मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे २१ ते २५

मराठी पदें - पदे २१ ते २५

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद २१
चला सखयांनों द्वारकेसि जाऊं । रूप श्रीहरिचें दृष्टिलागि पाहूं पाहूं ॥धृ॥ उभा राहिलाहे गोमतीचे तटीं । परब्रह्म हा पूर्ण जगजेठी । रूप पाहोनिया मदन आला पोटीं । तोचि नांदतसे जाउनिया बेटीं बेटीं ॥१॥
एकवेळां जरि द्वारकेसि जातां । श्रमावाचुनिया मोक्ष येत हातां । होतं उद्धार पितर पिंडीं साता । जरि सप्रेमें हरि गुण गातां गातां ॥२॥
याचिलागी जाती हरिजन । दृढनिश्चय करुनिया मन । सर्व वेंचिति जाउनिया धन । गुरुकृपें पावला निरंजन जन ॥३॥

पद २२.
मोतीं हो माझें हारपलें वो सये । सापडोनि दिल्हें गुरुरायें ॥धृ॥
चिन्मय मोतीं सुंदर जडित । बहुत काळ मजपाशीं होतें ।
सहजगति हारपलें अवचितें । नकळे सये झालि कैसी गत ॥१॥
फार वो दिन भ्रांतिमाजी गेले । अवचिता मोतीं नाकिं चापचिलें ।
भ्रमाचे हातीं नाहिं तें लागलें । तेव्हां हो माझें मन धडाडिलें ॥२॥
वेदशास्त्र ज्योतिषी धुंडीले । त्यांनीं हो कर्मग्रह सांगितलें ।
विधान त्याचें म्यांहो बहु केलें । त्याचियानें कांहीं नाहीं झालें ॥३॥
नेति धोति घरहि शोधिलें । इडा पिंगळा केर पाखडिलें ।
षड्चक्र उतरंडिसी धुंडिलें । मोति हो संये नाहिं सापडलें ॥४॥
तीर्थयात्रा देव नवसीले । व्रतें तपगळही टोचिले ।
इंद्रियदमन कडेलोट केलें । नवसासी देव न पावले ॥५॥
जिव हो माझा झाला होता वारा । दैवोदय जाहला सामोरा ।
सजजि मी गेलें सद्गुरुचे घरा । मनासि माझ्या दिलें त्यांनिं धीरा ॥६॥
गुरुनें कृपादृष्टि हो पाहिलें । मोतीं हो माझे गळ्यांत दाविलें ।
तेव्हां हो माझें मन आनंदलें । निरंजनिं रघुनाथ भेटले ॥७॥

पद २३.
सांपडलें वो मजला सखये सद्गुरुचें धन । समाधान झालें वो माझें फिरलेलें मन ॥धृ॥
गुरूनें कृपाळ होउनि मजला दिधलें दाऊन ।
स्वर्गमृत्युपाताळ आवघें गेलें व्यापून ।
अफाट जिकडे तिकडे उरले दाहि दिशा भरुन ॥१॥
अचाट धन सांपडलें तेथें झालों श्रीमान ।
देतां घेतां कोणालागीं नाहीं कीं वाण ।
नेइल त्याला कोणी ऐसा नाहीं अनुमान ॥२॥
जिकडे तिकडे भरोनि अवघें गेलेंसें धन ।
त्या वांचुनिया कोठें नाहीं रीता ठिकाण ।
तर्‍रुप होउनि ठेला अंतरबाह्य निरंजन ॥३॥

पद २४
ऐका रे सखयांनो स्वधर्म सांभाळा आपला ।
परधर्माचे मार्गें वायां शिणतां काशाला ॥धृ॥
स्वस्वरूपाला अवलोकावें धरोनिया ध्यान ।
कर्म अकर्मां विरहित ऐसी जाणुनिया खूण ।
याविण दुसरें करितां वायां होइल की शीण ॥१॥
शुकदत्तात्रय याज्ञवल्कि आणि कपिलमहामुनी ।
याची मार्गें गेले स्वधर्म ऐसें आचरोनी ।
ब्रह्मनिष्ट हे ठाउक एसें झाले सर्वजनीं ॥२॥
स्वधर्मदीक्षा धारण करुनी साधन उपाय ।
भावें दृढ धरावे जाउनि सद्गुरुचे पाय ।
कृपाळ होउनि दावुनि देतिल निरंजन ठाय ॥३॥

पद २५
साधा रे गुरुभक्ती । अंतरिं सांडुनि विभक्ती ।
भवभ्रम दूर करा रे व्यक्ती टाकुनि अव्यक्ती ॥धृ॥
एकावांचुनि दुसरें नाहीं या नामें भक्ति ।
निर्गुण सगुण झालें ह्मणतां आलि विभक्ती ।
दिसनें तितुकें मिथ्या ऐसी वेदाची उक्ति ॥१॥
भक्ता लागी रक्षुनि दुष्ट संहार ।
युगायुगाचे ठायीं जन्मतसे वारंवार ।
अखंड आद्यय असतां त्याचा कैचा अवतार ॥२॥
बाहुल्याला सत्य म्हणुनिया लावावी लग्न ।
जंवरि झालें नाहीं सद्गुरुसीं लग्न ।
निरंजनि रघुनाथ भेटल्या स्वरूपीं निमग्न ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP