मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
श्रीगुरुस्तुति

श्रीगुरुस्तुति

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा । जो नित्य राहे उदित प्रभात्मा ।
ज्ञानें जयाच्या नर हो कृतार्थ । तो पूर्ण आनंद गुरू समर्थ ॥१॥
अखंड आत्मा अविनाशि दत्त । तया पदीं लाविति जे स्वचित्त ।
वित्तभ्रमा सोडिति ते कृतार्थ । तो पूर्ण आनंद गुरू समर्थ ॥२॥
जो जागृति स्वप्न सुषुप्तिसाक्षी । जो निर्विकारें सकलां निरीक्षी ।
वीक्षी परी ज्यासि नसे निजार्थ । तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ॥३॥
जळीं स्थळीं सर्वहि वस्तुमाजी । व्यापूनि राहेचि तयासि राजी ।
जो ठेवि भावें नर हो कृतार्थ । तो पूर्ण आनंद गुरू समर्थ ॥४॥
जें दृश्य तें रूप नसे जयाचें । दृश्यांत राहे अविकारि ज्याचें ।
स्वरूप तोची अविनाशि अर्थ । तो पूर्ण आनंद गुरू समर्थ ॥५॥
दृश्यासि धेतां नच घेववें जें । स्वरूप तत्स्थ प्रभुचें सुतेजें ।
स्वयें प्रकाशे जगिं जो परार्थ । तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ॥६॥
असोनि सर्वत्र गुरुप्रसाद । विना न लाभे करितांहि खेदा ।
भेदाचि वार्ता करि जो अपार्थ । तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ॥७॥
अनन्य भावें भजतां अनन्य । लभ्य प्रभु जो नच होइ अन्य ।
संन्यस्त सवैंषण तारणार्थ । तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ॥८॥
मागे तुकाराम तयासि दत्त । दे वासुदेवा करुनी निमित्त ।
हें स्तोत्र चिन्मात्रपदा समर्थ । द्याया हराया सकलाध्यनर्थ ॥९॥
गाणगापुरि अठराशें सत्तावीस शकामधीं ।
उदेयेले स्तोत्र हेंचि आधि व्याधि हरो कुधी ॥१०॥

गुरुस्तुतीचा भावार्थ

ब्रह्म व आत्मा यांचें ऐक्य, अभेद दाखविण्याकरितां आत्म्यास परमात्मा म्हटलेलें आहे. आत्मा हा ब्रह्माप्रमाणेंच अविनाशी व पूर्ण आहे. दत्त हे सद्गुरुही असेच आहेत. हा कूटस्थ ( निर्विकार ) परमात्मा जागृति, स्वप्न व सुषुप्ति या तिन्ही अवस्थांस व्यापून आहे व तसाच तो सर्व जगतासही व्यांपून दशांगुळें उरला आहे. हा स्वत: अविकारी असून विकारांत सांपडण्याजोगा नाहीं. हा सर्वांना प्रकाशित करतो. पण त्याचा प्रकाश मात्र घेतां येत नाहीं. अशा या आत्म्याची प्राप्ति त्याची सद्गुरूप्रमाणें उपासना केल्यावांचून होत नाहीं. जसें दुधांत तूप असूनही तें दूध विरजून मंथन केल्यावांचून प्रकट होत नाहीं तद्वत्. परंतु हेंही कळण्यास गुरुकृपाच हवी व असा गुरु म्हणजेही परमात्माच; म्हणून अशा गुरूची अथवा दत्ताची म्हणजे अद्वैत ब्रह्माची एकभावानें उपासना केली असतां तो शेवटीं त्याचें फल जें त्याशीं एकरूप होणें तें देतो. एकंदरींत एकानेंच एकाची एकभावानें सेवा केली असतां अखेरीस तें एकच ज्याचें त्यास प्रतीत होतें असा सिद्धान्त. म्हणून परमात्मरूप दत्तानें वासुदेवाला निमित्त करून तुकारामाला दिलेलें हें स्तोत्र चिन्मात्र पदास नेण्यास म्हणजे आत्मप्रकाश करण्यास समर्थ आहे व त्याबरोबरच तें सर्व आधिव्याधि व कुधी ( कुबुद्धि ) म्हणजे अज्ञानापासून परावृत्त करून, ज्ञानमात्र केवल स्वरूप करण्यासही समर्थ आहे.
शिष्य :- मागें आपण ध्यानयोग साधल्याची खूण आत्मसाक्षात्कार म्हणून सांगितलीत तरी तो कशास म्हणावा ?
स्वामी :- आत्मसाक्षात्काराचें स्पष्ट लक्षण गीतेंतच श्रीभगवंतांनीं असें सांगितलें आहे. ते म्हणतात - ‘ यं लब्ध्वा चापरं लाभ मन्यते नाधिकं तत: । ’ म्हणजे असा एक परमोत्कृष्ट लाभ कीं ज्याच्यावर असा दुसरा लाभच शिल्लक उरत नाहीं तो लाभ.
शिष्य :- म्हणजे परमोच्च लाभच कां म्हणाना कीं ज्याचे योगें वेदांतमताप्रमाणें नि:श्रेयस प्राप्त होतें तो असेंच कीं नाहीं ?
स्वामी :- होय, तसेंच म्हणण्यास हरकत नाहीं.
शिष्य :- बरें अशा लाभाचा हेतु काय ? तो साधल्यापासून काय घडतें ?
स्वामी :- ज्यास आत्मसाक्षात्कार होतो अशा आत्म्यसाक्षात्कारी पुरुषाचीं सर्व कर्में मग निरहंकृतीनें होऊं लागतात, व तीं कर्में मग ब्रह्मार्पण होतात. शिवाय एरवीं कामिक कर्में करीत असतां त्यांत अहंकार असल्यामुळें त्या कर्मापासून इष्टानिष्ट गोष्टी घडल्या म्हणजे मन सुखदु:खांनीं बद्ध होतें व त्यामुळें जीवात्मा आपण कोण हें एकदींच विसरतो. त्याचा परिणाम तो भ्रमांत पडून आपण केवल पराधीन आहोंत म्हणून त्यास वाटूं लागतें. व त्या मुळें जो अद्वितीय असा केवलानंद तो त्यास उपभोगावयास मिळत नाहीं. पण निरहंकृति कर्मानें त्याची चित्तशुद्धी होऊन त्याचेकडे आपलेपुरतें मर्यादित असें कर्तेपण व त्याचा बोजा न राहिल्यामुळे त्याचें मन हलकें होतें म्हणजे त्याचे मनावरील बोजा उडून जाऊन तें स्वैरगामि अतएव स्वतंत्र होतें व त्यास कोणत्याहि प्रकारची काळजी, शंका इत्यादि न उरल्यामुळें त्याचें सर्व कांहीं यथासांग चालूं लागतें. घरांतील वडीलधार्‍या चालकांवर मुलांचा भर जसा पडलेला असतो व मुलांस जाणून अगर न जाणून कोणत्याहि प्रकारची काळजी न करितां कालक्रमणा सुखानें व आनंदानें करितां येते तसेंच येथेंहि आहे. ज्यानें आपलीं सर्व कर्मे ब्रह्मार्पण केलीं त्याची काळजी तो परमात्माच वागवितो व त्यामुळें परमात्म्याचा जो परमानंदाचा ठेवा तोच आत्मलाभ यास उपभोगावयास मिळतो. मग परमात्म्याचा हा अंशभागी असल्याचा त्याचा प्रत्यय असल्यामुळें आपण व परमात्मा एकच स्वरूप आहोंत हा त्याला अनुभव घडतो. आत्मसाक्षात्कार म्हणतात तो यालाच. स्वस्वरूपानुभव म्हणतात तोहि हाच. आत्मसमर्पण परब्रह्माचे ठायीं केल्यानें हा आपोआपच प्राप्त होत असतो. मग मुद्दाम एवढी अहंकृति धरून वांकड्या वळणानें जाण्याचें काय कारण ? बरें इतकेंहि करून अशा वांकड्या वळणानें मिळणारा आनंद अमर्याद असतो काय म्हणून विचार केला तर त्याचें उत्तर नाहीं असेंच येतें, व हें उघडहि आहे. कारण असें पहा कीं कवडीप्रमाणें संकुचित आकाराची वस्तु लाभल्यामुळें मन जास्त प्रसन्न होईल कीं दर्यासारख्या अमर्याद आकाराच्या वस्तुलाभानें मन जास्त गंभीर, प्रफुल्लित व आनंदित होईल ! महासागर हातांत आला तर कवडीच काय पण अनंत रत्नें त्या रत्नाकराकडून मिळतील, पण केवळ कवडीघेऊन संतुष्टु होऊं पाहणारास एका कवडीशिवाय महासागरासारखा विविध रत्नांचा आनंद कसा भोगावयास मिळणार ? आद्य शंकराचार्यांचे गुरु श्रीगोविंदपूज्यपाद यांनीहि आपल्या रसहृदयतंत्रांत एका चरणांत असेंच म्हटलें आहे. ‘ कृपणा: प्राप्य समुद्रं वराटिकालाभसंतुष्टा: । ’ ( र. हृ. ३. १ ). भावार्थ -- समुद्र लाभत असतां जे केवळ कवडीवरच संतुष्ट होऊन राहतात, म्हणजे हीच आपली इतिकृत्यता समजतात ते केवळ कृपण अतएव दरिद्रीच म्हणण्यास हरकत नाहीं. म्हणून मनाचा हा संकुचितपणा नाहींसा होण्यास सर्व कर्में ही अहंकृति टाकून व मन महासागरासारखें गंभीर व अमर्याद करून तें परब्रहमशीं मिसळून त्याच्या एवढें मोठें - नव्हे त यांतच समाविष्ट करून - मग तीं कर्में केलीं असतां आपल्यास त्याची बाधा न होतां महा परमानंद चाखावयास मिळतो. यापेक्षां आतां जगांत दुसरा मोठा मोठा तो आनंद कोणता असूं शकेल याचा तुमचा तुम्हीच विचार करा. ब्रह्मार्पण कर्में केल्यानें परमपुरुषार्थ घडतो तो हाच. मानवाची हीच इतिकर्तव्यता कीं त्यानें आपलें सर्व समर्पण एका परब्रह्माचे ठायीं करावें, म्हणजे तो महालाभाचा आयताच वांटेकरी होतो. काय अद्यापि समजलें किंवा नाहीं ? ‘ निर्हेतुक निरहंकारें ब्रह्मार्पण सर्वचि होती । ’ अशी एक साधूक्तिहि आहे.
शिष्य :- होय अगदीं बरोबर समजलें ! समुद्राचा दृष्टान्त खरोखरीच मोठा गंमतीचा खरा ! ज्यांत सर्व वस्तु द्रवून जातात, समरस होतात, एकरूप होतात, तोच समुद्र अशीच ना याची व्युत्पत्ति आहे ?
स्वामी :- होय असेंच.
शिष्य :- बरें ! अशा प्रकारच्या पुरुषाची वृत्ति ( वागणूक ) कशा प्रकारची असूं शकते तें समजेल काय ?
स्वामी :- हो ! अशा तर्‍हेचे पुरुष कसे असतात तें एकनाथी भागवतांत स्पष्टपणानें सांगितलें आहे. ‘ बालोत्मत्तपिशाचाभ: स्मर्तृगामी दयानिधि: । ’ म्हणजे बाल, उन्मत्त व पिशाच या तीन अवस्थांपैकीं कोणच्यातरी एका वृत्तीनें त्यांची वागणूक व्यवहारांत असते.
शिष्य :- पिशाचासारखी वृत्ति म्हणजे ते खरोखरीच पिसाट होऊन राहतात कीं काय ? कां आपलें हें नाटक ?
स्वामी :- होय, तसेंच ! ते प्रत्यक्ष पिशाच होत नाहींत तर लौकिकांत दाखविण्यापुरतें ते तसें वर्तन करतात. असे पुरुष अशा तर्‍हेच्या प्रत्यक्ष वृत्तीमध्यें असतात असें नव्हे तर ते केवळ असा आभास दाखवितात. याचें कारण त्यास जगताची निरथक उपाधि होऊं नये असा त्यांत गर्भित हेतु असतो. तुमच्या पाहण्यांत असे साधु आलेहि असतील किंवा ऐकिवांतहि असतील कीं ज्यांचे पुढें कोणी दर्शनास अगर विचारण्यास किंवा प्रसादास गेले तर ते खस्कन् अंगावर धांवून येतात, शिव्याशाप देतात अगर दगड धोंडे किंव काठी उचलून डोक्यांत हाणतात. म्हणून असल्या सत्पुरुषांचा तो आंतरहेतु असतो असें समजूं नये. त्यांचा हेतु इतकाच कीं, इतकाही धाकदपटशा दाखवून जे कोणी अखेरपर्यंत या दिव्यांत टिकतील तेच खरे कडकडीत मुमुक्षु असें त्यांस पांरखून त्यावर कृपादृष्टि करून त्यांस प्रसादं द्यावयाचा. खरोखर असे दयानिधि पुरुष स्मर्तृगामी म्हणजे सर्वांचें अंतर्याम जाणून त्यांचेवर यथायोग्य दया करणारेच होत. श्रीदत्तमहात्म्यांत अशा तर्‍हेचे पुष्कळ दृष्टांत आहेत. ज्यांत प्रत्यक्ष दत्तांनी चांडाळ, मलंग, भिकारी, उन्मत, पिशाचवत्, विषयी, अभिलाषी वगैरे अनेक प्रकारंची अमंगल, किळसवाणी अगर उग्ररूपें धारण करून त्यांची सेवा अगर भक्ति करूं पाहाण्यार्‍यास वेळीं अवेळीं भेडसाविलें आहे व त्यांची कसोटी पाहिली आहे. पण जे कोणी सद्भक्त इतक्याही परीक्षेस उतरून, त्यांचे सन्निध जाऊण पोहोंचले आहेत, त्यांचे पाय धरीत आहेत, त्यांची करुणा भाकीत आहेत त्या आर्त जनांवर ते दत्त प्रसन्न झाल्याशिवाय राहिलेही नाहींत. खुद्द एकनाथ स्वामींना तर हा अनुभव आहे. एकदां तुकोबांना कोणीएक सत्पुरुषांसही हा अनुभव आहे. एकदां तुकोबांना कोणीएक पिशाच्च भेटलें असतां ते म्हणाले -- ‘ काय विठोबा ! तुम्ही आतां पिशाच्चाचें रूप धारण केलें काय ? कांहीं हरकत नाहीं. पण अशानें मी तुम्हांस यत्किंचितही भिणार नाहीं हें ध्यानांत ठेवा. मी तुम्हास ओळखलें तुम्ही कोण आहां तें. ’ याप्रमाणें अनेक दाखले पिशाच्च वृत्तीचे असले तरी तेवढ्यावरून सत्पुरुषांची वृत्ति खरीच पिशाच्च म्हणून न समजतां, ती भासमात्र म्हणजे वरकरणी असते हें ध्यानांत ध्यावें व ते जरी अशी वृत्ति उपाधि होऊं नयेत म्हणून पत्करितात तरी तेवढ्यानें निरुपाधिक होतात म्हणजे आपलेमागें उपाधि लावून घेत नाहींत असें समजूं नये. जे कोणी खरोखरी आर्त व मुमुक्षी असतात त्यांचे मुक्ततेसाठीं व कार्यासाठीं ते उपाधि स्वीकारण्यास सज्ज असतात. मात्र मुमुक्षूनें त्यांचें चित्त आपलेकडे कसें ओढून घ्यावें व लाभ कसा करून घ्यावा हें त्याचे अभ्यसावर व सेवेवर अवलंबून राहील.
शिष्य :- दत्त हे त्रिशिर व षड्भुज म्हणतात हें खरें काय ?
स्वामी :- हो ! ही गोष्ट खरी आहे, पण कृतयुगीची आहे. तीन शिरें सहा हात हें तीन वृत्ति एकत्र मिळाल्याचें रूपक आहे. तथापि तसेंच रूप पाहूं जाणार्‍या भक्तास तें तसेंही दिसेल. पण कलियुगांत अशा त्रिशिर षड्भुज मूर्तीचें दर्शन होणें दुष्प्राप्य आहे. तें या युगांत मनुष्याप्रमाणें एकशिर, द्विहस्त व बालोन्मत्त अथवा पिशाच्च वृत्तीनें होणारें आहे. अवधूतवृत्ति म्हणतात ती यालाच.
शिष्य :- आपण जो आत्मसाक्षात्कार मघा म्हणालांत त्यांत आणखी कांहीं भेद आहे म्हणतात तें काय ?
स्वामी :- होय. आत्मसाक्षात्कारांत थोडा भेद आहे खरा. सारख्या अभ्यासानें जो सतत आत्मसाक्षात्कार होतो तो सगुण साक्षात्कार होय. वेदांतप्रतिपाद्य तो परोक्ष साक्षात्कार म्हणतात व त्याचा जो प्रत्यक्ष अनुभव तो अपरोक्ष साक्षात्कार.
शिष्य :- उत्थान म्हणतात तें काय ?
स्वामी :- उत्थान म्हणजे, कांहीं काल आत्मसमाधीमय अवस्थेंत जो गेलेला असतो तो पुन: पूर्वस्थितीवर येतो म्हणजे भानावर येतो. या जगांत येतो त्याला उत्थान म्हणावें व साक्षात्कार झाल्यानंतर पुन: पूर्वस्थितीवर येणें तेंच उत्थान. आत्मसाक्षात्काराची पराकाष्ठा म्हणजेच स्वतोत्थान होय.
शिष्य :- आत्मोत्थानाप्रमाणेंच परोत्थान म्हणून कांहीं असतें कीं काय ?
स्वामी :- होय. असतें तर ! बरें विचारलें. आत्मोत्थान एका जीवात्म्यालाच लागू आहे व परोत्थानाची अवस्था म्हणजेच ईश्वरपण ही अवस्था म्हणजे ज्ञानाची पराकाष्ठा होय.
शिष्य :- मला आपल्यास एकदा मुक्त व परब्रह्म यांतील अंतर विचारावयाचें होतें.
स्वामी :- कांहीं हरकत नाहीं. पुढील खेपेस सांगूं. कारण आतां संध्यावंदनाची वेळ झाली आहे. तेव्हां आज येथेंच मुक्काम करूं या.
शिष्य :- मुक्त व परब्रह्म यांत अंतर काय ? परवा आपण याविषयीं सांगूं म्हटलें होतें म्हणून पुन: आपल्यास त्याविषयीं स्मरण करीत आहें.
स्वामी :- ठीक आहे. आतां वेळही आहे. तेव्हां याविषयीं कांहीं विवरण करण्यास हरकत नाहीं. मुक्त व परब्रह्म हीं दृष्टान्तांनीं सांगावयाचीं म्हटलीं तर असें म्हणतां येईल. समजा एखादा गृहस्थाश्रमी असावा व तोच पुढें संसारास असार समजून व सर्व संग परित्याग करून संन्यासी व्हावा त्याप्रमाणें हें आहे. म्हणजे संन्यास स्वीकारल्यावरहि ज्याप्रमाणें पूर्वाश्रमीच्या मुलाबाळांचा संबंध म्हटला तर असून आतां मात्र त्यास तो बाधूं शकत नाहीं त्याप्रमाणें.
शिष्य :- मुक्तीस किती काल लागेल याचा कांहीं अंदाज आहे काय ?
स्वामी :- याचा अंदाज कसा करतां येईल ? सतत अभ्यास करूनही त्याला कालाचें बंधन आहे हें खरें आहे. तथापि तेवढ्यानें गडबडून जाण्याचें कारण नाहीं. एकदां मनुष्य निराश झाला कीं मग तो हात पाय गाळून पुढचा उद्योग करण्याचें सोडून देतो; म्हणून निराश न होतां क्रमानें सलोकता, समीपता, सरूपता व सायुज्यता ह्या मुक्तीच्या पायर्‍या आस्तें आस्तें व धीमेपणानें गांठून परब्रह्मपदीं जाणें हें जरूर आहे.
शिष्य :- आपण म्हणतां हा मार्ग खरोखरीच फार बिकट असून तो आम्हांसारख्या पामरांना साधणें फार दुष्कर आहे. मला नाहीं वाटत कीं अर्धवट साधकांना इतका अवघड जिना चडे तों धीर असेलसा. तो बिचारे ही बिकट वाट पाहून आधींच घाबरतील व कदाचित् तो निराशेनें सोडूनही देतील. इतका दम धरून अगदीं गिरिशिखरावर जाणारा असा क्वचितच महात्मा आढळेल.
स्वामी :- तेंही खरेंच. हा मार्ग सावकाशीचा अतएव पिपीलिकामार्ग आहे, व यास टप्पे टप्पेही बहुत आहेत. तथापि एवढ्यानें निराश होण्याचें कारण नाहीं. कां कीं ज्याला खरोखरीच तितकी उत्कंठा व तातडी आहे, त्याला नजीकचे मार्ग व नजीकचीं साधनेंही आहेत.
शिष्य :- तो कोणचा मार्ग ? व त्याचीं साधनें काय ?
स्वामी :- अहो असें पहा, मुंबईंत सोपान अगर दादर न चढतां एकदम पाळण्यांत ( लिफ्ट ) मध्यें बसून श्रम न पडतां त्या त्या मजल्यावर जातां येतेंच कीं नाहीं ? अथवा आगगाडीपेक्षांहि जलद अशा विमानमार्गें उड्डाण करून नदी,  नाले, पूल, डोंगर यांचे अडथळे न मोजतां एकदम अल्पावधींत हवा तिकडे संचार करतां येतोच कीं नाहीं ? फार लांब कशाला ? जनावरें वगैरे स्थलचर प्राण्यांना असें जाणें दुष्कर वाटतें; पण तींच देवानें घडविलेलीं विमानें म्हणजे पक्षी कसे मुर्रदिशी उडून जातात तें आपण पाहातोंच ना ? म्हणून पक्षी, विमानें अगर विजेचे पाळणें यांप्रमाणें चट् उड्डाण करतां येण्याजोगा एक जवळचा मार्ग आहे. ज्यास विहंगममार्ग असें म्हणतात. मुक्तीस लवकर जाऊं इच्छिणार्‍यानें अशा मार्गानें जाण्यास हरकत नाहीं. त्यानें हा सोपानमार्गाचा क्रम न स्वीकारतां विहंगममार्गानें आपली सुटका झट् करून घ्यावी. हा मार्गही अवघड नसून सोपाच आहे; तथापि यांत एक महत्त्वाची गोष्ट आहे.
शिष्य :- ती काय ? त्यांत कांहीं अशीच एखादी अडचण बिडचण नाहींना ?
स्वामी :- नाहीं. तसें कांहीं फार म्हणण्यासारखें नाहीं. पण या मार्गांत एक मोठी गोष्ट अशी लक्षांत ठेवावी लागते ती ही कीं, त्यानें म्हणजे साधकानें, सद्गुरूंचा प्रसाद व ईश्वरांचा अनुग्रह होण्यास आपल्या सेवेंत बिलकुल खंड पडूं देतां कामा नये व आपल्या प्रयत्नांत कसर करतां न ये. अशा सेवेनें व अशां प्रयत्नानें त्यानें आपल्या कर्मरूप क्षेत्रांत ( शेतांत ) श्रीगुरु व ईश्वर यांच्या कृपेचें पाटाचें पाणी सहज खेळूं शकेल अशा बेतानें आपल्या भूमिकेंत आगाऊच चर खोदून ठेवण्याची व्यवस्था करून ठेवली पाहिजे. अशी त्याची व्यवस्था झालेली असली म्हणजे सद्गुरु त्याच्या भूमिकेंतील चरांचे बांध ( दरवाजे ) केव्हांच फोदून टाकतील व त्यंतून आपल्या दयामय पाण्याचे प्रवाह सोडून तें पात्र जलमय करून टाकतील व असें झाल्यानें सद्गुरुरूपी जलांत मग आपणही बुडून जाऊन त्यांच्या स्वरूपीं पोहोचूं यांत आश्चर्य तें कसलें ? गुरूची योग्यता व गुरूची आवश्यकता या दृष्टान्तावरून पुन्हां एकवार पटण्याजोगी आहे नाहीं ?
शिष्य :- मला आपले बिनतोड दृष्टांत ऐकून फारच संतोष वाटला. परवा बसलेली मंडळीहि हेंच म्हणत होती कीं, स्वामीमहाराजांची ( आपली ) सांगण्याची हातोटी फार अपूर्व आहे म्हणून त्यांनाही आजचें आपलें हें भाषण सांगणार आहें व माझी खात्री आहे कीं हें ऐकून त्यांनाही आनंद वाटलाच पाहिजे. पाहिजे तर आज येथेंच पुरे करूं या.
शिष्य :- काल मीं आपलें झालेलें बोलणें मुक्त व परब्रह्मांतील अंतर याविषयीचें, आमचे सर्व बंधूंस सांगितलें व माझ्या अटकळीप्रमाणें त्यांनाही कांहीं शंका न येतां तो विषय पटून समाधान वाटलें. आतां त्यांतून एकदोघांच्या मनांत कांहीं गोष्टींविषयीं आपलेकडून फोड करून घ्यावयाची होती. पण ते, तो विषय आपलेपुढें ठेवण्याविषयीं भीड धरतात म्हणून त्यांचे वतीनें मीच तो विषय आपलेपुढें मांडतों.
स्वामी :- ज्ञानाचे बाबतींत भीड ठेवूं नये. आपली जखम चव्हाट्यावर बांधल्यावांचून औषध मिळत नाहीं. असो. काय ? त्यांचें म्हणणें तरी काय ?
शिष्य :- त्यांचें म्हणणें असें कीं, आम्ही या व्यवहारानें इतके जखडलेले आहोंत कीं, आमची सुटका कधीं काळीं होईल कीं नाहीं याचीच शंका वाटते. कारण आमचे हातून धड अभ्यासही होत नाहीं व धड सद्गुरुसेवाही होत नाहीं. तरी यास आणखी जवळचा कांहीं सुलभ उपाय असल्यास हवा आहे.
स्वामी :- कांहीं नाहीं. अशा प्रपंची पुरुषानें दिवसा काय हवा तो आपला व्यवहार करावा. पण रात्रीं आपणच ठरविलेल्या वेळीं थोडा कां होईना आत्मानात्मविचार करण्याचा परिपाठ ठेवला तर त्यांचीही सुटका होण्यास हरकत नाहीं.
शिष्य :- हा विवेक कसा करावयाचा ?
स्वामी :- त्याला एकच उपाय व तो म्हणजे मी व माझें याचा त्याग करणें. संन्यास करणें.
शिष्य :- म्हणजे काय ? याची विशेष फोड करून मला हवी आहे.
स्वामी :- असें पहा, सुषुप्तींत आपणांस सुख मिळतें कीं नाहीं ?
शिष्य :- होय. आपल्यास उत्तम गाढ झोंप लागली होती हें आपल्यास जागे झाल्यावर कळतें व त्याविषयीं आनंद होतो.
स्वामी :- पण सुषुप्तींत मन जरी निद्रित असलें तरी आपण म्हणजे आपला आत्माच जागा असतो. म्हणून त्याच्या साक्षित्वामुळें आपल्यास हा आनंद सांगता येतो. झोपेंत असतांनाच कोणांस हा आनंद त्यावेळीं सागतां येईल काय ? व जर येईल तर तो जागाच म्हणावयाचा. मग झोपेंत व जागेपणांत अंतर तें काय राहिलें ?
शिष्य :- होय, तें खरेंच. जागेपणीं आपलें मन जागें असतें व निद्रेंत तें निजलेलें असतें. पण आत्मा हा उभयावस्थेंत जागाच असतो, असाचना आपल्या म्हणण्याचा आशय ?
स्वामी :- होय, तसेंच. अगदीं तसेंच. इतकेंचसें काय पण आत्मा चारी अवस्थेंतही जागाच असतो, व या सर्व अवस्था आत्म्याला लागू नसून मनाच्या मूढ जागृतादि वृत्तीमुळें त्याला लागू आहेत. आत्म्यास बिलकूल लागू नाहींत.
शिष्य :- या चारी अवस्था कोणत्या व त्यांचीं लक्षणें काय ?
स्वामी :- हें पहा. मन जागें असतें ती जागृति निजलेलें असतें तेव्हां सुषुप्ति, जेव्हां अर्धवट जागें व अर्धवट झोंपाळू अशा संदिग्ध अवस्थेंत असतें तेव्हां स्वप्न, व जेव्हां मुळीं मनच नांहीसें झालेलें, मय लय पावलेलें असतें तेव्हां अमनस्क अथवा उन्मनी अवस्था म्हणावी. याच अवस्थेला, ती या तिन्हींहून विपरीत, विशेष व महत्त्वाची म्हणून चौथी अवस्था असें नामाभिधान आहे. जर कांहीं या नरदेहांत येऊन साधावयाचें असेल तर ती हीच अवस्था होय. समाधि स्थिति ती हीच. म्हणून येनकेन प्रकारेण मनाचा लय करणें अवश्य ठरतें. मी व माझें सोडल्याशिवाय या मनाचा लयच होऊं शकत नाहीं. कारण जेथें हें मी व माझें आलें तेथें अहंकार व मन सदा जागृत असतें व समाधि अवस्थेला तर हें अगदीं वावडें आहे. म्हणून मी व माझें सोडलें पाहिजे असें जे वर आम्ही म्हटलें त्याचें इंगित हेंच आहे.
शिष्य :- मी व माझें कोणत्या अवस्थेंत सोडावयाचें ? जागेपणीं कीं निद्रेंत ?
स्वामी :- मी आणि माझें जागेपणीं सोडलें पाहिजे व सुषुप्तींतही सोडलें पाहिजे. प्रथम जागृतींत हा सोडण्याचा अभ्यास केला म्हणजे मग सुषुप्तींतही तो हळूंहळूं साधूं लागतो. मात्र हें खरें कीं, जागेपणापेक्षां सुषुप्तींत हा साधणें कठीण आहे. एक वेळ जागेपणीं हें करतां येईल पण सुषुप्तींत मन निद्रिस्त जरी असलें तरी तें मी व माझें या द्विदल बीजाची वासना धरून असतेंच. त्या वेळीं हें बीज अदृश्य व लयस्थितींत असलें तरी त्याचा प्रचंड वृक्ष जागेपणीं होऊं लागतो. अनुकूल स्थिति मिळाली कीं बीजें फोंफावतात हा निसर्गसिद्ध नियमच आहे. म्हणून वासनाबीजें अजीबात जळून गेलेलीं पाहिजेत. भाजलेल्या धान्याप्रमाणें नांवाला धान्य हें बीं, पण पेरल्यास बिलकूल उपयोग नाहीं. जळलेल्या सुंभाचा पीळ दिसतो पण ते सुंभ कशास बांधतां येईल तर शपथ. म्हणून वासनाबीजें जाळून खाक केलीं पाहिजेत. मी व माझें हींच तीं वासनाबीजें होत. हा देह तो मी व या देहाकरितां जें जें करतों, केलें अगर करणार तें माझें. हीच ती भावना.
शिष्य :- आतां मला या मी व माझें या द्विदल बीजाचें कोडें पुष्कळ उलगडलें. बरें तर मी आतां असें विचारतों कीं, ज्या अहंकारामुळें मी व माझें जन्माला येतें तो अहंकार राहातो तरी कोठें ?
स्वामी :- बरा प्रश्न विचारला. मध्यंतरीं मी हेंच सांगणार होतों. याविषयींचा ग्रंथाधार असा आहे - ‘ नेत्रस्थं जागृतं विद्यात्कंठे स्वप्नं समादिशेत् । सुषुप्तं हृदिस्थं विद्यात्तालौ तुरीयकम् ॥ ’ म्हणजे - हा अहंकार शरीरांत ठिकठिकाणीं असतो. अहंकार म्हणजे या जड देहाविषयींची ममता, ममत्व. हा अहंकार नेत्रांत असतां जागृतावस्था असते. तो लीन होऊं लागला कीं, झोंप आलीच. हा कंठांत गेला कीं स्वप्नावस्था असते. तो हृदयांत गेला कीं सुषुप्ति व तो तालुस्थानीं म्हणजे ब्रह्मरंध्रीं गेला कीं तुरीया ( उन्मनी ) अवस्था होते. पहिल्या तीन ठिकाणीं अहंकार ज्या अवस्था करतो त्या अवस्थांत त्याचें स्वरूप शुद्ध नसतें. पण तो ब्रह्मरंध्रीं जाऊन तुर्यावस्था प्राप्त झाली कीं त्याचें तात्काल शुद्ध स्वरूप बनतें. येथें मायेचें स्वरूप असतें. येथील अहंकार स्वस्वरूपाचा असतो. बाकीच्या जागेचा अहंकार मायावेष्टित असतो. म्हणूनच आरंभीं सांगितल्याप्रमाणें आंत मी व बाहेर माझें येवढें टाकलें म्हणजे झालें. आणि सुषुप्तींत मी, तूं व तुझें आणि माझें हें टाकलें पाहिजे.
शिष्य :- जागृति आणि सुषुप्ति हीं तरी खरींचना ? व यांत मिळणारें सुखही खरेंचना ?
स्वामी :- जागृति ही खरी, पण तींत जेव्हां स्वस्वरूपाचा अनुभव असेल तेव्हां मात्र. स्वप्नस्थिति ही मिथ्या, कारण तेथें स्वरूपाचा अनुभव केव्हांही नसतोच. सुषुप्ति हा व्यवहारांतील सुखाचा अनुभव आहे. सुषुप्तींत स्वरूपाचा अनुभव घडतो. कारण तसें नसतें तर मागाहून तरी त्या आनंदाची आठवण कां झाली असती ? आणि स्वप्न हा नित्य हाच बोध घ्यावयाचा कीं रोजच्या स्वप्न - सुषप्तीवरून आपण नित्य हाच बोध घ्यावयाचा कीं ह्या दोन अवस्था म्हणजे सत्य व मिथ्या स्वरूप दाखविणारे दोन गुरु होत.
शिष्य :- बरें, सुषुप्तीचा आनंद जर खरा तर तो घेतां कां येत नाहीं ?
स्वामी :- कां बरें ? तो घेतां येतोच. पण तो घेतलेला आठवणींत नसतो इतकेंच. आणखी दुसरें असें कीं तो घेत असतांहि कळत नाहीं. त्याचें आपणांस भान नसतें.
शिष्य :- सुषुप्तींत तो आनंद कां न कळावा ?
स्वामी :- तो कळत नाहीं याचें कारण असें कीं, कळण्याला कारण जी वृत्ति ती तेथें मुळीं शून्य म्हणजे लय पावलेली असते म्हणून. शिवाय दुसरें असें कीं, तो आनंद घेतांना सुषुप्तींतील अज्ञान त्यावेळीं नसलें पाहिजे. याचा अर्थ त्यावेळीं ज्ञान असेल तरच तो घेतां येईल. म्हणून सुषुप्तिकाळीं ज्ञान राहण्यासाठीं त्याचा सतत अभ्यास केला पाहिजे हा इत्यर्थ.
शिष्य :- अज्ञान - नाश कशानें होईल ?
स्वामी :- स्वरूपाचें ज्ञान वृत्तीं प्रविष्ठ ( प्रतिबिंबित ) झाल्यावांचून मूळ अज्ञानाचा नाश करूं शकत नाहीं. यास दृष्टांत सूर्यकांत मण्याचा समर्पक आहे. कल्पना करा कीं, एका बाजूला आत्मप्रकाशरूपी सूर्य व दुसरे बाजूस अज्ञानरूपी कापूस ठेवला व मध्यें वृत्तिरूप सूर्यकांत ठेवला तर त्यायोगें तें अज्ञान जळून दग्ध नाहीं का होणार ?

---------------------------

शिष्य :- मागें आपण, ज्ञानानें आत्मा मुक्त होतो म्हणून म्हटलेंत त्याचा अर्थ - तो पुन्हां जन्ममरणाचे फेर्‍यांत सांपडत नाहीं हाच ना ? कां आणखी दुसरा अर्थ आहे ?
स्वामी :- होय, तोच. ज्ञानाचे योगें आत्म्याची ये - जा म्हणजे जन्ममरण सुटतें. वास्तविक आत्मा हा बद्ध नाहींच आहे. पण मनाचे बंधामुळें आत्म्यावर बंध आहे असा भास होतो. सूर्याचे उष्णतेनें उत्पन्न झालेले मेघ सूर्याच्या आड आल्यामुळें जसा सूर्य त्यांनीं बद्धता पावल्याचा भास होतो. वस्तुत: तो बद्ध नसतोच. तसेंच येथेंही आहे म्हणून समजावें.
शिष्य :- ज्ञानानें जर मुक्तता आहे, तर आम्हांस हें सुख:दुख कां बरें भोगावें लागतें ?
स्वामी :- प्रारब्धामुळें. प्रारब्ध याचा अर्थच प्राक् - पूर्वीं आरब्ध म्हणजे हाती धरलेलें, आरंभलेलें कार्य. आपण सोडलेल्या कर्मरूप बाणाचें फळ आपल्यास मिळालेंच पाहिजे. कर्म जसें शुभाशुभ असेल त्याप्रमाणें त्याचें फल पुण्य, पाप अथवा सुख, दु:ख असेल. यांवरून जेथें कर्मच नाहीं तेथें सुख - दु:खही नाहीं. मात्र कर्म याचा अर्थ सहेतुक कर्म असाच घ्यावयाचा. जें कर्म अहेतुक तें मुळीं कर्मच होऊं शकत नाहीं. त्यास फार तर सहज कर्म म्हणावें. सहज कर्माचा केव्हांहीं बाध होऊं शकत नाहीं. मग तें सहज कर्म शुभ असो कीं अशुभ असो; कांहीं चिंता नाहीं. यासाठीं भगवद्गीतेंत म्हटलेंच आहे कीं - ‘ सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् ’ याचा अर्थ - अर्जुना ! जें कर्म सहजीं आपल्या वांट्यांस आलें तें मग अशुभ असलें तरी बेहत्तर. पण तें टाकूं नये. याचें कारण तें मुळीं बाधतच नाहीं. आगंतुक कर्म मात्र बाधतें. यास दृष्टान्त - शरीराला नाक, कान, डोळे, हात, पाय इ. टेंगळें सहज कर्मानें ( प्रकृतीनें ) आलीं असल्यानें त्यांची बाधा होत नाहीं. उलट, तीं कांहीं अंशीं सुख देण्यासच कारणीभूत होतात. पण या टेंगळांशिवाय या अवयवावर जर का आगंतुक टेंगळें अगर फोड आले तर ते दु:खदायक होतात. याचें कारण काय तर ती सहजी ( प्रकृतीनें ) आलेलीं नव्हेत. म्हणून आपण कृत्रिम तर्‍हेनें केलेलीं कर्मे प्रारब्धांत गणलीं जाऊन, तें दृष्ट सुखदु:खात्मक प्रारब्ध आपणांस भोगणें प्राप्त होतें.
शिष्य :- हें प्रारब्ध नाहीसें होण्यास काय उपाय ?
स्वामी :- हें नसावें असें वाटत असेल तर वासनाबीजांचा क्षयच केला पाहिजे. तसाच मनोनाशही झाला पाहिजे. कारण वासनेला आधार मुळीं मनच.
शिष्य :- नुसत्या ज्ञानानें वासनाक्षय व मनोनाश होत नाहीं काय ?
स्वामी :- होतो, पण तो तात्पुरता होतो. पण पर्जन्यकाळ नसतांना धुळींत पडलेलीं बीजें व कंद, वर्षाकाळाची थंड व अनुकूल हवा लागतांच पुन्हां जोरानें उठूं लागतात. म्हणून नुसतें ज्ञान होऊन भागत नाहीं, तर त्याचा सतत अभ्यास झाला पाहिजे. अभ्यासानें हें बीजें जळून जातात म्हणजे त्यांचे मोड करपून जातात. मग जरी हीं बीजें नांवाला असलीं तरी त्यापासून सृष्टि होऊं शकत नाहीं. म्हणून ज्ञानोत्तरही स्वतंत्रपणें मनोनाश व वासनाक्षयाचा अभ्यास केलाच पाहिजे. मागें एकवार आम्हीं सूर्यकांत मण्याचा दृष्टांत देऊन सांगितलेंच आहे. त्याची येथें पुनरावृत्ति करून आठवण करतों कीं, स्वरूपज्ञान वृत्तींत प्रविष्ट झाल्यावांचून व त्याचीं एकवटलेलीं प्रखर किरणें अज्ञानरूप कापसावर पडल्याखेरीज तें जळून दग्ध होणार नाहीं.
शिष्य :- नुसता वासनानाश याचा व मनोनाशाचा अभ्यास अथवा नुसता ज्ञानाचा अभ्यास केला तर चालणार नाहीं काय ?
स्वामी :- चालेल. पण वासनाक्षय, मनोनाश व तत्त्वज्ञान या तिहींचा अभ्यास एकसमयावच्छेदेंकरून केल्यास उत्तम. कारण त्यानें काम त्वरित होतें.
शिष्य :- आपण जो या तिन्ही गोष्टींचा अभ्यास एककालीं झाला पाहिजे म्हणून म्हणतां तो कसा ?
स्वामी :- तो असा कीं, अंगप्रधानरूपानें.
शिष्य :- अंगप्रधानरूपानें म्हणजे ?
स्वामी :- अंगप्रधानरूपानें याचा अर्थ - एकदा ज्ञानाला प्रधान करून म्हणजे महत्त्व देऊन वासनाक्षय व मनोनाश यांना अंगत्व प्रधानत्व देऊन ज्ञानाला अंग करणें. म्हणजे या योगें दोन्ही अंगें खंबीर होतात. याचा विशेष उलगडा हवा असेल तर तो जीवन्मुक्तिविवेक या ग्रंथावरून करून घ्यावा.
शिष्य :- आम्ही जें ऐकलें व वाचलें आहे कीं - ज्ञान, भक्ति व योग असे तीन मुक्तीचे मार्ग आहेत. त्यांत तथ्य कितपत आहे ? म्हणजे तीनही आचरलेच पाहिजेत अथवा यांतून कोणताही एक आचरला तरी चालतो ? व जर एकेकटा मार्ग चालत असेल तर त्या प्रत्येकाचें भिन्नत्व अथवा वैशिष्ट्य काय ? व शिवाय या सर्वांतून सुकर कोणता ? असे माझे एकाच प्रश्नापासून उद्भवणारे चार पांच प्रश्न आहेत, त्यांचा कृपा करून उलगडा झाल्यास बरें होईल.
स्वामी :- हे सर्व प्रश्न एकमेकांच्या गुंतागुंतीचे आहेत यांत शंका नाहीं. पण ही गुंतागुंत एकदम सुटणारी नाहीं. यांतून कांहीं पदर आधीं तर कांहीं मागून असे सुटूं शकतील. म्हणून सर्व गुंतागुंत सुटेपर्यंत या विषयाचें पूर्ण अनुसंधान राखलें पाहिजे.
शिष्य :- पाहूं. आतां हें अनुसंधान राखण्याचा प्रयत्न तर करून पाहूं.
स्वामी :- ठीक आहे. प्रथम योगांत, ज्ञानांत व भक्तींत काय काय साधतें व काय काय कमी पडतें तें पाहूं म्हणजे त्यांचे मार्ग व त्यांचें वैशिष्ट्य या दोहींचा आपोआपाच उलगडा होईल. आतां क्रमानें योग, ज्ञान व भक्ति घेऊं.
योग्याचें :- वासनेचें मूळ ज्ञानानेंच जळतें. कसें, तर मोड भाजलेल्या बीजाप्रमाणें भर्जित बीज तें हेंच. म्हणून योग साध्य झाल्यावर त्यानें ज्ञानाचा अभ्यास स्वतंत्र केला पाहिजे. योग याचा अर्थ येथें हठयोग समजावा. यांत जळलेलें कांहींच नसतें. योगीं हा फक्त पंपानेम नळींतील वायू जबरीनें वर ओढून व ती जागा निर्वात करून पाण्याचें आकर्षण होतें, तद्वत् आचार करतो. म्हणजे देहाचें आकर्षण प्राणाचें ( वासनेचें ) मनांत व मनाचा आत्म्यांत लय जबरीनें करतो.
ज्ञान्याचें :- वासना व मनोनाशाचें मूळ फक्त जळलेलें असतें. पण त्याचा दृष्ट सुखदु:खात्मक शेंडा मात्र जळलेला नसतो, म्हणजे ओला अथवा जिवंत असतो. पण तो प्रारब्ध - भोगानें नाहींसा होतोच. तथापि त्यानें वासनाक्षय, मनोनाशाचा अभ्यास शेंडा जळण्यासाठी स्वतंत्र केला पाहिजे. पण एकाच काळीं ज्ञान व मनोनाशाचा अभ्यास केल्यास हें सर्व अज्ञान आमूलाग्र नाश पावतें.
भक्तियोग्याचें :- भक्तियोगाचें पर्यवसान ज्ञानयोगांत होतें. याचें कारण - ‘ भक्तेश्च या पराकाष्ठा सैव ज्ञानं प्रकीर्तितम् ’ असें देवीगीतेंतच सांगितलें आहे. भक्तीची पराकाष्ठा म्हणजे आत्यंतिकता तेंच आत्मनिवेदन. ही नववी भक्ति होय. म्हणूनच भक्तियोग्याला ज्ञानाप्रमाणें वासनाक्षय व मनोनाशाचा अभ्यास करण्याचें कारणच नाहीं. याचें कारण हेंच कीं त्याच्या संस्काराचा व मनाचा लय आत्मनिवेदन या भक्तीमुळें परमेश्वराच्या ठायीं झालेला असल्यामुळें व तो जगतांत एका ईश्वरावांचून दुसरें कांहींच पहात नसल्यामुळें त्यास या गोष्टीचें कारण पडत नाहीं. येथें पहाणें किंवा दिसणें हीं एक वृत्ति व ती नाहीं म्हणून मिथ्या माननें ही दुसरी वृत्ति = अनुवृत्ति. ज्ञानी हा बाहेर अनुवृत्तीनें जगत् पाहातो व भक्त हा आंधळेपणानें डोळे मिटून करतो. ज्ञानी आपला लय उघड्या डोळ्यांनीं करतो. आतां भक्त व ज्ञानी हे या जगतास कसे पाहतात म्हणाल तर - भक्तयोगी प्रथम सगुणाला ( ईश्वराला ) पाहून मग जगत् पाहतो व तें मिथ्या आहे म्हणतो. अर्थात् त्यास या गोष्टीचें ज्ञान नंतर होतें, व तें भक्तीच्या पराकाष्ठेनें होऊन ईश्वरस्वरूप ज्ञान होतें. त्यानें तो निर्गुण पहातो म्हणजे याथात्म्यज्ञान होऊन मग मोक्ष मिळतो. ज्ञानी प्रथम ब्रह्मज्ञान करून घेऊन ( निर्गुणाला पाहून ) मग जगत् पहातो. सगुण पहातो. म्हणजे अन्वयपूर्वक व्यतिरेक पाहणें ज्ञान्याचें तर व्यतिरेकपूर्वक अन्वय पाहणें भक्ताचें. याप्रमाणें योगी, ज्ञानी व भक्त यांची शेवटीं एकवाक्यता होते. शेवटीं सर्व एकच. एकाच ध्येयाला ( मुक्तीला ) पोंचणारे. भक्त असो, ज्ञानी असो अगर योगी असो त्या सर्वांना कर्म हें पायाप्रमाणें प्रधान आहेच. तो भक्कम नसेल तर त्यावांचून सर्वच डळमळित समजावें. हा सर्वांना पायाभूत आहे. कर्मावांचून कांहींच नाहीं. टिळक आपल्या गीतेच्या टीकेंत तरी हेंच प्रतिपादितात, व ईश्वर तरी कर्म कोठें नाहीं करीत ? मात्र त्याचें कर्म त्यास बाधत नाहीं व आपलें मात्र आपल्यास बाधतें. याचें कारण, त्याचें कर्म निष्काम किंवा सहज असतें. सूर्याचा जसा प्रकाश पडावा त्याप्रमाणें. म्हणून तो करून अकर्ता लेप न झालेला, सगुण सृष्टि करून स्वत: निर्गुण असा आहे.
शिष्य :- भावना व भक्ति यांत अंतर काय ?
स्वामी :- भावना म्हणजे एखाद्या गोष्टीविषयीं नुसती समजूत. भक्तीची गोष्ट तशी नाहीं. तींत प्रत्यक्ष क्रिया व तादात्म्य असावें लागतें. याहीपेक्षां सोप्या तर्‍हेनें सांगावयाचें म्हणजे ‘ स्वस्वरूपानुसन्धानं भक्तिरित्यभिधीयते ’ ( विवेकचूडामणी ) आपण नेहेमीं आपल्या स्वरूपाच्या ठिकाणींच रत असणें, गढून जाणें हीच खरी भक्ति. आत्मरतीच कां म्हणाना. नुसत्या भावनेनें भागणार नाहीं, तर खरी खरी भक्ति म्हणजे स्वस्वरूपानुसंधानच पाहिजे.
शिष्य :- आम्हांस असा भक्तिपुरस्पर अभ्यास करण्यास नेहमीं व्यवहार आड येतो याला काय करावें ? व्यवहार आड येण्यानें आमचे हातून अभ्यास होत नाहीं.
स्वामी :-  व्यवहार तर संभाळलाच पाहिजे व तो संभाळूनच सर्व कांहीं परमार्थ केला पाहिजे व हा व्यवहार आमच्या गुरुमहाराजांनीं आम्हांस सुद्धां शिकविला. याचा अभ्यास त्यांनीं वर्षभर तरी करवून घेतला असेल. ‘ आधीं प्रपंच कराव नेटका । मग परमार्थ साधावा झटका ’ म्हणून व्यवहार न टाकतां दिवसा हवा तो धंदा करून, रात्रीचे नियमित वेळीं आपली ध्यान धारणा, उपासना इ. जी कांहीं असेल ती नियमित वेळीं करावी, व एकदां नियम धरला कीं तो निमित्तावांचून कधींही मोडतां नये. आणखी व्यवहारांतील एक मुख्य लक्ष्यांत ठेवण्याची गोष्ट ही कीं, उभयतांतील व्यवहाराची कधींही बाहेर परिस्फुटता न करितां त्याचा उलगडा परस्परांनीं एकांतांतच करीत असावा, तर तो व्यवहारज्ञ व तो व्यवहार केल्याचें सार्थक. समजलें ना ?
शिष्य :- होय, समजलें. मला या व्यवहाराविषयीं बरेच दिवसांपासून धास्ती वाटे. वाटे कीं, परमार्थ साधण्यास व्यवहार सर्वस्वीं सांडलाच पाहिजे व त्यावांचून तर पदोपदें नडतें. तेव्हां या दोन गोष्टी साधणार कशा म्हणून भारी चिंता वाटे. पण आतां त्याचा चांगला उलगडा झाला. मला एकदां आपल्या तोंडून, हा व्यवहार न सोडतां अभ्यास करण्यास कांहीं हरकत नाहीं हेंच पाहिजे होतें. असो. आतां या आपल्या भाषणानें माझ्या मनाचें समाधान झालें.
स्वामी :- व्यवहर नडतो कोणास ? ज्याचें मन त्यांत लिप्त असतें त्यास. जो सदासर्वकाळ व्यवहार करतां करतां आपलें स्मरण ठेवतो त्यास व्यवहार केव्हांही बाधत नाहीं. सर्व कांहीं असंग राहून कर्म करण्यांतच शहाणपण आहे व खरा योगी तोच म्हणावा. ‘ कमलपत्रमिव ’ म्हणजे पाण्यांत कमलपत्र जन्मलें असून त्यावर पाणी ठरत नाहीं म्हणजे चिकटत नाहीं इतकें सुळसुळीत व असंग असतें.
शिष्य :- परमार्थ - साधनाला ब्रह्मचर्य अवश्य आहे म्हणतात त्याचें कारण काय ? व तें ब्रह्मचर्य कसें असावयास पाहिजे ?
स्वामी :- खरेंच. परमार्थांत ब्रह्मचर्य अवश्य आहे. कारण तो हा मुळीं त्याचा पायाच. जीव कीं प्राण. ज्याचें ब्रह्मचर्य ढळलें त्याची तपश्चर्या नष्ट झाली व तो अधोगतीलाच गेला म्हणून समजावें. ब्रह्मचर्य म्हणजेच ब्रह्मपदाची प्राप्ति. ती होण्यास आपण ऊर्ध्वरेतेच झालें पाहिजे. ऊर्ध्वरेते म्हणजे वीर्याचा नाश न करतां त्याचें संरक्षण, वर्धन. असें ब्रह्मचर्य सतत १२ वर्षें कडकडीत पाळल्यानें आपल्यास एक मेधा नांवाची अत्यंत स्मरणदायी अशी विलक्षण शक्ति प्राप्त होते. जिचे योगानें आत्मज्ञान होणें सुलभ जातें. आतां ब्रह्मचर्य कसें आचरावें म्हणाल तर - स्वप्नांत अगर मनांतही विषयवासना न येणें शिवाय द्विजांनीं ब्रह्मकर्मही केलें पाहिजे म्हणजे वेदाध्ययन, शुक्लवृत्ति व अग्निकार्य हीं तीन संभाळलींच पाहिजेत म्हणजे ब्रह्मकर्म कसें आचरावें म्हणाल तर - स्वप्नांत अगर मनांतही विषयवासना न येणें शिवाय द्विजांनीं ब्रह्मकर्मही केलें पाहिजे म्हणजे वेदाध्ययन, शुक्लवृत्ति व अग्निकार्य हीं तीन संभाळलींच पाहिजेत म्हणजे ब्रह्मकर्म होतें. वेदाध्ययन = संहिता, ब्राह्मण, आरण हीं ७।७ वेळ गुरुमुखेंकरून घेणें. शुक्लवृत्ति = पर्याप्त पुरणारी ओली भिक्षा मागणें. अग्निकार्य = निदान एक समिधा तरी घेऊन मंत्र म्हणून अग्नीस आहुती देणें. हें काम पांच मिनिटांतही होऊं शकतें. कॉलेजांतील मंडळी अथवा गृहस्थ लोक आपल्यास ब्रह्मकर्मास वेळ मिळत नाहीं म्हणतात म्हणून हें अगदीं थोडक्या वेळांत संक्षिप्तांत होणारें ब्रह्मकर्म सांगितलें आहे.
शिष्य :- महाराज ! आम्हांस हें सर्व करण्यास सोवळें ओवळें राखणें अडचणीचें पडतें त्यास कांहीं उपाय आहे काय ?
स्वामी :- हो, त्यासही उपाय कां नसावा ? इच्छा आहे तेथें उपायही मिळतो. नाहींतर न कर्त्याचा वार शनिवार. ज्यास सोंवळ्याची अडचण असेल त्यानें आपली संध्या ओलेत्यानेंच केली म्हणजे झालें. यास ५ मिनिटेंही नकोत. मात्र ब्रह्मकर्म करण्याची बुद्धि पाहिजे. आतां ब्रह्मयज्ञ करणें तो पंचमहायज्ञच करावा. हा म्हणजे देव, ऋषि, आचार्य, गुरु, पितर इ. चा होय. हा केल्याशिवाय ब्रह्मकर्म पुरें होत नाहीं. कां कीं, ज्यांच्या यज्ञामुळें आजही सृष्टि बघण्याचें व तींत राहण्याचें सामर्थ्य आलें त्यांची आठवण कृतज्ञता म्हणून आम्हीं केली तरच त्यांचे आम्ही उतराई होऊं हें ध्यानांत ठेवा.
शिष्य :- असो. आतां येथेंच पुरे करावें हें बरें. कां कीं आपल्या संध्यावंदनाची वेळ झाली आहे.
स्वामी :- नारायण ! असेंच रोज येत चला व आपल्या शंका अगर कांहीं विवरण विचारणें असल्यास विचारीत चला. परवांच्या कॉलेजच्या मुलींनींही बरेच प्रश्न विचारले होते व त्यांनाही, नेहमीं असें कांहीं तरी आत्मज्ञनविषयक विचारीत जा म्हणून आम्ही सवलत दिली आहे. येतांना तुमच्या मित्रमंडळीसही घेऊन येण्यास हरकत नाहीं. जा आतां उद्यां या. आज वेळ फार झाला आहे.

------------------------

शिष्य :- जीवन्मुक्त होण्याला काय काय करायला पाहिजे हें मला एकवार ऐकावयाचें आहे.
स्वामी :- जीवन्मुक्तीला तीन अभ्यास पाहिजेत.
शिष्य :- या अभ्यासानें काय फलप्राप्ति ? व ते अभ्यास कोणते ?
स्वामी :- यानें पंच फलें मिळतात. ते अभ्यास - तत्त्वज्ञान, वासनाक्षय, मनोनाश. मात्र तिहींचा सहाभ्यास ( एकत्र अभ्यास ) झाला पाहिजे. यानें जीं फळें मिळतात ती हीं - १ ज्ञानरक्षा, २ तप:सिद्धि, ३ सर्वसमत्व, ४ दु:खनिवृत्ति, ५ सुखाविर्भाव. या अभ्यासानें पांच प्रकारचा अभ्यास होऊन शेवटीं स्वरूपसिद्धि प्राप्त होते.
शिष्य :- योग्यास काय साध्य असतें व काय नसतें ?
स्वामी :- योग्याचा मनोनाश व वासनाक्षय झाल्याचे योगानें त्यास स्वरूपसुख समाधियोगानें घेतां येतें. मात्र त्याचा वासनाक्षय व मनोनाश समूल झालेला नसून, तो तात्पुरता झालेला असतो. शिवाय त्यास ज्ञान नसले कारणानें त्याचें जन्ममरण सुटत नाहीं. यास उदाहरण - एखाद्या गारुड्यानें किती जरी समाधि लावून दाखविली तरी तो भानावर आल्यावर पैसा मागण्यासाठी हात पुढें करतोच. म्हणून योग्याच्या वासना - मनोनाशाचें मूळ ज्ञानानेंच नष्ट व्हावें लागतें. भर्जितबीजवत्.
शिष्य :- तर मग ज्ञान्याचे स्थिति कशी असते व त्यास काय अधिक करावें लागतें ?
स्वामी :- योग्य विचारलेत. सांगतो ऐका. ज्ञान्याच्या वासना, मनोनाशाचें मूळ आधींच जळलेलें असतें. पण त्याचा शेंडा मात्र हिरवागार ओला ( जिवंत ) असतो. हा पुढें प्रारब्धभोगानें, सुकून जातो.
शिष्य :- ज्ञानाचें लक्षण काय व त्याचें फल काय ?
स्वामी :- तें असें आहे. संशयभावना, असंभावना, विपरीतभावनारहितं यज्ज्ञानं तत् अपरोक्षज्ञानम् । अपरोक्षज्ञानेन कैवल्यम् । परोक्षज्ञानेन ( शब्द ) ब्रह्मलोकप्राप्ति: । १ केवल = अद्वितीय. २ शब्दज्ञानं = गुरोर्मुखात् वेदान्तश्रवणेन जायमानं ज्ञानं तत्परोक्षज्ञानम् ।
शिष्य :- ज्ञान म्हणजेच मोक्ष ना ? कां आपला मोक्ष म्हणजे आणखी निराळ्या ठिकाणीं आहे ?
स्वामी :- प्रत्यग्ज्ञान म्हणजेच मोक्ष. विज्ञान हाच मोक्ष. अथवा ‘ अज्ञानहृदयग्रंथिनाशो मोक्ष इति स्मृत: ’ ( शिवगीता ). अज्ञानमय हृदयस्थग्रंथि, तिचा तो नाश तोच मोक्ष. मोक्षाची जगा दुसरी नाहीं. हा कांहीं दुसरीकडे कोठें अगरे गांवाशिवाचे ठायीं नसतो. ‘ मोक्षस्य न हि वासोस्ति न ग्रामान्तरमेव वा ’ मोक्ष म्हणजे स्वस्वरूपाचे ठिकाणीं झालेली जी ज्ञानवृत्ति ती प्रत्यगात्म्याचे ठिकाणीं ठेवली असतां अनादिवासनाक्षय होतो व वासनाक्षय म्हणजेच मोक्ष होय. आणखी असें वचन आहे कीं, ‘ अहंममेति यो भावो देहाक्षादावनात्मनि । अध्यासोयं निरस्तव्य: ’ ( विवेकचूडामणि ) लोकवासना, शास्त्रवासना व देहवासना हांकलल्यावांचून म्हणजे या सर्वांचा अभिमान सोडल्यावांचून स्वरूपज्ञानप्राप्ति नाहीं व त्यावांचून मोक्षही नाहीं.
शिष्य :- जसें आपण ज्ञानासंबंधीं सांगितलेत त्याप्रमाणें योगासंबंधीं कांहीं स्पष्ट करून सांगाल काय  ?
स्वामी :- योगासंबंधीं थोडक्यांत उत्कृष्ट माहिती आचार्यकृत योगतारावली या ग्रंथांत दिलेली आहे. यांत अवघे २८ श्लोक आहे. तसेंच राजयोग धारणेनें कसा साधावा हेंही उत्कृष्टपणें सांगितलें आहे. त्यांत आचार्य म्हणतात कीं, या राजयोग साध्य केल्यानें सर्व कांहें साध्य होतें. त्याच्या सतत अभ्यसानें वासनाक्षय व मनोनाशही होतात. याचें कारण यांत उन्मनी अवस्था प्राप्त होते. ‘ योगिचित्तमचित्तं स्यात् ’ म्हणजे योग्याचें चित्त अचित्त होतें म्हणजे नाहीसेंच होतें. जसें मन हें अमनस्क होतें त्याप्रमाणें. चित्त साध्य झाल्यावर ( स्वाधीन झाल्यावर ) खरोखरीं पुढें फार थोडें करावयाचें उरतें. नाहींच उरत म्हटलें तरी एक वेळ चालेल. एका साधूनें तर असें स्पष्ट म्हटलें आहे कीं, ‘ थोडें आहे थोडें आहे । चित्त साध्य झालिया । ’
शिष्य :- ब्रह्मलोक प्राप्तीपर्यंत सातलोक ओलांडावे लागतात म्हणतात तर ते सर्व एकाच उपायानें येतात काय ?
स्वामी :- एकाच उपायानें नव्हे, पण निरनिराळ्या साधनांचे द्वारें निरनिराळे लोकांपर्यंत जातां येतें. उदाहरणार्थ -- (१) यज्ञादि उपासना कर्म करणारे स्वर्गलोकापर्यंत जातात व तेथें त्यांचें पुण्य सरलें कीं परत मृत्युलोकांत येतात. ‘ क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ’ (२) नामोपासक जे आहेत ते महलोंकादिप्राप्तिद्वारां क्रममुक्तीला जातात. ब्रह्मलोकापर्यंत जातात; व म्हणूनच कलियुगांत नाममाहात्म्य श्रेष्ठ आहे. कारण या मुक्तीला गेलेला खालीं येत नाहीं. (३) निष्काम बुद्धीनें यज्ञकर्मे केलीं असतां चित्तशुद्धिद्वारां ज्ञानाला साधनीभूत होतात. (४) ज्ञानोपासक जे आहेत त्यांना निराळी गति नाहीं. त्यांचे प्राण येथेंच लीन होतात. ज्ञानसमकाल मुक्त आहे. त्यास देहपातानंतर कैवल्यच. त्याला सत्यलोकादिकांचें गमन नाहीं. पण ( गमनाची जरूर आहे ) याप्रमाणें स्वानुभूतिप्रकाशांत सांगितलें आहे.
शिष्य :- तप म्हणजे काय ?
स्वामी :- तप म्हणजे आलोचन.
शिष्य :- मागें जें आपण भक्ति, योग व ज्ञान हे तीन रस्ते सांगितलेत ते सर्व कोठपर्यंत जातात ? म्हणजे त्यांचें पर्यवसान कोठें होतें ?
स्वामी :- भक्ति असो, योग असो कीं ज्ञान असो. सर्वांचें पर्यवसान एकच. एकेच जागीं. म्हणजे हे तीनही रस्ते जरी निरनिराळ्या प्रदेशांतून आलेले असले तरी एकाच चव्हाट्याला येऊन मिळतात.
शिष्य :- या सर्वांच्या साधनांत तात्त्विक भेद आहेत कीं काय ? असल्यास कोणते ?
स्वामी :- तत्त्वत: जरी प्रत्येकाच्या साधनांत भेद असले तरी त्यांतील एकांतील कांहीं साधनें दुसर्‍यांतील कांहीं साधनांशीं जुळतात. ती आतां कोठें जुळतात तें खालच्या मांडणीवरून कठून येईल. भक्ति - योग व ज्ञान यांचीं साधनें --
नवविधाभक्तीचीं        अष्टांग योगाचीं                ज्ञानाचीं
                यांत श्रवणाचा अध्याहार आहे.
१ श्रवण            १ यम                        १ श्रवण
२ कीर्तन            २ नियम                    २ मनन
३ विष्णुस्मरण         ३ आसन                    ३ निदिध्यास
४ पादसेवन            ४ प्राणायाम                    फल - स्वरूपसाक्षात्कार
५ अर्चन            ५ प्रत्याहार
६ वन्दन            ६ धारणा
७ दास्य            ७ ध्यान
८ सख्य            ८ समाधि
९ आत्मनिवेदन        फल - स्व. सा.
फल - स्वरूपसाक्षात्कार
‘ ज्ञानिभ्योपि मतोधिक: ’ ‘ बुद्धे: फलमनाग्रह: ’ मी योग्याच्या ठिकाणींही नाहीं व ज्ञान्याच्या ठिकाणींही नाहीं असें सांगतात तर दोहोंच्या ठिकाणीं आहे.
शिष्य :- ज्ञानप्राप्तीला सुलभ साधनें कोणतीं ?
स्वामी :- १ साधुसमागम, २ सच्छास्त्रश्रवण, ३ प्रतिकूलवृत्त्युत्पादन, ४ प्राणनिरोध.
शिष्य :- या सर्वांतून उत्तम कोणतें ?
स्वामी :- या सर्वात पहिल्या प्रतीचें म्हणजे जें साधुसमागम तें, व बाकीचीं साधनें उत्तरोत्तर खालोखाल. याचें कारण साधुसमागमानें सद्गुरुकृपा व सद्गुरुकृपेनें ईश्वरानुग्रह होतो व या दोहोंनीं प्रारब्धास आड आलेला जो कालाचा बांध तोही दूर होतो. एरवीं किती जरे अभ्यास केला तरी हा खात्रीनें सुटतो असें नाहीं. म्हणून सद्गुरु मिळवून त्यांच्या मार्गानें जाणें हा सर्वांत सोपा व जवळचा मार्ग होय. याचें कारण,  आपल्यास फारसे श्रम करावें न लागतां त्यांच्या ज्ञानसाधनाचा व कृपेचा फायदा मिळतो.
साधुसमागमाचा योग जर आलाच नाहीं तर त्याचा प्रतिनिधि म्हणून सच्छास्त्रश्रवण धरतां येतें. व मग शास्त्रश्रवन व त्यावर स्वत: मनन. निदिध्यास इ. हाच उपगुरु होय. शास्त्राच्या ठिकाणीं दृढ श्रद्धा ठेवून आचरण केल्यानेंही काम होतें. प्रत्यक्ष रुपये जरी नाहींत, तरी त्याबद्दल हुंडी अथवा नोट चालवून जसें काम होतें त्याप्रमाणें. याचें कारण काय तर त्या हुंडीवर मालकाची स्वत:च्या जामिनकीची सही असते. वेदशास्त्रें इत्यादिकांवर ईश्वररूपी सद्गुरूचा असा सही - शिक्का असल्यानें तीं कार्यें होतात असें जाणावें. मंत्रापासून जी सिद्धि मिळते त्याचें कारण हेंच कीं, ते ज्यांचे मुखांतून निघालेले असतात ते पुरुष त्या मंत्राचे द्रष्टे अथवा ऋषि होत. व अशा सिद्ध पुरुषांच्या वचनाला बाध न येतां त्यांचे ऋषि होत. व अशा सिद्ध पुरुषांच्या वचनाला बाध न येतां त्यांचे मंत्र हुकमी चालावेत अशाविषयीं त्या मंत्रावर त्यांचें स्वत:चें आवाहन, प्रेरणा व एक तर्‍हेची शपथ अथवा हमी असते असें म्हटलें तरी चालेल. मंत्र हीं त्यांचीं स्वयंप्रेरणेनें भारलेलीं बीदवाक्यें होत. यास बट्टा लागूं नये म्हणून त्याचे द्रष्टे त्याविषयीं जागृत असतात. मात्र त्याबरोबरच मंत्रसाधकांनीं त्या द्रष्ट्याविषयीं पूज्य भावना ठेवून तो मंत्र जपावा म्हणजे नि:संशय कार्य घडतें. (३) आतां प्रतिकूलवृत्त्युत्पादनाबद्दल सांगावयाचें म्हणजे, ज्या वासना आपले मनांत उठत असतील त्या आपल्या कार्याला बाधक असतील तर त्यांचा नाद सोडून त्यांचे विरुद्ध असणार्‍या वृत्ति व क्रिया आरंभावयाच्या. उदाहरणार्थ - आपल्यास त्यागाचा अभ्यास करावयाचा आहे. पण आंतून लोभाच्या वासना उठत आहेत. त्यावर प्रतिक्रिया म्हणून मुद्दाम दानें देऊन, त्याग अमलांत आणावयाचा; म्हणजे कालांतरानें त्यागबुद्धीची संवय, व्यायामानें जसें शारीरबल वाढतें, तशी होऊं लागते. हें एक अडमुठ्या माणसाला जसा दंड तसें, अथवा ओढाळ गाईला जसा लोढना तसें वर्तन आहे. प्रतिकूलवृत्त्युत्पादन म्हणतात तें हेंच. षड्रिपूबद्दल प्रत्येकाविषयीं हीच प्रतिकूलवृत्ति धरून त्यांना ठिकाणी आणतां येईल. अथवा याची दुसरी तर्‍हा म्हणजे हे सर्व विकार आपले ठायीं न लावितां त्याचा ईश्वराचे ठिकाणीं विनियोग करणें. उदाहरणार्थ - लोभ खरा, पण तो ईश्वराविषयींचा. क्रोध करावा तो दुर्वासनेविषयींचा. काम करावा तो ईश्वरप्रीतीचा इ. (४) आतां प्राणनिरोध हें जें साधन आहे, तें हठयोगांतील आहे. नाक तोंड दाबून दम कोंडला असतां, कुंभक केला असतां, प्राणाचा निरोध होऊन मन स्तब्ध होतें, व त्याचा लय झाला म्हणजे उन्मनी अवस्था व समाधि होते. पण वैद्य जसें अनिर्वाह पक्षी, ऑपरेशन करून रोग कापण्याकडे प्रवृत्त होतात, तसेंच हें एक साधन मनाचा रोग कापण्याचें आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP