मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ९५

शतश्लोकी - श्लोक ९५

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


किं ज्योतिस्ते वदस्वाहनि रविरिह मे चंद्रदीपादि रात्रौ
स्यादेवं भानुदीपादिकपरिकलने किं तव ज्योतिरस्ति ।
चक्षुस्तन्मीलने किं भवति च सुतरां धीर्धियः किं प्रकाशे
तत्रैवाहं ततस्त्वं तदसि परमकं ज्योतिरस्मि प्रभोऽहम् ॥९५॥

अन्वयार्थ-‘ते किं ज्योतिः वदस्व-’ प्रश्र्न-हे शिष्या, तूं कोणत्या तेजानें (प्रकाशानें) व्यवहार करितोस तें सांग. ‘इह अहनि मे रविः रात्रौ चंद्रदीपादि स्यात्-’ उत्तर-या व्यवहारांत दिवसा सूर्य व रात्रीं चंद्र, दीप इत्यादि माझीं तेजें आहेत. ‘एवं भानुदीपादिकपरिकलने तव किं ज्योतिः अस्ति’ प्रश्र्न-ठीक आहे. पण सूर्य, दीप
इत्यादिकांचें ग्रहण तूं कोणत्या ज्योतीनें करितोस? -‘चक्षुः’ उत्तर-नेत्रानें. ‘तन्मीलने च किं भवति-’
प्रश्र्न-आणि नेत्र मिटल्यावर कोणत्या तेजानें व्यवहार करितोस? ‘सुतरां धीः-’ उत्तर-सर्वथा सर्वप्रकाशक बुद्धीनें. ‘धियः प्रकाशे किं (अहं)-’ प्रश्र्न बुद्धीचा प्रकाशक कोण?
उ.-मी अहंकार. ‘तत्र एव किं अहं-’ प्रश्र्न-तुझा प्रकाशक कोण?
उत्तर-मी शुद्ध चिद्घन आत्मा. ‘ततः त्वं तत् असि-’ गु. -तस्मात् तूं तें आहेस. ‘हे प्रभो अहं परमकं ज्योतिः अस्मि’ शिष्य-हे प्रभो, मी सर्वश्रेष्ठ तेज आहें. आतां येथें तोच जीवन्मुक्त स्वतःच्या अंतःकरणात गुरुशिष्यांची कल्पना करून त्यांच्या संवादद्वारा परम ज्योतिरूप आत्म्याकडे अनुसंधान कसें ठेवितो, तें आचार्य सांगतात- गुरू प्रश्र्न करितातः- हे शिष्या, दिवसा जो तूं सर्व पदार्थांशी व्यवहार करितोस व रात्रींहि जो तुझा दिवसाप्रमाणेंच व्यवहार होतो तो कोणत्या प्रकाशानें तें मला सांग. शिष्यः-महाराज दिवसा सूर्यप्रकाशानें व रात्रीं चंद्र, दीप इत्यादिकांच्या प्रकाशानें मी व्यवहार करितों. गु  -त्या चंद्रसूयौदि वस्तुप्रकाशकांचें ज्ञान तरी तुला कसें होतें? शिष्य-महाराज, मी माझ्या नेत्रांनीं त्यांचें ग्रहण करितों; व माझें नेत्र त्या प्रकाशाच्या साहाय्यानें सर्व पदार्थ पहातात. गे - पण तूं जेव्हां नेत्र मिटतोस तेव्हां, किंवा निद्रेमध्यें तुझें डोळे जेव्हां आपोआप मिटतात तेव्हां सूर्यादि प्रकाशक व घटादि प्रकाश्य यांचा अनुभव घेणारें कोणतें तेज असतें? - नेत्र मिटले असतां अत्यन्त प्रकाशक जी बुद्धि तिच्या योगानें माझा सर्व व्यवहार होतो. गे- बरें, बुद्धीचा प्रकाशक कोण? कारण चंद्रसूर्यांप्रमाणेंच तीहि प्रकाशमय आहे असा अनुभव येत असतो; तर तिचा अनुभव घेणारा कोण? शिे - मी (अहंकार), कारण मी बुद्धीच्या सर्व चेष्टा जाणतों. (ह्याप्रमाणें शिष्यानें गुरूंना उत्तर दिलें असतां पुनः) गुरु ह्मणतातः-पण त्या अनुभवाला येणार्‍या अहंतेचा व्यवहार तूं कोणाच्या ज्योतीनें करितोस? (असा प्रश्र्न केला असतां शिष्याला स्वस्वरूपाहून अन्य तेज न दिसल्यामुळें पुनः अहंकाराला प्रकाशित करणारा मीच (आत्मा) आहें, असें त्यानें सांगितलें. हें ऐकून) गुरु ह्मणतात- तर मग तुझ्याहून अन्य दुसरा कोणताच पदार्थ खरोखर प्रकाशरूप नसल्यामुळें, व जे सूर्यादि व्यावहारिक प्रकाशरूप पदार्थ आहेत तेहि त्या आत्म्याला, तो स्वयंज्योति व ह्मणूनच प्रकाशरूप असल्यामुळें, प्रकाशित करूं शकत नाहींत, ह्मणून ती श्रेष्ठ ज्योतिच (ह्मे कार्य-कारण, प्रकाश्यप्रकाशक इत्यादि व्यावहारिक भावांशीं यकिंचित्हि संबंध न ठेवणारें तेज ) तूं (‘त्वं’पदाचा लक्ष्यार्थ आत्मा) आहेस. असा कृपाळु गुरुंनीं उपदेश केला असतां, शिष्य त्याविषयीं स्वतःशीं एकान्तांत विचार करून स्वतःचा अनुभव सांगतो- हे प्रभो, मीच ती श्रेष्ठ ज्योति आहें. याच अर्थी ‘आत्मैवास्य ज्योतिः’ इत्यादि बृहदारण्यकश्रुति आहे. येथें आचार्यांनी गुरुशिष्यसंवादरूपानें विचाराची दिशा फार मार्मिकपणें, श्रुतीच्या आधारानें, दाखविली आहे] ९५


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP