मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे १५१ ते १५५

मराठी पदें - पदे १५१ ते १५५

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद १५१
हरिची भक्ति बरी भक्ति बरी । तारक भवसंसारीं ॥धृ॥
सर्वांतरि हरी पहावा । अंतरिं निश्चय भाव धरावा ॥१॥
हरिचे सद्गुण गावे । प्रेमळ वचनानें अळवावे ॥२॥
विषयभोग विसरावे । निरंजन भक्तीनें भजावें ॥३॥
निशिदिनिं सत्संगासि धरावे । भवजळि रितिनें याचि तरावें ॥४॥

पद १५२
हरिचें नाम बरें नाम बरें । पापीं तरले सारे ॥धृ॥
अजामिळ भव तरला । ह्मणतां नारायण पुत्राला ॥१॥
अळवितां पक्षाला । गणिका गेली वैकुंठाला ॥२॥
उलटें नाम स्मरतां । जाला वाल्हाकोळी तरता ॥३॥
निरंजन हरिनामें । यास्तव घेतो बहु सप्रेमें ॥४॥

पद १५३
धावे पावे हो सद्गुरुराया । श्रीदत्तात्रया ॥धृ०॥
बुडतों भवडोहीं जातो वायां । तुजवांचुनि सखयां ॥
शक्तिहिन झाली माही काया । येऊं दे माया ॥१॥
कामक्रोधादि जळचर भारी । उदकामाझारी ॥
नेती ओढुनि मज लावुनि दूरी । घालिति घोरीं ॥२॥
आशा सर्पिणी डंखूं पाहे । तृष्णा गळग्राहे ॥
करुनि बैसली त्राये त्राये । हरि मजला पाहे ॥३॥
ऐसा निरंजन होउनि दीन । बोलें वचन ॥
न दिसे मजलागीं तुझियावीण । संरक्षिता दीन ॥४॥

पद १५४
भज रे भज प्राण्या रघुविरचरणा । तापत्रयहरणा ॥धृ०॥
शिळा होती ते मानवी जाली । ज्याच्या पदचाली ॥
कर्में विप्रांचीं सिद्धिसि नेलीं । मखरक्षा केली ॥१॥
भावें पाळुनिया पितृवचन । सेवुनिया वन ॥
संगें घेतले वानरगण । सुग्रवि रक्षून ॥२॥
बिभीषण भक्ता संबोखिलें । सुरवर सोडविले ॥
सीता - शोकाचें निरसन केलें । मुनिसदना गेले ॥३॥
जेणें भक्ताच्या साठीं वहिला । अवतार धरिला ।
वेगीं शरणागत होई त्याला । निरंजन प्रभुला ॥४॥

पद १५५
आजि भाग्यउदयो मोठा जाला । आत्माराम अनुभवालागीं आला ॥धृ०॥
जग अवघें दिसतें चिदाकार । सर्प नाहीं सर्वदा एक दोर ।
सोनें जैसें भासती अलंकार । द्वैतभाव पळोनि गेले दूर ॥१॥
दु:खाध्वंस हाऊनि सुखावासि । अखंडित स्फुरत असे ज्ञप्ती ।
सदोदित आनंदाची प्राप्ती । होति जालि निरंकुशा तृप्ती ॥२॥
नाहीं जाले मरणजन्म फेरे । अज्ञानाचे विलया गेले वारे ।
भस्म केलें संचित कर्म सारें । भवबंध तोडिले सर्व दोरे ॥३॥
निरंजन जहालों निरंजन । नव्हतो ऐसा अनुभव जाला क्षीण ।
जीवदशा सरोनि गेली दीन । रघुराज पावला दयाघन ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP