मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे ५६ ते ६०

मराठी पदें - पदे ५६ ते ६०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद ५६
गुरुजि मजला महाराष्ट्रविद्या येती । याविण दुजी बैसेना माझ्या चितीं हो ॥धृ॥
अहंब्रह्म अनुभविला ओंकार हो । कका व्यापक पाहिला निर्विकार हो ॥ बाराखड्या जें गनग हें भिन्नाकार हो ॥१॥
दश अंक हे दशदिशा सारी हो । भरिव शून्य मोजितां लक्षावरि हो ॥ पाहूं जातां प्रसार त्याचा भारी हो ॥२॥
शुद्धतत्व मोजिला गुणाकार हो । द्वैतमाया उडविला भागाकार हो ॥ जमाखर्च जाहला बराबर हो ॥३॥
निरंजनीं आवडे हेचि विद्या हो । वरकड सार्‍या दिसताति अविद्या हो ॥ रघुनाथासि मिळाला शिष्या नाथा हो ॥४॥

पद ५७
ब्राह्मण ऐसें त्यासि म्हणावें । ब्रह्म जयाप्रति झालें ठावें ॥धृ॥
ब्रह्म असे जगिं निश्चय केला । यज्ञोपवित विराजित ज्याला ॥१॥
आत्मानात्म विचारित आहे । ज्ञानशिखा शिरिं संतत वाहे ॥२॥
साक्षपणें सर्वांतरवासी । धारण हा श्रौताग्नि जयासि ॥३॥
श्रीरघुनाथ दयाकर झाला । सत्य निरंजन ब्राह्मण केला ॥४॥

पद ५८
नरदेहा येउनि आजि धन्य आह्मि झालों ॥
जाउनिया सर्व क्षुधा पूर्णपणें धालों ॥धृ॥
सग्दुरु पदकमळें देखियलीं डोळां ।
झालें मन उल्हासित निज मन अळिकूळा ॥१॥
त्या सुखासि नाहीं पार करवेना लेखा ।
त्यापुढें स्वर्गंसुख तुच्छ दिसे देखा ॥२॥
गुरुचरणीं मस्तकासि टेकवितां बा रे ।
तत्क्षणीं आष्ट अंग निवालें सारे ॥३॥
निरंजनीं जनीं वनी गुरु रघुराज ।
अभिमान लौकिकादि सोडियेलि लाज ॥४॥

पद ५९
योगिया उगाचि शिणसी वायां रे ॥धृ॥
अरे नासक्या या शरिरासी । किति नीट करिसील सायासी ।
नाहिं स्वरुपीं समंध यासी रे ॥१॥
जैसे गाढवाचें घोडें । बहु धुतल्या नोहे फुडें ।
तैसा देह आत्मया पुढें रे ॥२॥
आहे आत्मा सर्वाठायीं । त्याजवांचुनि कांहीं नाहीं ।
किति कोंडु कोंडु घेसि देही रे ॥३॥
गुरु निरंजन रघुविर । त्याचे वचनीं होउनि स्थीर ।
राहे निजस्वरूपीं निर्भर ॥४॥

पद ६०
पाहतां विश्वचि ब्रम्ह खरें । पाहतां दृद्गृश्यार्थ नुरे ॥धृ०॥
तरंगाकृती सांडुनि आकृती । निर्भळ जळ सारें ॥१॥
मृगजळ ठायीं रश्मी दिसतां भावाभाव सरे ॥२॥
लावुनिया दिप रज्जु विलोक नि:संशय व्याळ नुरे ॥३॥
निरंजन मी समजलिया मग देह नसे बा रे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP