मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
कारणदेह निवारण

कारणदेह निवारण

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज


॥ श्रीसद्गुरु पदारविंदा भ्योनमः ॥ अथ कारणदेह निवारण प्रारंभः ॥
कारणदेहाचा विचार । सांगों जातां ग्रंथ फार । वाढला तो श्रोते नर । क्षमावंत असावे ॥१॥
दृष्यानिविद्ध समाधीस । साधु जाणती बहुवस । दृश्य सोडोनी आपणास । पाहूं जातां भांबावे ॥२॥
आपण आपण होऊनि रहा म्हणतां साधकासी पहा । कारणदेहाचा अडथळा हा । कैसा तो ही ऐकावा ॥३॥
दृश्य सोडोनी आपण आहे । तेथें कारणदेह आहे । म्हणे मज मी कैसा पाहे । असतांचि नकळे ॥४॥
कोणी एक तोंडोंविण । झालों म्हणे मी आपण । कोणी करा हो शोधन । तोंड मज नाहीं कीं ॥५॥
आतां कैसें करूं बा मी । मज कैसा कळेल मी । ऐसा संभ्रमाच्या भ्रमीं । पडे खरा साधक ॥६॥
ऐसें कळेना तयासी । कैसा तोंडेंवीण बोलसी । तैसा आपण आपणासी । कोठें म्हणुनी पूसतो ॥७॥
स्वप्नीं आपलें मरण । पाहूनि रडतो आपण । जरी मरता हा आपण । रडता कैसा सांगा कीं ॥८॥
तैसा कर्ता जो साधन । पुसे गुरुसी आपण जाऊन । तोंडें बोलतो आपण । तोंडें कोठें सांगा हो ॥९॥
कोणी एकासी जाळिलें । फिरूनि गाडगें फोडीलें । क्रिया कर्मांतर केलें । म्हणूनि रडे आपण ॥१०॥
आतां असों हे दृष्टांत । आपण आपणा पाहूं जात । दृश्य जैसें पाहत । तैसें पाहें आपणा ॥११॥
डोळा डोळ्यासी पाहणें । कानें कानासी ऐकणें । जिव्हे जिव्हेसी बोलणें । तैसें जाण आपणा ॥१२॥
येथें सद्गुरु अपेक्षा । अवश्य लागे त्या साधका । मग सुखी होतो देखा । परोपरी आठवी ॥१३॥
साधु समागम नसतां । उपयोगा ना विप्तन्नता । अंध लोकां काठी देतां । कांहीं धरी अवसान ॥१४॥
परी पुढें डोळे नसतां । मार्ग दिसेना तत्वता । रोगाविष्टा जर्जरता । होतां गती नये ती ॥१५॥
मग तो काठी घेऊनि उठे । उठूनि मग तो उभा ठे । चालण्याची तजवीज पडे । वांकड विंचुका चालतो ॥१६॥
बालक जैसा अनुक्रमें । कुसी उपडा गोडामगे । उंभराचा चढतां परमे । भिती धरूनी उभा ठे ॥१७॥
तैसी परी साधकाची । करितां साधनाची साची । होय तेथें सद्गुरुची । गरज लागे ॥१८॥
व्यास वसे सभ्या पाशी । कारणदेह आयित्यासी । गांठ पडतां नारदासी । साक्षात्कारी झाला तो ॥१९॥
शद्बानुविद्ध समाधीस । अंगिकारी सावकाश । तरीच केले ते सायास । सफळ होती साधकां ॥२०॥
न कळे आपणा आपण । ऐसें म्हणतां कळतो पण ।न कळे ऐसें तें नेणणें । तेंही मज भासलें ॥२१॥
नाहीं मी जें कां कल्पिलें । तेही मज पुढें असे ठेले । शुन्य साक्षित्व मी भलें । केलें कैसें जाणावें ॥२२॥
मज मी न कळे ऐसें म्हणतां । आपण आहे गा तत्वता । तोचि आपुली आपण होतां । संकट पडे तयासी ॥२३॥
मी हें किती सांगों आतां । जाऊनि पुसा सद्गुरुनाथा । शास्त्र निर्णय करितां । आहे नाहीं न ठरे ॥२४॥
सत्त असत्त सदसत्त । भिन्न अभिन्न न कळत । सभाग्य निर्भाग्य म्हणत । उभयरूप नव्हे तें ॥२५॥
वैष्णवांसी शरण जावें । कारणदेह निरसावे । महाकारणीं पडावें । तेंचि ऐका सांगतों ॥२६॥
इति श्रीलघुआत्ममथने गुरु शिष्य कथने कारणदेह निवारण चतुर्थपद समाप्तः ॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP