मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे ४६ ते ५०

मराठी पदें - पदे ४६ ते ५०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद ४६
शिष्य नव्हे तो मानवदेही पशु चकीलाडा ।
दुपाईं गाढव समजुनिया सोडा उकीरडा ॥धृ॥
प्रपंचीं मन असतां दारिद्र्यानें व्यापला ।
रांडा पोरें पिडिती खाया नाहीं पोटाला ।
कुटुंबाला टाकुनि सद्गुरु मोठासा केला ॥१॥
गुरुनें कृपाळ होउनि निजगुज सांगितलें ज्ञान ।
निश्चय पुरता नाहीं अंतरिं वाणेना खूण ।
शीतळता नाहीं म्हणुनिया करितो टुनफून ॥२॥
गुरुचे संगें राहुनि बहुत झाला लोचट ।
पूर्ती पोची वळखुन लोकीं भांडे बळकट ।
प्रपंच ना परमार्थ नाहीं एकही नीट ॥३॥
ऐसा शिष्या करील त्याची होइल फजीती ।
संगतीचे योगें होई ज्ञानाची माती ।
ज्ञाधुनि शिष्य करा निरंजन सांगतसे नीती ॥४॥

पद ४७
प्रपंच परमार्थी । चुकला दोन्ही अर्थीं ॥धृ॥
टोपी टिळे माळा । घालुनि रांडा करितो गोळा ॥१॥
सांगुनिया ज्ञानासी । पैका मागतसे लोकांसी ॥२॥
बाहेर साधू झाला । अंतरिं इच्छी सन्मानाला ॥३॥
निरंजन हा त्याला । सांगे करि पुरतें एकाला ॥४॥

पद ४८
शिष्या सद्गुरुचा सद्गुरुचा । नोहे तो हा साचा ॥धृ॥
वदला कवितावाणी । सुंदर श्लोक पदांतर गाणीं ॥१॥
गोड गळ्यानें गातो । लोकांना बहु टोणपे देतो ॥२॥
उद्धट होउनि बोले । आंगीं अनुभव नसतां डोले ॥३॥
जनरंजन बहु केलें । परि मन निरंजन न झालें ॥४॥

पद ४९
प्रसाद सदुगुरुचा । वेगळाचि गुण त्याचा ॥धृ॥
वदला कविता वाणी । ह्मणवी चातुर्याची खाणी ॥१॥
बहुत विद्या शिकला । शास्त्री ऐसें ह्मणती त्याला ॥२॥
योग - समाधीं केला । तरि तो ज्ञानी नाहीं झाला ॥३॥
टाळ विणा वाजविला । निरंजन पद नाहीं त्याला ॥४॥

५०
पद सद्गुरुचा महिमा वर्णूं काई । उपमेसि तयाच्या दुजा नाहीं हो ॥धृ॥
परिसाची उपमा देऊं जरी । तरि तो लोहा लागतां सोनें करी ।
न करवे आपुल्या ऐसीपरी ॥१॥ कल्पतरु उपमेलागीं द्यावा ।
तरि तो कल्पीलासि ये अनुभवा । अकल्पित देतसे गुरुठेवा ॥२॥
देव सर्व उपम देऊं जरी । तव ते देती असेल दैवीं जरी ॥
गुरु दैवीं नसल्या कृपा करी ॥३॥ पापतापदैन्य उठाउठी ।
पळुनि जाती जयाची होतां भेटी । निरंजनिं रघुविर घाली पोटी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP