मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे ३६ ते ४०

मराठी पदें - पदे ३६ ते ४०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद ३६
चला रे सखयांनो जाऊं गंगास्नानाला ।
बहुतां दिवसांनीं ऐसा पर्वकाळ आला ॥धृ॥
हृद - आकाशीं स्वरूप सुंदर भानू उगवला ।
अविद्या राहूनें त्याचा खग्रास केला ।
एक्या स्नानें करूनि मुक्ती होतसे त्याला ॥१॥
सद्गुरु ब्राह्मण गंगेपाशीं बैसला ।
सत्याचा संकल्प सांगे, जो येइल त्याला ।
क्षणामध्यें नाहीं करितो बहूत पापाला ॥२॥
निरंजन मोठ्यानें सांगे सर्वां लोकांला ।
नरदेहाचा पर्वकाळ जरि व्यर्थचि गेला ।
तरि मग जाणें लागल गाढवाचे जन्माला ॥३॥

पद ३७
राज्य आह्मां आक्षइ चीरकाळ हो ॥ वस्ति नाहिं दयादेशीचे भूपाळ हो ॥धृ॥
नाहिं भूतें दैवतें आणि इंद्र । नाहिं ग्रहनक्षत्रें सूर्यचंद्र ॥ नाहीं तेथें ब्रह्मा विष्णु रुद्र ॥१॥
नाहीं वेदशास्त्राचा कांहीं क्रम । नाहीं योगयागादि क्रियाकर्म । नाहीं तेथें वर्णाश्रम धर्म ॥२॥
नाहिं पृथ्वी उदक अग्नि कांहीं । वायु आनि आकाश तेथ नाहीं । स्वर्गमृत्युपाताळ नसे हेंही ॥३॥
मी मी ऐश्या शद्बासि न बोलून । शुद्धबुद्ध एकला निरंजन । विरळा जाणें ऐसी गुरुखूण ॥४॥

पद ३८
देखियला देश म्यां सुलक्षण । सर्व कर्में तेथींचीं विलक्षण हो ॥धृ॥
तेथें एक गोसावीराज भला । सर्व - कळा - कूशळ कवटाला । त्यानें धरुनि चोरटा राजा केला ॥१॥
मुका तेथें घातला कारभारी । परीक्षेसि आंधळा तेथें करी । प्रजा केली समूळ बरोबरी ॥२॥
त्यांनीं सर्व कर्मासी भ्रष्टवीलें । अठरा वर्ण पंगती जेववीले । गौद्विज श्वानाच्या सम केले ॥३॥
मोडोनिया वस्तीसि ओस केलें । नांगर जुंपुनि कोळशासि पेरिलं । निरंजन ह्मणे हे शुभ झालें ॥४॥

पद ३९
सांगतें कुळकथा माझी ऐका हो बाई ।
या सद्गुरुनें नेउनि मजला बुडवीले डोहीं ॥धृ॥
तान्हेलें ह्मणवुनिया पाणी पेयासी आलें ।
सद्गुरुनें घेउनि मजला मधींच लोटिलें ।
एक्या बुटकुळीनें बहुत खोली मी गेलें ॥१॥
नाकीं पाणी तोंडीं पाणी कानाचे द्वारीं ।
खालीं पाणी वर्ती पाणी पाणी चवफेरी ।
सर्वाठायीं पाणी जळमय झाले मी सारी ॥२॥
डोहो मोठा खोली येणें बहुतां बुडवीलें ।
माठे मोठे योगी जीवित्वासि मूकले ।
परस्परें चौघांचे तोंडें होतें ऐकिलें ॥३॥
बहुत काय सांगू आतां लोकांच्या गोष्टी ।
तसेंच घडोनि आलें सखये माझे अदृष्टी ।
निरंजन रघुनाथें केली नाहींसी सृष्टी ॥४॥

पद ४०
झोळी माझी कामधेनु तिचा महिमा काय वानूं ॥धृ॥
ब्राह्मणाचे घरीं जावें । माधोकरी मागावें ।
स्वइच्छेतें आणूनिया देइल तितुकेंचि घ्यावें ॥१॥
सात पांच शाखा भात वरण आनि भाकरी ।
पांढर्‍या पुरणपोळ्या अन्न बहू परोपरी ॥२॥
गंगेंत भिजवूनि खावी खडकावरी ।
बुद्धीला प्रकाशिती आणि बहु पुण्यकारी ॥३॥
बहुकाळ मागतांना कोणी कंटाळेना कदा ।
ह्मणोनि निरंजन मागतों हे सर्वदा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP