॥
हर्षें नाचे पाहुन मानाजी वाट जावयाजोगी ॥
द्वादश वर्षे तपुनी स्वर्ग - पथा जेंवि पाहतां जोगी ॥६८॥
तों द्वारीं बलशाली दोहन येऊनियां उभा राहे ॥
रण - कुंडांत अमौल्य प्राणांची आहुती करूं पाहे ॥६९॥
झुंझार झुंज तेजः-पुंज महा वीर ते मिळुन करिती ॥
ब्रह्मांड - भांड भांडुन पंचानन - गर्जना - भरें भरिती ॥७०॥
पडला हटास हटवी दोहन मानाजिला करून वार ॥
खवळे अत्यंत तदा तो निज - रिपु - वंश कानन - कुठार ॥७१॥
गंगथडींतिल त्यांच्या होते टोळींत लोक सतराशें ॥
त्यांतें घेऊन संगें धांवे प्रत्यक्ष काळसा भासे ॥७२॥
तेव्हां दोहन टिकला नाहीं मानाजिच्या पुढें फार ॥
मूर्च्छा येउन पडला भूमिवरी दोन लागुनी वार ॥७३॥
तो अरुणोदय झाला लढतां लढतां उजाडलें पुरतें ॥
कल्पांतींच्या जलधी - सम राहे गजबजूनियां पुर तें ॥७४॥
वार्ता मानाजीच्या दूत - मुखें कळुन येत विजयाची ॥
होळकराला तेव्हां हिंमत लागे सिदूं मग तयाची ॥७५॥
‘ हरहरहर ’ गर्जुनियां नेत स्वजनास होळकर पुढती ॥
होऊन पुढें नागर यशवंत - प्रमुख एकसर लढती ॥७६॥
सैन्यें मराठि सगळीं यशवंताच्या स्थळाकडे वळती ॥
कल्पांत - समुद्राच्या लाटांसम नीट येति आदळती ! ॥७७॥
कोठें नागर तेव्हां कोठें यशवंतराय हें न कळे ॥
गर्जत हांसत धांवत वीर मराठे पुरामधें घुसले ॥७८॥
त्या बाजुस मानाजी इकडुन मल्हार दावितो जोर ॥
म्हणती टिकेल कैसा यशवंत अजाण कालचें पोर ? ॥७९॥
नगराच्या मार्गांतुन सैन्य मराठी बळें फिरूं लागे ॥
नागर सागरसिंग - प्रमुख बळी भिउन राहिले मागें ॥८०॥
तो यशवंत समस्तां बोलावुन जवळ काय बोलतसे ॥
साक्षाद्वाचस्पति ही इच्छिल ऐकावयास बोल तसे ॥८१॥
“ वेशीबाहेर अरी घालविल्यावांचुनी बसे स्वस्थ ॥
पुरुषार्थास तयाच्या धिक्कार असो ! उठा जन समस्त ” ॥८२॥
शेवटचा मग हल्ला केला रजपूत पौर लोकांनीं ॥
तो नाद गर्जनेचा बहुधा ब्रह्माचिया पडे कानीं ॥८३॥
गच्च्या खिडक्या पांखीं भिंतीवरही निराश भट चढता ॥
वेडे रागें होउनि नागर झुंजार झुंज ते लढती ॥८४॥
जे एकदा मराठे शिरले शिरलेच नीट नगरांत ॥
तैलंग विप्र येउन जाइल तो काय परतुन घरांत ॥८५॥
रस्त्यांत राशि पडल्या प्रेतांच्या परि न शत्रु घालविले ॥
जाऊन चंबळेच्या उदकीं रक्त - प्रवाह कालवले ! ॥८६॥
गोळे धडाड पडती एकसरें तोफ देत दर वाजे ॥
बहुधा यमें उघडिले नगरीचे आज सर्व दरवाजे ! ॥८७॥
या प्रतिबंधा पाहुन चढला मल्हार फार तो कोपा ॥
रस्तोरस्तीं आणुन नाक्यावरि नीट रोंखिल्या तोफा ॥८८॥
मान - धनाढ्य महात्मा अरिच्या सैन्यापुढें उभा राहे ॥
झाला निराश तेव्हां यशवंत प्राण द्यावया पाहे ॥८९॥
तन्मित्र मान सागर विनविति येऊन हात जोडून ॥
“ ऐकुन घे यशवंता ! द्यावा हा मृत्यु - हेतु सोडून ॥९०॥
अससी जिवंत तूं तरि कधिं तरि आम्ही स्वतंत्रता मिळवूं ॥
कळवून स्वपराक्रम हेहि मराथे पुरांतुनी पळवूं ॥९१॥
जलधींत मकर तैसे गुप्तपणें या पुरामधें राहूं ॥
जें जें घडेल तें तें कांहीं दिन शांत बैसुनी पाहूं ॥९२॥
जोंधपुराला जाऊन तेथिल रजपूत तूं हि उठवावे ॥
त्यांसह वेगें येउन मारावे सर्व शत्रु लुटवावे ॥९३॥
येथें पुन्हा तयारी करितों लढण्यास दक्षणीसंगें ॥
तो वीर खरा लोकीं गळतें ज्याचें न धैर्य कीं भंगें ॥९४॥
आम्ही तुम्हीहि मिळुनी कोटा - नगरा स्वतंत्रता देऊं ॥
ईशापाशीं प्रार्थन करितों तो सुदिन लौकरी येऊ ” ॥९५॥
ऐसे बोलुन उचलुन घोड्यावर बसवितो तया शूर ॥
वेशींतून सुरक्षित गुप्तपणें देति घालवुन दूर ॥९६॥
मध्यान्हाचा आला वेळ अशा समयिं सर्वही नगर ॥
झालें स्वाधीन मिठी देति मराठे जसे बळी मगर ॥९७॥
श्लोक
जेथें तेथें ‘ हरहर ’ असा गाजला शब्द भारी ।
तेव्हां भाले बहु चमकले शत्रुला शोककारी ॥
नाचे झेंडा समरिं भगवा पौर मेले न थोडे ।
गाढें झालें यश महितळीं लोक गाती पवाडे ॥९८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP