मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे ५१ ते ५५

मराठी पदें - पदे ५१ ते ५५

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद ५१
मनचि कारण अवघें आदिअंतीं जाण । बंध अथवा मुक्ती दोन्ही व्हावया लागून ॥धृ॥
वर्णाश्रमधर्म रूपदेह - अभिमान । आप आणि पर भेदाभेदासि पाहणें । मनाचेंचि योगें अवघें द्वैताचें भान ॥१॥
मनचि आधार सर्वां इंद्रियां लागून ।
कर्माकर्में घडणें अवघें मनचि कारण ।
मनाचेचि योगें करणें पाप अथवा पुण्य ॥२॥
संकल्प विकल्प करणें मनाचें लक्षण ।
मनाचेचि योगें होणें मुक्त्या बंधन ।
मरोनिया वारंवार जन्मालागीं येणें ॥३॥
सद्गुरुप्रसादें मन झालेंसें उन्मन ॥
ध्येयध्याता ध्यान तिन्ही गेलीं हारपून ।
शुद्ध तत्व उरलासे नित्य निरंजन ॥४॥

पद ५२
पार्था धैर्य धरी समरीं । समरीं सांगें नीति बरि श्रीहरी ॥धृ॥
द्रोण पितामह कर्ण सुयोधन निकट आले वैरी ।
या समयीं तुज मोहे पिडिले म्हणसी मी नमरी ॥१॥
निजधर्माप्रति दूषण लावुनि म्हणवितां क्षेत्री ।
अपकीर्ति त्रैलोकीं होइल अगणित अल्पवरी ॥२॥
आप्त सहोदर मारूं कसे मी म्हणसी सत्य जरी ।
तरि त्या मृत्यू नाहिं कदापि चित्स्वरूपाचे परी ॥३॥
कर्ता हर्ता मीच असे रे हालवितां दोरी ।
निमित्तास्तव तुजला दाउनि करितों रणबोहोरी ॥४॥
व्यापक मी सर्वांतरि पार्था जग माझे उदरीं ।
पाहि बरें म्हणवुनिया दावित निजस्वरुपासि हारी ॥५॥
निरंजनपद पावुनि आक्षह निजशांतीसी वरी ।
लाभालाभीं समता मानुनि खेद कदा न करी ॥६॥

पद ५३
ज्ञानगंगेमाझारि आम्ही न्हालों हो । अंतर्बाह्य सवर्दा शुद्ध झालों हा ॥धृ॥
सद्गुरुकृपेचा पर्वकाळ हो । निश्चयाचा संकल्प अळुमाळ हो । भेदाभेदीं सोडुनि दिल्हें पहा हो ॥१॥
ब्रम्हडेहामाझारि बुडी दिल्ही हो । तयाठायीं विश्रांति बहु जाली हो । उठाउठीं तापत्रय गेलीं हो ॥१॥
रघुनाथपायाची शुद्ध धुळी । निरंजन लावुनिया कपाळीं हो । प्रेमानंदें नाचतो वेळोवेळीं हो ॥३॥

पद ५४
श्रीगुरुनाथा दयाकर झाले । म्हणुनिया मन माझें धालें ॥धृ॥
चिद्रस पाजुनि तृप्तचि केले । म्हणुनिया सर्वांग निवालें ॥१॥
आशापाश समूळचि गेले । पूर्णपणाचे ढेकर आले ॥२॥
जन्मांतरिं बहु सुकृत केलें । निरंजनिं रघुनाथ मिळालें ॥३॥

पद ५५
मनिं पुरता अनुताप असावा । नलगे जगलोकांत दिसावा ॥धृ॥
नलगे वांटुनि पाला खावा । अन्य षड्रस भोग त्यजावा ॥१॥
नलगे वल्कल वेष्टुनि घ्यावें । वस्त्राचे बहु त्याग करावे ॥२॥
नलगे डोइंत भस्म भरावें । जाउनिया वनिं वास करावे ॥३॥
सर्वहिं ईश्वरभाव असावा । ह्मणणें व्यर्थ निरंजनबावा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP