मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे ८१ ते ८५

मराठी पदें - पदे ८१ ते ८५

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद ८१
तो नर मुक्तचि आदि अंतीं । गेली मुळिहुनी ज्याची भ्रांती ॥धृ॥
जन्म नसे मग मागें झाला । अंतरयामीं अनुभव आला ॥१॥
देह नसे मज आतां कांहीं । पहातसे आपणास विदेही ॥२॥
मृत्यु नसे मजलागि कदाही । अजरामर आपणातें पाही ॥३॥
लागुनिया रघुनाथ पदासा । जन नसतां निरंजन झाला ॥४॥

पद ८२
तैसें सुख संसाराठायीं । शोधुनि पाहतां कांहिंच नाहीं ॥धृ॥
दुर्धर सर्पफणीचे छाये । बैसुनिया सुख पावेल काय ॥१॥
वाटुनिया बचनागा प्याला । सांगा तो नर काय जिवाला ॥२॥
विगळ अंथरुनी जो निजला । निद्रा काय सुखाची त्याला ॥३॥
संसारासि निरंजन भ्याला । जाउनिया गुरुपायीं लपाला ॥४॥

पद ८३
ब्रह्म सदा सर्वांतरि आहे । याचि प्रकारें पंडित पाहे ॥धृ॥
ब्राह्मण गौहस्तीचे ठायीं । टाकुनिया देह अंतरीं पाही ॥१॥
चांडाळादि शुनीचे देहे । पहातसे आंतीले विदेहे ॥२॥
सर्वांतरि आपणातें पाहे । आपण सर्वही होउनि राहे ॥३॥
श्रीरघुनाथ दयाकर झाला । सत्य निरंजन पंडित केला ॥४॥

पद ८४
त्या गुरु रघुरायाची मी दासी । जहाले सये हो निजनिश्चयेसी ॥धृ॥
उघडु नि तत्वाचें भांडार । काढीलें चिद्रत्न तेजाकार । घातले माझे कर्णिं मनोहर ॥१॥
निजघरीं बहुकाळीचें ठेवणें । सहजी मज दिधलें दाऊन ।
जहाली भवदारिद्र्याची हान । टाळिले सये हो जन्म तें मरण ॥२॥
त्या पदीं देह सर्वस्व वाहिला । भाव हा दूजा नाहिंच राहिला ।
रघुविर निरंजनिं म्यां पाहिला । संशय सये हो उठाऊठी गेला ॥३॥

पद ८५
धन्य स्वामी सद्गुरू रघुराया । तुज पाहतां शीतळ जहाली काया ॥धृ॥
चिन्मयरूप देखिलें वाडेंकोडें । तेंचि भासें सर्वदा मागेंपूढें ॥१॥
उघडितां झाकितां सर्वकाळ । नेत्रीं रूप कोंदलें अळूमाळ ॥२॥
स्थावरादि जंगमा सर्वांठायीं । तुजविण पाहतां कांहीं नाहीं ॥३॥
निरंजन रघुविर सर्व पाही । तयाविन दुसरा देव नाहीं हो ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP