मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे २६ ते ३०

मराठी पदें - पदे २६ ते ३०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद २६
अंतर्यामीं कोण आहे हा पाडारे ठायीं ।
यावांचुनी परमार्थीं पहातां कांहीं सुख नाहीं ॥धृ॥
जन्मापासुनि शेवटवरतें ब्रह्मचर्य केलें ।
स्त्रीमात्राचें कैसें मुख तें नाहीं पाहीलें ।
परतुनि जन्मा घेतां अवघें व्रत वायाम गेलें ॥१॥
गृहस्थाश्रम संपादुनिया यागविधी केले ।
आल्या विप्रालागीं भोजन बहुतां घातलें ।
पुण्यबळाचें योगें कारण जन्मासी झालें ॥२॥
वानप्रस्थालागीं जाउनि आरण्य सेविलें ।
कंदमुळातें खाउनि स्त्रीपुरुषांनीं व्रत केलें ।
देह दंडिला परंतु खंडण जन्मा न झालें ॥३॥
सोडुनिया संसारा केला चतुर्थ आश्रम ।
मी संन्यासी झालों ऐसा मानुनि संभ्रम ।
शुद्धतत्व ठायिं न पडतां झाला तो भ्रम ॥४॥
दंडकमंडलु त्यागुनि शेवटीं झालासे हंस ।
दैत भाव हा नाहीं गेला आंतरिंचा भास ।
निरंजन रघुनाथपदासी कैसा त्या वास ॥५॥

पद २७.
त्याग करा संगाचा अंतरिं होऊनि उदास ।
अखंड निश्चळ व्हारे स्वरूपीं करानिया वास ॥धृ॥
यागयोगकर्माचे ठायीं आसक्त न व्हावें ।
दानधर्मफळ हेतुलागीं कदापि न घ्यावें ।
जितुकें होईल तितुकें सर्वहि ब्रह्मीं अर्पावें ॥१॥
जपतप अनुष्ठानीं कांहीं करूं नये वांछा ।
तीर्थें क्षेत्रें पाहण्यासाठीं फिरूं नये स्वैच्छा ।
स्वर्गभोगप्राप्तीची अंतरिं धरुं नये इच्छा ॥२॥
विषयासी मन चिंतिल त्याला चिंतूं न द्यावें ।
कल्पनेसी छेदुनि संकल्पानें नासावें ।
गुरु रघुनाथप्रसादें आक्षइ निरंजन व्हावें ॥३॥

पद २८.
त्यागा रे स्त्रीसंगा अंतरिं होउनि ऊदास ।
करितां संग स्त्रियांचा झाला बहुतांचा नाश ॥धृ॥
शिवसांभाचें लिंग गळोनि पडलें भूमीला ।
वृंदेच्या भस्मावरि जाउनि विष्णू लोळला ।
सरस्वतीच्या योगें ब्रह्मा अपूज्य तो झाला ॥१॥
आहिल्येचे संगें छिद्रें पडलीं इंद्राला ।
गुरुपत्नीच्या योगें कळंक झाला चंद्राला ।
तारेच्या संगानें वाळी प्राणासि मुकला ॥२॥
सीतासंगें रावण मेला लंकेची होळी ।
पांचाळीचे संगें कौरव बुडवीली कूळी ।
अठराक्षौणि सैन्य बुडालें झाली रांगोळी ॥३॥
स्त्रिया भेणें कार्तिकस्वामी गेला कपाटीं ।
कलियुगाचे मानव तेथें कायसी गोष्टी ।
म्हणवुनिया निरंजन लपाला सद्गुरुचे पाठीं ॥४॥

पद २९
धन्य धन्य हो सद्गुरु भवसिंधूचें तारू ॥धृ॥
बुडतां भवडोहीं बहु खोली । करणी अघटित केली ।
बांधुनि ज्ञानाची सांगडी । पावविलें परथडी ॥१॥
मोहोपंकाचे गर्तेंत पडतां अकस्मात । ज्ञप्ति देउनिया मज हात । काढियलेंसे त्वरित ॥२॥
देउनिया दृष्टी मज वहिली । माया विलया नेली ।
निरंजनपद मज दिल्हें । स्वरूपीम निश्चळ केलें ॥३॥

पद ३०
झाले जगदंबा जगदंबा वरिलें सद्गुरुसांबा ॥धृ॥
काम क्रोधहोदंभा ठाईंच वधिलें शुंभनिशुंभा ॥१॥
भावभक्तिचा टेंभा घेउनि नाचूं रंग स्वयंभा ॥२॥
रघुविर शेंदुर भाळी । निरंजन शोभतसे काळी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP