मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे १६६ ते १७०

मराठी पदें - पदे १६६ ते १७०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद १६६
रघुराया स्वामीया मायबापा । मजवरि असूं द्या पूर्ण कृपा ॥धृ॥
दैवयोगें पायासीं अंतरलों । जवळोनि दूरिल देशा गेलों ॥
अमृतासी टाकून कांजी प्यालों । सर्व गुणें बहुत श्रमी जालों हो ॥१॥
तुह्माविण रक्षिता हो मजसी । कोण आहे पराव्या परदेशीं ॥
निवारण करितां दु:खराशी । न देखे मी नयनीं आणिकासी हो ॥२॥
उदयासी पातला पापठेवा । नाहीं केली तुमची कांहीं सेवा ॥
तेणें वाटे माझिया खेद जीवा । काय करूं श्रीगुरु देवदेवा हो ॥३॥
राहुनीया निरंजन कृष्णातटीं । इच्छितसे रघुविर पद - भेटी ॥
प्रेमभरतें आणोनी नेत्रपुटी । हरिसंगें लेहोनी धाडी चिठी हो ॥४॥

पद १६७
धन्य आजी सुदिन प्राप्त जाला । गुरुकृपा दसरा सण आला हो ॥धृ॥
गुरुपद वंदोनि वारंवार । मन घोड्यावरुते झालों स्वार ।
छत्र माथा गुरुचा पद्मकर । शमदम सांगाति दळभार ॥१॥
वेदशास्त्रें गाताती पुढें वाणी । दशनाद वाद्यांची झाली ध्वनी ।
निश्चयाच्या ध्वजासेसें उभारूनी । वैराग्ययंत्राची दणादणी ॥२॥
देहद्वय ग्रामातें सोडोनी । पंचकोस सीमेसी वोलांडोनी ।
बोधशस्त्र घेवोनि तेजखाणी । भेदासुर मारिला निरंजनीं हो ॥३॥

पद १६८
काय वानूं तेथीची मी नवाई । रासक्रीडा खेळला शेषशाई ॥धृ॥
सोळासहस्त्र मिळोनी गोपबाळा । मधुवनीं पाहोनी सावळा ।
नानारंग झोकिती वेळोवेळा । हावभाव दाविती सर्वकाळा हो ॥१॥
हरिलीला गाउनी सुस्वरीं । टाळविणे मृदंग झल्लरी ।
वेणूरव वाजविती टीपरी । मोरचंग उठलीसे घूमारी ॥२॥
तेथें एक जाहला चमत्कार । सोळासहस्त्र होउनी श्रीधर ।
वेगळाला गोपीचा धरुनि कर । नाचावया लागला चक्राकार हो ॥३॥
सुरवर बैसोनी वीमानीं । येते जाले सर्वही क्रीडास्थानीं ॥
निरंजन विलासी चक्रपाणी । विलोकुनी वर्षताती सुमनीं ॥४॥

पद १६९
कृष्णजीचें गार्‍हाणें सांगायासी । गोपि आली यशोदामातेपाशीं ॥धृ॥
लोणी खातां धरोनि कृष्ण हातीं । गोपी जाय नंदाच्या घराप्रती ।
अहो बाई सांगूं मी तूज कीती । येणें केली लोण्याची माझी माती ॥१॥
बोले नंदराणी ते वेल्हाळ । कां गे माझ्या कृष्णावरी घेसी आळ ।
स्तनपान करितसे गोपाळ । नाहिं कोठें गेला हा एकपळ हो ॥२॥
आश्चर्यातें नयनीं गोपी पाहे । एक खेळे दुसरा रांगताहे ।
तिजा गल्लोगल्लीनें धावताहे । त्रिभूवन पाहिलें कृष्णमय हो ॥३॥
होवोनिया विस्मित गवळणी । ह्मणे मोठा नाटकी चक्रपाणी ।
होवोनिया राहिला जनिवनीं । पूर्णपणें कोंदला निरंजनीं हो ॥४॥

पद १७०
सद्गुरु कृपाघन अजि वोळले सये । जाहाले मी सुखी तें या वाचे बोलतां नये ॥धृ॥
भवताप तपनिच्या अहे तापले देहे ॥
विषय मृगजळ पेऊं पाहे श्रमले बहु माहें ॥१॥
सुटला अविद्या वायू उठिलि वासनाधूळी ।
संशयकल्पना जीवा घोळी फिरती वाहटुळी ॥२॥
नित्यानित्य द्रुम संवट्टनि वैराग्य अग्नी ।
रिघोनिया पापतृण वनिं जाहली धूणी ॥३॥
शक्तिपात गुरूचें सुतेज कडकडी वीज ।
कर्मवृक्ष जळोनिया सहज भाजिलें बीज ॥४॥
रघुविर गुरुमेघ आले बोध वर्षले ।
त्याचिया प्रसादें पूर्ण निरंजन धाले ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP