मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ७०

शतश्लोकी - श्लोक ७०

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


अल्पानल्पप्रपंचप्रलय उपरतिश्चेंद्रियाणां सुखाप्तिर्जीवन्मुक्तौ
सुषुप्तौ त्रितयमपि समं किंतु तत्रास्ति भेदः ।
प्राक्संस्कारात्प्रसुप्तः पुनरपि च परावृत्तिमेति प्रबुद्धो
नश्यत्संस्कारजातो न सक किल पुनरावर्तते यश्च मुक्तः ॥७०॥

अन्वयार्थ-‘अल्पानल्पप्रपंचप्रलयः इंद्रियाणां उपरतिः सुखाप्तिः च (इति) त्रितयं अपि सुषुप्तौ मुक्तौ (च) समं-’ स्थूलसूक्ष्मप्रपंचाचा लय, इंद्रियांची शांति व सुखप्राप्ति हीं तिन्हीहि गाढ निद्रा व मुक्ति या दोन्ही अवस्थेंत सारखींच आहेत. ‘किंतु तत्र भेदः अस्ति’ पण त्यांत भेद आहे. ‘प्रसुप्तः प्राक् संस्कारात् पुनः अपि च परावृत्तिं एतिं-’ निद्रित पुरुष जाग्रतींतील संकल्पामुळें पुनः जाग्रतींत परत येतो. ‘यः च प्रबुद्धः सः मुक्तः सन् नश्यत्संस्कारजातः सन् न किल पुनः आवर्तते-’ व जो (अज्ञान नष्ट झाल्यामुळें) ज्ञानी झालेला असतो तो मुक्त झाल्यामुळें व त्याचे सर्व संस्कार नष्ट झाल्यामुळें पुनः कधींहि (देहाभिमानाकडे) परत येत नाहीं. आतां मुक्ति व सुषुप्ति या अवस्थांचें लक्षण जरी एक असलें तरी त्यांच्यांत मोठा भेद आहे; असें या श्लोकांत सांगतात-जीवन्मुक्ति व गाढ निद्रा या अवस्थेंत सर्व स्थूलसूक्ष्मप्रपंचाचा लय, इंद्रियशांति व आनंदप्राप्ति हीं सारखींच असतात.-असें जर असेल तर मग मुक्तीकरितां इतकें प्रयास करण्याचें काय कारण?- असा कोणी प्रश्र्न करतील म्हणून आचार्य सांगतात. पण त्यांत एक मोठा भेद आहे. निद्रित पुरुष (जीव) जाग्रतींतील अनेक वासनांमुळें पुनः देहाभिमानावर येतो (देहाभिमान धरितो) व पूर्ववत् व्यवहार करूं लागतो; आणि आत्मज्ञानी पुरुष तत्क्षणींच मुक्त होत असल्यामुळें व त्याचे संचित-क्रियमाण संस्कार नष्ट होत असल्यामुळें पुनः कधींहि देहाभिमान धरीत नाहीं; आणि त्यामुळें त्याला या व्यवहारांतहि पडावें लागत नाहीं. सारांश, प्राण्याच्या अनेक संकल्पविकल्पांमुळेंच त्याला पुनः पुनः जागृति, स्वप्न, जन्म, मरण इत्यादि अवस्था अनुभवाव्या लागतात.] ७०.


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP