मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे २२१ ते २२५

मराठी पदें - पदे २२१ ते २२५

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद २२१
जय गुरु श्रीदत्ता अवधूता । तारी मजला आतां ॥धृ॥
घेउनि प्रपंच माथां । बुडतों भवसागरिं मी वृथा ॥१॥
जन्ममरण प्रवाहीं । पडलों पळभरि स्थिरता नाहीं ॥२॥
विचार दृष्टी पाहतां । तुजविण न दिसे कोणी त्राता ॥३॥
तूंचि एक निज भक्ता । अक्षयिं निरंजन पद देता ॥४॥

पद २२२
विश्वीं असतां विश्वातीत होउनि पाही रे ।
मग तूं ब्रह्म आहेसि संदेह नाहीं रे ॥धृ॥
जें जें दिसतें हें जग तुझिया डोळा रे ।
मिथ्या सर्व अष्टधाप्रकृति डोळा रे ।
त्याचा दृष्ता त्याहुनि तूं नित्य निराळा रे ।
अज्ञानानें एकत्र नकरि गोळा रे ॥१॥
स्थूळदेह सर्वस्वें नाशिवंत रे ।
लिंगदेह तैसाची अंतवंत रे ।
कारन तिसरा भ्रमरूप हा निश्चित रे ।
साक्षियाचा चिन्मय तूं दृश्यातीत रे ॥२॥
हरिगुरुकृपें करुनि शुद्धबुद्धी रे ।
त्वंपद आणि तत्पद वाच्य उपाधि रे ।
त्यागुनि युक्त्या लक्षार्थीं ऐक्य साधी रे ।
घटमठ - त्यागें नभ जैसें निरावघी रे ॥३॥
मायारहित तों शुद्ध निरंजन रे ।
अद्वयरूप सश्चित्सुख परिपूर्ण रे ।
नामरूप सहजीं मिथ्यापण रे ।
रज्जुवरतें ज्यापरि सर्पभान रे ॥४॥

पद २२३
तो गुरु । भवसिंधूचें तारूं । उतरी पैलपारुं ।साधक जन आधारू ।
बोधशस्त्र घेउनिया सत्वरि करि निर्मुळ संसारू ॥धृ॥
आचार्य सर्वांमाजी आर्य ज्ञानदानीं औदार्य । साधुनि दे निजकार्य ।
शक्तिपात सामर्थ्य बळानें प्रगट करी चित्सूर्य ॥१॥
तो स्वामी । करि वीरक्ति कामीं । आचरवि निष्कामीं ।
प्रेमा जडवी रामीं । निरंजनपद देउनि अक्षयिं नांदवि निजसुखधामीं ॥२॥

पद २२४
सद्गुरुकृपें जहाली जागृती । फीटलि माझी सर्वहि भ्रांती ॥धृ०॥
दीसतें तें तें सर्व लया गेलें । अदृश्यरूप अनुभवा आलें ।
अनुभव घेणें नाहींच उरलें । अनुभवी त्या वांचोनि संचले ॥१॥
अनादितम होति जे सुषुप्ति । ते लया गेली तत्वज्ञानें भ्रांती ।
ज्ञानि मी वाटे तेहि स्वप्न स्थिति । हे सरलि जेथें होते जाणा जागृती ॥२॥
तम काशालिप्त नोहेचि आकाश । अज्ञानज्ञानाविण चिदाकाश ।
अलिप्त तैसे मिथ्याबुद्धिभास । बंध आणि मोक्ष हाहि नसे सोस ॥३॥
सच्चिदानंद अद्वय परिपूर्ण । बोलति श्रुति स्वरुप लक्षण ।
अनृत जडदु:ख भेदातें घेऊन । न ह्मणे कांहीं हो स्वयें निरंजन ॥४॥

पद २२५
तेचि साधु ऐसें ओळखावे । भवसिंधु तरावा ज्याचे नांवें ॥धृ॥
सोडुनिया लौकिक प्रवृत्तीसी । सेवुनिया सन्मार्ग निवृत्तीसी ।
लोटोनिया माघारीं सद्वृत्तीसी । स्वत:सिद्ध जाले सुखराशी हो ॥१॥
ज्ञान आणि अज्ञान वारिले । द्वैताद्वैत शद्बासि विसरले ।
सोहं भाव भाविताही शीणले । नेजबोधें परिपाका ऐसें आले हो ॥२॥
ज्याचे घरीं वैराग्य वाहे पाणी । उपरम खेळताहे अंगणीं ।
शांति विलसे अर्धांगी पट्टराणी । सर्वात्मत्वें भोगिती राजधानीं हो ॥३॥
ब्रह्मविद नोदं तें ब्रह्मरुप । रुप असतां जाणावें तें अरूप ।
निराकार निर्गुण निष्पाप । जनासहित निरंजन आपिआप हो ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP