मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
१ ते १०

अभंग - १ ते १०

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.



विघ्न नाशना गणपती । माझी तुजला प्रणती ॥१॥
येतां विघ्नातें निवारीं । मज तारीं या संसारीं ॥२॥
सकळ संसाराचा शीण । वाटे एक तुजविण ॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । देसी दर्शन सुख सर्वथा ॥४॥


तुज नमो विघ्न नाशना गणपति । माझी मंद मति हरी देवा ॥१॥
हरी देवा माझी मी देहभावना । पतित पावना लंबोदरा ॥२॥
स्वामी श्रीमन्मंगल मूर्ति । सद्ग्रंथाची स्फूर्ति स्फुरवीं मज ॥३॥
स्फुरवीं मज आत्म स्वरूप उघडें । जेणें माझें घडे समाधान ॥४॥
समाधान विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुझे पाय ध्यातां दिवसनिशीं ॥५॥


नमन तुला सरस्वति । माझी हरी मंद मती ॥१॥
माझें जडत्व परिहारीं । सच्चित्सुख स्फुरवुनि तारीं ॥२॥
तुझी पूर्ण कृपा होतां । नुरे दरिद्र दुःक व्यथा ॥३॥
तूंचि आवडसी एकांता । विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥४॥


नमो शारदायी सरस्वति माते । बालक मी मातें अवलोकावें ॥१॥
ग्रंथ रचनेची द्यावी शब्द स्फूर्ति । जेणें प्रेम पूर्ति होय माझी ॥२॥
आहे मी अज्ञानी मूर्ख जड मति । येतों काकुळती ह्मणोनीयां ॥३॥
अस्खलित शब्दीं ग्रंथ माझ्या मुखें । रचुनिया सुखें पाळिं मज ॥४॥
आत्म प्रेम विष्णु कृष्ण जगन्नाथा । भाव दे गुण गाथा रचावया ॥५॥


तुज नमन श्रीसद्गुरू । नये आत्म स्तवन करूं ॥१॥
आपण अनंत अपार । वेदां न लगे ज्याचा पार ॥२॥
तो तूं भेटला दातारा । दिला निजानंदीं थारा ॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । मज तूंची माता पिता ॥४॥


नमन आपणातें वैष्णव सद्गुरु । तूं माय लेंकरूं मी तुझें कीं ॥१॥
नलगे मज तूझ्या स्वरुपाचा अंत । व्यापक अनंत आद्य देवा ॥२॥
आत्म कृपा बळें हरी दुःख सारें । स्वसुखानुभवद्वारें संरक्षीसी ॥३॥
बाह्यांतर विरहित एकचि आपण । सच्चित्सुख पूर्ण परब्रह्म ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ हा मी तूझा । स्तवन रूपें पूजा करुनीं घेईं ॥५॥


दयाघना रामराजा ।  तुला नमस्कार माझा ॥१॥
जनक तूं मज सीता आई । असतां उणें मज काई ॥२॥
लक्ष्मण भरत शत्रुघ्न । माझे चुलते हरतिल विघ्न ॥३॥
सर्व साहार्थ मारुती । विष्णु कृष्ण जगनाथीं ॥४॥


तुझा कळला स्वभाव । दाविसि स्वभक्तां निज ठाव ॥१॥
दयानिधी जो तूं ऐसा । तो तूं मजचि सांडिसि कैसा ॥२॥
रामा बळकट हा विश्वास । म्हणुनी धरिली तुझी कास ॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । तूं मज तारिसी अनाथा ॥४॥


पराक्रमी तूं रघुवीर । कां रे लागला उशीर ॥१॥
तुझा सर्वार्थीं मज धीर । प्रतापी तूं गुण गंभीर ॥२॥
सर्व आपुली हे सत्ता । ऐसा कळला नीज पत्ता ॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुझ्या चरणीं हा माथा ॥४॥

१०
जरीही झालों अपराधी । तरि मी तुजची आराधी ॥१॥
तुजवीण चापपाणी रक्षण कर्ता नाहीं कोणी ॥२॥
आलों तुजची शरण । दावीं आपुले चरण ॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । भक्त वत्सल तूं प्रख्यात ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP