मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
९१ ते १००

अभंग - ९१ ते १००

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


९१
सदया नुरउनि माझे मी पण । उदया आला कीं आपण ॥१॥
माझ्या हरुनी देह भावा । दिधला स्वस्वरुपीं विसावा ॥२॥
वृत्तिस्थिर करुनी हें मन । केलें आत्मस्वरुपीं लीन ॥३॥
सच्चित्सुख जल निधि जैसा मीना । सुखनिमग्न करि जगजीवना ॥४॥
रामा आनंद निमग्न मी आतां । तुज पाहुनि विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥

९२
रत्न जडित मुकुट माथा । लखलखाट सभोवता ॥१॥
कानी कुंडलांचा थाट । आजुबाजु झगझगाट ॥२॥
रूपें सुंदर सांवळा । भाळीं कस्तुरीचा टिळा ॥३॥
कासे पितांबर पीवळा । गळा वैजयंति माळा ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । दिधलें दर्शन सीताकांता ॥५॥

९३
ऐसें आवडे मज ध्यान । करीं शोभे चाप बाण ॥१॥
वामांकावरि जानकि भाजा । मंदहास्य मुख राजरामा ॥२॥
लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न । सेवक वानरांचे गण ॥३॥
सन्मुख कर जोडुनि मारुती । नयनी निरखी सीतापती ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । आपण सर्वं सुखाचा दाता ॥५॥

९४
तीच रात्रि तोचि दिवस । वाटे मुढबुद्धीं जीवास ॥१॥
जल कालिचे आजी वाटे । नदी ओघ चंचल लोटे ॥२॥
लवपळ घडि वर्षें झालीं । वय सामोग्री सरत आली ॥३॥
तरि या जीवां नाहीं ठावें । पुढें परिणामि कैसें व्हावें ॥४॥
धरुनी विषय सुखाचा सोस । जन्ममरणें होती कासावीस ॥५॥
तुझा उपकार मजवरि मोठा । कळविला हा संसार खोटा ॥६॥
सच्चिदानंद स्वरूप आपणा । भेटविलें मज ग्रासुनि मीपणा ॥७॥
राम विष्णु कृष्ण जगन्नाथा । केला उपकार जानकि नाथा ॥८॥

९५
आत्म माया नदीच्या लोटें । जीव वाहुनि जाति कर्म नेटें ॥१॥
नाहीं एकत्र सहवास । जैसा प्रवाहि काष्टांस ॥२॥
लक्ष चौर्‍याशीं फेरा । फिरतां फिरतां नाहीं थारा ॥३॥
तुझी कृपा ज्यावरि स्थीर । त्यासी कळविशी आपण तीर ॥४॥
ऐसा प्रतापि तूं श्रीरघुवीर । मज तारिला देउनि आत्म धीर ॥५॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । निज महिमा गोड गातां ॥६॥

९६
कोण कोठील कोणाचा । रामा तुजविण या जीवाचा ॥१॥
इष्ट मित्र पुत्र कलत्र । सोहि रे धायरे आत्म गण गोत्र ॥२॥
क्षणक्षणीं बिघडती । मित्र पूर्वील शत्रू होती ॥३॥
सर्व पाहिलें शोधूनी । नाहीं तारक तुज वांचूनी ॥४॥
मायाभ्रमरूप खटपट सारी । एक आपुला आधार संसारीं ॥५॥
राम विष्णु कृष्ण जगन्नाथा । तूं मज भेटला हा उपकार माथा ॥६॥

९७
आत्म प्रत्ययें केवळ । गेली माझी तळमळ ॥१॥
तुझा उपकार तरी किति वानु । आला उदया आपण विद्भानु ॥२॥
ऐसा अखंड असावा आत्म योग । दावुनि पंच भुत सृष्टि वियोग ॥३॥
कधींच उद्भवुं न दे भवरोग । आपण वैद्य शिरोमणी नुरवि दुःखभोग ॥४॥
रामा विष्णु कृष्ण जगन्नाथा । देउनि दर्शन माझ्या हरिल्या सर्व व्यथा ॥५॥

९८
ऐसा कोण असे संसारीं । सकळ संकटें निवारी ॥१॥
भक्तरक्षक तूं साचा । निश्चय हा मानसाचा ॥२॥
असति ब्रह्मादिक देव । नसति सर्व सत्ताधिश स्वयमेव ॥३॥
आपण सर्वांसि आधार । ऐसा माझा कृतनिर्धार ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । नाहीं नाहीं तुजविण त्राता ॥५॥

९९
सद्गुरुचा हा प्रसाद । माझा ऐकुनि आला साद ॥१॥
अनंत जन्मीचें भाग्य मोठें मज एका एकीं आपण भेटे ॥२॥
तों अविचारि अनाचारी । दुःखें भोगुनि होतों या संसारीं ॥३॥
आनंदघना राम राजा । आपण भेटुनि केला हेतु पूर्ण माझा ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । किति भाग्य वर्णुं आतां ॥५॥

१००
येतां सण दीपवाळी । जन पडती जसे सुकाळि ॥१॥
त्याहुनि होय मज आनंद रामा । आत्म दर्शनें सुख धामा ॥२॥
आजि भला रे सुदिन सोनियाचा । लाभ झाला आपण रामराज याचा ॥३॥
आपण भक्तांचा अभिमानी । ऐसें पूर्णपणें कळों आलें ध्यानी ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । गोड लागति निजात्म कथा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP