मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे १३६ ते १४०

मराठी पदें - पदे १३६ ते १४०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद १३६
यशोदेबाई लाधलें भाग्य आजि वो ॥धृ॥
जो कां व्यापक चराचरी । निर्गुण अद्वय श्रीहरि ।
तो हा आलासे उदरीं महाराज हो ॥१॥
परब्रह्म तुझे घरीं । रांगे आंगणीं ओसरीं ।
काय वर्णूं आजि थोरी । वाटे लाज हो ॥२॥
सर्व त्रैलोक्यामाझारी । धन्य तूंचि सर्वापरी ।
नाहीं उपमा दुसरी । नवलचोज हो ॥३॥
स्वामि निरंजन वासी । पूर्ण आनंदाची रासी ।
अखंडित तुझेपाशीं । सांगे गूज हो ॥४॥

पद १३६
सावळा डोला पाहूं तुळशीदळ निर्मळ वाहूं ॥धृ॥
पुण्यक्षेत्र पंढरपूर । चंद्रभागा दक्षिण तिर ।
चला जाऊनि सत्वर । वाळवंटासी राहूं ॥१॥
उभा राहिलासे नीट । पाईं जोडोनिया वीट ।
सुंदर नाभीचे निकट । ठेवूनिया बाहू ॥२॥
ध्वजापताका लावून । येती साधुसंतजन ।
गाती विठोबाचे गुण । घेऊनिया लाहू ॥३॥
सर्व सांगे निरंजन । धन्य कलियूगीं कीर्तन ।
शुद्ध करोनिया मन । तदूप होऊं ॥४॥

पद १३७
जय जय भीमरथी भीमरथी । अगाध तवगुण कीर्ती ॥धृ॥
प्रगटुनि भीमाशंकरीं । येणें केलें त्वां पंढरपुरीं ।
पुंडलिकातें पोटीं । ठेवुनि घेसी हरिपदभेटी ॥२॥
तुझिया दर्शनमात्रें । होती दुर्जन जन सत्पात्रें ॥३॥
निरंजन सद्भावें । वंदुनि ह्मणतो तवगुण गावें ॥४॥

पद १३८
येई वो यदुराज मुरारी गोवर्धनधारी ।
बुडतों मी भवसागर डोहीं येउनि मज तारी ॥धृ॥
अविद्या वायूया योगें गेलों भवडोहीं ।
मोहो दुरासद दुर्धर याचे आवर्ताठायीं ।
जन्मालयाचे घेरे घेउनि पडिलों प्रवाहीं ॥१॥
कामादिक रिपु जळचर यानीं घालुनिया मीठीं ।
होउनिया श्रमदायक मोठे झोंबति ममकंठी ।
अशा सर्पिणी लागुनि मागें पुरविलीं पाठी ॥२॥
त्रासियलों बहु या संसारा स्वामी यदुवीरा ।
तुझियाविन जगिं शोधुनि पाहतां न दिसे मज थारा ।
उठी अतां धावुनि वेगीं हे दीनोद्धारा ॥३॥
निरंजन तव अंकित होउनि मोकलितो धाया ।
पूर्ण दयाकर होउनिया तूं दाखवि निजपायां ।
नाहींतरि मी तुझिया वांचुनि जातों कीं वाया ॥४॥

पद १३९
सावळिया पंढरिराया । कां नये दीनाची माया ॥धृ॥
मी तों अनाथ दुर्बळ । बुद्धीहीन अमंगळ ।
कामक्रोधांनीं सकळ । व्यापिली काया ॥१॥
बुडतों भवाचे सागरीं । कोण आह्मासी उद्धरी ।
तुझिया वांचुनि श्रीहरी । जातों मी वायां ॥२॥
नका पाहूं जी निर्वाण । बहुत झालासे मज शीण ।
सद्भावेंसी निरंजन । लागतों पायां ॥३॥

पद १४०
सत्वरि धावे पावे हो श्रीहरी । विनविति भावें हो भीमकी सुंदरी ॥धृ॥
तूं तंव दीनबंधू दयाकर । सदय पूर्णकृपेचा सागर ॥
धरिसि भक्तासाठीं अवतार । ह्मणवुनि तूंते हो ध्याते वारंवार ॥१॥
रुक्मया माझा बंधु मूर्खरासी । दिधलें तेणें मज चैद्यासी ।
वारिता कोणी नाहीं हो तयासी । म्यां तंव तुज हो वरिलें मानसीं ।२।
द्विजवरा हातीं पत्रिका धाडिली । किमपि मनिं शंका नाहीं आली ।
उद्धटपणें बहु म्यां लिहिली । ह्मणवुनि माझी हो निरसांड केली ॥३॥
यदुविरा स्वामी निरंजनवासी । धावुनि आतां येई वो वेगेंसी ।
प्राण हे माझे आले कंठापाशीं । रक्षिता होई हो येउनि मजसी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP