मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे ९१ ते ९५

मराठी पदें - पदे ९१ ते ९५

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद ९१
धन्य अजि नरदेह प्राप्त झाला । यानें आत्मलाभ हा मोठा दिला ॥धृ॥
तिर्यगादि सर्वही योनिठाई । श्रम जाले ते आतां सांगु काई ॥१॥
जन्मोजन्मीं सुकृत बहु केलें । ह्मणोनिया हें फळ प्राप्त झालें हो ॥२॥
उपकार मोठासा येणें केला । गुरुकृपापात्र हा होता झाला ॥३॥
निरंजन नरदेहालागी वाणी । एथोनिया राहिलीं येणीं जाणीं ॥४॥

पद ९२
नरदेह योग्य हा उपकारी । याला काय योजितां हो व्यवहारीं ॥धृ॥
जन्मोजन्मिं प्रपंच तुम्हीं केला । तेणें काय तुम्हांसी लाभ दिला हो ॥१॥
गुरुपायीं ठेवूनि निजडोई । शुद्धतत्व अपुलें पाडा ठाईं हो ॥२॥
निरंजन रघुवीर दृष्टि पाहा । प्रेतावानी पडोनि उगे राहा हो ॥३॥

पद ९३
मरोनिया मारक तोचि जाला । कदाकाळीं पाहुं नये त्याला ॥धृ॥
सांडोनिया स्वहित मार्गालागीं । कोकशास्त्र शिकला लागवेगीं हो ॥१॥
गुरुकृपें कोणासी प्राप्ति झाली । त्याचे चित्ती संशय नाना घाली हो ॥२॥
जैसें श्वान जातसे पिसाळोनी । दुसर्‍यासि मारिताहे डंखोनी ॥३॥
निरंजन सांगतो सर्व लोकां । त्याचे जवळी जाउनि बैसूं नका ॥४॥

पद ९४
महाराजा सद्गुरु स्वामिराया । कदाकाळीं सोडु नये तुझीया पाया ॥धृ॥
तुजलागीं पहातां सर्वकाळ । दु:ख नाहीं पाहिलें कोणे वेळे ॥१॥
पापताप दइन्य मजलागी । ठावें नाहीं जाहलें तुझे संगीं ॥२॥
आजवरी सुखाचा काळ गेला । एथूनिया वियोग नसो मला ॥३॥
निरंजन लोळतो पायावरी । रघुनाथ सद्गुरु कृपा करी ॥४॥

पद ९५
धन्य धन्य सद्गुरु रघुराया । सर्वावरी सारिखी तुझी माया ॥धृ॥
तुझी कीर्ती ऐकूनी बहुतापरी । ह्मणूनिया पातले वेषधारी ॥१॥
शास्त्री आनि पंडीत तपेश्वर । सर्व कला कुशल विद्याधर हो ॥२॥
परिक्षेसि पहावयालागीं आले । तुज पहातां तयांचे गर्व गेले ॥३॥
लागोनिया चरणीं झाले लीन । स्वामिकृपें होउनि निरंजन ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP